https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २६ मे, २०२४

व्यवहारात चुकीला माफी नाही!

व्यवहारात चुकीला माफी नाही!

निसर्ग व्यावहारिक आहे तसा मानव समाजही व्यावहारिक आहे. निसर्ग व समाज व्यवहारांमध्ये नैतिकतेचे व आध्यात्मिकतेचे प्रमाण किती याचा बारीक शोध घेतल्यास ते अत्यल्प असल्याचे दिसून येईल. खरं तर, कायदा आध्यात्मिक किंवा नैतिक नसून व्यावहारिक आहे. नैसर्गिक व्यवहारांचे निसर्ग नियम जसे निसर्गाने घालून दिले आहेत तसे सामाजिक व्यवहारांचे समाज नियम समाजाने घालून दिले आहेत. निसर्ग व समाज नियमांचा एकत्रित संच म्हणजे कायदा. अर्थात कायद्यात निसर्ग कायदा व समाज कायदा अशा दोन्ही कायद्यांचा समावेश होतो.

एखादा माणूस आध्यात्मिक दृष्ट्या कितीही देवश्रद्ध व पापभिरू असेल व नैतिक दृष्ट्या कितीही नीतीमान व निष्पाप असेल पण तो जर निसर्ग व समाज व्यवहाराच्या दृष्टीने मूर्ख असेल तर त्याला निसर्ग व समाज माफ करीत नाही. निसर्ग व्यवहारात निसर्ग कल्याण व निसर्ग सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात तसे समाज व्यवहारात समाज कल्याण व समाज सुरक्षितता हे कायद्याचे दोन उद्देश असतात. कायद्याच्या या उद्देशांना बाधा आणणारे कोणतेही कृत्य हे बेकायदेशीर असते म्हणजेच ते अव्यावहारिक असते. माणसाच्या आध्यात्मिकतेला व नैतिकतेला जर कायद्यात एवढे महत्व असते तर देवश्रद्ध व नीतीमान माणूस कितीही अव्यावहारिक वागला तरी निसर्ग व समाज दोघांनीही त्याला उदार मनाने माफ केले असते. पण तसे नाही. व्यावहारिक चुकीला कायद्यात माफी नाही अर्थात व्यवहारात चुकीला माफी नाही.

पण व्यवहार शिकवणारा व व्यवहार बंधनात ठेवणारा निसर्ग व समाज कायदा खरंच किती लोकांना आवडतो? मुळात जनावरे असोत की माणसे, त्यांना बंधनात राहणेच आवडत नाही. त्यांना मुक्त जीवन हवे असते. म्हणून तर संधी मिळाली की स्वार्थी माणूस त्याच्या क्षणिक स्वार्थासाठी कायदा तोडायला तयार असतो. सगळ्याच माणसांचा हा सर्वसाधारण कल असतो. पण सर्वसामान्य माणसे याबाबतीत घाबरून मागे राहतात व बेरकी माणसे याबाबतीत पुढे जातात एवढाच काय तो फरक. याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावहारिक चूक करणारा सर्वसामान्य माणूस नेहमी कायद्याच्या कचाट्यात अगदी सहज सापडतो व त्याची लवकर सुटका होत नाही. धनदांडग्या, बेरक्या लोकांचे तसे नसते. तरीही कायदा कोणालाच सोडत नाही. तो कोणी मोडला की मग कोणी कितीही मोठा असो कायदा त्याला त्रास देतोच.

