https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३१ मार्च, २०२४

आमच्या सिद्धीचे लग्न!

आमच्या सिद्धीचे लग्न!

मॕट्रीमोनी ताई, सगळंच काही बायोडाटात मांडता येत नाही. पण मुलाचा काका म्हणून सांगतो की, ज्या मुलीचे आमच्या सिद्धीबरोबर (सिद्धांत विठ्ठल मोरे) लग्न होईल तिच्या आयुष्याचे कल्याण होईल. मी जे खडतर जीवन अनुभवलेय त्याही पेक्षा जास्त खडतर जीवन आमच्या सिद्धीने अनुभवलेय व तरीही ३२ वर्षे झाले तो संयम पाळून आहे. या मुलाची उंची, त्याचे गोरेपण, त्याचा हँडसमपणा, त्याचे बोलणे, त्याचा स्वभाव बघून नुसत्या आकर्षणावर भाळणाऱ्या मुली प्रेमासाठी त्याच्या मागे लागल्या नसतील का? पण आमचा मुलगा घरंदाज, सुसंस्कृत व विवेकी आहे म्हणून ३२ वर्षे झाले तरी असल्या वरवरच्या प्रेमाच्या नादाला तो लागला नाही याचा आम्हाला अभिमान आहे. मी माझा विवाह जमवून लग्न केलेय. लग्ना अगोदर तीन मुलींनी माझ्या सोबत प्रेमाचे नाटक करून मला नाकारले ते चांगले झाले. कारण म्हणून तर ३९ वर्षे माझ्याबरोबर माझ्या खडतर परिस्थितीतही संसार करणारी पत्नी मला मिळाली. माझ्या मुलीनेही ३२ व्या वर्षीच वधूवर सूचक विवाह संस्थेच्या माध्यमातूनच जमवून लग्न केले. लग्नाअगोदर बाॕय फ्रेंड, प्रेम नाही केले. उच्च शिक्षण व उच्च करियरचे ध्येय समोर असल्याने संयम पाळला. पण खरं तर इथे शिक्षणापेक्षा मुलामुलींवरील योग्य संस्काराचा व सुसंस्कृतपणाचा प्रश्न असतो. नुसत्या फोटोवरून व बायोडाटा वरून माझ्या पुतण्याची (सिद्धीची) कसली वर परीक्षा घेणार तुमच्या संस्थेत नाव नोंदवलेल्या मुली? त्याला प्रत्यक्ष बघितल्यावर, त्याच्याशी बोलल्यावरच आमचा मुलगा कसा आहे हे त्या मुलींना कळेल. मी मात्र ठामपणे हेच म्हणेल की आमच्या सिद्धीला ज्या मुली नाकारतील त्यांचे ते दुर्दैव असेल आणि त्याला समजूतदार, संसारी, चांगली मुलगी मिळण्याचे ते सुदैव असेल. आमचे चोहोकडून तसे प्रयत्न चालू आहेत. योग आला की तसेच होईल. हे लग्न जमवायचे काम चाललेय, नोकरी मिळविण्याचे नव्हे म्हणून सरळस्पष्ट लिहिले हे लक्षात घ्यावे.

-ॲड. बळीराम मोरे (मुलाचा काका), १.४.२०२४

गुरुवार, २८ मार्च, २०२४

आमचा सुवर्णकाळ!

खरंच आम्ही नशीबवान म्हणून आम्ही तो नैसर्गिक सुवर्णकाळ जगलो!

तांत्रिक प्रगतीने माणसे यंत्रे झाली. त्यांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेची संगत लागली. तुम्ही कोणाची संगत करता यावर तुमच्या आयुष्याचे गणित अवलंबून असते. आमच्या लहानपणी व तरूणपणात आमच्या हातात मोबाईल नव्हते व कसली ती आॕनलाईन संपर्काची भानगड नव्हती. आमचे खेळ मैदानी होते म्हणून आम्ही आॕनलाईन गेम्सच्या जाळ्यात सापडलो नव्हतो. आमचा माणसांशी संपर्क प्रत्यक्ष होता आणि म्हणून तो नैसर्गिक होता. तो व्हॉटसॲप सारखा कृत्रिम नव्हता. आमची लग्ने प्रत्यक्ष भेटीतून जमायची. हल्लीच्या आॕनलाईन वधूवर सूचक केंद्रातून नव्हे. आम्ही नैसर्गिक जीवन जगलो. हल्लीची पिढी डिजिटल क्रांतीला डोक्यावर नाचवत कृत्रिम जीवन जगत आहे. अशा कृत्रिम जीवनाची आम्हाला कीव येते! खरंच आम्ही नशीबवान म्हणून आम्ही तो नैसर्गिक सुवर्ण काळ जगलो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.३.२०२४

