https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २० जुलै, २०२०

देवा, विश्व शांती!

देवा, विश्व शांती!

(१) खरं तर, देवश्रद्ध आस्तिकाकडून एवढी ईश्वर प्रार्थना पुरेशी आहे. देवा या शब्दात  जगातील सर्व देव आले, विश्व या शब्दात विश्व आले किंवा निसर्ग आला व शांती या शब्दात मनाचे मोठे समाधान आले, परमोच्च आनंद आला. वैश्विक शांती मध्ये स्वतःची शांतीही आली.

(२) पण विश्वात किंवा निसर्गात देव आहे ही फक्त श्रध्दा आहे व श्रध्दा ही फक्त भावनिक असते. ही भावना प्रत्यक्षात उतरण्यासाठी म्हणजेच श्रध्देचे रूपांतर विश्वासात होण्यासाठी देव हा प्रत्यक्षात दिसला पाहिजे.

(३) आता न दिसणाऱ्या देवापुढे विश्व शांतीची केलेली प्रार्थना ही सुध्दा मानवी मनाची चांगली भावना आहे. पण या भावनेचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत होण्यासाठी देवाशी प्रत्यक्षात संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे. तसा संपर्क निर्माण झाल्याशिवाय विश्व शांती, कल्याण योजनेत देवाने काय मदत केली पाहिजे व तुम्हाला या योजनेत काय योगदान द्यायला हवे यावर देव व तुम्ही असे दोघांना समोरासमोर बसून नीट चर्चा कशी करता येईल? पण तसे काहीच करता येत नसल्याने देव श्रध्दा व देव प्रार्थना हवेत विरून जातात.

(४) देवाची व विश्व शांती, कल्याणाची भावना अशी हवेत विरून गेल्यावर मात्र निसर्गाची प्रत्यक्ष जाणीव (जी वासनिक व भावनिक अशी संमिश्र असते) व स्वतःची बुद्धी या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. नैसर्गिक जाणिवांशी बुद्धीची मैत्री हाच मानवी जीवनाचा व मानवी प्रगतीचा पाया आहे.

(५) पृथ्वीभोवती हवेचे जे वातावरण आहे ते वजनाने हलके आहे. पण या वातावरणाला चिकटलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमीन व पाणी या दोन गोष्टी वजनाने जड आहेत. या गोष्टी एकमेकांना चिकटलेल्या आहेत.

(६) आपल्या हलक्या फुलक्या मनाची तुलना हवेशी तर आपल्या जड शरीराची तुलना जमीन, पाणी यांच्याशी करता येईल. याच विचाराने प्रेम, करूणा यासारख्या आपल्या पूरक नैसर्गिक भावनांची तुलना हवेशी तर तहान, भूक, लैंगिकता यासारख्या आपल्या मूलभूत नैसर्गिक वासनांची तुलना जमीन, पाणी यांच्याशी करता येईल.

(७) हवा, मन व मनातील भावना या तिन्ही गोष्टी वजनाने हलक्या असल्या तरी त्यांची प्रत्यक्षात जाणीव होते म्हणजे त्या प्रत्यक्षात अनुभवता येतात. कारण त्या जड असलेल्या भौतिक वासनांना चिकटलेल्या असतात. पण देवाच्या भावनिक श्रध्देचे रूपांतर मात्र प्रत्यक्ष जाणिवेत व अनुभवात होत नाही. त्यामुळे तिथे बुद्धीचे काहीच चालत नाही. देवश्रद्धेच्या भावनेत प्रत्यक्ष जाणीव, अनुभव नसल्याने या भावनेशी बुद्धीची मैत्री होऊ शकत नाही.

(८) प्रेम, करूणा या नैसर्गिक भावनांची प्रत्यक्ष जाणीव होत असल्याने, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत असल्याने या भावनांशी बुद्धीला मैत्री करता येते. बुद्धीला नुसती मूलभूत वासनांशी मैत्री करून चालत नाही तर पूरक भावनांशीही मैत्री करावी लागते व या मैत्रीतून वासना व भावना यांच्यात योग्य संतुलन साधावे लागते. असे संतुलन साधता येणाऱ्या बुद्धीला विवेकी किंवा न्याय बुद्धी म्हणतात.

