https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

जैविक साखळी!

जैविक साखळी तोडणे अनैसर्गिक!

प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उदात्त भावना निसर्गाने फक्त आंतर मानवी संबंधातच का बऱ्या निर्माण केल्या असाव्यात? माणूस हा पर्यावरणातील जैविक साखळीत अगदी वरच्या टोकावर उत्क्रांत झाल्याने असेल का असे? कारण इतर जैविक साखळीत जीवो जीवस्य जीवनम व बळी तो कानपिळी हाच निसर्गाचा कठोर नियम आहे. ही जैविक साखळी तोडणे अनैसर्गिक आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
निसर्गाची नवलसाखळी व वन्यजीव सुरक्षा हे दिनांक ५.९.२०२० च्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेले दोन लेख.

करोना देवी अंधश्रद्धा!

केवढी मोठी ही अंधश्रद्धा!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका शहरात चक्क करोना देवीची स्थापना केली. जगातील शास्त्रज्ञ करोना विषाणूवर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि इथे काही जण चक्क करोना देवी स्थापन करून तिची अंधभक्ती करायला लोकांना उद्युक्त करीत आहेत! बापरे, केवढी मोठी ही अंधश्रद्धा!

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
लोकसत्ता वृत्तपत्र बातमी दिनांक ३.९.२०२०

पर्यावरण फ्रेंडली गणेश मूर्ती!

याचसाठी का केला होता अट्टाहास?

धर्म संस्कृती व निसर्गाचे पर्यावरण यात संतुलन  साधता आले पाहिजे. प्लास्टर अॉफ पॕरिसच्या गणेश मूर्त्या पाण्यात नीट न विरघळल्याने तिथे जलप्रदूषण होऊन पाण्यातील प्राणवायू कमी होतो व पाण्यातील जीवसृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते असे निसर्गाचे विज्ञान सांगते. त्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे शाडूच्या गणेश मूर्त्या! पण हा पर्याय टाळला जातो. मग प्लास्टर अॉफ पॕरिस च्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याची कल्पना पुढे आली. विसर्जनानंतर प्लास्टर अॉफ पॕरिसचा कृत्रिम तलावांतील साचलेला गाळ जर पुन्हा खाडीच्या पाण्यात टाकायचा असेल तर मग कृत्रिम तलावांचा उपयोग काय? गणेश मूर्त्यांचे विसर्जन सरळ खाडीच्या पाण्यातच करायला मग हरकत का? हे असे झाले की, लोकांना ओला कचरा, सुका कचरा दोन वेगवेगळ्या डस्टबिन्स मध्ये जमा करायला सांगायचे व नंतर पालिकेच्या घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी ओला कचरा व सुका कचरा एकत्र करून डम्पिंग ग्राऊंडवर किंवा समुद्रात टाकायचा. मग हा व्यर्थ खटाटोप कशासाठी? याचसाठी का केला होता अट्टाहास?

-ॲड.बी.एस.मोरे©११.९.२०२०

संदर्भः
लोकसत्ता वृत्तपत्रातील बातम्या दिनांक १ व ३ सप्टेंबर, २०२०

वेळ व शक्ती वाया चालली!

वेळ व शक्ती वाया चालली!

या फेसबुकवर मित्र असलेल्या मंडळींपैकी किती जण हाय प्रोफाईल श्रीमंत जीवन जगत आहात? मला वाटते आपण बहुतेक जण गरीब व मध्यमवर्गीय आहोत. आपल्या पैकी कोणाचा सेलिब्रिटी लोकांकडे असतो तसा ३००० चौ. फुटांएवढा किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाचा  आलिशान बंगला, फ्लॅट व त्यासोबत तेवढेच मोठे कार्यालय मुंबईत आहे काय? आपण त्या लोकांएवढ्या चैनी करीत आहोत का? तसेच आपण त्यांच्या सारखे करमणूक नावाची चैन असलेल्या उद्योगधंद्यात सतत व्यस्त राहून लाखो, करोडो रूपये कमवत आहोत का? मला वाटते आपल्यापैकी कोणीच एवढे मोठे नाही आहोत. मग आपण का बरे या लोकांचे तथाकथित मोठे विषय उगाच चघळत बसलो आहोत? आपल्याला गेले पाच ते सहा महिने घरात कोरोना लॉकडाऊनने अडकवून ठेवले आहे. आपली रोजीरोटी सद्या पूर्ण बंद आहे. आपल्यापैकी काही माणसे घरी बसून कामधंदा नसल्याने तणावाने जग सोडून गेली आहेत. आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या या अत्यावश्यक विषयांना ही मोठी माणसे किती महत्व देतात? मग आपण त्यांच्या विषयांना एवढे महत्व का देत आहोत? आपण का बरे प्रभावित होत आहोत त्यांच्या विषयांनी? त्यांची तथाकथित मोठी कर्मे त्यांना तसलीच फळे देत असतील तर आपण आपल्यासाठी त्रासदायक असलेली ती फळे का चिवडीत बसलो आहोत? याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यांवर, कानांवर याच बातम्यांनी मिडियाकडून सतत होत असलेला वर्षाव! बघा बाबांनो, नीट विचार करा या गोष्टीचा की आपण आपला वेळ व आपली शक्ती या आपल्यासाठी त्रासदायक व निरर्थक असलेल्या गोष्टींवर वाया तर घालवत नाही आहोत ना?

-ॲड.बी.एस.मोरे©१०.९.२०२०

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

गेले ते दिवस, गेला तो आनंद!

गेले ते दिवस, संपला तो आनंद!