असा हा जबरदस्त व्यावहारिक कायदा स्वैर स्वातंत्र्याचे मुक्त जीवन जगू इच्छिणाऱ्या व बेरक्या लोकांना नकोसा वाटतो. म्हणून तर कंपनी संचालकांना प्राॕडक्शन मॕनेजर, मार्केटिंग मॕनेजर, आर्थिक हिशोब सांभाळणारे चार्टर्ड अकौंटंट ही व्यवस्थापक मंडळी उत्पादक माणसे वाटतात तर कंपनी व इतर कायद्यांचे व्यवस्थापन करणारा कंपनी सेक्रेटरी व कंपनीला कायदेविषयक सल्ला देणारा वकील हे कायदा तज्ज्ञ या भांडवलदार लोकांना कामात उगाच अडथळा आणणारी अनुत्पादक माणसे वाटतात. या भांडवलदार मंडळींचे काय घेऊन बसलात पण सर्वसामान्य माणसे सुद्धा वकिलाला फी देऊन वकिलाच्या माध्यमातून व्यावहारिक करार, दस्तऐवज करण्याचे टाळतात व असले मसुदे संगणकात साठवून बसलेल्या कायद्याचे अर्धवट ज्ञान असलेल्या टपरीवरील एखाद्या टायपिस्ट कडून कायद्याचे करार, दस्तऐवज स्वस्तात करून घेतात आणि मग पुढे ही मंडळी कशात अडकली, फसली की वकिलाकडे रडत येतात. 

लक्षात ठेवा, कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल. व्यवहार ज्ञान म्हणजेच कायद्याचे ज्ञान. व्यवहारी बना याचा अर्थ कायदेशीर वागा. तुम्ही कितीही देवधर्म करा, कितीही मोठे समाजकार्य करा, हल्लीच्या समाज माध्यमावर कितीही मित्र संख्या वाढवा व समाज माध्यमावर कितीही समाजप्रबोधक लेखन करा जर तुमच्या मूर्खपणातून तुमच्या कडून एखादी जरी व्यावहारिक चूक झाली तर तुमची वाहवा करणारी मंडळी, मित्र इतकेच काय तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत. बाकी अशा प्रसंगात बाहेरचा समाज तर तुमच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवायला टपूनच बसलेला असतो. कारण व्यवहारात चुकीला माफी नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.५.२०२४

शनिवार, २५ मे, २०२४

निसर्ग हाच मोठा चमत्कार!

निसर्ग हाच मोठा चमत्कार आहे, त्याची उत्पत्ती, त्याची रचना, त्या रचनेतील वैशिष्ट्यपूर्ण विविधता, त्या रचनेचे चलनवलन व नियंत्रण करणारी नियमबद्ध निसर्ग व्यवस्था, या सर्व वैज्ञानिक गोष्टी समजायला खूप कठीण व बघायला खूप आश्चर्यकारक आहेत, बुद्धिमान माणूस, मानव समाज व मानव समाज व्यवस्था या सुद्धा निसर्ग रचना व निसर्ग व्यवस्थेचाच भाग आहेत, या कठीण व आश्चर्यकारक वैज्ञानिक गोष्टी निसर्गाने मानवी बुद्धीला खाद्य पुरविण्यासाठी तर निर्माण केल्या नाहीत ना? -ॲड.बी.एस.मोरे

नैतिक गोष्ट, कायदेशीर गोष्ट फरक!

नैतिक गोष्ट म्हणजे मानवतेला धरून असलेली गोष्ट, अशी नैतिक गोष्ट ही कायदेशीर असतेच असते, पण कायदेशीर गोष्ट नैतिक असेलच असे नाही, कायद्यातील पळवाटा शोधून एखादा गुन्हेगार संशयाचा फायदा घेऊन कायद्याच्या न्यायालयात निर्दोष सुटला व कायद्याच्या राज्यात मुक्तपणे फिरला म्हणून तो चारित्र्याने नैतिक ठरत नाही, कितीतरी भ्रष्ट व व्यभिचारी माणसे त्यांचे अनैतिक चारित्र्य कायद्याच्या चौकटीत बसवून समाजात थोर, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून निर्लज्जपणे मिरवत असतात आणि जर त्यांच्या अनैतिक चारित्र्यावर कोण बोलले तर त्याच्यावर करोडो रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही टाकतात एवढी यांची अब्रू मौल्यवान असते! -ॲड.बी.एस.मोरे

वास्तवात जगताना!

वास्तवात जगताना!