(९) प्रेम, करूणा या भावनांना भूक, लैंगिकता या वासनांचे भौतिक जडत्व प्राप्त झालेले आहे. पण तसे भौतिक जडत्व देवावरील भावनिक श्रद्धेला प्राप्त होऊ शकत नाही आणि जिथे असे भौतिक जडत्व नाही म्हणजे जिथे फक्त आणि फक्त आध्यात्मिक भावना आहे तिथे बुद्धीचे काम नाही. म्हणून कितीही घोळ घोळ घोळले तरी बुद्धीला केवळ भावनेवर आधारित असलेली देव श्रद्धा पटणे ही गोष्ट शक्यच नाही. म्हणून देवाला व देवाच्या विश्व शांतीच्या निव्वळ  भावनिक प्रार्थनेला फक्त भावनेवर म्हणजे फक्त हवेवर सोडून देऊन बुद्धी त्यापासून स्वतःला मोकळी करून घेते व तिच्या नैसर्गिक कामाला लागते.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

विषाणूचा पाठलाग!

विषाणूचा पाठलाग (चेसिंग द व्हायरस)!

(१) बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाचे डार्विन या शास्त्रज्ञाने पुराव्यानिशी खूप छान विश्लेषण केले आहे. या नियमाला इंग्रजीत survival of the fittest म्हणतात. निसर्गाने पृथ्वीवर जीवन निर्माण केले आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसाने सद्या अलगीकरण व विलगीकरण या ज्या पद्धती  अंमलात आणल्या आहेत त्यातील अलगीकरण पद्धतीचा अवलंब करून निसर्गाने मानवेतर जीवन व मानवी जीवन यांचे अलगीकरण केले, पण विलगीकरण केले नाही. तसे केले असते तर काल गटारीला मांसाहारी माणसांना मटण खाताच आले नसते. निसर्गाने अलगीकरण तर केले पण बळी तो कानपिळी हा नियम दोन्ही जीवनांत समान ठेवला.

(२) काय समानता साधलीय बघा या निसर्गाने कायद्याच्या बाबतीत! पुन्हा गंमत अशी की, बळी तो कानपिळी या निसर्गाच्या कायद्याचा नियम समान पण बळाचे प्रकार वेगळे! म्हणजे मानवेतर प्राण्यांना शारीरिक बळ दिले पण त्यांना बौद्धिक बळात कमकुवत ठेवले आणि माणसांना बौद्धिक बळात सामर्थ्यशाली केले पण शारीरिक दृष्ट्या कमकुवत केले व तसे करून दोन्ही जीवनांत झेंगाट लावून दिले. बरं, निसर्ग इतकेच करून गप्प बसला नाही तर मानवेतर प्राण्यांच्या शारीरिक बळात पण त्याने दुजाभाव केला. वाघ, सिंहासारख्या प्राण्यांना हरणे, ससे या प्राण्यांपेक्षा इतके सशक्त केले की हरणे, ससे यांच्यासारख्या शरीराने अशक्त असलेल्या प्राण्यांनी त्यांचा आत्मविश्वास किंवा मनोबल वाढविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात ते कधीही यशस्वी शकणार नाहीत. एकटेच काय हे असे सगळे अशक्त प्राणी एकवटले तरी त्या अशक्त एकीचा वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र, सशक्त प्राण्यांना काही फरक पडणार नाही. बिचाऱ्या अशक्त प्राण्यांना हे सशक्त प्राणी शरीर (बाहु) बळाच्या बाबतीत चितपट करणार आणि त्यांना खाऊन टाकणार अशीच त्या डोकेबाज निसर्गाची अफलातून योजना!

