https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ७ जुलै, २०२०

आभासी दर्शन!

आभासी दर्शन!

(१) पूर्वी वस्तूंची अदलाबदल किंवा विनिमय प्रत्यक्ष  स्वरूपात म्हणजे बार्टर पद्धतीने होत असे. एका वस्तूच्या किंमतीचे मोजमाप दुसऱ्या वस्तूच्या किंमतीने व्हायचे. उदा. एक किलो तांदूळ विकत घ्यायला दोन किलो गहू मोबदला  म्हणून द्यावे लागणे म्हणजे तांदळाची किंमत गव्हापेक्षा जास्त कारण एक किलो तांदूळ घेण्यासाठी दोन किलो गहू मोजावे लागायचे. वस्तूंची किंमत अशाप्रकारे ठरवून त्या वस्तूंचा विनिमय प्रत्यक्ष स्वरूपात करणे त्रासदायक होऊ लागले म्हणून पुढे पैसा हे विनिमय व किंमतीचे माध्यम म्हणून पुढे आले. पण पैसा काय आहे तर तो प्रत्यक्षात असलेल्या वस्तू व सेवांचा आभासी प्रतिनिधी आहे. अर्थात पैसा हे प्रत्यक्ष संपत्तीचे आभासी दर्शन आहे. पैसा ही प्रत्यक्ष संपत्ती नव्हे. तो प्रत्यक्ष संपत्तीचा एक आभास आहे. पण याच पैशाच्या माध्यमातून प्रत्यक्ष संपत्ती विकत घेता येत असल्याने या पैशालाही म्हणजे संपत्तीच्या आभासालाही पुढे संपत्ती इतकेच महत्व प्राप्त झाले.

(२) आता सिध्दिविनायक गणपती मुंबई मधील प्रभादेवी येथे स्थानापन्न असला व पंढरपूरचा विठोबा पंढरपूरी स्थानापन्न असला तरी या देवांचे अॉनलाईन दर्शन घरी बसून निवांतपणे घेता येते. हे अॉनलाईन दर्शन आभासी असते. जर पैशाप्रमाणे या अॉनलाईन देव दर्शनाचेच महत्व वाढले तर ज्या ठिकाणी हे देव स्थानापन्न झाले आहेत त्या तिर्थस्थळांचे महत्व पुढे कमी होईल त्याचे काय करायचे? म्हणजे असे की पैशाचे महत्व मोठे पण प्रत्यक्ष संपत्तीचे महत्व कमी! विकासाच्या नावाखाली करायला जायचे एक आणि व्हायचे भलतेच!

(३) या कोरोनाने तर हल्ली प्रत्यक्ष व्यवहारांची वाटच लावून टाकलीय. घरी बसून अॉनलाईन शिक्षण, अॉनलाईन काम, अॉनलाईन बँकिंग व्यवहार आणि आता लग्नेही अॉनलाईन होऊ लागलीत. पुढे नवरा बायकोला एकत्र राहू नका म्हणतील व संसार म्हणजे मुलेबाळे, सगळेच अॉनलाईन करा म्हणतील. अरे, काय चाललंय काय? म्हणजे या सर्व गोष्टींचे लांबूनच आभासी दर्शन घ्यायचे. प्रत्यक्षात भेटीगाठीच नाहीत!

(४) हल्ली व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांवरून लोकांचा संवाद चालतो.  शहरातील बागेत किंवा गावच्या चावडीवर एकत्र बसून गप्पा मारण्याचे पूर्वीचे दिवसच या अॉनलाईन संवादाने संपवून टाकले. अॉनलाईन संवाद करणारी ही माणसे प्रत्यक्षात लांबच्या ठिकाणी कुठेतरी असतात, पण ती जणूकाही जवळच आहेत असा आभास होतो. हेही एक प्रकारचे लोकांचे आभासी दर्शनच! बरं, हे असे समाज माध्यमावरील संवाद खरे मानून चालले तरी त्याचा प्रत्यक्षात काय व किती उपयोग होतो हा सुध्दा एक अभ्यासाचाच विषय आहे.