मुंबईतील या इमारती वजा चाळी म्हणजे मराठी माणसांचा जीव! अनधिकृत झोपटपट्ट्यांत मराठी माणूस तसा कमीच. मुंबईत अनधिकृत झोपडपट्ट्या कोणी व कशा वाढवल्या, तिथे कोणाचा जास्त शिरकाव झाला व तिथे पुढे एस.आर.ए. योजना राबवण्यात आल्यावर त्या योजनेचा मुंबईतील मराठी माणसांना किती फायदा झाला हा इतिहास वेगळाच. मराठी माणूस हाच मुंबईतील खरा अधिकृत माणूस. मराठी माणसांच्या मुंबईतील या इमारती वजा चाळींतून मराठी माणसांची संस्कृती स्थिरावली, वाढली. मुंबईतील चाळींतील अधिकृत मराठी वास्तव्याला व संस्कृतीला ग्रहण लागले आणि मग मराठी माणूस मुंबई बाहेर वसई-विरार, कल्याण-बदलापूर, वाशी-खारघर अशा दूरच्या  ठिकाणी लांब फेकला गेला. या मराठी चाळींत  मित्रांच्या घरी जाऊन गणपती, दसरा, दिवाळी सणात भेटीचा जो आनंद मी घेतलाय त्याचे वर्णन करता येणार नाही. गेले ते दिवस, संपला तो आनंद!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.९.२०२०

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

वकिली व्यवसायातील मक्तेदारी?

वकिली व्यवसायात ठराविक वकिलांचीच मक्तेदारी निर्माण झालीय काय?

मान्य आहे की वकिली, डॉक्टरकी हे विशिष्ट शैक्षणिक पात्रतेवर आधारित असे फार उदात्त व्यवसाय आहेत. फायदा समोर ठेऊन चालणारे ते उद्योगधंदे नव्हेत. पण मग या व्यवसायांचेही स्वतंत्र प्रश्न आहेत. वकिली व्यवसायाचे योग्य नियमन करण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी राज्य बार कौन्सिल व राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय बार कौन्सिल आहे. पण या व्यवसायाचे नियमन करणे म्हणजे व्यावसायिक निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून वकिलांवर शिस्तभंग कारवाई करणे फक्त एवढेच बार कौन्सिलचे काम नव्हे. वकिलांचे कल्याण व त्यांची सुरक्षा हे सुद्धा बार कौन्सिलचे उद्देश आहेत. काही वकिलांची वकिली तूफान चालते, ते फी कमाई चांगली करतात. म्हणजे फक्त तेच कायद्यात हुशार असतात काय? १०% वकिलांची भरपूर फी कमाई एकीकडे व ९०% वकिलांची अत्यंत  क्षुल्लक फी कमाई दुसरीकडे हा काय प्रकार आहे? वकिली व्यवसायात ही मक्तेदारी का व कशी निर्माण झाली? क्षुल्लक फी कमाई वर जगणारे ९०% वकील या कोरोना लॉकडाऊन काळात उपाशी मरत नसतील काय? अशावेळी बार कौन्सिलचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य काय? या सर्व गोष्टींचा विचार आता झालाच पाहिजे. या ९०% वकिलांची परिस्थिती या कोरोना लॉकडाऊन काळात खूपच हलाखीची झाली आहे याकडे सरकार व बार कौन्सिलने दुर्लक्ष करून कसे चालेल? कारण फक्त १०% मोठे नामांकित वकील हेच न्यायव्यवस्थेचा भाग नाहीत तर त्यांच्याबरोबर क्षुल्लक फी कमाई करणारे इतर ९०% वकीलही या व्यवस्थेचा भाग आहेत.

-ॲड.बी.एस.मोरे©८.९.२०२०

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

नवीन आयुष्य नव्या रूपात!

मला पुन्हा नव्याने जीवन जगायचेय माझ्या सुधारलेल्या नव्या रूपात!

शाळा, कॉलेजच्या औपचारिक शिक्षणातून व वकिली व्यवसायातील अनुभवातून मी खूप शिकलोय. परंतु गेले पाच ते सहा महिने या कोरोना महामारीने व कोरोना लॉकडाऊनने जे शिक्षण मला दिले त्याला तोड नाही. उगवता सूर्य, त्याचा दिवस, मावळता सूर्य, अंधारी रात्र, रात्रीचा चंद्र आणि यांच्या मधोमध असलेल्या  पृथ्वीवरील माझे अस्तित्व व वास्तव्य याचा नवीनच अर्थ मला याच भयाण काळात चांगला  कळला. पूर्वीही माणसे मरत होती. पण कामात व्यस्त असल्याने त्यांचे मरण जीवनाचा सखोल अर्थ सांगत नसायचे. आता मात्र गेली पाच ते सहा महिने अर्थप्राप्ती करून देणारे कामच नसल्याने मन मोकळे झाल्याचा अर्थात मुक्तीचा वेगळाच अनुभव घेतोय. स्वतःचे आत्मपरीक्षण करीत जगाचा विचार करायला मला भरपूर वेळ मिळाला. माणसांचे या काळातील मृत्यू व त्यांची या काळातील अत्यंत भीतीग्रस्त दयनीय अवस्था खूप काही शिकवून गेली. जगातील कितीतरी निरर्थक गोष्टींवर माणूस उगाचच वाद घालत बसतो व जीवन तणावग्रस्त करून घेतो हेही याच काळाने नीट विचारांती कळले. या काळाने खरंच माझ्यात खूप सुधारणा घडवून आणलीय. मी आता वाट बघतोय ती हा कोरोना विषाणू या जगातून कसा व कधी नष्ट होईल व त्याच्यापासून माणूस कधी पूर्णपणे भयमुक्त होईल याची! कारण मला आता पुन्हा नव्याने जीवन जगायचेय माझ्या सुधारलेल्या नव्या रूपात!

-ॲड.बी.एस.मोरे©८.९.२०२०