(३) पण या सर्व बाहुबली प्राण्यांना पुरून उरली ती माणसाची तीक्ष्ण बुद्धी! निसर्गाने माणसाला असे बुद्धीबळ बहाल केले की त्याने भल्या भल्यांची वाट लावली. ज्या निसर्गाने हे असे बुद्धीबळ माणसाला प्रदान केले ते बुद्धीबळ नंतर निसर्गालाही भारी पडू लागले. मग निसर्ग व माणूस या दोघांतच मोठा खेळ सुरू झाला. मानवी बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी मग निसर्गाने काहीना काहीतरी आव्हाने निर्माण करायला सुरूवात केली. निसर्गाने अशी आव्हाने निर्माण करायची आणि मग मानवी बुद्धीने ती परतून लावायची असा तो जबरदस्त खेळ सुरू झाला. कोरोना विषाणूची सद्याची दहशत हा याच खेळाचा भाग आहे. माणसाच्या बुद्धीला घायकुतीला आणायचे निसर्गाचे केवढे मोठे हे षडयंत्र? माणसा माणसांमध्येच भांडणे लावून दिली निसर्गाने! अमेरिका चीनला दोष देतेय तर चीन अमेरिकेला भीक घालत नाही. तर मध्येच जागतिक आरोग्य संघटना रोज नवे नवे फतवे काढतेय!

(४) लोकमतच्या दिनांक १८ जुलै, २०२० च्या अंकात छापून आलेली एक बातमी मी वाचली. ही बातमी खूप छोटी आहे पण तिचा अर्थ खूप मोठा आहे. बातमी अशी आहे की, स्पेनच्या एका शेतात ८७ मिंक प्राण्यांना (जे सशासारखे दिसतात) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने स्पेनचे सरकार तिकडच्या ९२७०० मिंक प्राण्यांना कसलीही दयामाया न दाखवता ठार करणार आहे. आता ही प्रचंड मोठ्या प्रमाणातील प्राणी हिंसा होत असताना तिकडचे काय आणि इकडचे काय प्राणी मित्र काहीही करू शकणार नाहीत. कारण मानवी बुद्धी ही मानवेतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याने ती शेवटी मानवाचे अस्तित्व कसे टिकेल याचाच विचार करणार. आला ना शेवटी निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम पुढे! वासना व भावना यात संतुलन साधणाऱ्या बुद्धीला न्याय किंवा विवेकी बुद्धी म्हणतात. केला ना न्याय याच बुद्धीने मिंक प्राण्यांचा!

(५) कोरोना विषाणूचा हा असा पाठलाग सुरू आहे मानवी बुद्धीकडून! इंग्रजीत या मोहिमेचे "चेसिंग द व्हायरस" असे नामकरण केले गेले आहे. याच मोहिमे अंतर्गत आता पालिका कर्मचारी पोलीस बळ (बळी तो कानपिळी हा नियम आलाच ना शेवटी) सोबत घेऊन घरोघरी अँटीजेन चाचणी किटस घेऊन फिरणार व या विषाणूचा "चेसिंग द व्हायरस" या मोहिमे अंतर्गत जोरात पाठलाग करणार. समजा या अँटिजेन मशीनने चहा व खारीबटर खाऊन घरामध्ये लॉकडाऊन करून अगदी व्यवस्थित जगणाऱ्या माझ्या सारख्या ६४ वर्षाचे वय असलेल्या माणसाला चुकून कोरोनाग्रस्त म्हणून घोषित केले तर मग आमची रवानगी सरळ कुठे होणार तर त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये का तर ती अँटिजेन मशीन तशी सांगते म्हणून!

(६) हल्ली माणसाचा स्वतःपेक्षा अशा यंत्रांवरच विश्वास जास्त वाढलेला दिसतोय. म्हणून तर आता निवडणूकांत ईव्हीएम मशिनचा वापर अगदी डोळे झाकून केला जातो. आता तर ते अॉनलाईन शिक्षण, अॉनलाईन व्यवहार पुढे आलेत. माणूस आता हळूहळू यंत्रवत होऊ लागलाय. माणसाची नैसर्गिक बुद्धी हळूहळू यंत्राच्या कृत्रिम बुद्धीकडे गहाण पडू लागलीय.