(५) समोर बसून खळखळून हसणे, एकमेकांना  टाळी देणे यात किती मजा येते. व्हॉटसअप किंवा समाज माध्यमावर मात्र करायचे काय तर हसू आले की हसण्याचे चिन्ह पुढे करायचे, टाळी वाजवू वाटली तर हात किंवा अंगठा पुढे करायचा, राग आला तर लालबुंद कपाळाचे चिन्ह पुढे करायचे. अॉनलाईन विनोदी संवादाने समोरच्याला गुदगुल्या झाल्या आहेत हे त्याच्या हास्य चिन्हावरून ओळखायचे. हा आभासी खेळ मोठा गंमतीदार असतो. भूक लागली तर लोक उद्या अॉनलाईन जेवण करा म्हणतील. खरंच माणूस हल्ली आभासी दुनियेत खूपच वावरू लागलाय!

-ॲड.बी.एस.मोरे©८.७.२०२०

खरंच गोंधळाची परिस्थिती!

खरंच गोंधळाची परिस्थिती!

आता बोंबला! कोरोना हवेतूनही पसरतो म्हणे! हा शास्त्रज्ञांचा नवीन दावा जागतिक आरोग्य संघटनेकडे गेलाय. इकडे कोरोनावर कोणतेच एक ठराविक औषध नसल्याने इंटरनेट वरील उलटसुलट माहिती वाचून कोरोना पेशंटस डॉक्टरांनी आम्हाला अमूकच तमूकच औषध दिले पाहिजे म्हणून डॉक्टरांशीच हुज्जत घालू लागलेत. तर काही शास्त्रज्ञ कोरोना विषाणूची जातकुळी काढून प्राण्यांपासूनच हा विषाणू पसरतो असे सांगून पाळीव प्राण्यांना लांब ठेवा असा अप्रत्यक्ष संदेश देऊ लागलेत. या तीन परस्परविरोधी गोष्टी सांगणाऱ्या तीन बातम्या मी दिनांक ७ जुलै २०२० च्या लोकसत्तेत काल वाचल्या व त्याच तीन बातम्या मी माझ्या या पोस्टसोबत जोडत आहे. अगोदर माणसांपासून अंतर राखा असे सांगितले, आता प्राण्यांपासून अंतर राखा असे सांगू लागले व कहर म्हणजे आता हवेतूनही हा विषाणू पसरत असल्याने हवेपासूनही अंतर ठेवा असे सांगत आहेत की काय हे शास्त्रज्ञ? कोरोनावरील औषधाचा किंवा लसीचा तर पत्ताच नाही आणि या अशा उलटसुलट चर्चा चालवल्यात या शास्त्रज्ञांनी! या शास्त्रज्ञ, डॉक्टरांमध्येच कशाचा कशाला थांगपत्ता नाही की काही ताळमेळ राहिला नाही आणि यांच्या शब्दांवर विसंबून राहून जगातील सरकारे लॉकडाऊन वाढवत बसली व सुरळीत चाललेल्या अर्थचक्राची वाट लावत बसली? खरंच गोंधळाची परिस्थिती!

-ॲड.बी.एस.मोरे©८.७.२०२०

तेरे दर पे आया हूँ!

तेरे दर पे आया हूँ!

(१) निसर्गाचे प्रारूप काय तर देव, पण देवाचे प्रारूप काय? कोणाला देवाचे अस्तित्व साधु संतांत जाणवेल, तर कोणाला महामानवांत! पण निसर्ग काय किंवा देव काय, तो प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. तरीही निसर्गापुढे किंवा  देवापुढे किंवा एखाद्या महामानवाच्या मूर्तीपुढे आपण आपले मन व्यक्त करीत असतो.

