https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

Heart in brain out!

HEART IN BRAIN OUT!

Critical comments of my opponents on my facebook posts getting read by distant relatives disturbed my close relatives hence decision of blocking all relatives from social media. Close relational love does not stop by this blocking. Old style phone communication continues with close relatives thereby making close relations free from formal social media communication. This is my way of heart in brain out!

-Adv.B.S.More©7.8.2020

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

सर्जनशीलता!

सर्जनशीलता (creativity)!

मानवी बुद्धीची सर्जनशीलता/निर्माणक्षमता (creativity) ही कल्पक (ingenious) व उत्पादक (productive) असते. सर्जनशीलता ही कल्पकता फुलवते व कल्पकता ही पुढे उत्पादकता वाढवते. सर्जनशील बुद्धी म्हणजे सुपीक बुद्धी! सर्जनशीलता ही कल्पकता व उत्पादकता यांचे संप्रेरक होय! सर्जनशील बुद्धी सतत भन्नाट कल्पना बाहेर काढत असते. ज्या व्यक्तीची कल्पनाशक्ती मोठी त्याची उत्पादकता मोठी! वैचारिक लेख, कविता ही सर्जनशील बुद्धीचीच उत्पादने होत. या प्रकारच्या बौद्धिक उत्पादनांना कायद्याने बौध्दिक संपदा असे म्हणतात. कॉपीराइट, पेटंट व डिझाईन कायदा अशा बौध्दिक संपदेचे मालकी हक्क निश्चित करून त्यांचे चोरांपासून संरक्षण करतो. माणूस निसर्गाच्या सर्जनशीलतेला प्रतिसाद देतो तो स्वतःच्या सर्जनशीलतेनेच! त्या प्रतिसादातून तो अनेक कृत्रिम उत्पादने निर्माण करतो. हे काम इतर सजीवांना जमत नाही. कारण त्यांची सर्जनशीलता मुळातच फार मर्यादित असते. पण मनुष्याला याबाबतीत निसर्गाने फारच सूट दिलेली दिसते. मनुष्याची सर्जनशीलता व त्यावर आधारित कल्पकता व उत्पादकता निसर्गाच्या तोडीस तोड असल्याने निसर्गाने पक्षी बनवला तर मनुष्याने विमान बनवले, निसर्गाने बघण्यासाठी डोळा दिला तर मनुष्याने कॕमेरा व पुढे चष्मा बनवला. या सर्व कृत्रिम गोष्टी निर्माण करताना मनुष्याने निसर्गाच्या उत्पादनांची मस्त कॉपी केली व स्वतःच्या सर्जनशीलतेने निसर्गाच्या उत्पादनांतूनच नवीन उत्पादने निर्माण केली. हे सर्व करण्यासाठी  निसर्गानेच मानवी बुद्धीला भारी सर्जनशीलता  देऊन तिची कल्पकता व उत्पादकता वाढवली. निसर्गाच्या सर्जनशीलतेला माणूस जसा छान प्रतिसाद देतो तसा चांगला प्रतिसाद माणसाने माणसाच्या सर्जनशीलतेला द्यायला नको का? माणसा माणसांत अशा सर्जनशीलतेची व त्यातून निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपदेची व वस्तू, सेवांची आर्थिक देवाणघेवाण योग्य त्या परस्पर सहकार्याने व आर्थिक मोबदल्याने व्हायला हवी!

-ॲड.बी.एस.मोरे©६.८.२०२०

दिवस तुझे हे फुलायचे!

दिवस तुझे हे फुलायचे!