(७) मी तर आता वयानुसार किंवा कदाचित त्या कोरोनामुळे सुद्धा मरण्याची शक्यता आहेच. पण मरताना या गोष्टी बघवत नाहीत की, लोक कोरोना झालेल्या माणसांना वाळीत टाकतात. इतकेच काय पण कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर त्या व्यक्तीचे फार जवळचे नातेवाईक सुध्दा त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मग त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार परस्पर सरकारी कर्मचाऱ्यांकडून किंवा स्वयंसेवी संस्थांकडून केला जातो. असे मृतदेह बेवारस होतात, पण अशा व्यक्तीने मागे ठेवलेल्या संपत्तीवरील वारसा हक्क मात्र ही नातेवाईक मंडळी सोडत नाहीत. कोरोनामुळे मृत झालेल्या व ज्याचा मृतदेह बेवारस ठरवला जातो अशा माणसाची संपत्ती सरकारजमा करायला मात्र ही नातेवाईक मंडळी तयार होत नाहीत. तो वारसा हक्क त्यांना हवाच असतो. खरंच, या कोरोनाने जगाची खरी रीत व सत्य परिस्थिती दाखवून दिली. माणसाला निसर्ग या काय गोष्टी दाखवून राहिलाय व का याचेच माझ्या बुद्धीला आश्चर्य वाटतेय!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.७.२०२०


रविवार, १९ जुलै, २०२०

बुद्धीला प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते!

बुद्धीला प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते!

(१) बुद्धीला प्रश्न पडतात तेंव्हा ती त्या प्रश्नांचा मागोवा घेत त्यांची उत्तरे शोधते व अशी उत्तरे शोधत आयुष्याचे धडे शिकत जाते. आपली ज्ञानेंद्रिये आपल्या मेंदूतील बुद्धीला माहिती पुरवतात तर आपल्याला होणाऱ्या वासना, भावना यांच्या जाणिवा याही आपल्या बुद्धीला माहिती पुरवतात. माहिती हे बुद्धीचे खाद्य असते. हे खाद्य मिळाले नाही तर बुद्धी उपाशी राहून मरेल. हे खाद्य बुद्धीचे कच्चे अन्न असते.  ते खाण्यास म्हणजे ज्ञान या अर्थाने वापरण्यास योग्य होण्यासाठी बुद्धी त्यावर प्रक्रिया करते. प्रश्न सुरू करून बुद्धी त्या प्रक्रियेचे इंजिन सुरू करते. बुद्धीला प्रश्न पडणे हेच बुद्धीच्या जिवंत पणाचे लक्षण असते. बुद्धीला जर प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते. शालेय शिक्षण हे मूलभूत प्रश्नोत्तरांचे शिक्षण असते तर कॉलेज शिक्षण हे गंभीर प्रश्नोत्तरांचे शिक्षण असते. निसर्ग हीच मोठी शाळा व हेच मोठे कॉलेज आहे. म्हणून औपचारिक शाळा, कॉलेजात न शिकणारी माणसेही निसर्गाच्या शाळा, कॉलेजात सतत अनौपचारिक शिक्षण घेत असतात.

(२) मी कमला मिल या कापड गिरणीच्या खर्च (कॉस्टिंग) खात्यात कारकून म्हणून कामाला लागलो तेंव्हा मी कॉमर्स शाखेचा पदवीधर (बी.कॉम.) होतो. परंतु कापसावर होणारी प्रक्रिया, तो प्रक्रिया खर्च काय असतो याची बिलकुल माहिती नव्हती. म्हणजे बी.कॉम. पदवीतून मिळालेले माझे ज्ञान जुजबी होते. मग हळूहळू कॉस्टिंग खात्याच्या वरिष्ठांची बोलणी खात कापूस खरेदी खर्च, कापसापासून धागा बनविण्याचा खर्च, धाग्यापासून कापसाचे तागे बनविण्याचा खर्च, मग त्या ताग्यांची धुलाई, रंगरंगोटी, डिझाईन वगैरे करण्याचा खर्च, या संपूर्ण प्रक्रियेत घाम गाळणाऱ्या कामगारांचा पगार, मग या सगळ्या खर्चांची गोळाबेरीज करून त्यावर केंद्रीय कर म्हणजे उत्पादन शुल्क (एक्साईज)अधिक केल्यावर येणाऱ्या एकूण कापड खर्चात कापड गिरणी मालकाचा नफा अधिक करायचा व मग कापडाची विक्री किंमत काढायची. या विक्री किंमतीवर मग पुढे कापड दूकानदार विक्री कर लावून ग्राहकाला कापड विकायचे. अशी ती लांबलचक प्रक्रिया होती. तिचे ज्ञान त्या कॉस्टिंग खात्यात कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यावरच मला प्राप्त झाले. बी.कॉम. पदवी नसलेले काही वरिष्ठ लोक त्या खात्यात माझे बॉस होते कारण त्यांना त्या  कामाचे प्रॕक्टिकल ज्ञान होते.