(२) तुम्ही देवाला जे मागाल ते देव देतो असा समज आहे. पण त्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत ही देवाची अट असते. म्हणून तर "प्रयत्नांती परमेश्वर" ही म्हण रूढ झाली. लहानपणापासून मी देवाला ज्ञान मागायला सुरूवात केली. पण त्यासाठी सतत प्रयत्नही केले (अजूनही करतोय) आणि देवाने माझ्या झोळीत ते ज्ञान भरभरून टाकले. पैसा, सत्ता यांनी माझी झोळी भर असे मी देवाला मागितले नाही आणि मग देवाने मला त्या दोन्ही बाबतीत सतत मागेच ठेवले. माझ्या झोळीत ना पैसा दिला ना सत्ता दिली! या दोन्हीही गोष्टी माझ्या झोळीत नसल्याने त्या मी वाटूच शकत नाही. मग काय वाटायचे तर ज्ञान! ज्ञानाने भरलेली झोळी खाली नाही केली तर ज्ञानाच्या ओझ्याने ती फाटून जाईल म्हणून झोळी खाली करीत जायचे. तेच तर मी करतोय ना!

(३) १९७९ साली प्रदर्शित झालेल्या लैला मजनू या हिंदी चित्रपटात "तेरे दर पे आया हूँ, कुछ करके जाऊँगा, झोली भर के जाऊँगा, या मर के जाऊँगा" असे एका मशिदीत देवाला आर्त भावनेने आवाहन करणारे सुंदर गीत आहे. हे गीत गाताना तो नायक त्याची रिकामी झोळी त्याच्या प्रेयसीने भरण्याची प्रार्थना देवापुढे करतो. मी माझी झोळी ज्ञानाने भर अशी देवाला प्रार्थना केली आणि खरंच ती भरली व अजूनही भरतच आहे. मरण्यापूर्वी ती खाली केलीच पाहिजे. म्हणून या उतार वयात देवाला म्हणत असतो "तेरे दर पे आऊँगा, झोली खाली करके आऊँगा, नही तो कुछ ना पाऊँगा"!

-ॲड.बी.एस.मोरे©७.७.२०२०

तेरे दर पे आया हूँ!

तेरे दर पे आया हूँ
कुछ कर के जाऊँगा
झोली भर के जाऊँगा
या मर के जाऊँगा
तेरे दर पे आया हूँ                          IIधृII

तू सब कुछ जाने है हर
ग़म पहचान है
तू सब कुछ जाने है हर
ग़म पहचान है
जो दिल की उलझन है सब
तुझ पे रौशन है
घायल परवाना हूँ
वहशी दीवाना हूँ
घायल परवाना हूँ
वहशी दीवाना हूँ
तेरी शोहरत सुन सुन के
उम्मीदें लाया हूँ
मैं तेरे दर पे आया हूँ
कुछ कर के जाऊँगा
झोली भर के जाऊँगा
या मर के जाऊँगा
मैं तेरे दर पे आया हूँ                       II१II

दिल ग़म से हैरान है
मेरी दुनिया वीरान है
दिल ग़म से हैरान है
मेरी दुनिया वीरान है
नज़रों की प्यास बुझा
मेरा बिछड़ा यार मिला
अब या ग़म छुटेगा
वरना दम टूटेगा
अब या ग़म छुटेगा
वरना दम टूटेगा
अब जीना मुश्किल है
फरियादें लाया हूँ
तेरे दर पे आया हूँ
कुछ कर के जाऊँगा
झोली भर के जाऊँगा
या मर के जाऊँगा
तेरे दर पे आया हूँ                         II२II

फिल्मः लैला मजनू (1979)
गायकः महमद रफी


सोमवार, ६ जुलै, २०२०

मी सद्या कसा जगतोय?

मी सद्या कसा जगतोय?

(१) मी सद्या चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात मजेत आहे असे म्हणू शकत नाही. कोरोनाने सगळ्यांच्या गाड्या बिघडवल्यात व नाड्या सोडल्यात आणि त्यात मीही आहे.

(२) मी चार महिने झाले कुठेही बाहेर जात नाही. चार महिने माझी वकिली पूर्ण बंद आहे. शेवटी घरखर्चासाठी बायकोचे मंगळसूत्र मोडले व त्या पैशावर सद्या जगतोय.