ये कली जब तलक फूल बनके खिले, इंतजार इंतजार इंतजार करो, हे हिंदी गीत आठवतेय का? आये दिन बहार के या हिंदी चित्रपटात धर्मेंद्र व आशा पारेख यांच्या सुंदर कलाकारीचा आनंद देणारे हे मस्त युगुल गीत! मराठीतही दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, हे अरूण दाते यांनी गायलेले एक सुंदर गीत आहे. साठी पार केलेली मंडळी जेंव्हा एकांतात मागे वळून बघत असतील तेंव्हा त्यांना त्यांचे ते मस्त बालपण नक्कीच आठवत असेल. मी आज असाच एकांतात बसलो असताना बालपणीच्या त्या गोड आठवणीत रमलो. साधारण १९६१ ते १९६३ या तीन वर्षांच्या काळात पूर्व प्राथमिक शाळेत झालेली ती अक्षर ओळख, मग १९६४ ते १९७० या सात वर्षांच्या काळात प्राथमिक शाळेत वाक्ये व वाक्यांचा अर्थ, पुढे १९७१ ते १९७४ या चार वर्षांच्या काळात माध्यमिक शाळेत जगाची ओळख, मग पुढे १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात बी.कॉम., पुढे १९८० ते १९८२ या तीन वर्षांच्या काळात इंटर कंपनी सेक्रेटरी कोर्स आणि शेवटी १९८३ ते १९८५ या तीन वर्षांच्या काळात एलएल.बी. म्हणजे ३+७+४+४+३+३=२४ वर्षे मी शिक्षण घेत होतो. मग पुढे नोकरी, व्यवसायात जगाचा प्रत्यक्ष अनुभव, मग त्या मूलभूत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची परीक्षा व प्रगल्भता आणि तसेच मनाची परिपक्वता! बापरे, केवढा मोठा हा जीवन फुलण्याचा प्रवास! पण ज्ञानाच्या  प्रवासात पूर्व प्राथमिक शाळेत मी जेंव्हा कळी होतो तो अनुभव खूपच सुखद होता. तसाच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुभवही कळी हळूच उमलण्याचा गोड अनुभव. पुढील उच्च शिक्षणाचा अनुभव हा कळी फुलण्याचा म्हणजे तारूण्याने बहरण्याचा अनुभव. मग पुढे विवाह, संसार म्हणजे कळीचे फूल झाल्यानंतर त्या फूलाचा हसण्या, खेळण्याचा मोठा अनुभव तर आता सद्या ६४ व्या वयात माझे फुललेले फूल सुकण्याचा, कोमेजण्याचा थोडासा दुःखद अनुभव. खरंच काय पण जीवनचक्र बनवलेय निसर्गाने, सगळंच आश्चर्य! आज मी माझ्या जीवनाचे फूल सुकत असताना जेंव्हा मागे वळून बघतो तेंव्हा पूर्व प्राथमिक शाळेतील माझीच ती कळी मला परत मागे ये म्हणून पुन्हा पुन्हा खुणावतेय. पण मी तिच्याकडे प्रत्यक्षात जाऊ शकत नाही. पण तरीही महान निसर्गाचा मी खूप आभारी आहे. कारण त्याने ती कळी माझ्या मेंदूत अजूनही जिवंत ठेवली आहे. मी आजही तिचा आनंद घेऊ शकतो. काय मजा आहे बघा! मी माझ्याच बालपणीच्या कळीचा आनंद आजही घेऊ शकतोय व तो घेतानाच मी फूलाचाही आनंद घेतोय. हा आनंद इतका मोठा आहे की माझे फूल हळूहळू सुकत चाललेय हे दुःख या आनंदापुढे फिके झालेय!

-ॲड.बी.एस.मोरे©५.८.२०२०

भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आनंदोत्सव!

भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आनंदोत्सव!

आज दिनांक ५ अॉगष्ट, २०२० रोजी श्रीराम जन्मनगरी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या निर्माणाचे कार्य सुरू झाले. श्रीराम मंदिराचे भव्य दिव्य निर्माण हे भारतीय संस्कृतीचेच पुनर्निर्माण होय. साधारणपणे ५०० वर्षापूर्वी बाबराने श्रीराम मंदिराच्या जागी बाबरी ढाचा उभा करून भारतीय संस्कृतीवर हल्ला केला. तो ढाचा पुढे बाबरी मशीद म्हणून काही शेकडो वर्षे श्रीराम जन्मभूमी व श्रीराम मंदिराच्या जागी शेकडो वर्षे तसाच उभा होता. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या शेकडो वर्षांच्या  जुन्या वादावर पडदा पडला व बाबरी ढाचा पाडलेल्या परिसरात भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतीय संस्कृतीवरील बाबरी हल्ल्याची सल, धगधग भारतातील असंख्य हिंदू बंधू व भगिनींच्या मनात गेली अनेक वर्षे जिवंत होती. तिला आज पूर्णविराम मिळाला. जर देशातील नागरिकांचे खच्चीकरण करायचे असेल तर तिच्या संस्कृती वर सर्वप्रथम हल्ला चढवला जातो व तेच काम परकीय हल्लेखोर बाबराने केले होते. आज अयोध्या नगरीतील भव्य श्रीराम मंदिर निर्माण  सोहळा, तो आनंदोत्सव टी.व्ही. वर लाईव्ह पाहिला. हा सोहळा मला भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आनंदोत्सव वाटला व माझ्या मनाला खूप मोठा आनंद झाला. आता या सुवर्ण क्षणावर पक्षीय व धार्मिक भेदाभेद विसरून सर्वच भारतीयांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. कारण प्रभू श्रीराम व रामचरित्र ही भारतीय संस्कृती आहे व ती सर्व भारतीयांची आहे. आज जर कोरोनाचे सावट नसते तर भारतीय सांस्कृतिक स्वातंत्र्याचा आनंदोत्सव संपूर्ण भारतभर अत्यंत जल्लोषात, दिमाखात साजरा झाला असता हे नक्की! आता या सांस्कृतिक आनंदाने कोरोना बरा होणार का किंवा तो भारतातून पळून जाणार का असली हलकट, खोचक, टवाळखोर प्रतिक्रिया माझ्या या लेखावर कोणी करू नये. कारण कोरोना ही भौतिक गोष्ट आहे व तिचा खातमा हा भौतिक पद्धतीनेच करावा लागणार व तो केला जाणार. पण त्या नीच भौतिक गोष्टीचा संबंध उच्च नैतिक, सांस्कृतिक भावनेशी जोडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कारण असा प्रयत्न हे त्या व्यक्तीचा हलकटपणा, टवाळखोरगिरी सिद्ध करेल व अशा व्यक्तीस ब्लॉक करून माझ्या फेसबुक खात्यावरून कायमचे हद्दपार केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी!

