https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

तू मोठा, मी छोटा?

तू मोठा, मी छोटा?

बाजारात फिरताना दुकानदारांकडून खूप शिकण्यासारखे असते. छोटा दुकानदार कधी स्वतःच्या छोट्या दुकानाची तुलना मोठ्या दुकानाशी करीत बसत नाही. स्वतःच्या छोट्या  दुकानालाच ईश्वरी देणगी समजून त्याच दुकानाच्या दारात उभा राहून स्वतःचा व्यापार, धंदा वाढविण्याचा जमेल तेवढा प्रयत्न करतो व मिळेल त्यात खूश राहतो. मी मात्र त्याची वकिली भारी, माझी वकिली साॕरी अशी तुलना करीत बसलो. तो धंदा आहे, माझा उच्च शैक्षणिक वकिली व्यवसाय आहे असे म्हणत माझ्या तथाकथित उच्च शिक्षित बुद्धीचे तुणतुणे वाजवत बसलो आणि मिळालेय त्यातला आनंद घालवून बसलो. चलो, देर है दुरूस्त है!

-©ॲड.बी.एस.मोरे,१७.१२.२०२३

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

तर काय करायचे?

तर काय करायचे?

बुद्धी शिवाय भौतिकतेच्या सागरात पोहणे शक्य नाही व भावनेशिवाय आध्यात्मिकतेच्या आकाशात विहार करणे शक्य नाही. पण या दोन्ही गोष्टी एकमेकांना चिकटलेल्या असल्याने यांची सांगड कशी घालायची हा पुन्हा जड बुद्धीचाच प्रश्न. आध्यात्मिक श्रद्धा भावनेच्या मदतीने जड बुद्धीचे हे सांगड काम सहज, हलकेफुलके होत असेल तर मग आध्यात्मिक श्रद्धा भावना महत्वाची ठरते. पण जड बुद्धीच्या भौतिक मार्गात आध्यात्मिक श्रद्धा भावना अडथळा आणत असेल किंवा श्रद्धा भावनेच्या आध्यात्मिक मार्गात जड बुद्धी अडथळा आणत असेल तर काय करायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१२.२०२३

आध्यात्मिकतेच्या वाटेवर!

आध्यात्मिकतेच्या वाटेवर!

"पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा" या पांडुरंग/विठ्ठलाविषयी (श्रीकृष्ण) वापरात असलेल्या वाक्याचा अर्थ मी पंढरपूर येथे माझे जवळजवळ पाच सहा वर्षांचे बालपन घालवूनही कळलाच नाही. त्या विठ्ठल मूर्तीत परब्रम्ह म्हणजे संपूर्ण ब्रम्हांडाचे तेज व ताकद असलेला परमेश्वर सूक्ष्म स्वरूपात कसा बघायचा हे कळले नाही. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दाखविले तेंव्हा अर्जुन ते रूप डोळ्यांत साठवू न शकल्याने भयभीत झाला याचा अर्थ परब्रम्ह शब्दात समाविष्ट आहे हेही कळले नाही. हिंदू धर्मातील विविध देवदेवता या विश्वातील वैशिष्ट्यपूर्ण विविधतेचे प्रातिनिधीक दर्शन आहे हे सुद्धा कळले नाही. कोणत्याही देवमूर्तीत परब्रम्ह सूक्ष्म स्वरूपात बघून परब्रम्हाची मनोभावे प्रार्थना करण्याचे कळले नाही. कळलेच नाही तर वळेल कसे आणि वळलेच नाही तर कोणत्याही देवदेवतेकडे बघताना आध्यात्मिक भाव निर्माण होतीलच कसे? त्या आध्यात्मिक वाटेवर चालायला आता कुठे हळूहळू शिकतोय. पण भौतिकता गोचीडासारखी शरीर व मनाला चिकटलीय. तिला फेकूनही देता येत नाही. तिच्या विळख्यात राहून आध्यात्मिक साधना करणे हे कठीण काम आहे. काल शनिवार दिनांक १६.१२.२०२३ चे परळ मंदिरातील देवदर्शन तसे वरवरचेच!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१२.२०२३
(आध्यात्मिकतेच्या वाटेवर)

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आध्यात्मिक संकेत!