(३) मी डोंबिवलीला रहातो. बघूया, लोकल ट्रेन सुरू व्हायची वाट बघतोय. अजूनही ताकद आहे ६४ वयात. याही वयात डोंबिवली वरून मुंबईला प्रवास करून काहीतरी मार्ग काढीनच. मी बिल्डर कंपन्यांचा कायदेशीर सल्लागार आहे. इकडे कल्याण डोंबिवली स्थानिक पातळीवर माझ्या या ज्ञानाचा मला तसा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मुंबईनेच मला जगवलेय व तीच मला जगवणार! सगळे दिवस सारखे रहात नसतात, यातूनही मार्ग निघेलच!

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

माझ्या पोस्टस आणि नैराश्य?

माझ्या पोस्टस वाचकांच्या मनात नैराश्य निर्माण करतात काय?

मी माझे संपूर्ण जीवन प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत जगत आलोय. जीवनातील माझे काटेरी अनुभव सत्य आहेत. पण त्यातही काही गुलाबी अनुभव माझ्या वाट्यास आले व ते गुलाबी अनुभवही मी अधूनमधून शेअर करीत असतो. पण सुख जवाएवढे, दुःख पर्वताएवढे अशीच माझ्या जीवनाची कथा आहे व माझी हीच कथा मी तुकड्या तुकड्यांनी आत्मचरित्र म्हणून शेअर करतो. जे खरे आहे ते खरे आहे, त्यात काय लपवायचे? जीवनातील कटू वाईट अनुभव लपवून फक्त चांगल्या गोष्टींचे प्रदर्शन करणारे आत्मचरित्र हे आत्मचरित्र होऊ शकत नाही. माझ्या अशा सरळस्पष्ट लिखाणामुळे कदाचित माझ्या पोस्टस वाचकांना नकारात्मक नैराश्यमय वाटतही असतील. पण काही लोक माझ्यासारखे जीवन जगले किंवा जगत आहेत त्यांना माझ्या याच पोस्टस सकारात्मक उर्जा देणाऱ्या वाटत असतील. कारण प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत मी ताठ मानेने कसा जीवन जगलो व जगत आहे हे त्यांना कळत असेल व त्यातून त्यांना लढण्याची उर्जा मिळत असेल. नक्की तसे होत असेल का हे मी सांगू शकत नाही. कारण एकच पोस्ट काही जणांना नकारात्मक नैराश्यमय वाटेल तर काही जणांना सकारात्मक उर्जात्मक! हा प्रत्येकाच्या स्वानुभवाचा व नजरेचा फरक असतो. माझ्या पोस्टसमध्ये ना नैराश्य असते ना उन्माद! मला अनुभवास आलेले सत्य मी अगदी जसेच्या तसे लिहितो. माझी फक्त भाषा शैली वेगळी आहे एवढेच! कोणास काय वाटेल याचा विचार करून मी कधी लिहीत नाही. कारण मी तसा विचार करून लिहायला लागलो तर माझ्या  लिखाणातील माझी मूळ नैसर्गिकताच नष्ट होईल. बाकी माझ्या लिखाणातून कोणी काय बोध, काय संदेश घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

रविवार, ५ जुलै, २०२०

लोणच्याची बरणी!

लोणच्याची बरणी!

(१) माणूस जसा आयुष्य जगतो तशीच त्याला बहुधा झोपेतील स्वप्नेही पडत असावी. माझा साधारण अनुभव तसाच आहे. जुन्या हिंदी चित्रपटातील एक अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री मला गावच्या चुलीवर चहा बनवून प्यायला देत  असल्याचे एक गोड स्वप्न मागे पडले होते. हे स्वप्न बायकोला सांगितले तर तिने माझी चेष्टा केली होती. कुठे ती अभिनेत्री आणि कुठे तुम्ही आणि ती तुम्हाला गॕसवर नाही पण चुलीवर चहा करून पाजणार? असली स्वप्ने बघणे सोडा हो असे बायकोने मला सुनावले. पण मी अशी स्वप्ने काय मुद्दाम ठरवून बघतो? ती मला सहज पडतात आणि मी ती बघतो यात माझा काय दोष?