जय श्रीराम!

-ॲड.बी.एस.मोरे©५.८.२०२०

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

वैचारिक धरसोड वृत्ती!

वैचारिक धरसोड वृत्ती!

निसर्गाचे मूलभूत विज्ञान एका बाजूला आणि मानवी भावना व बुद्धीचा धर्म दुसऱ्या बाजूला असे होऊ शकते. धर्म म्हणजे तरी काय तर मानवी मनात असलेल्या उच्च नैतिक भावनांची सांगड मानवी मनाच्या मूलभूत वासनांबरोबर घालून तयार झालेला मानवासाठीचा कायदा जो इतर प्राणीमात्रांपासून वेगळा असतो. हा धर्म किंवा कायदा तयार करण्यासाठी मानवी बुद्धीला वासना व भावना यांची सांगड घालावी लागते व तशी सांगड घालताना स्वतःची एक तात्त्विक बैठक तयार करावी लागते. ही बैठक म्हणजेच बुद्धीचे तत्त्वज्ञान! मानव समूहात अनेक धार्मिक व अधार्मिक तत्वज्ञाने आहेत. याचे कारण म्हणजे सगळ्या लोकांची बुद्धी समान पातळीवर कार्य करीत नाही. म्हणजे सर्व लोकांना सारखे ज्ञान मिळाले तरी सर्वांची बुद्धी त्या समान ज्ञानावर समान कार्य करीलच असे नसते. म्हणून तर जगात अनेक धर्म आहेत व तसेच अनेक तत्वज्ञाने सुद्धा आहेत. म्हणून मग सर्व लोकांसाठी एक समान कायदा असावा अशी संकल्पना पुढे आली. याच संकल्पनेवर कायद्याचे राज्य ही संकल्पना उभी आहे. प्रश्न असा आहे की असा समान कायदा समाजात समान विचारधारा निर्माण करण्यात यशस्वी होतो का? तर याचे उत्तर होय ही आहे व नाही ही आहे. कारण तसे असते तर मग समाजात वाद निर्माण झाले नसते. किती संख्या आहे कायद्यांची व न्याय निर्णयांची! खालपासून वर सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक न्यायालये का निर्माण करावी लागली? याचे कारण म्हणजे वकील व न्यायाधीश यांची बुद्धी समान पातळीवर कार्य करील याची शास्वती नसते. इथे मुद्दा बुद्धीच्या वैचारिक धरसोडीचा आहे. तुम्ही आस्तिक असाल तर तुम्ही तसे का आहात याबद्दल तुमची ठाम वैचारिक/तात्त्विक बैठक असायला हवी. तुम्ही नास्तिक असाल तर त्या बाबतीतही तुमची ठाम वैचारिक/तात्त्विक बैठक असली पाहिजे. आज एक विचार, उद्या दुसरा विचार याला वैचारिक धरसोड वृत्ती म्हणतात. अशा धरसोड वृत्तीच्या माणसावर लोक विश्वास ठेवत नाहीत. अशा धरसोड वृत्तीला बुद्धीचा वैचारिक गोंधळ कारणीभूत असतो. बुद्धीला जेंव्हा मूलभूत वासना (बेसिक इन्स्टिंक्टस) व उच्च भावना यांची संतुलित सांगड कशी घालायची हे नीट सुचत नाही तेंव्हा बुद्धीचा वैचारिक गोंधळ उडतो. मनातील बुद्धीचा गोंधळ हे बुद्धीची वैचारिक/तात्त्विक बैठक पक्की नसल्याचे लक्षण असते. अशा गोंधळामुळे ठाम कृती करणे अवघड होऊन बसते. पण तरीही कट्टर वैचारिक भूमिका ही एककल्ली असते. ती दुसऱ्याचे ऐकूनच घेत नाही. म्हणून वैचारिक  दृष्ट्या मवाळ असणे हे कधीही चांगलेच! पण मवाळ असणे म्हणजे बौध्दिकदृष्ट्या गोंधळी असणे नव्हे. माणसाला स्वतःची वैचारिक/ तात्त्विक बैठक नीट बसवता आलीच पाहिजे. ती पक्की झाल्यावर मग तिच्याशी प्रामाणिक व ठाम राहिले पाहिजे. वैचारिक धरसोड वृत्तीमुळे समाजालाच नाही तर स्वतःलाही त्रास होतो. अशा वैचारिक धरसोड वृत्तीमुळे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होऊन जाते!