(३) नंतर मी बऱ्याच कंपन्यांत नोकऱ्या केल्या. तिथे विविध प्रकारचे ज्ञान मिळविले. मग कंपनी  सेक्रेटरी (इंटर) पूर्ण करून कंपनी सेक्रेटरीला मदतनीस म्हणून सेक्रेटरीयल प्रॕक्टिसचेही थोडे काम केले. मग पुढे एलएल.बी. करून वकिली करीत जगाचेही भरपूर ज्ञान मिळविले. परंतु माझ्या बुद्धीने मिळविलेले हे ज्ञान खूपच अपुरे आहे. म्हणून तिला सतत प्रश्न पडतात मग ते प्रश्न विज्ञानाचे असोत, धर्माचे असोत, निसर्गाचे असोत, देवाचे असोत, अर्थकारणाचे असोत, राजकारणाचे असोत, कलेचे असोत की क्रिकेट  सारख्या खेळांचे असोत. माझ्या बुद्धीवर या सर्व प्रश्नांचा सतत भडिमार चालू असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न माझी बुद्धी सतत करीत असते.

(४) खरं तर, सगळ्यांनाच असे प्रश्न पडले पाहिजेत. तुम्ही ते विचारले पाहिजेत. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा एकच गुरू सापडू शकत नाही. कारण निसर्गाच्या सर्व शाखांचे पूर्ण ज्ञान असणारा गुरू या जगात असूच शकत नाही. म्हणून मी कोणालाही गुरू करून घेतला नाही. बाकी आयुष्यात बरेच गुरू भेटले ज्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या. पण माझा खरा गुरू एकच आणि तो म्हणजे निसर्ग. त्या निसर्गात देव आहे असे मानून मी त्या देवालाच उलट प्रश्न करतो. आता देवाला मी असे उलट प्रश्न केल्यावर काहीजण उगाच भावनिक का होतात हेच मला कळत नाही. आपण ज्याच्या वर प्रेम करतो, ज्याच्या वर विश्वास टाकतो त्यालाच प्रश्न करणार नाही तर मग कोणाला करणार? लहान मुले आईवडिलांनाच प्रथम प्रश्न विचारणार ना! मग मी वयाने कितीही मोठा झालो, जगातील काही जुजबी ज्ञान मिळवले तरी निसर्गापुढे म्हणा किंवा निसर्गातील देवापुढे म्हणा मी लहान मूलच ना!

(५) तुम्हीच निवडून दिलेल्या तुमच्या सत्ताधारी लोकांना उलट प्रश्न केले नाहीत तर ते तुम्हाला गृहीत धरतील, तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुमच्या बोडक्यावर बसतील. म्हणून त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. कारण आपण त्यांना आपले मायबाप समजतो. त्यांनीही मुले असे प्रश्न का करतात म्हणून रागावू नये. पण काही मुले खोडकर असतात. ती उगीच चेष्टा करायची म्हणून काहीतरी प्रश्न कुत्सितपणे विचारत राहतात. हे असले उद्योग खरेच चुकीचे आहेत. काही माणसे उगाच वाद घालायचा म्हणून केवळ वादासाठी वाद घालतात. हे तर अतिशय निंदनीय आहे.

(६) साधारण साठी ओलांडली की माणसाचा मृत्यूकडे प्रवास सुरू होतो. माझे वय सद्या ६४ चालू आहे. म्हणजे या प्रवासात मी पुढे येऊन पोहोचलोय. पण माझ्या बुद्धीला सतत प्रश्न पडतच राहतात. समाजमाध्यमांवर माझ्या  लेखांतून, छोट्या छोट्या विचार वाक्यांतून मी या प्रश्नांना उघड करतो. माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो. पण बरेच प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतात. म्हणून माणूस हा मरताना ज्ञानाच्या बाबतीत अतृप्त राहूनच मरतो. मानवी बुद्धी ही जिज्ञासू असते म्हणून ती सतत प्रश्न करते. तिला प्रश्न विचारू द्या! तुम्ही जर तिला प्रश्न विचारताना अडवले, रोखले तर ती गंजून जाईल!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.७.२०२०

शनिवार, १८ जुलै, २०२०

लज्जा!

