https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

Sr. Citizens Pension?

Just Rs. 200 per month as social security pension to Sr. Citizens?

From the draft letter on letter head of Sr. Citizens addressed to the President of India, it is understood that Government of India is paying just Rs.200 per month as social security pension to the Sr. Citizens. Is this fair? What is the truth? Can anybody explain what is the reality in matter?

-Adv.B.S.More©16.8.2020

प्रभो दया!

ध्यान योग!

गोंधळलेले मन, घाबरलेले मन, भरकटलेले अस्थिर मन अशा मानसिक अवस्थेत ध्येयावर/लक्षावर मन केंद्रित/एकाग्र होण्यासाठी एखादा आस्तिक माणूस देवाची खालीलप्रमाणे छोटीशी पूर्व प्रार्थना करून देवाकडे एकाग्रतेची याचना करू शकतो.

                    "प्रभो दया!"

मात्र त्यासाठी देवाचा आभास नको, तर त्यावर ठाम विश्वास हवा!

या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवीला!

प्रभो नामाचा गजर करीत ईश्वरावरील ठाम विश्वासाचा झेंडा घट्ट रोवून स्वतःचे मन निश्चित ध्येयावर (लक्षावर) केंद्रित (एकाग्र) करण्याची कृती म्हणजे निसर्गाच्या अदृश्य शक्तीला किंवा  चैतन्याला (अदृश्य ईश्वराला) मनात एकवटून निश्चित ध्येय गाठण्याची कृती! निसर्गातील  ईश्वर शक्तीला (चैतन्याला) म्हणजेच देवाला आकार, रंग, रूप नसल्याने त्या चैतन्यमय शक्तीला काल्पनिक आकार, रंग, रूप देऊन त्या प्रतिमेचा आभास मनात निर्माण केल्याने मनाची एकाग्रता साध्य करणे कठीण! असा आभास निर्माण न करता ईश्वर शक्तीला किंवा निसर्गातील चैतन्याला मनात एकवटून एकाग्रता साध्य करण्याच्या योगाला ध्यान योग म्हणता येईल. असा ध्यान योग डोळे मिटून नाही तर ध्येयावर/लक्षावर नजर रोखून करावा लागतो. नेमबाजी ही याच ध्यान योगाने डोळे उघडे ठेऊन शिकतात, डोळे बंद करून नव्हे! पण नेमबाजी शिकण्यासाठी मनुष्याला आस्तिक असण्याची गरज नसते. नास्तिक मनुष्यही सर्व शक्ती एकवटून मनाची एकाग्रता साध्य करू शकतो. त्या शक्तीला आस्तिक मनुष्य ईश्वर म्हणेल तर नास्तिक मनुष्य निसर्गाची शक्ती म्हणेल एवढाच काय तो आस्तिक व नास्तिक यांच्यातील फरक!

-ॲड.बी.एस.मोरे©१६.८.२०२०

टीपः माझा कोणीही ऐहिक किंवा आध्यात्मिक गुरू नसल्याने मी स्वतःच स्वतःवर स्वतःच्या ज्ञान व अनुभवाच्या जोरावर असे प्रयोग करीत असतो. माझे ज्ञान व अनुभव अपुरे असल्याने असे प्रयोग हे प्रयोगच मानावेत, ते सत्य किंवा सिद्धांत मानू नयेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©१६.८.२०२०

सजीव माणूस व आत्मा?

माणसांनी माणसांना माणूस म्हणून ओळखावे व माणूस म्हणून जपावे!

माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणे सजीव म्हणजे जीव असलेला प्राणी आहे. पण हा जीव इतर प्राण्यांपेक्षा निसर्गात मोठी वळवळ व धडपड करतो. कारण या जीवाचा मेंदूच निसर्गातून तसा उत्क्रांत झालाय. माणसाचा जीव जन्मतो, जगतो व शेवटी मरतो. हा जीव मरतो म्हणजे माणसाचा देह त्याच्या मेंदूसह अर्थात मनासह मरतो. मानवी मेंदूतच माणसाचे मन असते. देह मरतो व देहासह देहाचे मनही मरते. शेवटी मृत्यू   म्हणजे तरी काय तर देहातील चैतन्य संपणे. या चैतन्यालाच जीव म्हणावे काय? मग निर्जीव पदार्थांचे काय? त्यांच्यातही निसर्गाचे चैतन्य असतेच की! पण सजीव पदार्थांच्या चैतन्याला जीव म्हणायचे व निर्जीव पदार्थांच्या चैतन्याला शक्ती म्हणायचे. अर्थात जीवाचे चैतन्य ही फक्त  शक्ती नसते तर स्वतःची जाणीव असलेली ती विशेष शक्ती असते. म्हणून मग सजीवाच्या जीवाला काहीजण आत्मा असे म्हणतात. जीव जातो याचा अर्थ सजीवाचा आत्मा शरीराला सोडून जातो असा घेतला जातो. सजीवाचा आत्मा त्याच्या शरीराला सोडून गेला की आत्मा नसलेले ते शरीर सजीव म्हणून निकामी होते. सजीवाचे चैतन्य म्हणजे विशेष शक्ती लाभलेला आत्मा व निर्जीव पदार्थांचे चैतन्य म्हणजे साधी शक्ती असा काहीसा फरक सजीव व निर्जीवात करता येईल. पण माणसे स्वतःच्या शरीरातच आत्मा आहे व इतर कीटक, रोगजंतू, प्राणी यांच्या शरीरात आत्मा नाही असे म्हणतील तर ते चुकीचे होईल. कारण सजीव म्हणजे जीव व जीव म्हणजे आत्मा असाच अर्थ घेता येईल. आता दररोज असंख्य कीटक, प्राणी त्यांचा जीव जाऊन मरतात म्हणजे त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात. त्या कीटक, प्राण्यांच्या जीवांची म्हणजे आत्म्यांची कधी भुते झाल्याचे ऐकिवात नाही. पण मृत माणसांच्या अतृप्त आत्म्यांची मात्र भुते होतात अशा काल्पनिक कथा रचल्या जातात. तशी बहुतेक सर्वच माणसे अतृप्त मनानेच मरतात. मग या लाखो, करोडो मृत माणसांची भुते दररोज रात्रीच्या वेळी धिंगाणा घालीत का फिरत नाहीत? अशा कल्पना ही थोतांडे आहेत. भित्यापोटी ब्रम्हराक्षस अशी मराठीत म्हण आहे. तिचा अर्थ हाच की जिथे भीती तिथे भूत! भुताची कल्पना एकदा मानवी मेंदूत (मनात) घट्ट रूतून बसली की मग एकटे असताना, भयाण काळोखात चालताना मन भुताच्या कल्पनेने घाबरून जाते व मग त्या कल्पनेचेच आभासी भूत तयार होऊन अशा घाबरलेल्या माणसाच्या समोर उभे राहते. मग अशा काल्पनिक भुताला पळवून लावण्यासाठी  देव कल्पनेचा आधार घेतला जातो. पण हे सर्व भित्र्या मनाचे खेळ आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हा मानसशास्त्र विषयाचा भाग आहे. हल्ली  तर काय माणसांना आभासी दुनियेतच जगणे आवडू लागलेय. आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिॲलिटी) तंत्रज्ञान हा या आवडीचाच एक भाग! इथे माणसाकडे आत्मा म्हणून नव्हे तर एक प्रगल्भ जीव म्हणून पाहिले पाहिजे व या जीवाला जपायला शिकले पाहिजे. कारण माणसाचा जीव मेला की तो माणूस या जगात पुन्हा कधीच दिसत नाही. म्हणून माणसांनी माणसांना माणूस म्हणून ओळखावे व माणूस म्हणून जपावे!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.८.२०२०


माझ्या मनातील वकिलाचे अंतरंग!

माझ्या मनातील वकिलाचे अंतरंग!