मला मिळालेले आध्यात्मिक संकेत, इशारे (सिग्नल्स)!

मी आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्या बुद्धीलाच जास्त महत्व दिले आणि भावनेला कमी महत्व दिले. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन वकिली सारख्या बौद्धिक व्यवसायात आलो. पण बुद्धीला मर्यादा आहेत हे विसरलो. आज सहज लोकमान्य टिळकांचा एक प्रेरणादायी विचार समोर आला आणि माझ्या जिवाची घालमेल मी स्वतःच करून घेतोय, माझे जीवन मी स्वतःच कठीण करून घेतोय, थोडक्यात मी चुकतोय याची आतून जाणीव झाली. "जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते" हेच ते लोकमान्य टिळकांचे वाक्य ज्याने मला माझी चूक दाखवून दिली.

बुद्धीची मर्यादा न जाणता तिलाच अती महत्त्व दिल्याने झाले काय तर मी इतरांच्या बुद्धीशी माझ्या बुद्धीची  बौद्धिक तुलना करू लागलो. तो वकिलीत एवढा यशस्वी मग मी का नाही झालो तसा यशस्वी? हा प्रश्न मला सतावू लागल्यावर मी त्याची बौद्धिक चिकित्सा करू लागलो. आणि डोंगर पोखरून उंदराचा शोध लावला. तो शोध म्हणजे लग्नानंतर माझ्या पत्नीने मला मुंबईतील वरळी बी.डी.डी. चाळीत राहू दिले असते तर माझी खूप प्रगती झाली असती. पण तिच्यामुळे डोंबिवलीत आलो व मुंबईतील नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणचे प्रवासी अंतर वाढल्यामुळे त्या प्रवासाला वैतागून आलेल्या संधी सोडून दिल्या व मोठ्या यशाला मुकलो. या बौद्धिक चिकित्सेतून मी माझ्या मागे राहण्याचे खापर सरळ पत्नीवर टाकून मोकळा झालो हा विचार न करता की मुंबईत राहून मी काय मोठा दिवा लावणार होतो? वास्तविक इतरांशी स्वतःची तुलना करणेच चुकीचे. या जगात प्रत्येक पदार्थ, प्राणीमात्राची ताकद वेगळी, आवाका वेगळा, भूमिका वेगळी जी वैशिष्ट्यपूर्ण असते. माणसांतही प्रत्येकाचे टॕलेंट वेगळे असते व त्याबरोबर कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. हीच तर निसर्गाची विविधता आहे. या वैशिष्ट्यपूर्ण विविधतेचा आनंद घ्यायचा सोडून मी स्वतःची तुलना या विविधतेबरोबर करीत बसलो. कसली ही माझी मागासलेली बुद्धी!

उठसूट पत्नीला दोष देणे हे माझ्या कंपनी क्लायंटच्या व्यवस्थापकीय संचालकालाच पटले नाही. त्याने मला काल सरळ त्याच्या कॕबिनमध्ये बोलवून माझ्या रागाची पर्वा न करता दोन खडे बोल सुनावले. "क्या मोरे साब, आप हमेशा आपकी मिसेस को ही आप करियर मे पिछे रहने के लिये दोषी क्यूं ठहराते हो, चाल वातावरण में आपके लडकी का उच्च शिक्षण और अच्छा विकास होने में आपके मिसेस को डर लगा होगा इसलिये उन्होने डोंबिवली में थोडा बडा घर और थोडा अच्छा वातावरण देखके डोंबिवली रहना पसंद किया होगा, इससे कठिनाई आपको हुई लेकिन आपके लडकी का अच्छा विकास हुआ ऐसा आप पाॕजिटिव्ह क्यूं नही सोचते, हर वक्त पत्नीको दोष देते हो जिसने आप का जीवनभर साथ निभाया"! वर उल्लेखित लोकमान्य टिळकांच्या बुद्धी कुठपर्यंत व श्रद्धा कुठून सुरू हे थोडक्यात सांगणाऱ्या प्रेरणादायी विचार वाक्याला सुसंगत असा हा एक संकेत मला त्या संचालकाकडून काल मिळाला जो मला माझ्यात बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल हे नक्की!