काल्पनिक आभासी मिथ्य कथा!

काल्पनिक आभासी मिथ्य कथा!

मित्रहो, कृपया मला पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मिथ्या, अंधश्रद्ध कथांचे लिखाण किंवा व्हिडिओज पाठवू नका. मी विज्ञाननिष्ठ माणूस आहे. अशा कथांत सांगितलेले सर्व काल्पनिक, आभासी असते. असे काहीही प्रत्यक्षात होत नाही. या सगळ्या कल्पना आहेत. वास्तव फार वेगळे आहे. मनाला विरंगुळा म्हणून सुद्धा मी असले लिखाण वाचत नाही, व्हिडिओज बघत नाही. याला इंग्रजीत मिथॉलॉजी (मिथ्य) म्हणतात. खरे सांगायचे तर, आता जसे काही लेखक काल्पनिक कथा, कादंबऱ्या लिहितात ज्यावर काही चित्रपटही येतात अगदी तसेच विज्ञानाने अप्रगत असलेले पूर्वीचे लोक असल्या काल्पनिक कथा रचायचे. पुढे लोकांनी या मिथ्य कथांना तिखटमीठ लावून त्यात चमत्कार घुसवून त्या कथा खऱ्या वाटतील अशी त्यांची रचना केली. असो, यावर अधिक भाष्य करणार नाही. लोकांना माझे हे म्हणणे पटावे अशी माझी अपेक्षा नाही. लोकांनी त्यांना जे योग्य वाटेल ते करावे. मला जे योग्य वाटेल ते मी केले व करीत आहे समाजातील अंधश्रद्ध लोकांची पर्वा न करता. सत्य हे कटू असते. लोकांना ते कसे आवडेल? म्हणून ते लोकांना समजावून सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही. तरीही माझी भूमिका एकदा स्पष्ट केल्यावर सुद्धा जर कुणी मला त्याचे किंवा तिचे ते न पटणारे लिखाण, व्हिडिओ पाठवले तर या सर्वांना मी माझे स्मरणपत्र (रिमांइडर) पाठवतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४

बुधवार, २७ मार्च, २०२४

वधू परीक्षा!

वधू परीक्षा!

हल्ली मुले मुली एकतर अगोदर प्रेम करून आईवडिलांना नंतर सांगतात की अमूक अमूक हा किंवा ही माझा जीवनसाथी/जोडीदार किंवा स्वतःच वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून आपला जोडीदार निवडून आपल्या आईवडिलांपुढे उभा करतात. मग आईवडिलांना लग्न मंडपात जाऊन त्यांना आशीर्वाद द्यायचे तेवढेच  काम उरते.

आमच्या काळात परिस्थिती वेगळी होती. प्रेम विवाहाला विशेष करून घरातूनच अनेक अडथळे निर्माण केले जायचे. त्यामागे आईवडिलांचे तसे ठोस कारणही असायचे व ते कारण म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणी अनोळखी व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवू नये. माझ्या बाबतीत थोडे असेच झाले. माझे आॕफीसमधल्या एका मुलीवर प्रेम बसले. ती तशी  आमच्याच मराठा जातीतली होती. शिवाय एम.ए., बी.एड. अशी उच्च शिक्षित होती. मीही नोकरी करीत त्यावेळी बी.कॉम. (आॕनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. अशा तीन शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्या होत्या. ती दिसायलाही सुंदर होती. दोघे एकाच ठिकाणी नोकरीत व दोघेही कायम झालेलो. थोडक्यात आमचे ते परफेक्ट मॕच होते.

