हार्ट ब्लॉक नंतर आता मेंटल ब्लॉक!
निसर्गाने किंवा निसर्गातील त्या महान परमेश्वराने मानवी शरीर हे काय अजब यंत्र बनविले आहे त्याचा फाॕर्म्युला त्या परमेश्वरालाच ठाऊक. मेंदू, हृदय, किडनी, छाती, पोट, डोळे, नाक, कान अशा अनेक अवयवांचे वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ शरीराच्या ठराविक भागाविषयीच्या त्यांच्या विशेष पण तरीही मर्यादित वैद्यकीय ज्ञानाने रूग्णांच्या शरीरावर निरनिराळे प्रयोग करीत असतात. गंमत ही की त्यांच्या या प्रयोगांनी शरीराचा एक अवयव सुधारला तर दुसरा अवयव बिघडतो. मग जा त्या दुसऱ्या अवयवाच्या तज्ज्ञाकडे.
माझेच उदाहरण घ्या ना. माझ्या हृदयात ६७ वयात कसला तो २:१ ए.व्ही. ब्लॉक निर्माण झालाय व त्याने माझ्या हृदयाचे इलेक्ट्रिक सर्किटच बिघडवून टाकले. आता इलेक्ट्रिक करंटच अनियमित झाला तर हृदयाचे पंप बिघडून हृदयातून संपूर्ण शरीराला होणारा रक्तप्रवाह पण अनियमित होणार ही नैसर्गिक वैज्ञानिक गोष्ट आहे ज्यावर देवाचे अध्यात्म काय करणार? माझ्या मेंदूत जगाच्या विचाराचा किडा सारखा वळवळत असतो. त्यामुळे माझा मेंदू हृदयाकडून जास्तीतजास्त रक्ताची मागणी करतो. ६७ वर्षे रक्ताचे पंपिंग करून करून माझे हृदय बिच्चारे थकले. आता ते माझ्या मेंदूला जुमानत नाही. माझ्या हृदयाच्या या असहकारामुळे माझा मेंदू हल्ली संभ्रमित व घाबरट झाला आहे. तो त्याचा आत्मविश्वास गमावत चाललाय आणि ही सर्व परिस्थिती हृदयाच्या ब्लॉकमुळे निर्माण झालीय. इथे हृदय मेंदूवर वरचढ ठरलेय.
त्यामुळे झालेय काय की अंघोळ ही साधी गोष्ट सुद्धा मला कठीण होऊन बसलीय. शरीराच्या खांद्याखालील भागाला कितीही साबण लावा त्याने त्रास होत नाही. पण एकदा का डोक्याला व तोंडाला साबण लावला की कधी डोक्यावरून पाणी घेतोय व डोक्याचा, तोंडाचा तो फेस धुवून काढतोय असे होऊन जाते. नेमके याच वेळी हृदयाला मस्ती येऊन ते मेंदूचा रक्त पुरवठा कमी करते आणि मग मेंदूला काय करावे हे सुचतच नाही. तो घाबरून जातो व मेंदू घाबरला की जीव गुदमरून जातो. हा क्षण म्हणजे धड जीवन नाही व धड मरण नाही असा मधल्या मध्ये लटकण्याचा क्षण. या क्षणात देवाचे कसले ते अध्यात्म सुचतच नाही. इतक्या देवदेवता आहेत व इतके साधुसंत आहेत पण एकाचेही नाव घेता येत नाही मग त्यांचा धावा कसला करणार? त्यावेळी कोणीच वाचवायला येत नाही. मग स्वतःच स्वतःला सावरून डोक्यावर पाणी घेऊन त्या भयंकर क्षणातून बाहेर यावे लागते.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर हार्ट ब्लॉक नंतर आता माझ्या मेंदूत मेंटल ब्लॉक झालाय. याचे कारण हृदय व मेंदू हे शरीराचे दोन प्रमुख अवयव एकमेकांशी निगडीत आहेत. एक अवयव बिघडला की दुसरा अवयव बिघडतो. कॉर्डिओलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सुचवलेय तर माझ्या हृदयाजवळ पेसमेकर म्हणजे हातातील घड्याळाची आकाराची बॕटरी बसवा. त्यांना हृदयाच्या पलिकडे काही कळतच नाही. ती कृत्रिम बॕटरी छातीत घातली तर माझ्या हृदयाची टिकटिक वाढेल म्हणे. पण त्याने माझा मेंदू बिघडेल त्याचे काय? यावर कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टरांकडे काय उपाय आहे? या बॕटरीने माझा मेंदू शंभर टक्के बिघडणार याची मला पूर्ण खात्री आहे कारण माझा मेंदू या असल्या कृत्रिम उपकरणांवर जगायला तयारच नाही.