देवाला पण लाज वाटत असेल का?

लज्जेची भावना ही माणसातच आहे. जनावरे न लाजता त्यांची नैसर्गिक क्रियाकर्मे बिनधास्त उरकतात. पण माणूस मात्र काही नैसर्गिक गोष्टी करायलाही लाजतो. हो, पण म्हणून तर तो माणूस आहे ना! नाहीतर जनावरांत व माणसांत काही फरकच राहिला नसता. आता ही लज्जेची भावना देवाने माणसात घातली म्हणावी तर पुन्हा प्रश्न निर्माण होतो की ही लज्जेची भावना देवाने माणसात पूर्णपणे का नाही घातली? ती भावना अर्धवट घातल्यामुळे  काही माणसे निर्लज्जपणे वागतात. कधीकधी ही निर्लज्ज माणसे त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस करतात. माणसांचा हा निर्लज्जपणा तो देवही खुशालपणे बघत रहातो हे मात्र विचित्र वाटते. मग हा निर्लज्जपणा एका बाजूने म्हणजे नुसत्या माणसाच्या बाजूने नसून तो दुसऱ्या बाजूने म्हणजे देवाच्या बाजूनेही आहे हे उघड होते. देवाला जर अशा गोष्टींची लाज वाटली असती तर त्याने त्यांचा बंदोबस्त केला असता ना! माणूस अर्धा लाजरा, अर्धा निर्लज्ज आहे तर मग माणसाला असा अर्ध्या अक्कलेचा बनवणारा तो देवही तसाच आहे काय? खरंच माणसाला असा अर्धा लाजरा बनवला याची देवाला लाज वाटत असेल काय?

-ॲड.बी.एस.मोरे© १९.७.२०२०

मै हूं ना!

माझ्या हातात सर्वोच्च सत्ता आली आणि मी कोरोनाला पळवून लावले!

काल असेच एक भारी स्वप्न मला पडले. माझ्या हातात अचानक सर्वोच्च सत्ता आली. मग मी जनतेला रेडिओ व टी.व्ही. वरून एक भाषण ठोकले. ते भाषण एकंदरीत असे होते.