काल परवाच मला सुधारण्यासाठी आणखी एक संकेत मला माझ्या माजी लिगल स्टेनोकडून मिळाला. मी माझ्या पत्नीला सतत दोष देणे हे बहुतेक त्यालाही आवडले नसावे. मग तो सरळ मला म्हणाला "आता यावर जास्त लांबलचक लिहू नका, सरळ फोन करून प्रत्यक्ष बोला". पण शेवटी मी करायचे ते केलेच. याच विषयावर भला मोठा लेख त्याला पाठवून दिला. माझ्या चौकस व चिकित्सक बुद्धीला लिखाणाची भारी खाज! पण तो बुद्धीचा खोटा गर्व व भ्रम होता. या संकेतातून मी चुकतोय हे मला कळले. इतकेच कंपनी संचालकाचे वरील खडे बोल मी माझ्या सद्याच्या लिगल टायपिस्ट -कम-असिस्टंटला सांगितले तेंव्हा त्याने मला हेच सांगितले की तुमच्या पत्नीने डोंबिवलीला राहणे पसंत का केले हे तुम्ही नीट समजून घ्या व तिने तुम्हाला आयुष्यभर दिलेली साथ लक्षात घ्या. हा लोकमान्य टिळकांच्या विचार वाक्याला सुसंगत असा तिसरा संकेत व सुधारण्याचा इशारा.

चौथा संकेत मिळाला तो वकिलांच्या ग्रूपवरील एका वकिलाच्या अनाहूत सल्ल्याने. हा १००० वकिलांचा मोठा ग्रूप आहे. या ग्रूपमध्ये संपूर्ण भारतातील वकील आहेत. त्यात सुप्रीम कोर्टात प्रॕक्टिस करणारे मोठे काउन्सेल्स आहेत. या ग्रूपवर काही  वकिलांना माझे बौद्धिक लिखाण आवडले व त्यांनी त्याचे स्वागतच केले. पण आज एका वकिलाने मात्र "हमारे सन्माननीय ॲड. बलिराम मोरे साब, आप अब थोडा बॕकफूट पर जाकर बॕक सिट पर बैठिये, यहाँ ऐसे विचार लिखने के लिये सभी वकील गण पात्र है" हे वाक्य त्या ग्रूपवर टाकले व माझ्या बौध्दिक मर्यादेचा आणखी एक संकेत देऊन थांबण्याचा इशारा दिला.

तसे तर काही संकेत मला पूर्वीही मिळत होते पण माझी बुद्धी त्यांना जुमानत नव्हती. एक जवळचा वकील मित्र मला अध्यात्माविषयी नीट समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. पण मी त्यालाच माझ्या बौद्धिक विचारांचे तुणतुणे वाजवून दाखवायचो. पण त्याची परमेश्वरावर गाढ श्रद्धा आहे व अध्यात्माविषयी त्याचे विचार ठाम आहेत. मीच या बाबतीत डळमळीत आहे. ना तळ्यात ना मळ्यात अशी माझ्या मनाची स्थिती आहे. मला धड आस्तिक म्हणता येणार नाही व धड नास्तिक म्हणता येणार नाही. दोन्ही मध्ये कुठेतरी मध्येच लटकतोय मी.

माझ्या बुद्धीला भारी माज आहे. या बुद्धीच्या कोनातून देवप्रतिमांकडे पाहिले तर ती आध्यात्मिक भावना मनात निर्माण होत नाही. बुद्धीच्या अती घमेंडीपणामुळे माझी देवश्रद्धा (भावना) कोरडी पडते. अहो, मी झोपेतून उठल्यावर व झोपताना जी देव प्रार्थना करतो ती सुद्धा गणिती पद्धतीने करतो कारण काय तर माझ्या बुद्धीचा शहाणपणा. मग त्या प्रार्थनेत आध्यात्मिक भावच रहात नाही व एक प्रार्थना फुकट गेली म्हणून मग दुसरी, तिसरी प्रार्थना म्हणण्याचा मला मंत्रचळ लागतो.