निसर्गाची विविधता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या विविधतेला निसर्गाच्या विविध ज्ञान शाखा चिकटलेल्या आहेत. माणूस त्याच्या जन्मानंतर साधारण तीन वर्षांनी बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये या खालच्या पायरीपासून वरच्या पायरी पर्यंतच्या शैक्षणिक संस्थांतून या ज्ञान शाखांचे शिक्षण घेतो व पुढे तरूण, प्रौढ वयात या ज्ञानाचा वापर करून हळूहळू सरावाने त्यात विशेष प्रावीण्य, कौशल्य मिळवून तज्ज्ञ होतो. माणसे येतात, जातात पण नैसर्गिक विविधतेला चिकटलेल्या या ज्ञान शाखा व त्यांना संलग्न असलेल्या विविध शैक्षणिक संस्था व कार्यशाळा कायम राहतात.

माणसे निसर्गाच्या विविधतेचे ज्ञान मिळवून व त्यात कौशल्य प्राप्त करून या विविधतेची एकमेकांशी देवाणघेवाण करतात व निसर्गाचे वास्तव जगतात. ते जगण्यासाठी माणसे एकमेकांवर अवलंबून असतात व म्हणून तर विविधतेची आंतरमानवी देवाणघेवाण होते. माणूस स्वयंपूर्ण असता तर अशी देवाणघेवाण शक्य झाली नसती.

माणसे निसर्गाचे वैविध्यपूर्ण वास्तव जगताना त्यात काल्पनिक रंग भरून  हे वास्तव मनोरंजक करतात. हे वास्तव जगताना येणारा प्रत्यक्ष अनुभव व घडणाऱ्या प्रत्यक्ष घटना माणसे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतात व त्यातून एकमेकांशी शाब्दिक संवाद साधतात. ही मानवी अभिव्यक्ती नैसर्गिक असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क कायद्याने काही अटी शर्तींसह मान्य केला आहे.

निसर्गाच्या वैविध्यपूर्ण वास्तवाचा अनुभव घेत माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. इथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अभिप्रेत आहे, जनावर म्हणून जगण्याचा नव्हे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४

आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!

आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!

आपण सर्वजण निसर्ग व्यवस्थेचे व त्या व्यवस्थेअंतर्गत आपण आपल्या बुद्धीने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेचे गुलाम आहोत. निसर्ग व्यवस्थेत वाघ हरणाला जबड्यात पकडून ठार मारून खातो तर समाज व्यवस्थेत मूठभर धनदांडगे सर्वसामान्यांची सर्व बाजूंनी पिळवणूक करून आणखी धनश्रीमंत व बलदांडगे होतात. ही समाज व्यवस्था निसर्गाच्या बळी तो कानपिळी या निसर्ग नियमावर आधारित निसर्ग व्यवस्थेला पूरक आहे. नैतिकता व कायद्याचे राज्य या संकल्पनेची वरवरची रंगरंगोटी केल्याने निसर्ग व समाज व्यवस्थेतील कटू वास्तव बदलत नाही. इथे बौद्धिक प्रश्न हा आहे की, परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने वाघाच्या जबड्यातील हरणाची सुटका करता येत नसेल तर त्या प्रार्थनेचा उपयोग काय? पण असो, जे आहे ते आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४

शुक्रवार, २४ मे, २०२४

काय चाललंय काय?

काय चाललंय काय?

या जगात आजूबाजूला ज्या गोष्टी बघायला मिळतात त्यातून काय चाललंय काय हा प्रश्न माझ्या मनात उत्पन्न होतो. कदाचित माझी बुद्धी उतार वयात नीट काम देत नसल्यामुळे असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतील.

