https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

निसर्गापासून अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?

निसर्गापासून निसर्गाचा अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल?

निसर्गापासून निसर्गाचा अंतरात्मा म्हणजे परमात्मा वेगळा कसा करता येईल, मानवी मनाचे अंतरंग हेच तर मानवी शरीराचे बाह्यरंग असतात, शारीरिक हालचालीतून ते प्रकट होतात, मनाचे अंतरंग व शरीराचे बाह्यरंग हे जर वेगळे नाहीत तर निसर्ग व निसर्गाचा अंतरात्मा किंवा परमात्मा हे वेगळे कसे, याच तर्काने निसर्गाचे विज्ञान व अंतरात्म्याचे किंवा परमात्म्याचे अध्यात्म हे वेगळे कसे, आम्ही निसर्ग व निसर्गाचे विज्ञान जगतो पण परमात्मा व त्याचे अध्यात्म पूजतो व त्यातून आम्ही वास्तवालाच काल्पनिक बनवतो! -ॲड.बी.एस.मोरे

भानासाठी ज्ञान!

भानासाठी ज्ञान!

शिक्षण म्हणजे सभोवतालच्या पर्यावरणाचे व त्यात असलेल्या स्वतःचे ज्ञान. ज्ञान हे मर्यादेचे भान देते. शिक्षणातून मिळवलेले ज्ञान हे पैसे कमावण्याचे व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकत नाही. त्या ज्ञानात मिळवलेले विशेष प्रावीण्य, कौशल्य हे पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल होऊ शकते. असे कौशल्य विशिष्ट ज्ञानावर केलेल्या प्रयत्नातून, सरावातून प्राप्त होते. असा सराव म्हणजे हिऱ्याला पैलू पाडण्याचा प्रकार असतो. पण ज्ञानाच्या अनेक शाखा असल्याने त्या प्रत्येक शाखेत सराव करून सर्व शाखांत प्रावीण्य मिळवता येत नाही. अर्थात ज्ञानाच्या खाणीतील सर्व हिऱ्यांना एकटा माणूस पैलू पाडू शकत नाही. तशी अपेक्षा करणे चुकीचे. मुळात शिक्षण व ज्ञानाला पैसा व सत्ता प्राप्तीचे भांडवल समजणेच चूक आहे. सर्व ज्ञान शाखांचे, क्षेत्रांचे थोडे थोडे जुजबी ज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान जे सर्वांना असणे आवश्यक असते. हे सामान्य ज्ञान शालेय शिक्षणातून मिळते. या सामान्य ज्ञानाशिवाय माणसाला सामान्य भान येत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला निदान इयत्ता दहावी पर्यंत तरी शिक्षण हे असलेच पाहिजे. एवढेही शिक्षण नसलेली माणसे राजकारणात यशस्वी होऊ शकतात पण कधी तर समाज बहुसंख्येने अशिक्षित असेल तर. बहुसंख्य जनता जर सुशिक्षित असेल तर अशिक्षित (म्हणजे कमीतकमी सामान्य ज्ञानाचे शालेय शिक्षण नसलेल्या) माणसांची राजकारणात डाळ शिजणार नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की मर्यादा भानासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण ते पैसा व सत्ता मिळविण्याचे भांडवल होऊ शकत नाही. मी अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण, नंतर बी.काॕम. चे पदवी शिक्षण, पुढे पदव्युत्तर कंपनी सेक्रेटरी (इंटर) शिक्षण व शेवटी कायद्याचे पदव्युत्तर एलएल.बी. शिक्षण एवढे उच्च शिक्षण घेतले. पण या एवढ्या ज्ञान पसाऱ्यातून मी उदरनिर्वाहासाठी वकिली व्यवसाय स्वीकारला व तो करताना कायदा ज्ञानाच्या विशाल सागरातील काही थेंबांवरच प्रभुत्व मिळवले, त्यात कौशल्य प्राप्त केले. ते कौशल्य माझ्या संपूर्ण ज्ञानाच्या एक टक्का (१%) एवढेही नाही. अर्थात माझे एक टक्का ज्ञान एवढेच माझे पैसा कमावण्याचे भांडवल झाले. त्या भांडवलावर मी फक्त माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सामान्य गरजांपुरता थोडाच पैसा कमवू शकलो. ही झाली अर्थकारण क्षेत्राची गोष्ट. राजकारण क्षेत्रात मला गतीच नाही कारण त्या क्षेत्रात मला कौशल्य प्राप्त करता आले नाही. त्यामुळे राजकीय सत्तेचा मला गंधही नाही. ज्ञानाने माझ्यावर खूप उपकार केलेत. मी सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळे मी जास्त उंच उड्या मारू नयेत याचे भान मला सतत याच ज्ञानाने दिले व मला भानावर ठेवले. थोडक्यात, मर्यादा भानासाठी ज्ञान हाच ज्ञानाचा मुख्य हेतू एवढेच मला या लेखातून सांगायचे आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २२.१.२०२४

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे!

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे लागते!