(२) परवा असेच एक झोपेत स्वप्न पडले. मी मोठ्या महागड्या वस्तूंच्या प्रदर्शनात गेलोय. त्यामुळे तिथे श्रीमंतांची गर्दी होती. मला त्या प्रदर्शनात कसा प्रवेश मिळाला हे ते स्वप्नच जाणो. अमिताभ बच्चन हे त्या वस्तू प्रदर्शनाचे खास आकर्षण होते. तिथे मधोमध स्टेज उभे केले होते व तिथे महानायक अमिताभ बच्चन हातवारे करून काहीतरी करीत होते. म्हणून मी तिथे उत्सुकतेने गेलो व थोडा वेळ थांबलो. तिथे सगळा श्रीमंतांचाच घोळका होता. अमिताभ बच्चन साहेबांनी नुसत्या भुवया उंचावल्या की लोक आरडाओरडा करायचे. बच्चन साहेबांनी डोळा मिचकावला की हा आरडाओरडा वाढून जोरात टाळ्या पडायच्या. यात काय कला आहे हा त्यावेळी मला प्रश्न पडला. हे सगळे लोक वेडे झालेत की काय! डोळा मिचकावला तर एवढे काय म्हणून ओरडायचे? मी तिथे उभ्या असलेल्या एकाला हळूच विचारले की, अहो हे चाललंय काय? तर तो म्हणाला की या अगोदर अमिताभ बच्चन यांनी भुवया उंचावल्या ना त्याचे त्यांनी पन्नास लाख कमावले व आताच त्यांनी जे डोळे मिचकावले ना त्याचे त्यांनी एक कोटी कमावले. बापरे, एवढी किंमत असल्या गोष्टींची? हो पण नंतर विचार केला की त्या भुवया उंचावणे, डोळे मिचकावणे या गोष्टी सामान्य माणसाने नाही तर सर्वांचे आवडते कलाकार अमिताभ बच्चन यांनी केल्या. मग त्या गोष्टींची तेवढी किंमत असणारच ना! मी मग लांबूनच अमिताभ बच्चन यांना अदबीने नमस्कार केला व त्या प्रदर्शनातील इतर वस्तू बघायला पुढे सरकलो.

(३) त्या प्रदर्शनात विविध वस्तूंचे वेगवेगळे हॉल होते. मी एकेक हॉल फिरू लागलो. वस्तूंच्या किंमती विचारू लागलो. त्या किंमती ऐकून माझी बोबडीच वळली. कारण माझ्या खिशात फक्त पाचशे रूपये होते व वस्तूंच्या किंमती दोन हजार रूपयांपासून पुढे सुरू होत होत्या. एक पण वस्तू माझ्या लायकीची नाही (की मी त्या वस्तूंच्या लायकीचा नाही) असे मनात येऊन फिरत असताना अचानक एका हॉलमध्ये मला एक छोटी पण सुंदर लोणच्याची बरणी दिसली. मनात म्हटले की ही लोणच्याची बरणी नक्कीच माझ्या बजेट मध्ये असणार. आता हीच बरणी विकत घेऊन बायकोला आश्चर्यचकित करणार. शेवटी ती लोणच्याची बरणी हातात घेऊन मी काऊंटरवर तिची किंमत विचारायला गेलो. कारण त्या बरणीला तिच्या किंमतीचे लेबल चिकटवलेले नव्हते. त्या काऊंटरवरील बाईने त्या बरणीची किंमत मला अडीच हजार रूपये सांगितली. मी तर उडालोच ती किंमत ऐकून. तरीपण धाडस करून त्या बाईला म्हणालोच "मॕडम, इतनी छोटी बरणी की किमत इतनी जादा कैसी, बाहर बाजार मे तो इस बरणी की किमत बहोतही कम होगी"! तर ती बाई मला म्हणाली की "भाईसाब, इस बरणी का किमती मटेरियल और डिझाईन तो देखो, उसकी यह किमत है"!

