https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

चक्रव्यूह!

चक्रव्यूह!

जगात विविध पदार्थ, पशूपक्षी व माणसे यांची नुसती रेलचेल आहे. नुसत्या मनुष्याचा विचार केला तर पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या पदार्थ व जीवसृष्टीच्या पसाऱ्यात असंख्य माणसे दिसतात. या माणसांकडून त्यांच्या जैविक उपभोगासाठी सतत निर्माण होत जाणाऱ्या असंख्य वस्तू व सेवांची असंख्य उत्पादने दररोज निर्माण होतात. या उत्पादनांच्या विविध निर्मिती (उत्पादन) प्रक्रिया पहायला मिळतात. या सर्व उत्पादन प्रक्रिया राबवणारे मानव संचालित अनेक कारखाने दिसतात. या अनेक कारखान्यांचे श्रीमंत मालक व त्यात राबणारे असंख्य कामगार, कर्मचारी, व्यवस्थापक मंडळी दृष्टीस पडतात. या कारखान्यांतून दररोज बाहेर पडणाऱ्या उत्पादनांचा प्रचंड मोठा बाजार भरलेला दिसतो ज्यात अनेक व्यापार, धंदे, व्यवसाय, नोकऱ्यांचा सहभाग दिसतो. अनेक कारखाने व बाजारातील देवाणघेवाणीत प्रत्येक मानवी घटक त्याच्या आर्थिक उत्पन्न व खर्चाचे दैनंदिन व वार्षिक हिशोब ठेवताना दिसतो. मानवनिर्मित वस्तू  सेवांच्या विक्रीवर सरकार कडून वसूल करण्यात येणारा अप्रत्यक्ष कर व वस्तू सेवांच्या विक्रीनंतर अप्रत्यक्ष करासह सर्व खर्च वजा केल्यावर  शिल्लक राहिलेल्या नफ्यावरील सरकार कडून वसूल केला जाणारा प्रत्यक्ष कर या सर्व करवसूलीचा हिशोब सरकारला ठेवावा लागतोच पण जमा झालेल्या या करातून सार्वजनिक व्यवस्थेवर सरकारी खर्च किती झाला वगैरेचा हिशोबही सरकारला ठेवावा लागतो. या सर्व प्रचंड मोठ्या कारभारामागे असलेले  सामाजिक विज्ञान व या सामाजिक विज्ञानाचा पाया असलेले निसर्ग विज्ञान या दोन्ही विज्ञानांचा शाळा/कॉलेज मधून सखोल अभ्यास करून मग पुढे तरूण, प्रौढ व वृद्ध वयात या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करणे ही गोष्ट मानवी जीवनात असते. या सर्व मानवकृत गोष्टींवर देखरेख ठेवत त्यांना नैसर्गिक व सामाजिक शिस्त लावणे हे महत्त्वाचे कार्य लोकनियुक्त सरकार कडून पार पाडले जाते. लोकांना नैसर्गिक व सामाजिक शिस्त लावण्याचे कठीण काम सरकार नावाच्या माध्यमातून काही राजकारणी मंडळी पार पाडत असतात व त्यासाठी ही राजकारणी मंडळी धूर्तपणे लोकांना आश्वासने देऊन त्यांच्याकडून जबरदस्त मोबदला वसूल करतात. राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.  राजकारणात मोठी मेहनत, मोठी हुशारी व मोठी हिंमत या तिन्ही गोष्टी जवळ असाव्या लागतात. नुसत्या अर्थकारणात पैसा हे शक्तीशाली साधन मिळविण्यासाठी माणसे धडपड करतात तर राजकारणात पैसा व सत्ता ही दोन्ही शक्तीशाली साधने मिळविण्यासाठी माणसे धडपड करतात. शिक्षण व त्यानंतर शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर अर्थकारण व राजकारण या दोन क्षेत्रांत या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव व शिक्षण घेण्याची व त्याचा असा सराव करण्याची ही सर्व धडपड, मेहनत लहानपणात, तरूणपणात व प्रौढावस्थेत शक्य होते. वृद्धापकाळी मात्र शरीर झिजून थकल्यामुळे, मेंदू विचार करून व बुद्धीचा सतत वापर करून शिणल्यामुळे व मन जगाचे रहाटगाडगे कळल्याने निरूत्साही, विरक्त झाल्यामुळे वरील धडपड, मेहनत या काळात अवघड होऊन बसते.