-ॲड.बी.एस.मोरे©५.८.२०२०

पद्धत व शैली!

पद्धत व शैली यातील फरक!

पद्धत (सिस्टिम) व शैली (स्टाइल) यात फरक जाणवतो. माणूस शब्द, स्वर व देहबोलीतून व्यक्त होतो, संवाद साधतो. पण या अभिव्यक्ती किंवा संवादातील पद्धत व शैली यांच्यात फरक असतो. उदाहरणार्थ शब्द, वाक्यांतून वक्तृत्व किंवा लेखन ही व्यक्त होण्याची पद्धत झाली, पण लेखनाची किंवा बोलण्याची भाषा शैली वेगळी असू शकते. मराठी भाषा एकच पण तिची शहरी व गावरान शैली, ठेवण, ढब किंवा धाटणी वेगळी जाणवते. हाच फरक तंत्र व कलेत जाणवतो. उदाहरणार्थ, ध्वनी हे व्यक्त होण्याचे नैसर्गिक तंत्र झाले, पद्धत झाली, पण त्यातून संगीत स्वर काढून व्यक्त होणे ही खरं तर नैसर्गिक कला झाली, शैली झाली. म्हणजे तंत्र/पद्धत व कला/शैली या दोन्हीही गोष्टी नैसर्गिक पण तरीही त्यांच्यात फरक आहे. तंत्र/पद्धत व कला/शैली या विज्ञानाच्या मूलभूत सैद्धांतिक पाया वर आधारित कृतीच्या दोन शाखा आहेत. पण या शाखांतही प्रथम येते ते तंत्र व नंतर येते ती कला! उदाहरणार्थ, ध्वनीच नसेल तर संगीत कुठून येणार व भाषाच नसेल तर भाषाशैली कुठून येणार? तंत्राचा संबंध पद्धतीशी आहे व कलेचा संबंध शैलीशी आहे. आता याच न्यायाने माणसाचे मूळ नैसर्गिक वर्तन जवळजवळ सारखे असले तरी देखील  माणसांतील धार्मिक संस्कृती किंवा नुसती संस्कृती म्हणा यात फरक दिसतो. म्हणून तर कोणत्याही इतर धर्मांतील लोकांना जवळ न करणारी संकुचित धार्मिक राष्ट्रे व सर्व धार्मिक  संस्कृतीना किंवा इतर संस्कृतीना सामावून घेणारी अमेरिका व भारत सारखी लोकशाही प्रधान राष्ट्रे अशी मनुष्य समूहांची विभागणी जगात झालेली दिसते. जगाची अशी दुभंगलेली मानसिकता ही नैसर्गिक पद्धतीतून नाही तर विविध धार्मिक संस्कृतीतून किंवा शैलीतून निर्माण झाली असावी असे मला वाटते. पण माझे हे वैयक्तिक मत असल्याने त्यावर वाद घालू नयेत ही वाचकांना नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©४.८.२०२०

कोरोनावरील मुद्दा काय आणि कमेंटस काय?

