https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

जीवन कर (लाईफ टॕक्स)

जगण्याचा जीवन कर (लाईफ टॕक्स)!

माणसांना जगण्यासाठी निसर्गाने दिलेली विविध साधने तशी फुकटच. पण ही साधने निसर्गाने फुकट दिली असली तरी ती माणसांच्या हाती निसर्ग सहजासहजी लागू देत नाही. त्यासाठी माणसांना निसर्गाला दोन प्रकारचे जीवन कर (लाईफ टॕक्स) द्यावे लागतात. एक कर म्हणजे कष्ट (बौद्धिक व शारीरिक) आणि दुसरा कर म्हणजे धोके (जे कधीकधी माणसांचा जीव घेतात). पाण्यात मासे भरपूर आहेत. जा आणि मासे फुकट पकडा व खा. पण हे मासे माणसांच्या हातात सहजासहजी येत नाहीत. ते निसटतात. म्हणून मग पाण्यात जाळे फेका आणि मग माशांना जाळ्यात पकडा. आला ना कष्ट नावाचा जीवन कर. दुसरी गोष्ट म्हणजे या मासेमारीत धोका हा असतोच. खोल पाण्यात नावेने जावे लागते. नाव बुडण्याचा धोका असतो. आला ना धोका नावाचा जीवन कर. जी गोष्ट मासेमारीची तीच गोष्ट शेतात धान्य पिकवण्याची. शेतात राबावे लागते (कष्ट). लहरी पाऊस कधीकधी दगा देतो (धोका). शेतात कष्ट करताना साप, विंचवाची भीती (धोका).

कष्ट व धोका हे दोन कर निसर्गाला दिल्यानंतर हातात जे येईल ते खा व शिल्लक राहिलेले बाजारात विका. म्हणजे पुन्हा बाजारात मालाची विक्री करण्याचे कष्टच. हा जीवन कर (कष्ट) मात्र समाजाला द्यावा लागतो. त्यात पुन्हा बाजारभावाची शास्वती नाही कारण ते कमीजास्त होतात (धोका). कष्ट व धोका हे दोन कर निसर्गाला देऊन भागत नाही. तर हे दोन्ही कर अशाप्रकारे पुन्हा समाजाला द्यावेच लागतात. पण यात समाजातील दुष्ट माणसांकडून फसवणूक किंवा लूटमार होण्याचा धोका असतो (हा एक विचित्र उपद्रवी समाज कर). मग या विचित्र उपद्रवी करापासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून समाजाने नेमलेल्या सरकारला राजकीय कर हा द्यावाच लागतो.

अशाप्रकारे निसर्ग, समाज व समाज पुरस्कृत सरकार या तिघांना वरील कर दिल्यावर हातात जे शिल्लक राहील ते खा, संसारात खर्च करा व त्यातून थोडीफार बचत करा जी म्हातारपणी उपयोगी येईल (बचत नाही केली तर ज्या मुलांचे नीट संगोपन केले त्याच मुलांकडून लाथ बसण्याचा धोका) आणि मग या बचतीतून जी काही शिल्लक राहील ती मुलांना सुपुर्द करून या भौतिक जगाचा कायमचा निरोप घ्या. या करयुक्त जगण्याला जीवन ऐसे नाव!

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.१.२०२४

देवत्वाची अनुभूती!

चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती!

मानवी जीवन विलक्षण आनंददायी आहे कारण याच जीवनात मनुष्य सकारात्मक, कल्याणकारी, चांगल्या भावनांचा अनुभव घेऊ शकतो. हा विशेष अनुभव हीच देवत्वाची श्रेष्ठ अनुभूती होय. मी देव पाहिला असे म्हणणारी व्यक्ती देवत्वाची हीच श्रेष्ठ अनुभूती घेत असते.