"प्रिय नागरिक बंधू, भगिनींनो! अगोदर तुम्ही हे लक्षात घ्या की कोरोना विषाणूवर औषध नाही. पण हा विषाणू घशाला व फुफ्फुसाला किती त्रास देतो, तो कोणत्या माणसावर हिंसक हल्ला करून ठार मारतो व कोणत्या माणसाला फक्त अस्वलासारख्या गुदगुल्या करून सोडून देतो याची मी गोड बोलून चीनकडूनच माहिती काढून घेतली आहे. पण चीनवर माझा विश्वास नसल्याने त्याला क्रॉस चेक करण्यासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षाला तरी कोरोनाचे ज्ञान आहे का याची चाचपणी करून घेतली आहे. पण ही चौकशी करीत असताना मनातून दोघांनाही शिव्या हासडून शेवटी मी आपल्याच संशोधकांशी व मोठ्या डॉक्टरांशी चर्चा करून मूलभूत माहिती काढली आहे. हे सर्व काम मी दोन दिवसांत उरकले. मग मी तिसऱ्या दिवशी परदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांना भारतात येऊच दिले नाही. त्यांचा विमानतळांवरच मस्त बंदोबस्त केला. खाणे पिणे, वैद्यकीय सुविधा सगळ्या गोष्टी त्यांना विमानतळांवरच व तसेच त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या थ्री स्टार, फोर स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलात केल्या आहेत. पण परिस्थिती थोडी  गंभीर असल्याने तुम्ही यापुढे फक्त आठ दिवस लॉकडाऊन मध्ये रहायचे आहे. तुम्ही आता मास्क व शारीरिक अंतर ठेऊन काम करण्याची संस्कृती आत्मसात करायला हवी. जी माणसे वृद्ध आहेत, न्यूमोनिया वगैरे होऊन गेलेल्या आजारांनी ज्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार आहेत त्यांना कोरोना विषाणू ठार मारू शकतो. अशा लोकांनी मात्र आठ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावरही घराबाहेर पडायचे नाही. बाकी ठणठणीत असलेल्या माणसांनी बिनधास्त मास्क लावून बाहेर पडायचे. पण शारीरिक अंतराचा नियम मोडायचा नाही. तसे केल्यास पोलीस त्यांना अटक करून सरळ जेलमध्येच रवानगी करतील. राखीव ठेवलेल्या काही विषाणूरोधक इंजेक्शन्सचा उपयोग फक्त १० ते २०% गंभीर  रूग्णांवरच केला जाणार आहे. गंभीर रूग्ण कोण तर जुनाट आजारांनी अगोदरच प्रतिकार शक्ती कमकुवत झालेले रूग्ण ज्यांचे मूळचे आजार शरीरात कोरोना विषाणू घुसला की बळावतात. बाकीच्या ठणठणीत माणसांच्या शरीरात चुकून किंवा  निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणू घुसलाच तर त्यांच्या मजबूत प्रतिकार शक्तीला, सशक्त मनोबलाला मदत म्हणून फ्लू वर असलेली औषधे देऊन त्यांनी घरी राहूनच बरे व्हायचे आहे. खाजगी रूग्णालयात जाऊन त्यांचा धंदा वाढवायचा नाही. सर्व सरकारी रूग्णालयांत, प्राथमिक आरोग्य केंद्रात फ्लूच्या गोळ्यांची, प्रतिकार शक्ती आणखी वाढवून शरीरातून कोरोना विषाणूची क्रियाशीलता संपवणाऱ्या  टॉनिक्सच्या गोळ्यांची व्यवस्था केलेली आहे. तेंव्हा या कोरोनाला बिलकुल घाबरायचे नाही. आठ दिवसांनी लॉकडाऊन उठला की मास्क लावून शारीरिक अंतर नियमाचे पालन करीत व अधूनमधून हातावर सॕनिटायझर शिंपडत तुम्ही  बिनधास्त कामाला जायचे आहे. उद्योगधंदे फक्त पहिले आठ दिवसच बंद राहतील. नंतर ते चालू होतील. हे सर्व नियमबद्ध कामकाज चालू असताना या विषाणूवर लस शोधण्याचे प्रयोग चालूच राहतील. पण लस कधी येईल याचा भरवसा देता येत नसल्याने उगाच ती गोष्ट डोक्यात घेऊन फिरू नका. कोरोना शरीरात घुसू नये म्हणून काळजी घ्यायची आहे. पण चुकून घुसलाच तर त्याची गच्छंती साध्या फ्लूच्या गोळ्यांनीही होते. पण हे फक्त ८०% ठणठणीत लोकांच्या बाबतीत होऊ शकते. बाकी २०% कमकुवत लोकांना धोका आहेच. त्यांनी जास्त काळजी घ्यायची आहे. पण त्यांच्यासाठीही ती विषाणूरोधक इंजेक्शन्स तयार ठेवलेली आहेतच व सोबत अॉक्सिजन, वेन्टिलिएटर्सची सोय आहे आणि ती सुध्दा सरकारी रूग्णालयांत! या २०% लोकांना या सरकारी रूग्णालयांत सहज प्रवेश मिळेल. बाकी ८०% ठणठणीत लोकांना रूग्णालयात अॕडमिट व्हायची गरजच भासणार नाही. आठ दिवस दम काढा. या आठ दिवसांत विमान तळावर असलेल्या भारतीयांनी व तुम्हीही मास्क वगैरे नियम पाळून संचार करायचा आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय करायचे आहेत. बाकी काय मी आहेच ना (मै हूं ना)"! 

असे हे लय भारी स्वप्न मला पडले. यातले खरे काय, खोटे काय हे मला माहित नाही. पण मला हे असे स्वप्न पडले हे मात्र खरे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.७.२०२०

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

Reality is different in advocacy!

REALITY IS DIFFERENT IN ADVOCACY!

(1) In a society where the major population is poor and uneducated, advocacy has a little role to play as earning profession at least for the person coming from poor & uneducated family. Yes, it is true that Dr. B.R. Ambedkar became law in his own by becoming an architect of Indian constitution inspite of being born in socially backward class family & suffering all kinds of hardship, but it is also true that he did not make his advocacy as profession of his own  livelihood. He fought throughout his life by all legal means for upliftment of lower class without bothering about his own income and safety. He thus made advocacy a truly noble profession.