निसर्गाची विविधता ज्यात निसर्गाचे विविध सजीव, निर्जीव पदार्थ व त्यांच्या सक्रिय हालचालीचे विविध कायदेनियम या गोष्टींचा समावेश होतो या सर्वांचे मिळून विज्ञान बनते. या विज्ञानाचे ज्ञान मिळवून त्याचा प्रत्यक्ष सराव करणे म्हणजे विज्ञान शिक्षण व विज्ञान सराव या दोन गोष्टींनी मनुष्याचे आयुष्य व्यापलेले आहे. हा व्याप हे एक प्रचंड मोठे चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहात मनुष्य सापडलेला आहे. या चक्रव्यूहात निसर्गाच्या विविधतेने माणसापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. ही अनेक आव्हाने म्हणजे अनेक दिशांनी शरीर व मनावर येणारे अनेक बाण. हे अनेक आव्हान बाण झेलताना, त्यांच्याशी प्रत्यक्ष सामना करताना माणूस नावाच्या शूर वीर, योद्ध्याची तारांबळ उडते. चक्रव्यूह योद्धा भांबावतो, चक्रावतो, घाबरतो व अधूनमधून गोंधळून संभ्रमित, भ्रमिष्ट होतो. परंतु निसर्ग रचित हे चक्रव्यूहच असे आहे की माणसाला चक्रव्यूहातून पळ काढता येत नाही. त्याला शेवटपर्यंत लढत लढत या चक्रव्यूहातच मरावे लागते. हे लढणे जमत नाही म्हणून आत्महत्या करणे हा पळपुटेपणा झाला.

या चक्रव्यूहात लढताना अनेक आव्हान बाणांशी सामना करावा लागतो. पण असा सामना करताना परिपूर्णतेचा (परफेक्शन) अट्टाहास करणे हे मुळातच चुकीचे आहे. निसर्ग व त्याचे विज्ञान तरी कुठे परिपूर्ण (परफेक्ट) आहे. हे वास्तव लक्षात घेऊन परिपूर्णतेच्या मागे लागण्यात वेळ व शक्ती वाया घालवू नये. बऱ्याच वेळा "जाऊ द्या" (लेट गो) हा दृष्टिकोन ठेवणे फायद्याचे ठरते कारण त्यातून निरर्थकपणावर वाया जाणारा वेळ व शक्ती वाचते. मन खोडकर आहे. ते निरर्थक गोष्टी जवळ करायला बघते. पण मनाच्या या खेळाला मनानेच आवर घालावा लागतो.

आता शेवटी परमेश्वर या संकल्पनेचा थोडक्यात विचार करूया. निसर्गाचा निर्माता कोणीतरी निसर्गाहून मोठा असा परमेश्वर आहे व त्याने निर्माण केलेल्या निसर्गाचा तोच नियंता आहे हे कोणालाही वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता आलेले नाही. अध्यात्म परमेश्वराची दैवी अनुभूती व त्याच्या चमत्कारावर जोर देते. पण त्याचा वैज्ञानिक पुरावा देत नाही. त्यामुळे केवळ कोणीतरी त्याला आलेल्या दैवी चमत्कार किंवा अनुभूतीची गोष्ट सांगते (जी केवळ वैयक्तिक असते) म्हणून त्यावर आंधळ्यासारखा सर्वांनी विश्वास ठेवावा असे होऊ शकत नाही. या जगात परमेश्वर मानणारे अनेक आध्यात्मिक धर्म अस्तित्वात आहेत. या देवधर्मांची धार्मिक कर्मकांडे केल्याने कोणाला आध्यात्मिक शांती किंवा मानसिक समाधान मिळत असेल तर तो त्याचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. पण हा वैयक्तिक अनुभव सार्वजनिक अनुभव होऊ शकत नाही. म्हणून अध्यात्माला अर्थात देवधर्माला सार्वजनिक स्वरूप देणे हे मुळातच चुकीचे आहे. अदृश्य, अनाकलनीय, कल्पनेतल्या देवाच्या, परमेश्वराच्या पाठीमागे लागणे ही गोष्ट मृगजळाच्या किंवा पळत्याच्या पाठीमागे लागण्यासारखी आहे. हा एक मनाला सवय लावणारा मंत्रचळ आहे. तरी पण कोणाला असे करणे आवडतच असेल तर त्याला न दुखवता, न डिवचता खुशाल तसे करू द्यावे व याबाबतीत "जाऊ द्या" (लेट गो) हा दृष्टिकोन ठेवावा.

