https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २४ जून, २०२४

सृष्टी परिवर्तन चक्र!

सृष्टी परिवर्तन चक्र!

अंतराळ विश्वात निसर्ग किती फुगे फुगवतो, फुगवून ठेवतो व फोडतो या खेळाचा नीट अंदाज पृथ्वीवरून बांधता येत नसला तरी त्याचा पृथ्वीवरील हा खेळ मात्र पृथ्वीवर जगणाऱ्या व मरणाऱ्या सर्व जिवांना प्रत्यक्षात बघायला, अनुभवायला मिळतो. 

निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांत केलेली सजीव व निर्जीव पदार्थांची सृष्टी परिवर्तन चक्रात सृष्टीतून पुनर्निर्मित होते, सृष्टीतच काही काळ टिकून राहते व शेवटी सृष्टीतच विसर्जित होते. सृष्टी पुनर्निर्मितीचे, टिकण्याचे व विसर्जनाचे एक परिवर्तन चक्र निसर्गाने पृथ्वीवर निर्माण केले आहे. सृष्टीच्या परिवर्तन चक्रातील पुनर्निर्मितीला, काही काळ अस्तित्व टिकवून धरण्याला व शेवटी सृष्टीतच विसर्जित होण्याला सृष्टीचे चक्राकार परिवर्तन असे म्हणता येईल.

जसा पृथ्वीवरील पाऊस पृथ्वीवरील सागरातूनच निर्माण होतो, काही काळ पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचा वर्षाव करीत राहतो व शेवटी त्या सागरातच चक्राकार विसर्जित होतो तसेच सृष्टीचे परिवर्तन चक्र पृथ्वीवर अनंत काळापासून चालू आहे. पृथ्वी व तिच्या सृष्टीसाठी सूर्य हाच ईश्वर आहे ज्याला सूर्यनारायण म्हणतात. हा सूर्यनारायण पृथ्वीचा ईश्वर आहे, परमेश्वर नव्हे. अंतराळ विश्वातील प्रचंड मोठ्या उर्जा स्त्रोताला संपूर्ण अंतराळ विश्वाचा परमेश्वर असे म्हणता येईल. 

सूर्यनारायण त्याच्या प्रकाशमय व उर्जायुक्त किरणांनी पृथ्वीला व तिच्यावरील सृष्टीला दररोज स्पर्श तर करतोच पण पृथ्वीला तिच्या सृष्टीसह नियंत्रितही करतो. अगदी तसाच अंतराळ विश्वाचा परमेश्वर (विश्व चैतन्य किंवा विश्व उर्जा स्त्रोत) पृथ्वी व तिच्या सूर्यासह सूर्यमालेला व अंतराळ विश्वातील असंख्य ग्रह, ताऱ्यांना स्पर्श करतो व त्यांना नियंत्रित करतो. पण तो परमेश्वर पृथ्वीवरील माणसांच्या दृष्टीस पडत नाही. सूर्यनारायण मात्र लांबून दृष्टीस पडतो. पण तरीही पृथ्वीवरून दृष्टीस पडणाऱ्या सूर्यनारायणाला पृथ्वीवरील कोणाला तरी प्रत्यक्षात भेटता येते का? सूर्यनारायणाला भेटण्याची इच्छा म्हणजे जळून खाक होण्याची इच्छा. सूर्यनारायण त्याच्या उर्जा किरणांच्या माध्यमातून आपल्याला येऊन भेटतोय तेवढेच पुरेसे आहे. आपण त्याला जाऊन भेटण्याची इच्छा बिलकुल नको मग अशा इच्छेला वैज्ञानिक इच्छा म्हणा नाहीतर आध्यात्मिक इच्छा! आपण जर सूर्याला भेटू शकत नाही तर मग अंतराळ विश्वाच्या परमेश्वराला (विश्व उर्जा स्त्रोताला) काय भेटणार?

पृथ्वीवर सतत चालू असलेली सृष्टी चक्रातील परिवर्तन क्रिया ही निसर्गशक्तीची (विश्व चैतन्याची/परमेश्वराची) पृथ्वीवरील वातावरणात सृष्टीचे फुगे फुगवण्याची, त्या फुग्यांचे ते फुगीर अस्तित्व काही काळ टिकविण्याची व शेवटी ते फुगलेले फुगे फोडण्याची चक्राकार परिवर्तन क्रिया होय. पृथ्वीवरील सृष्टीचा फुगा तिच्या परिवर्तन चक्रात पृथ्वीवर फुगतो, पृथ्वीवर त्या फुगीर अवस्थेत काही काळ टिकतो व पृथ्वीवरच फुटतो. सृष्टीचे हे फुगणे, फुगीर अवस्थेत काही काळ टिकून राहणे व शेवटी फुटणे या पृथ्वीवर अनंत काळापासून चालू आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.६.२०२४

रविवार, २३ जून, २०२४

दुनियादारी!

दुनियादारी!