होऊन होऊन काय होईल? माझ्या हृदयाची हळूहळू चालू असलेली टिकटिक बंद पडेल आणि मी मरेल एवढेच ना! त्याला तर माझा मेंदू केंव्हाच तयार झालाय. कदाचित मी बाथरूम मध्ये अंघोळ करतानाच मरून पडेल असे वाटतेय. कारण अंघोळ करताना माझा हार्ट ब्लॉक माझ्या मेंदूत मेंटल ब्लॉक तयार करतो. यावर तात्पुरता इलाज म्हणून आता मी काय करणार तर अंगाला भरपूर साबण लावला तरी डोके व तोंड या भागांना अगदी थोडा साबण लावणार म्हणजे तिथे जास्त फेस होणार नाही आणि मग तो मेंटल ब्लॉक तयार व्हायच्या आत पटकन डोक्यावरून पाणी घेऊन मोकळे होणार. उगाच लोचा व्हायला नको. पण हॉस्पिटलमध्ये मरण्यापेक्षा घरात मरणे ही तशी चांगलीच गोष्ट आहे मग त्यासाठी बाथरूम तर बाथरूम.
मी बायकोला व मुलीला सांगूनच टाकलेय की मला हृदयविकाराचा झटका आला की लगेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्यायची बिलकुल घाई करायची नाही. मी बेशुद्ध असलो तर मला न विचारता तिथे माझ्या छातीची चिरफाड करून तो पेसमेकर बसवला तर? माझ्या हृदयाचे मिटर बंद झाले तरी चालेल पण त्या डॉक्टरांच्या जबरदस्त फी चे मिटर चालू व्हायला नको. तसे तर हार्ट अटॕकने पटकन मृत्यू यायला माणूस पुण्यवान असावा लागतो. मी तसा पुण्यवान माणूस आहे हे सिद्ध करण्याची मला देवाने दिलेली संधी मी का दवडू?
अंगाला विशेष करून डोक्याला व तोंडाला जास्त साबण लावला की त्रास होतो व देवाचे अध्यात्म जास्त केले की नैराश्य येते हा तसा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझे वडील जास्त देवदेव करीत नव्हते पण ते ७९ वर्षे जगून शांतपणे हार्ट अटॕकने गेले. याउलट माझी आई देवाची खूप पूजा अर्चा करायची पण तिला कमी वयात मधुमेह झाला आणि त्या साखर आजाराने तिला भयंकर त्रास दिला. पायाला मधुमेहामुळे गँगरीन झाले. जे. जे. हॉस्पिटलमध्ये पायाची बरीच आॕपरेशन्स झाली. शेवटी कमी वयातच जे.जे. रूग्णालयातच तिने प्राण सोडले. हा कसला देवाचा उलटा न्याय? इतरांचे अनुभव मला माहित नाहीत व त्यांच्याशी माझे काही घेणे देणे नाही. मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून बोलतो व लिहितो. निसर्गाचे विज्ञान काय किंवा परमेश्वराचे अध्यात्म काय, या दोन्ही गोष्टी मी जेवढ्यास तेवढ्या करतो. माझ्या हार्ट व मेंटल ब्लॉकसनी माझे ज्ञान आणखी वाढवले एवढे मात्र नक्की!
-©ॲड.बी.एस.मोरे, १४.२.२०२४