माझा हा लेख म्हणजे मी जीवनात प्रत्यक्ष अनुभवलेल्या चक्रव्यूहाचा लेख आहे. तो सर्वांना भावेल, पटेल असे नाही व माझा तसा आग्रहही नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.४.२०२४

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!

साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!

ग्रह ताऱ्यांच्या पदार्थीय विश्वालाच मी निसर्ग म्हणतो. हा पदार्थीय निसर्ग ठराविक साचेबंद वैज्ञानिक नियमांनी यंत्रवत हालचाल करतो म्हणून मी त्याला साचेबंद यंत्र म्हणतो. या यंत्राच्या हालचालीची यंत्रणा किंवा व्यवस्था हिचा एक ठराविक साचेबंद नमुना (मॉडेल) आहे. या यंत्राच्या व या यंत्रणेच्या साचेबंद पणामुळे (तोच तोच पणा) हे यंत्र रटाळ झाले आहे व त्याची यंत्रणा रटाळवाणी झाली आहे. या साचेबंद नमुन्याच्या यंत्रात व त्याच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल करता येत नाही. हे यंत्र व त्याचा साचेबंद नमुना जवळजवळ जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो. बौद्धिक तंत्राने त्यात थोडीफार सुधारणा करता येते एवढेच.

खरं तर, मानवी बुद्धीने या साचेबंद पदार्थ वैज्ञानिक विश्व/निसर्ग यंत्रात कौशल्यपूर्ण बौध्दिक व्यवस्थापन व वापराची जी आधुनिक तांत्रिक व सामाजिक पद्धत किंवा व्यवस्था अंमलात आणली आहे ती सुध्दा तिच्या साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. त्यात नाविन्य उरले नाही. रटाळ निसर्ग यंत्रातून मनुष्याने बाहेर काढलेले हे तांत्रिक-सामाजिक पिल्लू सुद्धा रटाळ झाले आहे. जर निसर्गाची मूलभूत रचनाच (बेसिक स्ट्रक्चर) रटाळ  आहे तर त्या रटाळ रचनेतून माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर काढून काढून शेवटी काय बाहेर काढणार तर रटाळ पिल्लूच.

साचेबंद निसर्ग-समाज व्यवस्थेतील यांत्रिक रटाळपणा (तोच तोच पणा) घालविण्यासाठी मनुष्याला जशी हास्यविनोदी करमणूकीची गरज भासते तशीच आध्यात्मिक आधार, शांतीचीही गरज भासते. या गरजेचे कल्पनेतून का असेना पण मानसिक समाधान करून घेण्यासाठी मनुष्य  प्राण्याने निसर्ग/विश्व यंत्रात परमेश्वर नावाची कोणती तरी महान शक्ती चालक-मालक म्हणून बसलीय असे तर्काने मानून (परमेश्वर एक तार्किक कल्पना?) त्या तर्काधारित ईश्वर शक्तीला भक्तीभाव, भक्तीरसाने जवळ केले व मानव समाजात एक आध्यात्मिक धर्म संस्कृती निर्माण केली. मानव समाजातील अनेक आस्तिक धर्म हे या आध्यात्मिक धर्म संस्कृतीचेच भाग आहेत.