हे समजण्याची निसर्गाने पृथ्वीवर रचलेली सृष्टीची पर्यावरणीय रचना विज्ञानाच्या सहाय्याने अभ्यासली पाहिजे. या रचनेच्या पायाशी आहेत निर्जीव पदार्थ. या पदार्थांचे गुणधर्म  अजैविक व त्यांची या गुणधर्मांशी निगडीत असलेली बुद्धी यांत्रिक. मानवाने शोधलेली व उपयोगात आणलेली निर्जीव पदार्थांची कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या निर्जीवांची यांत्रिक बुद्धी. निर्जीव पदार्थांचे अजैविक गुणधर्म व त्यांची यांत्रिक बुद्धी तंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तळ मजला होय.

या पायावरील पहिली पायरी उत्क्रांत झालीय ती अर्धसजीव वनस्पतींची. अर्धसजीव वनस्पतींना जीव असतो, म्हणून त्यांना वासना, भावना व बुद्धी या तिन्ही गोष्टी असतात. पण त्या अर्ध विकसित पातळीवर असतात. या वनस्पतींचे अर्धजैविक गुणधर्म व या गुणधर्मांशी निगडीत असलेली या वनस्पतींची बुद्धी अर्ध यांत्रिक व अर्ध जैविक असते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा पहिला मजला होय.

वनस्पतींच्या नंतर उत्क्रांत झालेली दुसरी पायरी सजीव पशूपक्षांची. या सजीव पशूपक्षांचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्यांची पूर्ण सजीव जैविक बुद्धी ही वनस्पतींपेक्षा जास्त विकसित पण अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा दुसरा मजला होय.

पशूपक्षांच्या नंतर उत्क्रांत झालेली तिसरी पायरी म्हणजे पूर्ण विकसित झालेल्या सजीव माणसांची. मनुष्य  प्राण्याचे पूर्ण सजीव जैविक गुणधर्म (वासना व भावना) व त्याची पूर्ण सजीव जैविक बुद्धी सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण हे मानवी गुणधर्म व ही मानवी बुद्धी श्रेष्ठ असली तरी ती तंतोतंत नसते कारण निर्जीव पदार्थांप्रमाणे ती यांत्रिक नसते. ती अतंतोतंत असते. पर्यावरणीय सृष्टी रचना इमारतीचा हा तिसरा मजला होय. अशा रीतीने तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला अशी चार मजल्यांची ही पर्यावरणीय सृष्टी रचनेची इमारत निसर्गाने पृथ्वीवर उत्क्रांती करीत बांधली आहे.

या इमारतीच्या अगदी वरच्या म्हणजे तळ मजला (पाया) धरून चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या (जगणाऱ्या) माणसाच्या मूलभूत जैविक वासना (बेसिक इन्सटिन्क्टस) यांना ज्या पूरक भावना निसर्गाने चिकटवल्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत. या भावनांचा एक प्रकार आहे तो देव भावनांचा म्हणजे सकारात्मक किंवा चांगल्या, विधायक भावनांचा (उदा. प्रेम, करूणा) व दुसरा प्रकार आहे तो दैत्य/राक्षस भावनांचा म्हणजे नकारात्मक किंवा वाईट, विध्वंसक भावनांचा (उदा. राग, लोभ).

मूलभूत जैविक वासनांचे समाधान करण्याच्या प्रक्रियेत दैत्य/राक्षस भावनांना चांगले, विधायक वळण लावण्याचे काम देव भावना करीत असतात. अशाप्रकारे मेंदूमनाला चांगले वळण लावण्याच्या कामात जी मानवी बुद्धी योग्य साथ देते तिला सुबुद्धी म्हणतात व जी मानवी बुद्धी दैत्य/राक्षस भावनांना अयोग्य साथ देते तिला कुबुद्धी म्हणतात. सुबुद्धी मनुष्याच्या हातून देवकार्य म्हणजे चांगले कर्म घडवते तर कुबुद्धी मनुष्याच्या हातून दैत्यकार्य म्हणजे वाईट कर्म घडवते. मानवी जगात देव व दैत्यांचे हे युद्ध सतत चालू असते. माझ्या मते, मानवी जीवनात चांगल्या भावनांचा मंगल अनुभव हीच देवत्वाची अनुभूती. नीट अभ्यास केला तर सर्व धर्म, धम्मात याच मंगलाची प्रार्थना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

उतावीळपणा, चिंतातुरपणा!