ती मला म्हणाली "अरे, तुझे घर व आईवडील कधी दाखवतोस"? मी तिला सांगितले की "तू आमच्या घरी गणपतीला ये, देव दर्शनही होईल, घरही बघशील आणि आईवडील पण भेटतील". ती तयार झाली. मग गणपतीत मी आईला ती घरी येतेय तेव्हा काकांना (माझ्या वडिलांना) घरी थांबायला सांग असे सांगितले. आईने वडिलांना तसे सांगितलेही.

मग ती व मी आॕफीस सुटल्यावर आमच्या वरळी बी.डी.डी. चाळीत असलेल्या १२० चौ. फुटाच्या छोट्या खोलीत आलो. पण घरी आलो तर काय माझे वडील अंगावर कधी नाही ती फाटकी बनीयन घालून बसलेले. आईचा चेहरा हिरमुसलेला. कारण माझ्या वडिलांसमोर कोणाचे काही चालत नसे. माझ्याकडे बघत तिने कसेबसे गणपतीचे दर्शन घेतले व आईने दिलेला चहा घेऊन सर्वांना नमस्कार करून मला "चल खाली मला कॕबमध्ये बसवून दे" म्हणाली. मी तिला घेऊन चालत चालत कॕब शोधण्यासाठी जांबोरी मैदानाजवळ येईपर्यंत ती माझ्याशी काही बोलली नाही. मग त्या भयाण शांततेतच मी तिला कॕबमध्ये बसवून दिले. मी घरी आलो तेव्हा फाटक्या बनियनमध्ये बसलेल्या वडिलांना जाम भांडावे असे वाटले पण शेवटी गप्प बसलो व कसेबसे चार घास खाऊन वर गच्चीवर जाऊन झोपलो. त्या रात्री खरंच मी गच्चीवर एकटाच खूप रडलो.

आता पुढची गोष्ट सांगतो. दुसऱ्या दिवशी मी आॕफीसमध्ये गेलो. मला वाटत होते की ती आमचे छोटे घर व आमच्या गरीब, फाटक्या व अशिक्षित माणसांपेक्षा प्रतिकूल परिस्थितीतून एवढे उच्च शिक्षण घेतलेल्या मला किंमत देईल व आपण स्वतंत्र राहू असे म्हणून लग्नाला होकार देईल. पण तिने त्या दुसऱ्याच दिवशी मला नकार दिला. ही होती माझ्या वडिलांनी फाटकी बनीयन घालून तिची घेतलेली साधी वधू परीक्षा. पुढे वडिलांनीच गावी जाऊन दुसरे स्थळ जमवले ती माझी बायको फक्त बारावी शिकलेली पण दिसायला तिच्यापेक्षा सुंदर जिच्या बरोबर मी १९८५ पासून गेली ३९ वर्षे संसार करीत आहे.

ही माझी स्वतःची सत्यकथा आहे. पूर्वी लग्ने ही अशी जमायची व वधू परीक्षा या अशा व्हायच्या. पदराला पदर लागलाच पाहिजे म्हणजे वधू वराच्या कुटुंबांचा धागा हा जवळच्या नातेवाईकांच्या नातेसंबंधात कुठेतरी जुळलाच पाहिजे यावर दोन्ही कुटुंबांचा कटाक्ष असायचा. हल्ली लग्ने कशी जमतात, आॕनलाईन वधूवर सूचक मंडळांनी पैशासाठी लग्नाचा काय बाजार मांडलाय यावर लिहावे व बोलावे तितके कमीच!

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४

भौतिकतेचा भस्मासूर!

भौतिकतेच्या आहारी गेलेला माणूस आध्यात्मिक शांती शोधतोय?

विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे म्हणतात. तेव्हापासून हे विश्व प्रसरण पावतेय. या प्रसरणाचा एक भाग म्हणजे पृथ्वीवरील निर्जीव व सजीव पदार्थ सृष्टीची उत्क्रांती.  बुद्धिमान माणूस हा सृष्टी उत्क्रांतीचा वरचा टप्पा.