माझा कोरोनावरील मुद्दा काय आणि कमेंटस काय?

लॉकडाऊन मध्ये लोक गेली जवळजवळ चार महिने घरी बसले असताना १०० तून फार तर १० जण कोरोनाबाधित झाले पाहिजेत! इथे जवळजवळ ४०% लोक बाहेर पडले कधी आणि बाधित झाले कधी हा महत्वाचा मुद्दा आहे. ३ अॉगष्ट २०२० लोकसत्तेचा अग्रलेख यावर तर्कशुद्ध विश्लेषण करतोय. तो माझ्या पोस्टवरील कमेंटमध्ये प्रतिमेत दिला.  नुसत्या कोरोनाने एवढे लोक मेलेत का? "कोरोनाचे संक्रमण जास्त पण कोरोना मृत्यू दर कमी" हा मुद्दा उपस्थित केला मी माझ्या पोस्टमधून. पण त्यावरील कमेंटस मात्र भलतीकडेच गेल्या.  माझी पोस्ट लोकसत्तेच्या अग्रलेखाबरोबर न वाचता सरळसरळ मंदबुद्धी वगैरे कमेंटस केल्या गेल्या माझ्या पोस्टवर. अशा कमेंटस फारच विचित्र व मनाला त्रासदायक वाटतात. लोकसत्ता संपादकाने विचारपूर्वक लिहिलेला ३ अॉगष्टचा तो अग्रलेख आहे. ती वृत्तपत्रातील बातमी नाही. त्या संपादकीयावर सुद्धा मंदबुद्धी वगैरे सारख्या विचित्र कमेंटस करता येतील काय? मी कोरोना विषाणूला कमी लेखत नाही. तो अत्यंत घातक विषाणू आहे याबद्दल माझे बिलकुल दुमत नाही. माझा ८२ वर्षाचा अत्यंत जवळचा क्लायंट तथा मित्र गेली चार महिने घरीच ठणठणीत होता. पण बाहेरून एकजण कागदपत्रांवर त्या क्लायंटची सही घेण्यासाठी घरी आला व माझ्या क्लायंटला कोरोना झाला. गेली आठ दिवस तो क्लायंट घरीच क्वारंटाईन होता. पण काल रात्री त्या कोरोना विषाणूने असा चाप दाबला, अशी कळ फिरवली की माझ्या त्या क्लायंट मित्राची तब्बेत अचानक खूप बिघडली. कालच रात्री अॕम्ब्युलन्सने त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. आता  ती महागडी इंजेक्शन्स वगैरे देऊन माझ्या त्या क्लायंट मित्राला बरे करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मुंबईच्या महापौर यांचा थोरला भाऊ कोरोनाने नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडला. भारताचे गृहमंत्री श्री. अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, तसेच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी आहे. तसेचा बिग बी अमिताभ बच्चन कुटुंबालाही कोरोनाने ग्रासले. ही सगळी मोठी माणसे. पण कोरोना श्रीमंत व गरीब असा भेदाभेद करीत नाही. कोरोनाच्या मगरमिठीतून जे बचावले ते नशीबवान, त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट! मग तुम्ही त्याला त्यांची मजबूत प्रतिकार शक्ती म्हणा किंवा आणखी काही. पण झोपडपट्टीतले गरीब लोक हे त्यांच्या मजबूत प्रतिकार शक्तीमुळे वाचतात व सदनिकांत राहणारे लोक त्यांच्या कमकुवत प्रतिकार शक्तीमुळे मरतात असा सर्वसाधारण अंदाज काढणे चुकीचे आहे. कोरोना विषाणू हा भयंकरच आहे. तो कोणाला कसा नाचवतो हे माहित नाही. मास्क लावणे व शारीरिक अंतर ठेवणे या दोन प्रमुख गोष्टी सद्या तरी आपल्या हातात आहेत. तेंव्हा काळजी घ्या! माझी किमान अपेक्षा एवढीच आहे की, तुमचे समाज माध्यमावरील लिखाण मग ते लेख रूपात असो, विचार वाक्यात असो की कमेंट मध्ये असो ते विचित्र, खोचक, चेष्टेखोर असू नये!

-ॲड.बी.एस.मोरे©४.८.२०२०

P.S.

Yesterday on 3rd August, 2020 night my 82 yrs home quarantined client friend is admitted in hospital because corona triggered his stable  condition. Corona is dangerous. We cannot take it lightly. All of you please take care of yourself and your family!

-Adv.B.S.More (4.8.2020)