उतावीळपणा व चिंतातुरपणा, कारणे व उपाय!

ज्या माणसाला तरूण, प्रौढ व वृद्ध वयातही लहान मुलासारखे जगता येते त्या माणसासारखे सुंदर जीवन नाही. लहानपणी भूक लागली तरी आईवडील भाकरी देणार याची खात्री असते. त्यामुळे काळजीचे कारण नसते. लहानपणात लैंगिक वासना नसते त्यामुळे वासनेने व्याकुळ, उतावीळ होण्याची गोष्ट नसते. शालेय शिक्षणातून काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद असतो. त्यामुळे त्याचा ताण जाणवत नाही. त्यामुळे लहानपणी आनंद, शांती, स्थिरता, एकाग्रता, निरागसता या सगळ्याच गोष्टी अत्युच्च शिखरावर असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतशा वासना वाढतात व त्याबरोबर जबाबदाऱ्याही. मग मन वासनेने उतावीळ व जबाबदारीच्या भितीने चिंतातुर होते. उतावीळपणा व चिंतातुरपणा ही दोन्ही मनाच्या भावनिक उद्रेकाची, मानसिक आजाराची लक्षणे आहेत. पण या दोन्ही मागची कारणे वेगळी आहेत. उतावीळपणा वासना काबूत ठेवता न आल्याने निर्माण होतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण यातूनच निर्माण झाली असावी. तर चिंतातुरपणा भितीवर मात करता न आल्याने निर्माण होतो. भावनिक उद्रेकाची ही दोन्ही लक्षणे फार त्रासदायक असतात. एकाग्रता कमी होणे, मन अस्थिर, अशांत राहणे हे मानसिक क्लेश, वेदना भावनिक उद्रेकाच्या या दोन लक्षणांमुळे मनाला होतात. या लक्षणांमुळे जीवनाचा आनंद कमी होतो. जो माणूस वासनेने उतावीळ व भितीने चिंतातुर होत नाही तो माणूस लहान मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१.२०२४

लोकांना ज्ञानामृत पाजणे किती धोकादायक?

लोकांना ज्ञानामृत पाजणे किती धोक्याचे?

काही निरर्थक गोष्टी केवळ लोक काय म्हणतील या लोकांच्या दबावामुळे आपण करीत असतो. निसर्ग विज्ञानाच्या दृष्टीने अवास्तव असणाऱ्या काही प्रथा, परंपरा केवळ पिढ्यानपिढ्या चालत आल्यात व लोकही आंधळेपणाने त्या पाळतात म्हणून त्या मनाला पटल्या नाहीत तरी पाळायच्या म्हणजे स्वतःच्या मनाने स्वतःलाच फसवणे होय. सखोल अभ्यासाच्या बौद्धिक कष्टातून मनाला कळलेली काही गुपीते सत्य असली तरी ती लोकांना सांगायची नसतात. लोक असे सत्य स्वीकारण्याची गोष्ट तर सोडाच पण ते सहन न झाल्याने लोकांना वास्तवाचे असे ज्ञानामृत पाजणाऱ्यालाच लोक जबरदस्तीने विष प्यायला भाग पाडतील. महान ग्रीक तत्वज्ञ साॕक्रेटिस हे याचे ठळक उदाहरण आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा नियम!

नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम!

निसर्गाने त्याच्या उत्क्रांतीतून काय पण नमुने बनवून ठेवलेत या जगात. या नमुन्यांची विविधता नुसती वरवर बघितली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. मग ती तपासायला गेल्यावर तर काय मेंदूचा पार भुगाच होऊन जातो.