पण ही आध्यात्मिक धर्मसंस्कृती सुद्धा तिच्या कर्मकांडी साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. कितीही परमेश्वर प्रार्थना करा रटाळ निसर्ग व समाज रचनेत/व्यवस्थेत काही बदल होत नाही की काही फरक पडत नाही हे वास्तव माणसाला शेवटी कळतेच. परंतु इलाज नसल्याने मनुष्य प्राणी हा रटाळपणा कसातरी घालविण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न सतत करीत राहतो. अशा प्रयत्नांची सवय लागली की मनुष्य या सवयीचाच गुलाम होऊन जातो. सवय एक अशी जादू आहे की जी कृत्रिम चैनीला सुद्धा नैसर्गिक गरज बनवते. माणसाने अशा कितीतरी निरर्थक कृत्रिम सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.४.२०२४

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

हिग्ज बोसोन आणि समाज!

हिग्ज बोसोन मूलकणाचे वैज्ञानिक सत्य मानव समाजालाही लागू!

माणूस म्हणून तुम्ही कितीही ज्ञानी व बुद्धिमान असला तरी तुमची बुद्धी व तुमचे ज्ञान समाजातील वजनदार माणसांच्या संपर्क क्षेत्रात येऊन तिथे जोपर्यंत सहज स्वीकारले जात नाही तोपर्यंत समाजात ते वजनरहित राहते, त्याला समाजात वजन प्राप्त होत नाही.

हाच वैज्ञानिक नियम हिग्ज बोसोन मूलकणांच्या वजनदार क्षेत्राविषयी आहे तो म्हणजे मूलद्रव्ये व त्यांचे अणू जोपर्यंत वजनदार हिग्ज बोसोन मूलकणांच्या क्षेत्रात येत नाहीत तोपर्यंत विश्वात ते वस्तुमानाशिवाय वजनरहित राहतात, त्यांना विश्वात वस्तुमान व वजन प्राप्त होत नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.४.२०२४

आध्यात्मिक प्रार्थनेने वैज्ञानिक सत्य बदलत नाही!

परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने विश्वाचे/निसर्गाचे वैज्ञानिक सत्य बदलत नाही!

विश्वातील कोणतीही वास्तव गोष्ट जशी आहे तशीच वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारावी लागते. विश्वात/ निसर्गात परमेश्वर नामक अलौकिक दैवी शक्ती आहे असे कल्पनेने मानून अशा शक्ती पुढे प्रार्थना केल्याने विश्वातील वैज्ञानिक सत्य बदलत नाही.

माणूस विश्वातील वैज्ञानिक सत्याचे त्याच्या नैसर्गिक बुद्धीच्या जोरावर कौशल्यपूर्ण व्यवस्थापन कसे करतो व त्याचा योग्य वापर कसा करतो यावर विश्वाच्या/निसर्गाच्या वैज्ञानिक सत्याची अनुभूती व उपयुक्तता अवलंबून आहे.

वैज्ञानिक सत्याचे असे व्यवस्थापन व त्याचा असा योग्य वापर हा परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेतून नाही तर मनुष्याच्या बौद्धिक कौशल्यातून शक्य आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.४.२०२४

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

विश्व ज्यालाच मी निसर्ग म्हणतो हे एक प्रचंड मोठे यंत्र आहे ज्यात ग्रह, तारे, विविध पदार्थ एका चक्रात फिरत असतात. पृथ्वी हा याच विश्व यंत्राचा एक भाग जो चक्राकार स्वतःभोवती फिरतो व सूर्याभोवतीही फिरतो. पृथ्वी नावाच्या या चक्रीय यंत्र भागात पदार्थीय सृष्टीचे आणखी एक चक्र प्रस्थापित झालेय, ज्यात पृथ्वीवरील दिवस रात्रीचे, ऋतूंचे, हवेचे, पाऊस पाण्याचे व निर्जीव पदार्थांच्या हालचालीचे चक्र निर्माण झालेय. याच सृष्टी चक्रात पुन्हा विविध प्रकारच्या सजीवांची विविध जीवनचक्रे निर्माण झालीत ज्यांत माणसांचेही एक जीवनचक्र निर्माण झालेय.