(2) But today there are thousands of advocates (of which I am one) coming from poor and uneducated families who dare to enter into legal profession with attraction of dignity and high income earned by few top advocates from legal profession. It is dangerous for persons coming from poor and uneducated families to make this profession as means of earning livelihood. I can tell this by my own experience (which some advocates may criticise) that it is very very difficult to survive in this profession at least in India if you are making your poor family totally dependent on the income to be earned from legal profession. This is because the reality is different in advocacy in a country like India having large number of population poor and uneducated.

(3) There are two basic points to be seriously noted in this connection.  First point is that advocacy has not become an essential service in a country like India like marketing of essential commodities such life essential food, medical and police service. The poor and uneducated people in India are less aware even about their basic human rights and they are habitual to digest injustice. They prefer settling their disputes with the help of local agents who act as settlers. These settlers are not qualified lawyers, but they are  trained in settling disputes by using some pressure of local panchayats or politicians out of court and get such settlements documented by executing small affidavits before local notaries or small agreements registered with local registrars of documents. The poor people avoid going to courts because of inability to pay high advocates fees and long delay in judicial process. This fact has proved that advocacy is not an essential service on which people should remain dependent on mass scale. It is needed by few rich businessmen and the few powerful politicians who engage services of top lawyers of country by paying their very high fee.

(4) If advocacy does not make itself  essential service, then does it make it as entertainment service? That is not at all possible because the law is a serious subject & not a subject matter of entertainment. The poor people will buy tickets and will go to watch movies in cinema halls instead of going to advocates. The law and its legal maxims, principles  do not attract poor & uneducated mass. The term justice is not the same for rich class and poor mass. It is very very different for these two categories. As aforesaid, rich hire top advocates and poor engage local settlers. So where will many advocates coming from poor and uneducated families go? They just struggle for their basic survival. Even the workers having full time jobs can be said to be in a better position and more secured than these poor advocates.

(5) The foundation of this article is based on two main points which are essential for learning by such poor advocates viz. advocacy is not an essential service in the countries like India and advocacy is not at all entertainment art anywhere in the world. I had decided in last week to remain away from social media till the present corona lockdown gets lifted completely making people free to attend their regular jobs with masks & social distancing code but I could not sleep yesterday with a serious thought that I have made a wrong choice of making advocacy as means of earning my livelihood  without proper study in advance. But how could a textile mill worker's son i.e. me make such study well in advance is also a big question. The purpose of this article based on my personal experience is not to lower the dignity of noble profession of advocacy and not to discourage newcomers who are enthusiastic about entering into this profession, but to caution those coming from poor & uneducated families with the fact that reality is different in advocacy so that those who want to come in this noble and dignified profession can come well prepared. Thank you!

-Adv.B.S.More©18.7.2020

मर्यादित संपर्क!

मोठी माणसे, मोठा संपर्क!

जोपर्यंत लोक तुमच्या उच्च श्रेणीच्या ज्ञानाला, संशोधनाला व अभिव्यक्तीला पैसा व सन्मान या रूपात उच्च किंमत देत नाहीत तोपर्यंत लोकांशी उगाच संपर्क वाढविण्यात अर्थ नाही. जगात अशी बरीच उदाहरणे आहेत की ज्यात छोट्या गोष्टी करून माणसे मोठी झाली आहेत व होत असतात. खरं तर, जगातील हे फार मोठे आश्चर्यच आहे व अशा आश्चर्याबरोबर जगायला प्रामाणिक माणसांनी शिकायला हवे. जर पैसा व सन्मान छोटा तर मग संपर्क का मोठा? असा मोठा संपर्क मोठ्या लोकांनाच करू द्या! जगाने जर तुम्हाला मर्यादित ठेवायचाच विडा उचलला असेल तर अशा जगाशी संपर्क मर्यादित ठेवणे हेच योग्य होय! इतकेच नव्हे तर तुम्ही जर देवावर श्रध्दा ठेवणारे आस्तिक असाल व त्या देवाच्या व्यवस्थेत जर तुम्हाला योग्य न्याय मिळत नसेल तर त्या देवाशीही संपर्क मर्यादित ठेवणेच योग्य होय!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.७.२०२०