या जगात निर्जीव पदार्थांचे नमुने किती, अर्धसजीव वनस्पतींचे नमुने किती, सजीव प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे मासे, हवेत उडणारे पक्षी, किटक, जमिनीवर सरपटणारे प्राणी, जमिनीवरील शाकाहारी, मांसाहारी चार पायांचे प्राणी, दोन पायांची व दोन हातांची माणसे यांचे नमुने किती, बापरे या सर्वांचा अभ्यास करून या सर्वांबरोबर राहणे म्हणजे केवढे कठीण काम.

वरील नमुनेदार पदार्थ, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार या जगात नमुनेदार हालचाल करीत असतात. या सर्वात माणूस हा खास नमुनेदार प्राणी. हा खास नमुना निसर्गाने काय विचार करून बनवला असेल (उत्क्रांत केला असेल) हे कळायला मार्ग नाही आणि निसर्गाला मन, बुद्धी आहे का व तो विचार करतो का हे कळायला पण मार्ग नाही.

निसर्गाचा खास नमुना असलेल्या बुद्धिमान माणसाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याचे जीवन खास नमुनेदार बनविलेले आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या जीवनाला वैज्ञानिक व तांत्रिक, कलात्मक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, शासकीय, कायदेशीर, सांस्कृतिक, आध्यात्मिक आकार दिला आहे जो आकार खास नमुनेदार आहे.

मनुष्याने त्याच्या जीवनाला विशेष आकार देताना निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम ओळखला. या नियमानुसार जो बलवान तोच श्रेष्ठ हे त्याला कळले. मग श्रेष्ठ नव्हे तर सर्वश्रेष्ठ होण्यासाठी त्याने इतर प्राण्यांपेक्षा अधिक बलवान व्हायचे ठरवले. त्यासाठी त्याने सामाजिक जीवन स्वीकारून समूहाने रहायचे ठरवले. त्यातून कुटुंबे, समाज गट, निरनिराळी राज्ये, राष्ट्रे निर्माण झाली. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये महाशक्ती (सुपर पाॕवर) बनण्याची स्पर्धा सुरू झाली आणि या सर्वांचा मूळ पाया काय तर बळी तो कानपिळी हा मूलभूत निसर्ग नियम.

गंमत ही की बळी तो कानपिळी या नियमाला बुद्धिमान माणसाने देव कल्पनेतून आध्यात्मिक रंग दिला. म्हणजे काय तर मनुष्य जीवनाला त्रासदायक असलेल्या नमुनेदार जगातील ज्या ज्या उपद्रवी गोष्टी असतील त्यांना मनुष्याने दुष्ट राक्षस अशी उपमा देऊन टाकली. त्यातून वाईट, विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांवरही राक्षस असा शिक्का बसला. मग या दुष्ट राक्षसांचा संपूर्ण विनाश करण्यासाठी किंवा त्यांचा विनाश होत नाही म्हणून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मानवी जीवन कल्याणकारी व संरक्षक शक्ती ज्या ज्या माणसांनी सिद्ध केल्या त्या त्या बलवान माणसांना देवत्व प्राप्त झाले. असे देवराज्य स्थापन करणारे महान राजे पूजनीय झाले. असे राजेच काय पण समाज कल्याणकारी काम करणारे महापुरूष सुद्धा वंदनीय झाले. लोक त्यांना वंदन करू लागले. मग पुढे लोकांनी त्यांचे पुतळे निर्माण केले. देव व राक्षस यांच्यातील युद्धाच्या मुळाशी शेवटी आहे काय तर निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम. असे आहे हे नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४

ईश्वरकण (गाॕड पार्टिकल)?

ईश्वरकण (गाॕड पार्टिकल)?

विश्वनिर्मितीचा वैज्ञानिक सिद्धांत किती जणांनी अभ्यासलाय व किती जणांना कळलाय? या सिद्धांताला इंग्रजीत बिग बँग थिअरी म्हणतात. अंतराळ पोकळीत कोणत्या तरी सूक्ष्म कणाचा महास्फोट झाला व मग त्या कणाचे अनेक कण बनून विश्वनिर्मितीला सुरूवात झाली व या कणांचे हळूहळू प्रसरण होत पदार्थ कणांचे विश्व निर्माण झाले जे आता अस्तित्वात आहे असा काहीसा हा ढोबळ सिद्धांत.