या प्रश्नास कारण की, आजूबाजूला जो तमाशा चाललाय त्या तमाशात एखादी प्रसिद्ध नटी साधा नाही तर तब्बल तीनचारशे कोटी रूपयांचा नेकलेस गळ्यात घालून त्याचे जाहीर प्रदर्शन करते. याच तमाशात हजारो कोटीची संपत्ती बाळगणारे प्रसिद्ध खेळाडू, कलाकार त्यांच्या जाहिरातीतून जंगली रमी सारखे आॕनलाईन गेम्स खेळायला लोकांना उद्युक्त करतात.

याच तमाशात एखादा अती श्रीमंत उद्योगपती त्याच्या मुलांच्या लग्नात करोडो रूपयांचा चुराडा करून त्याच्या श्रीमंतीचे जाहीर प्रदर्शन करतो. याच तमाशात एखादा श्रीमंत  उद्योजक त्याच्या लाडक्या पोरास अल्पवयातच महागडी कार खेळणे म्हणून चालवायला देतो. याच तमाशात एखादा खंडणीखोर भाई गळ्यात सोन्याच्या चैनी व बोटांत हिऱ्यांच्या अंगठ्या घालून मिरवतो व अप्रत्यक्षपणे बेकार पोरांना स्वतःचा महान आदर्श घालून देतो. आणि हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत त्याचे खूप कौतुक वाटून सर्वसामान्य माणसे टाळ्या वाजवत बसतात आणि याच महान लोकांच्या गुलामीत पिढ्यानपिढ्या आयुष्य पुढे ढकलत राहतात.

काय चाललंय काय?

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.५.२०२४

गुरुवार, २३ मे, २०२४

विकासाचा फुगा!

विकासाचा फुगा!

आधुनिक माणूस साधनांऐवजी सुविधांत जास्त अडकलेला दिसत आहे. साधनसुविधा शब्दाचा अर्थ मूलभूत नैसर्गिक साधनांना पूरक मदत करणाऱ्या मानवनिर्मित कृत्रिम सुविधा असा आहे. उदा. हवेतील प्राणवायू हे मूलभूत नैसर्गिक साधन तर रूग्णास करण्यात येणारा याच प्राणवायूचा कृत्रिम पुरवठा ही पूरक कृत्रिम सुविधा होय. तसेच मानवी मेंदूची बुद्धिमत्ता हे मूलभूत नैसर्गिक साधन तर संगणक यंत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.,आर्टिफिशियल इंटेलिजन्स) ही पूरक कृत्रिम सुविधा होय.

माणसांनी त्यांच्या सोयीसाठी मूळ नैसर्गिक साधनांतून अनेक सुविधा निर्माण केल्या. या सुविधा सतत वाढवत राहण्याचा मानवी बुद्धीला मंत्रचळ (ओसीडी) लागल्याचे दिसत आहे. या सुविधांचा फुगा वाढवणे म्हणजेच मानवी विकास या भ्रमात राहून माणसे हा फुगा फुगवत पुढे चालली आहेत. सुविधांचा विकास फुगा जेवढा वाढेल तेवढ्या प्रमाणात  पैशाचा साठा वाढवावा लागतो. कारण वाढलेल्या सुविधांची आंतर मानवी देवाणघेवाण करण्यासाठी माणसांना कृत्रिम माध्यम म्हणून पैसा लागतो. 

माणूस या कृत्रिम सुविधांच्या मागे लागून त्याचे नैसर्गिक स्वत्व हरवत चालल्याचे दिसत आहे. सुविधांचा फुगा व पैशाचा भुगा या भुग्यांमध्ये सर्वसामान्य माणसे भरडली जात आहेत. याचे मूलभूत कारण काय तर मूलभूत नैसर्गिक साधने मूठभर भांडवलदार व मूठभर राजकारणी मंडळींनी स्वतःच्या ताब्यात ठेवली आहेत. पण भविष्यात कधीतरी सुविधा विकासाचा हा मोठा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही असे वाटते. कदाचित असे वाटणे हा माझा या भुग्यातील भ्रम असेल. पण माझ्या या विकास फुग्याच्या लेखाने लोकांना निदान विचार करायला भाग पाडले तरी खूप मिळवले.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४