बुद्धिमान माणसाची बुद्धी अचानक निर्माण झाली नाही. तीही अनेक आव्हाने, संकटे झेलत उत्क्रांत झाली व अजूनही होत आहे. प्रचंड मोठ्या विश्वाचे अंतराळ विज्ञान व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या सृष्टीचे विज्ञान हे एकसारखे नाही. अंतराळ विश्व व पृथ्वीवरील सृष्टी या दोघांची बेरीज म्हणजे निसर्ग असे ढोबळ मानाने म्हणता येईल.

निसर्ग व निसर्गाचे विज्ञान हे वास्तव आहे कारण ते प्रयोग, अनुभव व पुरावे यातून सिद्ध करता येते व ते सिद्ध झालेय. तसे परमेश्वराचे नाही. परमेश्वर हा मानवी बुद्धीचा तार्किक अंदाज आहे. निसर्ग आहे, निसर्गाचे विज्ञान आहे मग नक्कीच त्याच्या मागे कोणती तरी महान दैवी शक्ती असली पाहिजे व ती महाशक्ती म्हणजे परमेश्वर हा तर्क. हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही.

माणूस उत्क्रांत होत होता तेव्हा व आताही वैज्ञानिक व तांत्रिक दृष्ट्या खूप प्रगत झाल्यानंतर सुद्धा मानवी जीवनातील संकटे, आव्हाने, स्पर्धा, अशांती, भीती या गोष्टी चालूच आहेत. त्यामुळे मानवी मन तर्कावर आधारित असलेल्या परमेश्वराचा आधार शोधते.

पण परमेश्वराचा आधार खरंच किती जणांना मिळतो? तो सर्वांना समान मिळतो का? असमान मिळत असेल तर त्याची कारणे कोणती? या अशा तार्किक प्रश्नांतून अनेक कल्पना मानवी मनाने निर्माण केल्या. मुळात परमेश्वर हाच तर्कावर आधारित.  मग त्याचा आधार असमान म्हणून पुन्हा अनेक तर्कवितर्क. गतजन्माचे संचित (प्रारब्ध) ही अशीच एक कल्पना. स्वर्ग व नरक या सुद्धा कल्पना आहेत. या सर्व कल्पना असल्याने त्या पुराव्याने सिद्ध करता येणे शक्यच नाही. स्वतः परमेश्वर कोणालाही पुराव्याने सिद्ध करता आला नाही व येणार नाही. फक्त तर्कावर आधारित भावनिक श्रद्धा परमेश्वरावर ठेवायची. पण याच श्रद्धेचे जेव्हा अंधश्रद्धेत रूपांतर होते तेव्हा ते खूप त्रासदायक होते.

पिढ्यानपिढ्या काही अंधश्रद्धा पुढे ढकलल्या गेल्या व मानवी मनात रूतून बसल्या. त्या बाहेर काढून फेकून देण्याची हिंमत करण्यासाठी वास्तव काय व आपण करतोय काय याचा सारासार विचार करता आला पाहिजे. पण कोणाला वेळ आहे असा विचार करायला? एकीकडून डोंगर फोडून इमारती बांधल्या जात आहेत तर दुसरीकडून समुद्राच्या खालून रस्ता (टनेल) काढला जात आहे. यात परमेश्वराला कुठे शोधत बसायचे? तंत्रक्रांती ते अर्थक्रांतीच्या विकास प्रवासाने भयंकर गती धारण केलीय व भयानक स्पर्धा, भयाण अशांतता निर्माण केलीय. 

विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक जीवनशैलीने शरीराला थोडा आराम मिळतही असेल पण मनाचे काय? मन प्रचंड अस्थिर, अशांत व भयभीत झालेय त्याचे काय करायचे? मग आध्यात्मिक शांती मिळवायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी मंदिरात जावे तर तिथेही भक्तांची भयाण गर्दी. हे भक्त त्या मंदिरात देवापुढे उभे राहून देवाचे ध्यान कमी व भौतिकतेचाच विचार जास्त करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी कसली आध्यात्मिक शांती मिळणार?