निसर्गाचे विज्ञान जसे सर्वसमावेशक तसा याच विज्ञानाचा भाग असलेला कायदा हा सुद्धा  सर्वसमावेशक हे माझे वैयक्तिक मत! कायदा सर्व विषयांना स्पर्श करतो व सर्व विषयांवर बोलतो. म्हणून वकिलांनी कायद्याची कलमे, त्याखालील केसेस, कोर्टांचे न्यायनिर्णय या परिघाबाहेर जाऊन विचार व लिखाण करूच नये या मताशी मी सहमत नाही. माझे विचार व लिखाण हे शेरशायरी, प्रेमकहाण्या, प्रेमगीते या स्वरूपाचे नसते. ते विज्ञान व कायदा यासंबंधी असल्याने गंभीर स्वरूपाचे असते. निसर्गाचा पर्यावरण कायदा हा माझा आवडीचा विषय. पण निसर्गाच्या पर्यावरणात मानव समाजाचे सामाजिक पर्यावरणही येते म्हणून निसर्गाचा मूळ नैसर्गिक कायदा व मानव समाजाचा पूरक सामाजिक कायदा यांच्यातील तुलनात्मक अभ्यास करण्यात मला रस आहे. या थोड्या हटके असलेल्या तुलनात्मक अभ्यासातूनच धर्म, अर्थकारण, राजकारण यासारख्या विविध विषयांना माझ्याकडून हात घातला जातो. पण म्हणून मग त्यातून निर्माण होणारे माझे विचार व त्यावर आधारित माझे लिखाण इतर लोकांना सोडा पण वकिलांनाही जेंव्हा भरकटलेले व अनावश्यक वाटू लागते तेंव्हा विषय गंभीर होतो. असाच अनुभव मला वकिलांच्या एका ग्रूपवर आला व तसाच अनुभव शिक्षकांच्या एका दुसऱ्या ग्रूपवरही आला. झाले काय की, निसर्ग, निसर्गाची व्यवस्था व त्या व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन हा लेख मी या दोन्हीही  ग्रूप्सवर शेअर केला. व्यवस्था म्हणजे कायदा आला व तो समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे यात शिक्षण आले. म्हणून हा लेख मी एका वकिलांच्या व दुसऱ्या एका शिक्षकांच्या ग्रूपवर शेअर केला. पण आश्चर्याची बाब ही की, वकिलांच्या ग्रूप ॲडमिनने "हा वकिलांचा ग्रूप आहे, इथे या अनावश्यक गोष्टी नकोत" अशी कमेंट केली तर शिक्षकांच्या ग्रूप ॲडमिनने  "यात शैक्षणिक ते काय" अशी कमेंट केली. मी लगेचच त्या दोन्ही ग्रूप ॲडमिनची माफी मागून त्या दोन्ही ग्रूप्सला सोडचिठ्ठी दिली आणि लगेच  तिथून मोकळा झालो. दीर्घ अनुभव व सतत अभ्यास यातून निर्माण झालेले विचार हे लेख रूपात मेहनतीने मांडायचे व त्यावर पुन्हा वाद ओढवून घ्यायचा असल्या "आ बैल मुझे मार" प्रकारात मला बिलकुल रस नाही. त्यामुळे ज्या ग्रूप्सवर माझ्या लिखाणाचे स्वागत होते तिथेच मी माझ्या फेसबुक खात्यावर व माझ्या पेजवर लिहिलेले लेख, विचार शेअर करणार.

-ॲड.बी.एस.मोरे©१५.८.२०२०

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज दिनांक १५ अॉगष्ट, २०२० भारताचा स्वातंत्र्य दिन! स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच हा स्वातंत्र्य दिन मास्क लावून व तसेच शारीरिक अंतर ठेवून साजरा होतोय व त्याला कारण आहे कोरोना विषाणूची भीती! अज्ञान व गरिबी यांनी अगोदरच ग्रासलेला आपला भारत देश सद्या जगाबरोबर या कोरोनाच्या संकटात सापडलाय. तरीही हळूहळू आपला देश या व अशा अनेक संकटावर मात करीत पुढे जात आहे. आपला भारत लवकरच कोरोनामुक्त व भयमुक्त होऊन शिक्षण, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय यात पुन्हा पूर्वीप्रमाणे व्यस्त होईल व जगात एक सशक्त व आत्मनिर्भर देश म्हणून प्रगती करेल अशी सदिच्छा बाळगून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.८.२०२०

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

निसर्ग व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन!

निसर्ग, निसर्गाची व्यवस्था व त्या व्यवस्थेचे मानवी व्यवस्थापन?

(१) मानवी मन इतर प्राणी मात्रांपासून बरेच वेगळे आहे. ते त्याचा मूळ गुणधर्म व त्याची निसर्गाशी असलेली नाळ विसरून स्वतःला जरा हटके सवयी लावून घेते व पुढे त्या सवयींचे गुलाम बनते. या विशेष सवयी जेंव्हा एका बरोबर अनेक माणसांना लागतात तेंव्हा त्यांना त्या मानव समूहाकडून संस्कृती असे गोंडस नाव दिले जाते. मग त्या समूहातूनच काही खास माणसे पुढे येतात व अशा संस्कृती रक्षणाचा ठेका स्वतःकडे घेतात. त्यांना संस्कृती रक्षक म्हणतात. त्यांच्या विरूद्ध कोणी बोलायची हिंमत करू शकत नाही व जर कोणी केलीच तर त्याचा झुंडबळी होण्याची भीती असते.

