बाळूचे लग्न!
बरोबर ३९ वर्षापूर्वी १९८५ सालच्या याच मार्च महिन्यात बाळूचे (माझे) लग्न जमविण्यासाठी काकांनी (माझ्या वडिलांनी) जावईबापू श्री. बी.एन.पवार यांना (आमचे गोव्याचे भाऊजी) गळ घातली. मग आमच्या गोव्याच्या भाऊजींनी त्यांच्या नाते संबंधातील (बहुतेक बिरूताई पवार, पुणे) कुर्डुवाडीचे स्थळ माझ्यासाठी शोधले. याच महिन्यात १९८५ साली माझे वडील (काका) व गोव्याचे भाऊजी माझ्या होणाऱ्या बायकोला (मुलीला) बघण्यासाठी कुर्डुवाडीला गेले. त्यानंतर पुढच्याच महिन्यात (एप्रिल १९८५) मी व पंढरपूरची माझी ताई (भामाताई) मुलीला बघण्यासाठी कुर्डुवाडी येथे गेलो. मी माझ्या होणाऱ्या बायकोला (जी १९८५ ते २०२४ हा ३९ वर्षाचा एवढा मोठा दीर्घकाळ अर्धांगिनी बनून माझ्याशी संसार करीत आहे) एक दोन प्रश्न पाहुणे मंडळींसमोर विचारून लगेच तिला पसंत केली व मुंबईला परत आल्यावर आईवडील व गोव्याच्या भाऊजींमार्फत माझा तिकडे होकार कळविला. लगेच त्याच महिन्यात (एप्रिल १९८५) आलेल्या श्रीराम नवमीला माझी लग्नाची सुपारी फुटली व टिळा लावण्याचा कार्यक्रम पार पडला. मग पुढील महिनाभर (मे १९८५) लगीनघाई आणि ३१ मे १९८५ रोजी भामाताईच्या दारात पंढरपूरला माझे लग्न व्यवस्थित पार पडले.
संसारात भांड्याला भांडे लागतेच त्यात काही नवल नाही. तशी आम्हा पती पत्नीतही क्षुल्लक कारणांवरून भांडणे झाली. पण तरीही संसार मजेत झाला. त्या भांडणांचीही मजा होती. आता उतार वयात आमच्या संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्याने आमची भांडणेच होत नाहीत. एकुलत्या एक मुलीचे उच्च शिक्षण पूर्ण होऊन ती तिच्या सासरी आनंदात आहे. जीवन कृतार्थ झाले!
माझ्या या यशस्वी संसारासाठी मी माझे भाऊजी (बी.एन.पवार) यांना खूप धन्यवाद देतो. कारण त्यांनी केलेल्या प्रामाणिक, काळजीपूर्वक प्रयत्नांमुळेच मला माझी अर्धांगिनी मिळाली जिने मला माझ्या गरिबीत, खडतर प्रवासात कायम साथ दिली. दुसरे धन्यवाद माझे दुसरे भाऊजी म्हणजे पंढरपूरच्या भामाताईचे पती कै. विजय धोंडिबा मोरे यांना. माझे लग्न पंढरपूरला त्यांच्याच दारात झाले जरी लग्न अक्षता चंद्रभागा नदीकाठी असलेल्या द्वारकाधीश मंदिरात पडल्या. माझ्या लग्न पत्रिकेत श्री. बी.एन. पवार व श्री. विजय धोंडिबा मोरे या माझ्या दोन मेहुण्यांचीच नावे निमंत्रक म्हणून आहेत. आईवडील तर होतेच पाठीशी. पण ते आता हयात नाहीत.
अशी व्हायची पूर्वीची लग्ने. नाहीतर आता काय ती वधूवर सूचक मंडळे व लग्नाचा बाजार!
-©ॲड.बी.एस.मोरे (बाळू), ११.३.२०२४