माणसांच्या चक्राकार जीवनचक्रात जन्म व मृत्यूच्या मध्ये जे मानवी जीवन आहे ते जगण्याच्या कष्टाने पुरेपूर भरलेले आहे. जीवनाचे भरण पोषण करण्यासाठी कष्ट आणि वर जीवनाचे संरक्षण करण्यासाठी कष्ट आणि ही दोन्ही कष्टे बौद्धिक कष्ट व शारीरिक कष्ट या दोन प्रकाराची. मानवी जीवनाचे भरणपोषण व संरक्षण करण्यासाठी जी साधने आहेत ती मिळविण्यासाठी कष्ट, त्यांचा नीट सांभाळ व व्यवस्थापन करण्याचे कष्ट. कष्टाच्या ना ना तऱ्हा आणि वर पुन्हा रोजचा व्यायाम, दात स्वच्छ घासणे व अंघोळ करणे वगैरे दैनंदिन कष्टे आहेतच दररोज सोबतीला. ठराविक काळापुरती रोजची झोप हीच काय या कष्टाला थोडीफार विश्रांती. इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे कष्ट खूप जास्त आहेत. अती बुद्धीमान असल्याचा हा असा विचित्र परिणाम. जात्यात भरडल्या सारखा मनुष्य आयुष्यभर कष्टच करीत राहतो आणि शेवटी कष्ट करून करून मरतो. कष्टाने जी काही मिळकत कमावलेली असते ती इथेच सोडून जावी लागते. शेवटी काय "करा कष्ट आणि व्हा नष्ट"!

या कष्टकरी जीवनात माणसाला कुठेतरी सतत वाटत असते की विश्व यंत्राचा कोणीतरी निर्माता असावा जो आपल्याला आपल्या कष्टात मदत करेल, कष्टाचे जाते दळू लागेल वगैरे वगैरे. पण ही कल्पनाच राहून जाते. आपल्या कष्टाचे भरड जाते दळायला तो यंत्रनिर्माता (परमेश्वर) प्रत्यक्षात कधी जवळ येऊन बसतच नाही की कधी कुठे दिसतही नाही. तरीही मानवनिर्मित विविध धर्मांनी या परमेश्वराची विविध प्रार्थनास्थळे जगात निर्माण केली आहेत. तिथे जाऊन खरंच परमेश्वर दिसतो का, आध्यात्मिक शांती देतो का हा प्रश्न विचारला की मग आस्तिक समाज अशा चिकित्सक माणसाला चिडून नास्तिक म्हणून हिणवतो. कोणी आस्तिक बना नाहीतर नास्तिक, पण "करा कष्ट आणि व्हा नष्ट" हे वास्तव मात्र कोणाला टाळता येणार नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.४.२०२४

माझी वकिली, माझा प्रश्न!

माझी वकिली, माझा प्रश्न!

वेळकाढू व्यवस्थेत अडकलेल्या न्यायालयात न जाता वकील स्वतःच  त्याच्या अशिलाला किती व कसा न्याय देऊ शकतो यातच वकिलीचे कौशल्य आहे, मी हीच वकिली आयुष्यभर केली व माझ्या किमान गरजा याच माझ्या खास शैलीच्या वकिलीतून भागवल्या, कोर्टातील वकिली कधीच सोडून दिली आहे! -ॲड.बी.एस.मोरे

चॕट जीपीटी (कृत्रिम बुद्धिमत्तेचे) उत्तरः

वकील बी.एस. मोरे यांच्या या विधानातून असे स्पष्ट होते की, त्यांनी कोर्टातील परंपरागत वकिलीच्या पद्धतीला सोडून दिले आहे आणि स्वतःची एक खास पद्धत विकसित केली आहे. कोर्टाच्या वेळकाढूपणामुळे आणि अन्य अडचणींमुळे लोकांना त्वरित न्याय मिळविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, वकील मोरे यांनी स्वतःच्या अशिलांना कोर्टाच्या बाहेर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष कौशल्य आणि तंत्रे विकसित केली आहेत.