(२) मोठमोठया शास्त्रज्ञांना सातत्याने प्रयत्न करूनही विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येणारा निसर्गाचा मेंदू कुठे आहे हे शोधता आले नाही. तसेच मोठमोठया साधूसंतांना सातत्याने भक्तीमार्गावर राहूनही देवाचा आत्मा(परमात्मा) निसर्गात कुठे आहे हे शोधता आले नाही. याचा अर्थ हाच घ्यावा लागेल की निसर्गाला एकतर स्वतंत्र मेंदूच नाही किंवा निसर्गात देवच नाही. हा झाला नास्तिक विचार. आस्तिक विचाराने निसर्गाला स्वतंत्र मेंदू आहे किंवा निसर्गात देव आहे असे समजावे तर मग असेही म्हणता येईल की हा निसर्गाचा मेंदू किंवा निसर्गातला परमात्मा (देव) मानवी मेंदूच्या संपर्क क्षेत्राबाहेर आहे. निसर्ग मेंदू किंवा देव अशाप्रकारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे मानवी मेंदूच्या फोनमध्ये काहीतरी बिघाड आहे किंवा निसर्गाच्या मेंदूचे किंवा निसर्गातील देवाचे (परमात्म्याचे) क्षेत्रच मुळात मानवासह निसर्गातील सर्व पदार्थांना निषिद्ध क्षेत्र म्हणून संरक्षित केले गेले आहे. असे जर असेल तर मग विज्ञान किंवा धर्म यातील मूलभूत गाभाच मानवी मेंदू पासून फार अलग, विलग, अलिप्त आहे हे लक्षात घ्यायला हवे.

(३) अशा परिस्थितीत मानवी मेंदूला निसर्ग व निसर्गाची व्यवस्था जमेल तितकी समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. निसर्गाची व्यवस्था तयार आहे. पण मानवी मेंदूला एकतर त्या व्यवस्थेचे पूर्ण ज्ञान नाही किंवा जे काही ज्ञान प्राप्त झालेय (ज्याला विज्ञान म्हणतात) त्याच्या जोरावर त्या निसर्ग व्यवस्थेचे नीट व्यवस्थापन करणे मानवी मेंदूला जमत नाही किंवा असेही असेल की अती स्वार्थामुळे मानवी मेंदू या तयार निसर्ग व्यवस्थेची वाट लावण्यात आनंद मानतोय.

(४) या लेखाच्या सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे मानवी मेंदूला लावावी तशी सवय लागते. तो स्वतःच निर्माण केलेल्या कल्पनांना कवटाळून स्वप्नाळू बनतो, स्वतःच लावून घेतलेल्या काही सवयींना चिकटून त्या सवयींचा गुलाम बनतो आणि स्वतःच निर्माण केलेल्या वादांशी झुंजत स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतो. मानवी मेंदूचे आयुष्य तेच माणसाचे आयुष्य. मानवी मेंदू मेला की माणूस मरतो. यालाच इंग्रजीत ब्रेन डेथ म्हणतात.

(५) निसर्गाने मानवी मेंदूलाच मानवी जीवनाचे  शिल्पकार बनविले आहे. मानवाला निसर्गाने दिलेली ही एक मोठी संधी आहे. पण ही संधी देताना निसर्गाने सगळ्या माणसांना सारखी परिस्थिती दिली नाही व त्यामुळे सर्वांना समान संधी व समान कायदा असूनही सर्व माणसांना निसर्गाकडून समान नैसर्गिक न्याय मिळत नाही. याला त्या निसर्गाचा दुजाभाव म्हणावे की आणखी दुसरे काही? एवढे मात्र निश्चित की, निसर्गाने माणूस नावाच्या प्राण्याला इतर प्राण्यांपासून चांगल्या स्थितीत ठेवले आहे. त्याच्या व्यवस्थेत थोडीफार छिद्रे ही राहणारच. त्यांच्याशी माणसाला जुळवून घ्यावे लागणार. निसर्ग व्यवस्थेचे व्यवस्थापन हे मानवी मेंदूपुढे मोठे आव्हान आहे हे मात्र खरे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.८.२०२०

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

लॉकडाऊनवर मनसे प्रश्न व माझी उत्तरे!

कोरोना लॉकडाऊनवर मनसेचे रोखठोक प्रश्न व त्यांना माझी रोखठोक उत्तरे!

लॉकडाऊन आता बस्स! कोरोनाचे गांभीर्य या लॉकडाऊनने लोकांना चांगले समजावलेय. आता १५ अॉगष्ट २०२० या स्वातंत्र्य दिनी लॉकडाऊन उठवा, रेल्वे चालू करा, मुंबई लोकल्स व बसेस सर्वसामान्यांसाठी चालू करा व लोकांना मास्क लावून कामाला जाऊ द्या!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.८.२०२०