गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!
मन म्हणजे हलकी हवा तर शरीर म्हणजे जड पृथ्वी. प्रश्न असा आहे की जड पृथ्वीने तिच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणावर राज्य करावे की त्या हवेच्या आवरणाने पृथ्वीवर राज्य करावे? अर्थात मनाने शरीरावर राज्य करावे की शरीराने मनावर राज्य करावे?
यासाठी अंतराळ म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. अंतराळ म्हणजे एक प्रचंड मोठी निर्वात म्हणजे हवा नसलेली पोकळी. या निर्वात पोकळीने ग्रह, ताऱ्यांच्या जड भौतिक विश्वाला झेलले आहे ज्यात भौतिक हवाही आली जिला वजन आहे म्हणजे तीही जडच. हवा जड ग्रहांच्या तुलनेने हलकी आहे पण तिलाही वजन असल्याने तीही तशी जडच असा निष्कर्ष निघतो. जड भौतिक विश्वाला अंतराळातील निर्वात पोकळी झेलतेय हे खरेच आश्चर्यकारक, चमत्कारिक आहे. जड भौतिक विश्वाला निसर्ग मानले तर अंतराळातील निर्वात पोकळीला की त्या पोकळीत असलेल्या अदृश्य अनाकलनीय शक्तीला परमेश्वर मानावे काय आणि मानले तर त्या पोकळीतील त्या परमेश्वरापर्यंत आध्यात्मिक भक्तीने पोहोचता येईल काय? अंतराळ पोकळीने झेललेल्या जड भौतिक विश्वाला वेळ काळाचे बंधन असल्याचे दिसून येते. पण असे वेळ काळाचे बंधन पोकळीतील त्या परमेश्वराला असेल का किंवा तो परमेश्वर कोणत्याच बंधनात नसेल का? हे सगळे प्रश्न या जर तर च्या तार्किक गोष्टी ज्यांना तर्काशिवाय कसलाही आधार नाही. खरं तर आपण त्या पोकळीत जन्मत नाही, जगत नाही व मरतही नाही. आपले सगळे काही आपल्या जड पृथ्वीच्या जड वातावरणातच होते.
आता जड पृथ्वीवरून ती ज्याच्या बंधनात आहे त्या जड वेळेचा विचार करूया म्हणजे आपल्यालाही वेळेचे बंधन समजेल. जड पृथ्वीला जड वेळेने बंधनात ठेवलेय म्हणून तर पृथ्वीवरील सर्व जड पदार्थ (ज्यात माणसेही आली) जड वेळेच्या बंधनात आहेत. अमूक अमूक वेळेत (२४ तास) पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते व अमूक अमूक काळात (वेळेचा मोठा भाग म्हणजे ३६५ दिवसांचा काळ) पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार प्रदक्षिणा घालते. तिच्या या कर्माचे व त्या कर्माच्या वेळेचे बंधन तिच्यावर कोणी बरे घातले? मध्यवर्ती सूर्याने की त्या अंतराळ पोकळीतील अदृश्य शक्तीने म्हणजे परमेश्वराने? काही कळायला मार्ग नाही. आपण काही गोष्टी (परमेश्वर सुद्धा) आपल्या तर्काने मानतो. पण या तर्काला कसलाच वैज्ञानिक पुरावा नाही. तर्काने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक नाही का?
पृथ्वीचे वेळेचे एक घड्याळ आहे जे तिने माणसांसहीत पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर लादलेय. माझ्यावर वेळेचे बंधन मग मी तुम्हाला सोडतेय होय असेच ती अप्रत्यक्षपणे तिच्यावरील व तिच्यातील पदार्थांना म्हणते. या वेळेच्या (घड्याळाच्या) बंधनात गोल फिरत राहून दिवसांमागून दिवस कधी जातात व आपण कधी म्हातारे होतो हे कळतच नाही. वेळेचे घड्याळ आपल्या अवस्थांत बदल करते. ते आपल्याला बालपण, तरूणपण व म्हातारपण दाखवते व त्याबरोबर जन्म मरणाचा फेराही दाखवते जो फेरा परमेश्वराची कोणी कितीही आध्यात्मिक भक्ती केली तरी चुकता चुकत नाही.
माणसांनी वेळेच्या बंधनात राहून कालानुरूप जीवनकर्मे करीत राहणे मी समजू शकतो. पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेड लागल्यासारखे नुसते धावत रहायचे हे मला पसंत नाही. मी माझ्या गरजा कमी केल्या आणि या घड्याळांच्या काट्यांनाच माझ्या बंधनात ठेवले म्हणजे वेळेची दादागिरी चालू दिली नाही. तुम्हीही हे करू शकता जर तुम्ही तुमच्या गरजा कमी केल्या तर. विकासाच्या नावावर तुम्ही तुमच्या गरजा सतत वाढवतच राहिला तर तुम्हाला तुमचे आयुष्य पुरणार नाही. तुम्हाला शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!
-©ॲड.बी.एस.मोरे, २०.१२.२०२३