आध्यात्मिक शांती सोडा साधी शांती मिळावी म्हणून शेतात एखाद्या मोठ्या दगडावर जाऊन शांत बसावे तर तिथेही खालून विंचू, साप येतील की काय याची भीती. जंगलात झाडाखाली जाऊन बसावे तर हिंस्त्र प्राणी हल्ला करण्याची भीती. इतकी ही भौतिकता भयानक, भयंकर भितीदायक आहे जिचा निर्माता कोण तर स्वतः परमेश्वर आणि त्याच परमेश्वराकडे संकटमुक्तीची, शांतीची प्रार्थना करायची? पटतात का या गोष्टी बुद्धीला?

विश्व प्रसरण पावतेय आणि भौतिक गोष्टींच्या हव्यासाचे शेपूट वाढतच चाललेय. ते कोणी रोखू शकणार नाही. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ताही मनुष्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या जोडीला आलीय. या भागीदारीतून भौतिकता हाहाकार माजवणार हे नक्की. भौतिकतेच्या भस्मासूराला परमेश्वर रोखू शकेल काय? तो रोखेल तेव्हा रोखेल पण तोपर्यंत आपणच स्वतःच्या भौतिक वेडाला रोखले पाहिजे. आपण जर स्वतःच आपल्या भौतिक मागण्या कमी केल्या व आजूबाजूला भौतिक विकासाचा जो धिंगाणा चाललाय त्यापासून स्वतःला जास्तीतजास्त अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तर आध्यात्मिक शांती नाही मिळाली तरी थोडी साधी शांती तरी मनाला जरूर मिळेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४

मंगळवार, २६ मार्च, २०२४

मॕट्रिमोनी ताई!

मॕट्रिमोनी ताई, नमस्कार.

मी वराचा डोंबिवलीला राहणारा काका आहे. वर बदलापूर येथे राहतो. मी तुम्हाला मुली (वधू) विषयीच्या अपेक्षा प्रत्यक्ष तुमच्या साईटवर सांगितल्या आहेत. अहो, तुम्ही तुमच्या साईटसवर वधूवर स्थळांच्या नोंदण्या फुकटात करता व नंतर कसले ते पॕकेज देऊन जोडीदार संपर्कासाठी पैसे मागता? हे मला मंजूर नाही. हा तर पैशाच्या तालावर चालवलेला लग्नाचा बाजार झाला. शेवटी मी वकील आहे त्यामुळे ही गोष्ट थोडी गांभीर्याने घ्या. स्थळ जमल्यावर आम्ही खुशीने देऊ की भेट म्हणून काही पैसे तुम्हाला. ही वधूवर सूचक सेवा तुम्ही समाजसेवा म्हणून अगोदर फुकटात किंवा अत्यंत कमी पैशात करा. अगोदर नीट स्थळे दाखवा व मगच पैशाची मागणी करा. तुम्हाला मध्यस्थ म्हणून पैशात कमिशन लागते काय? तुम्ही माझ्या पुतण्याच्या स्थळाची तुमच्याकडे नोंदणी करतानाच जर १०० रूपयांच्या वर एक जरी पैसा जादा मागितला असता तर मी तुमचा नाद लगेच तिथल्या तिथेच सोडून दिला असता. नोंदणी फुकट करून नंतर स्थळ दाखवताना तुम्ही पैशाची मागणी करता ही पद्धतच चुकीची आहे. धन्यवाद!

-ॲड.बळीराम मोरे, डोंबिवली

सोमवार, २५ मार्च, २०२४

शुभ मंगल सावधान!

शुभ मंगल सावधान!