विश्वाचा निर्माता व नियंता परमेश्वर आहे असे मानणारे लोक म्हणजे देवश्रद्ध आस्तिक लोक. ईश्वराचे अस्तित्व मानून आस्तिकांनी जगात अनेक देवधर्म निर्माण केले. पण परमेश्वर जर विश्व निर्माता व नियंता असे मानले तर मग देवधर्म व निसर्ग विज्ञान यांची सांगड घालावी लागते. अशी सांगड घालताना मनात विचार येतो की ज्या सूक्ष्म कणाने त्याच्या महास्फोटातून विश्व निर्माण केले तो कण म्हणजे रंग, रूप, गुण, आकार नसलेला ईश्वर कण (गाॕड पार्टिकल) तर नसेल? तो ईश्वर कण म्हणजेच निर्गुण निराकार परमेश्वर असे मानायचे का? कण कण में है भगवान म्हणजे कणा कणात ईश्वर आहे असे मानले जाते. पण मानणे व असणे यात फरक आहे हे सांगायला नको.

बरं तो निर्गुण निराकार ईश्वर कण अंतराळ पोकळीत असाच फिरत असेल का? फिरताना त्याला भान नसेल का? मग त्याला अचानक भान येऊन स्वतःचा महास्फोट करून विश्वाची निर्मिती करावे असे का वाटले असेल? भानात येणे याचा अर्थ अगोदर भानात नसणे असा होतो. मग त्या ईश्वर कणाला त्याच्या महास्फोटापूर्वी कसलेच भान नसेल का?

हे अनेक प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे जर त्या निर्गुण निराकार ईश्वर कणाने विश्वरूपी शरीर धारण केले असे मानले तर मग या शरीरात त्याने एकीकडून देवत्वाचे चांगले गुण तर दुसरीकडून राक्षसत्वाचे वाईट गुण घुसवून त्या दोन विरोधी गुणांत कायमचे युद्ध लावून का दिले असावे? बरं या युद्धात तो निर्गुण निराकार ईश्वर कण म्हणजे परमेश्वर कोणाची बाजू घेतो हेच खरं तर कळायला मार्ग नाही. कारण दुष्ट प्रवृत्ती जगातून संपता संपत नाहीत. खरं तर चांगल्या व वाईट या दोन्ही प्रवृत्ती त्या एकाच निर्गुण निराकार परमेश्वराच्या (ईश्वर कणाच्या) दोन विभिन्न आवृत्त्या असल्याने तो परमेश्वर त्यातील वाईट आवृत्तीचा संपूर्ण विनाश करेल अशी भाबडी आशा करण्यात काय अर्थ आहे? आणि शेवटचा प्रश्न हा की अशी भाबडी आशा मनात धरून त्या निर्गुण निराकार ईश्वर कणास (परमेश्वरास) प्रार्थना करून काय उपयोग आहे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४

जास्त खोलात जाऊ नये!

जास्त खोलात जाऊ नये!

सागराची खोली व आकाशाची उंची मोजण्याचा प्रयत्न करू नये. अती खोलात जाऊन विचार करू नये. कारण जास्त खोलात गेल्यास हाती गाळच येतो. निसर्ग विज्ञानाच्या जास्त खोलात गेले तर अंतराळ पोकळीत चाचपडत बसावे लागते व ईश्वर अध्यात्माच्या जास्त खोलात गेले तर ईश्वर तर सापडतच नाही पण वेड लागण्याची पाळी येते. त्या अनाकलनीय ईश्वराचे ध्यान केल्यास मिथ्या कल्पना वाढतच जातात व आध्यात्मिक शांती मिळण्याऐवजी माणूस भ्रमिष्ट होण्याची शक्यता असते. मग काय करावे? तर भानात यावे व वास्तवाचे ध्यान करून त्यात रमावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.१.२०२४