(४) शेवटी त्या बाईला मी गयावया करून म्हणालो की "मॕडम, मेरे खिसे मे सिर्फ पाचसो रूपये है, उसमे यह बरणी आप मुझे देंगे तो आपकी बहोत मेहरबानी होगी"! त्यावर ती बाई म्हणाली "ऐसा नही होता भाईसाब"! मी नाराज होऊन त्या हॉलच्या बाहेर पडलो. तेंव्हा त्याच हॉलमधून माझ्याबरोबर एक सूटाबुटातील माणूसही बाहेर पडला. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला "मै आपका सब सुन रहा था, आपके पास सिर्फ पाचसो रूपये है यह मुझे मालूम पडे है, मै इधरही बाजूमे रहता हूं, मेरे घर मे उस बरणीसे भी अच्छी बरणी है जो मैने एक महिना पहले खरेदी की है, एकदम नयी है, उसकी किंमत उस हॉलवाली बरणीसे भी जादा है, लेकिन मै तो और नयी ले सकता हूं, आप तो स्वाभिमानी है, आप मेरे से वह बरणी फोकट मे लेनेवाले नही यह मुझे मालूम है, आप जो भी किंमत अदा करेंगे उसमे वह बरणी मै आपको बेचूंगा"! मी त्या गोष्टीला तयार झालो आणि आम्ही त्या भल्या माणसाच्या घरी निघालो आणि तेवढयात माझे स्वप्न भंग पावले.

(५) वरील दोन स्वप्ने काय दर्शवितात तर ते माझे मन दर्शवितात. मला पडणारी स्वप्ने हा माझ्या मनाचा आरसा आहे. त्यात मी स्वतःला पहात असतो. अभिनेत्रीच्या स्वप्नात मला तीही दिसते आणि तिच्याबरोबर मला गावची चूलही दिसते. अभिनेत्री हे मला हव्या असलेल्या श्रीमंतीचे प्रतीक, तर चूल हे माझ्या गरिबीचे अर्थात माझ्या मर्यादेचे प्रतीक! दुसऱ्या स्वप्नात सुध्दा तीच गोष्ट पण वेगळ्या स्वरूपात दिसते. महागड्या वस्तूंच्या प्रदर्शनात माझे फिरणे हे मला हव्या असणाऱ्या श्रीमंतीचे प्रतीक, तर माझ्या खिशातील पाचशे रूपये हे माझ्या गरिबीचे, अर्थात माझ्या मर्यादेचे प्रतीक!

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

मन की बात!

मन की बात!

समाज माध्यमावर सक्रिय असलेली माणसे त्यांच्या पोस्टस मधून व्यक्त होतात तेंव्हा ती त्यांची मन की बात समाज व्यासपीठावर उघड करीत असतात. समाज माध्यम ही खरं तर मनमोकळ्या (मन मोकळे करणाऱ्या) गप्पांची चावडी असते किंवा कट्टा असतो. या चावडी किंवा कट्टयावर लोक त्यांच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या किंवा सद्या घडत असलेल्या छोट्या मोठ्या घटनांची तथा स्वानुभवाची झलक सादर करीत असतात. या सादरीकरणात स्वतःच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आयुष्यातील विविध विषय येतात. या पोस्टसमध्ये भावना व विचार यांचे मिश्रण असते. काहीजण त्यातही दुसऱ्यांचे लेखन, विचार चोरून अॉनलाईन तस्करी करीत असतात. काहीजण इकडच्या पोस्टस तिकडे फिरवण्याचेच काम करतात. त्यात स्वतःची बौद्धिक मेहनत नसते. पण ते फिरवणे सुध्दा त्यांची मन की बातच असते. प्रत्येकाच्या वाट्यास येणारी परिस्थिती सारखी नसल्याने प्रत्येकाचे स्वानुभव व विचार एक नसतात. त्यात विविधता असते. विविधतेने नटलेली ही मन की बात कधी करमणूक प्रधान तर कधी विचार करायला लावणारी असते.

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०