अरे बेटा, नको वाटतंय रे तुझ्यासाठी आॕनलाईन जोडीदार शोधायला. ही आॕनलाईन जोडीदार शोधायची प्रक्रिया खूपच कठीण वाटतेय मला. ही आॕनलाईन वधूवर मंडळे अनुरूप जोडीदार शोधून देऊन हा जोडीदार तुम्हाला मॕच होतोय असे सांगतात आणि त्या मॕच जोडीदाराबरोबर बोलायला परवानगी द्या म्हटले की लगेच आॕनलाईन पैसे भरा म्हणतात. बेटा, मी तुझ्यासाठी आज दोन तीन मुली पसंत करून त्यांना लगेच फोन लावायचा प्रयत्न केला तर मला त्या आॕनलाईन वधूवर सूचक मंडळाचा मध्यस्थ मध्येच येऊन ताबडतोब पैसे भरा म्हणाला. अरे बेटा, मी पण गरीब आणि तू पण गरीब. मग काय माझ्याकडे पैसे नाहीत आणि बेटा तुझ्याकडेही पैसे नाहीत. आपण काय करणार? आणि तसेही आपण गरीब लोकांनी का म्हणून असे पैसे द्यावेत या मध्यस्थ विवाह संस्थांना? आॕनलाईन पैसे भरून पुढची गॕरंटी काय? ते पैसे फुकट गेले तर? ही मंडळे त्यांच्या विवाह संस्थेची जाहिरात मात्र फुकट करतात आणि नंतर हळूहळू पैसे उकळायला सुरूवात करतात. बेटा, तुझ्यासाठी मी काही आॕनलाईन विवाह संस्थेत फुकटात नोंदणी केली. त्यांना माझा ईमेल आय.डी. दिला. मग तुझे ते आॕनलाईन प्रोफाईल आवडले म्हणून मला वधूवर मंडळांमधील काही मुलींकडून ईमेल आले. पण मुलींनी पाठवलेल्या लिंकवर गेलो की लगेच प्रोफाईल प्रिमियम अपग्रेड करा व साधारण १५०० रू. एवढी रक्कम आॕनलाईन भरून मुलीशी अमूक अमूक काळ साधारण फक्त १० मिनिटे बोला असे मेसेज आले. खरंच हे सगळे माझ्या डोक्यावरून चाललेय बघ. बेटा, हल्ली काळ फार बिकट आलाय बघ. प्रत्यक्ष नोंदणी करणारी काही वधूवर सूचक मंडळे आहेत पण तीही ५०० रू. पासून ते ३००० रूपयापर्यंत नोंदणी फी मागतात. तिचा काळही मर्यादित एक वर्षासाठी असतो. त्या एक वर्षात लग्न नाही जमले तर पुन्हा नवीन नोंदणी फी भरा. तिथे त्यांच्या फाईल्समध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये विवाह इच्छुक मुला मुलींची माहिती ठासून भरलेली असते. पण बेटा, आॕनलाईन नोंदणी असो नाहीतर प्रत्यक्ष नोंदणी, ही वधूवर सूचक मंडळे या सामाजिक संस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्याही फुकट समाजसेवेची अपेक्षा करू नकोस. लग्नाचा बाजार मांडलाय यांनी व विवाह हा पैसे कमावण्याचा धंदा केलाय यांनी. हल्लीची तरूण मुले मुली यांच्या जाळ्यात कशी सापडलीत हेच कळेनासे झालेय. मला खूप वाईट वाटते याचे. पण हल्लीच्या या तरूण पिढीला तरी माझे म्हणणे काय पटणार? कारण आम्ही जुनाट वळणाची माणसे. आणि आमच्या जुनाट गोष्टी म्हणजे आम्हाला फुकटात नातेवाईकच मध्यस्थ बनून लग्न जमवायला मदत करायचे. आमचे आईवडीलही पदराला पदर लागतोय का याची काळजी घ्यायचे. पण खरंच जुनाट वळणाच्या आमचे संसार या जुनाट वळणावरच व्यवस्थित पार पडले ही गोष्ट खरी आहे. तरीही आम्ही नवीन पिढीला जुनाट वाटतो. मग फसतात बिच्चारे आणि भोगतात फळे. पण याला काही चांगल्या विवाह संस्था व काही चाणाक्ष मुलेमुली अपवाद आहेत बरं का! पण हे अपवाद सोडले तर बेटा आयुष्याची धूळवड केलीय बघ या विवाह संस्थांनी व त्यांच्या नादी लागलेल्या हल्लीच्या मुलामुलींनी!

-©ॲड.बी.एस.मोरे, धूळवड, २५.३.२०२४,