धरले तर चावते, सोडले तर पळते!
धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी खालील अवस्था बघू.
(१) तरूणपणी सहजसोप्या व वजनाला हलक्या वाटणाऱ्या गोष्टी पुढे वय वाढल्यावर अवघड व वजनाला जड होऊनही त्या कराव्या लागणे, नीट न पेलवणाऱ्या, नीट न झेपणाऱ्या गोष्टी व्यवस्थित जमत नसूनही हळूहळू का होईना पण बळेच कराव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
(२) जगाच्या पाठीवर कुठेही जा पण तीन दृश्ये जरूर दिसतील. एक लहान मुलांना हाताला धरून शाळेत सोडणारे त्यांचे तरूण आईवडील, दोन पैसा व जमलेच तर सत्ता प्राप्त करण्यासाठी जोशात (होश कमी असला तरी) धावणारी तरूण, प्रौढ मंडळी व तीन सक्रिय जीवनाच्या व्यासपीठावरून खाली उतरून लांब कुठेतरी कोपऱ्यात बसलेली (ज्येष्ठ नागरिक कट्टा) वृद्ध मंडळी. कुठेही जा, ही तीन दृश्ये हमखास दिसतात. गौतम बुद्धांना आजारी माणूस, म्हातारा माणूस व प्रेत अशी तीन दृश्ये दिसली होती जी त्यांच्या आत्मचिंतनास कारणीभूत ठरली. पण इथे मी नमूद केलेली तीन दृश्ये सर्वांना नेहमीच दिसतात पण त्यावर किती जण आत्मचिंतन करतात? पण शेवटी हे दृश्य वास्तव आहे, ते टाळता येत नाही, मग त्यावर काय आणि कसले आत्मचिंतन करायचे असा सर्वसाधारण विचार लोक करतात. हे वास्तव कंटाळवाणे वाटले तरीही ते स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
(३) कोणालाही निसर्ग विज्ञानाच्या व समाजशास्त्राच्या अनेकविध ज्ञान शाखांत प्रावीण्य मिळवून त्या सर्व ज्ञान शाखांत तज्ज्ञ होता येत नाही त्यामुळे परावलंबीत्व येते. आंधळे पणाने डाॕक्टर, इंजिनियर, वकील, सी.ए. सारख्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवता येत नाही व सामान्य ज्ञानाच्या जोरावर त्यांचे सल्ले सर्वसामान्यांना खोडूनही काढता येत नाहीत. मग सुरू होते ती मनात चूक की बरोबर यांची घालमेल. तरीही हे इतरांवरील हे परावलंबीत्व स्वीकारावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
(४) होश असो नसो पण तरीही जोशात असलेल्या तरूण, प्रौढ पिढीबरोबर वृद्धांना नीट मिसळता न येणे व त्यांच्यापासून पूर्णपणे अलिप्तही होता न येणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
(५) वृद्धापकाळात शरीराचे अवयव झिजून झिजून थकलेले, खचलेले असल्याने पूर्वीचा आत्मविश्वास रहात नाही, तरीही डळमळीत झालेल्या आत्मविश्वासाने जीवनाची गाडी म्हातारपणी चालवावी लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
(६) राजकारणी कितीही भ्रष्ट वागले तरी त्यांच्याशिवाय कायद्याचे राज्य पुढे सरकत नाही म्हणून गरजेपोटी त्यांना पुन्हा पुन्हा निवडून द्यावे लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
(७) कायद्याच्या राज्यात कायद्याने न्याय मिळण्यासाठी न्यायालयांत कितीही वेळ लागला व तारीख पे तारीख असे कितीही वेळा झाले तरी शेवटी गरजेपोटी अंतिम न्यायासाठी न्यायालयांत सारख्या खेटा घालाव्या लागणे, ही अवस्था म्हणजे धरले तर चावते, सोडले तर पळते ही अवस्था.
मला जवळून कळलेल्या धरले तर चावते, सोडले तर पळते या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव देणाऱ्या काही मोजक्या अवस्था मी वर दिल्या आहेत. जिवाची घालमेल करणाऱ्या आणखी अशा बऱ्याच इतर अवस्था असू शकतील.
-©ॲड.बी.एस.मोरे, ४.१.२०२४