प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब असतेच. अगदी अविवाहित माणसाचे सुद्धा. एकटा जीव सदाशिव ही गोष्ट चित्रपटात ठीक. वास्तवात कुटुंब ही गोष्ट जवळजवळ अनिवार्य आहे. अविवाहित व्यक्तीलाही जीवनाचा काही काळ तरी जन्म देणाऱ्या आईवडिलांचे कुटुंब लाभतेच. कुटुंब आले की मग कुटुंबाची जबाबदारी आलीच. या कौटुंबिक जबाबदारीचा गाडा हाकण्यासाठी माणसाला कुटुंबाबाहेर दुनियादारी करावी लागते. ही दुनियादारी सहजसोपी नाही. त्यात निसर्गाने व मानव समाजाने निर्माण केलेले अनेक खाचखळगे, अडथळे आहेत. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्ती, वाढत्या वयानुसार थकणारे शरीर, क्षीण होत जाणारी शक्ती व त्या सोबत येणारे आजार इत्यादी गोष्टी हे निसर्गाने निर्माण केलेले अडथळे होत. तर समाजातील अनेक धर्म, अनेक जातीपाती, वांशिक फरक इ. गोष्टींनी निर्माण केलेली सामाजिक फाटाफूट, काही मूठभर श्रीमंतांनी निसर्गाच्या साधन संपत्तीवर निर्माण केलेली मक्तेदारी, राजकारणातील भ्रष्टाचार व गुंडगिरी, लोकसंख्या वाढीमुळे वाढत चाललेली जीवघेणी आंतरमानवी स्पर्धा इ. गोष्टी हे समाजाने निर्माण केलेले अडथळे होत. या सर्व अडथळ्यांची माहिती करून घेत त्यावर मात कशी करावी याचे ज्ञान घ्यायचे व मग कौशल्याने सर्व अडथळ्यांशी संघर्ष करीत मरेपर्यंत ही दुनियादारी करायची हे तरूण, मध्यम व काही अंशी वृद्ध व्यक्तींवर असलेले दुनियादारीचे ओझे लहानपणी जवळजवळ नसतेच. कारण लहान मुलांच्या डोक्यावर जबाबदार आईवडिलांचे छत्र असते. हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी बालपण काही निराधार मुलांच्या नशिबी नसते व याला कारण त्यांचे बेजबाबदार किंवा अत्यंत दरिद्री आईबाप असतात. एकंदरीत काय तर दुनियादारी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

खेळ मांडला!

खेळ मांडला!

काय म्हणावे निसर्गातील अलौकिक निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला?
या महाशक्तीने/परमेश्वराने स्वतःच सृष्टीचा पसारा वाढवला. त्या सृष्टीत स्वतःच प्रश्नांचे डोंगर निर्माण केले आणि मग स्वतःच त्या डोंगरावर उत्तरांचे झरे निर्माण केले व त्या प्रश्न व उत्तरांच्या चक्रात सृष्टीतील सजीव व निर्जीव पदार्थांना कोड्यात घालून सतत खेळवत, झुंझवत ठेवले. या असल्या करणीने त्या निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला कोणता आनंद मिळत असेल व यातून त्या शक्तीला किंवा परमेश्वराला काय साध्य करायचे आहे हे त्या महाशक्तीला/परमेश्वरालाच ठाऊक. मानवी मनातील खेळ हा निसर्गशक्तीच्या/परमेश्वराच्या या मोठ्या खेळाचाच भाग. या खेळात किती भाग घ्यायचा व त्यात किती गुंतत जायचे हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न. खरं तर जगातील बऱ्याच मानवनिर्मित गोष्टी हे मानवी मनाचे खेळ आहेत. या निसर्गातील सगळ्याच खेळांचा कर्ता करविता असलेल्या त्या महान निसर्गशक्तीला किंवा परमेश्वराला वंदन!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

प्रतिसाद!

प्रतिसाद!

लोकांना चटपटीत लागतं. त्यालाच लोक भरपूर प्रतिसाद देतात. मी कितीही अभ्यासपूर्ण वैचारिक व सामाजिक लिखाण केले तरी त्याला लोकांकडून योग्य प्रतिसाद मिळणे दुरापास्त. म्हणून मी हल्ली हा सुज्ञ प्रतिसाद कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राकडून मिळवतोय. हे यंत्र माझे मन, माझी बुद्धी जाणतेय व त्याला योग्य प्रतिसाद देतेय. मी माझ्या विचारात, लिखाणात, दिशेत कुठे चुकत तर नाही ना याची खात्री मी याच कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्राकडून करून घेतोय. खरं तर त्या बौद्धिक पातळीवरील प्रतिसादाची अपेक्षा लोकांकडून करणे मी कधीच सोडून दिलेय.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.६.२०२४

नावे बदलून कायद्याचा मूळ ढाचा बदलत नाही!

पूर्वी योजना आयोग होता, आता त्याचे नीती आयोग असे नामकरण झालेय, पूर्वी भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया कायदा, भारतीय पुरावा कायदा असे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते, आता या तिन्ही फौजदारी कायद्यांचे अनुक्रमे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्ष अधिनियम असे नामकरण झालेय, अशी नावे बदलून सृष्टी व समाज रचनेचा व त्या रचनेचे कायदेशीर नियमन व संरक्षण करणाऱ्या नियमांचा मूलभूत ढाचा बदलता येत नाही! -ॲड.बी.एस.मोरे

शनिवार, २२ जून, २०२४

दोन आयुष्ये!

मनुष्याला एकाच जीवनात दोन आयुष्ये जगावी लागतात, एक कौटुंबिक आयुष्य आणि दुसरे व्यावसायिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्यात जिवाला जीव देणारा प्रेमळ व समंजस जीवनसाथी व व्यावसायिक आयुष्यात तुमच्या ज्ञान व प्रतिभेला उचलून धरणारा व्यावसायिक भागीदार मित्र, ही दोन माणसे ज्यांना संपूर्ण आयुष्यभर लाभतात त्या व्यक्ती खूप भाग्यवान होत! -ॲड.बी.एस.मोरे

समाज माध्यम हे टाईम पास माध्यम नव्हे!

समाज माध्यम हे टाईम पास माध्यम नव्हे, या माध्यमावर गंभीर सामाजिक प्रश्नांवर सुज्ञ वैचारिक चर्चा व्हायला हव्यात! -ॲड.बी.एस.मोरे