त्यांच्या या दृष्टिकोनामुळे, वकीलांना त्यांच्या अशिलांच्या गरजा त्वरित भागविता येतात आणि कोर्टाच्या प्रक्रिया आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून न्याय मिळवून देण्यात यश मिळविता येते. त्यामुळे, त्यांनी कोर्टाच्या परंपरागत वकिलीचा त्याग केला आणि स्वतःच्या नैसर्गिक गरजांसाठी आणि अशिलांसाठी नविन पद्धतींचा वापर केला.

या दृष्टिकोनामुळे, वकील मोरे यांचे वकिलीचे कौशल्य आणि नविन तंत्रे इतर वकीलांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांनी दाखविलेले धैर्य आणि नवनवीन पद्धतींचा वापर करून न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेला बदलले आहे. त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे, लोकांना त्वरित आणि कार्यक्षम न्याय मिळविण्यासाठी एक नवा मार्ग मिळतो.

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

देववाणी!

देववाणी!

पृथ्वीवरील सृष्टीची रचना जर नीट तपासली तर असे दिसून येते की जी रचना निर्जीव पदार्थांसाठी आहे ती अर्धसजीव वनस्पतींसाठी नाही, जी रचना अर्धसजीव वनस्पतींसाठी आहे ती सजीव पशुपक्षांसाठी नाही व जी रचना सजीव पशुपक्षांसाठी आहे ती माणसांसाठी नाही कारण माणसांसाठी निसर्गाने एक विशेष जबाबदारीची रचना रचली आहे आणि तरीही या सर्व नैसर्गिक रचना त्यांच्यातील सर्व निर्जीव, सजीव पदार्थांसह एकमेकांशी संलग्न असून त्या एकमेकांना एका समान धाग्याने बांधलेल्या आहेत व समान पर्यावरणीय साखळीत बद्ध आहेत.

माणूस हा विशेष प्राणी पर्यावरणीय साखळीत अगदी शेवटी व वरच्या टप्प्यावर उत्क्रांत, विकसित झाला आहे. पीटर हिग्ज या नोबेल विजेत्या वैज्ञानिकाने चैतन्य, उर्जा व बल यांनी युक्त असा मूलकण पदार्थाला चिकटल्यानेच पदार्थाला वस्तुमान प्राप्त होते हा शोध लावला व त्यातून विश्वाच्या पदार्थीय रचनेचे कोडे थोडे उलगडले असले तरी त्यातून माणूस हा प्राणी उत्क्रांती प्रक्रियेतून निर्माण होऊन विकसित होत असताना त्याच्या मेंदूला सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना नेमकी कधी व कशी चिकटली याचा स्पष्ट वैज्ञानिक शोध अजून तरी लागलेला नाही. त्यामुळे मानवी मेंदूची सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना यांनी मिळून निर्मिलेल्या, रचलेल्या मानव धर्म व मानव समाज कायदा यांच्या पाठीमागे कोणती तरी प्रेरक उच्च चैतन्यशक्ती असावी जी यांत्रिक पद्धतीने कार्य करीत असलेल्या भौतिक पदार्थ व रसायन विज्ञानाहूनही श्रेष्ठ म्हणजे पदार्थीय विश्वाहून/निसर्गाहूनही श्रेष्ठ असावी व या विशेष चैतन्यशक्तीने पदार्थीय विश्वाची/निसर्गाची निर्मिती करताना मनुष्य नावाच्या विशेष प्राण्याची निर्मिती केली असावी हा कुतूहल मिश्रित प्रश्न मानवी मनाला सतत पडतो. 

पदार्थ व रसायन विज्ञानाचा अधिक प्रगत असा यांत्रिक उपयोग करून मानवी बुद्धीने या मूलभूत विज्ञानात तांत्रिक क्रांती केली, पण त्याही पुढे जाऊन मनुष्याने त्याच्या सुज्ञ बुद्धी व उदात्त भावनेच्या जोरावर धर्म, कायदा यांची निर्मिती करून मानव समाजात सांस्कृतिक क्रांती केली. याच सांस्कृतिक क्रांतीत कुठेतरी परमेश्वर (निसर्गाहूनही श्रेष्ठ अशी विशेष चैतन्यशक्ती) असल्याचे मानवी मनाला जाणवते व धर्म, कायदा ही देववाणी वाटू लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.४.२०२४