श्री. रविंद्र मालुसरे, अध्यक्ष, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, आपण रामायणावर हे छान लिहिले आहे ते मी समाज माध्यमावर शेअर करतो. पण धर्माचे राजकारण करणाऱ्यांना हे कितपत रूचेल? सद्या वाल्मिकी रामायणाचाच गाजावाजा होताना दिसत आहे. तुलसीदासांचे रामायण पण आहे. भृगू ऋषी यांनी पण टीकात्मक रामायण लिहिले आहे असे कुठेतरी वाचण्यात आले. पण बहुसंख्य लोकांना धार्मिक भावनांवर डोलताना भौतिक वास्तवाचा अर्थात आकाशात उडताना पृथ्वीवरील जमिनीचा विसर पडताना दिसतो. लोकांच्या याच भावनिक मानसिकतेचा राजकारणी लोक फायदा उठवतात व धर्माला राजकारणाच्या दावणीला बांधतात. पण राजकारण्यांचा हा धूर्तपणा लोकांना कळत नाही. धर्माचा राजकारणासाठी वापर होऊ नये असे कितीही वाटले व ते असंविधानिक असले तरी तसा वापर होतोच. यावर रोखठोक बौद्धिक विचार मांडण्याची सोय नाही. कारण धर्मभावनेने बेभान  झालेले लोक अंगावरून चवताळून येतात. त्यांना वास्तव लेखन आवडत नाही. मला सुद्धा समाज माध्यमावर फार सांभाळून लेखन करावे लागते. खूप बौद्धिक कष्टाने मिळवलेले वकील पद व वयाचे ज्येष्ठत्व याची बिलकुल पर्वा न करता ओळख पाळख नसलेले पण स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्र झालेले फेसबुकी मित्र अशा स्पष्ट लिखाणावर सरळ सरळ शिव्या द्यायला कमी करत नाहीत. मला असे अनुभव अधूनमधून येतात. मग खालची बौद्धिक पातळी असलेल्या चुकून माझे मित्र झालेल्या लोकांना मला ब्लॉक करावे लागते. म्हणून तर मी माझे फेसबुक खाते निवडक वैचारिक मित्रांसाठी मर्यादित ठेवले आहे. आपले लेखन छान असते. धन्यवाद!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१.२०२४
https://poladpuraasmita.blogspot.com/2024/01/blog-post_21.html

व्यायाम व जीवन योग!

झोप अर्थात निद्रितावस्था ही जिवंत शरीर व मनाची तात्पुरती विश्रांती होय, झोप पुरी झाल्यानंतर सुरू होते जागृतावस्था ज्यात शरीराच्या शारीरिक हालचालीचा व मनाच्या भावनिक, बौद्धिक क्रियेचा व्यायाम सुरू असतो, दृढ निश्चय, मनोनिग्रह हा मनाच्या व्यायामाचा प्रमुख भाग असतो, शारीरिक व मानसिक व्यायाम ही समांतर प्रक्रिया आहे व दोन्ही व्यायाम प्रक्रियेत संतुलन हाच जीवन योग असतो! -ॲड.बी.एस.मोरे

राजेशाही, लोकशाही!

राजेशाही ही वारसा हक्काने घराण्यातच राहिली (तेव्हाची घराणेशाही) व पेशवाई (तेव्हाचे पंतप्रधान पद) ही कर्तबगारीवर चालू राहिली. पण जेव्हा पेशवेच राजे म्हणजे सत्ताधीश झाले तेव्हा पेशवाई सुद्धा वारसा हक्काने पेशवा घराण्यातच राहिली व अशाप्रकारे पेशवाईत घराणेशाही घुसली. आताच्या लोकशाहीतील सर्वसामान्य जनता ही त्यावेळच्या राजेशाहीतील सर्वसामान्य प्रजा होती. -ॲड.बी.एस.मोरे (मला थोडक्यात समजलेला राजेशाही इतिहास)

FREE ADVOCACY?

FREE ADVOCACY?

One being advocate in his housing society may turn irritating if society takes such advocate for granted for free legal advice not just on few occasions but always. If this is the case of advocate's own society where he live what about other social &/or political organizations if advocate proposes to go free without any gain in return. The advocates are specially learned in special branch of knowledge called law and so if advocates are not free for professional service to business organizations then they should not be free for other organizations too. The exceptional free legal service to any poor, needy individual is different from such service to any group of people, social or political. The selfless social service is degrading and foolish act in selfish human society. If an advocate is specially learned in special branch of knowledge called law, then he has to be truly professional!

-©Adv.B.S.More, 21.1.2024

ईश्वर एक पण धर्म अनेक!

ईश्वर एक, पण त्याच्या धार्मिक मान्यता अनेक (अनेक धर्म व पंथ) याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेले ईश्वराचे विराट विश्वरूप. हा झाला विश्वाचा आध्यात्मिक अर्थ. याचा वैज्ञानिक अर्थ हा की, निसर्ग एक पण निसर्गाची विविधता अनेक (अनेकविध). हे असे की एकाच घड्याळाचे सेकंद काटा, मिनिट काटा व तास काटा हे तीन काटे वेगळे पण ते गोल चक्राकार फिरणाऱ्या वेळेचे संयुक्त भान देतात.  -ॲड.बी.एस.मोरे