बुद्धीचा हा अती शहाणपणा मला कुठेतरी थांबवायचा होता पण नीट कळत नव्हते. पण आज लोकमान्य टिळकांचे "जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते" हे विचार वाक्य वाचण्यात आले आणि मग माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत हे वास्तव मला कळले. मग या मर्यादे पुढे काय? तर श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, आध्यात्मिक श्रद्धा हे उत्तर सुद्धा मला लोकमान्य टिळकांच्या याच वाक्यातून मिळाले. टिळकांच्या  या वाक्याला सुसंगत असे वरील संकेत, इशारे (सिग्नल्स) ही मला मिळाले आहेत. तेंव्हा आता चला सुधारणेच्या वाटेवर पुढे! बुद्धीची मर्यादा समजली की तिला थांबवून मनाला ईश्वरापुढे लीन करायचे मग बाकी प्रश्न आपोआप सुटतील!

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१२.२०२३

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

RELIGION AND POLITICS

LET WE NOT MAKE RELIGION AS POLITICAL ISSUE!

I am myself a Hindu and regard this religion as all inclusive religion inclusive of science and principle of world as one family (vasudhaiv kutumbakam). As declared by Hon'ble Supreme Court Hindu is a culture (way of life जीवनशैली) and it is great culture. Let us follow it, let us respect it along with other religious people who are also part of great Hindu Indian culture without making it any political issue provided other religions also respect India's major religion viz. Hindu religion which is Indian way of life. Give respect, take respect. Secularism cannot be one sided!🙏🙏

-©Adv.B.S.More, 14.12.2023

उतार वयातला आनंदयात्री!

उतार वयातला आनंदयात्री!

आयुष्यभर नैसर्गिक व सामाजिक कर्तव्यकर्मे पार पाडून पाडून वृद्ध व्यक्तीचे शरीर थकलेले व मृत्यूची चाहूल लागून मन थोडेफार उदास झालेले असते. तरूणपणाचा जोम व उत्साह व तसेच वास्तवातील उत्सुकता संपलेली असते. त्यामुळे उतार वयात शरीर व मनाला आराम देणे ही नैसर्गिक अपरिहार्यता असते व तिचा स्वीकार केला पाहिजे.

मग उतार वयात वृद्ध माणसाने जीवन कसे जगावे? माझ्या मताने ते एक आनंदयात्री बनून जगावे? पण या वयात आनंदयात्री कसे बनावे? तर माझ्या मते, स्पर्श करा आणि निघून जा (टच अँड गो) पद्धतीने आनंदयात्री बनावे. हा टच अँड गो काय प्रकार आहे? मला सुचलेल्या यातील काही गोष्टी खालीलप्रमाणे.

(१) आपली दैनंदिन जीवनकर्मे हळूहळू व वरवर करणे.
(२) शारीरिक व्यायाम हलका फुलका करणे.
(३) काही निसर्गकर्मे थोडा जास्त वेळ घेतात (उदा. शौचकर्म). तिथे टच अँड गो चालत नाही. त्यांना थोडा जास्त वेळ देणे. पण तरीही तिथे जास्त पाणी लावत न बसणे.
(४) झोपेतून उठल्यावर दात ब्रशने जास्त घासत न बसता वरवर घासून चूळ भरून मोकळे होणे.
(५) अंघोळ करताना अंगाला जास्त साबण लावून बाथरूममध्ये अंग चोळत बसण्याऐवजी वरवर साबण लावून अंगावर पाणी ओतून मोकळे होत बाथरूममधून लवकर बाहेर पडणे.
(६) माध्यमांतील बातम्या टक लावून न बघता व सखोल न वाचता वरवर बघणे व वाचणे.
(७) आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपला आवाका व नियंत्रण यांच्या बाहेर असल्याने त्या मनाला जास्त लावून न घेणे.
(८) जगाचा जास्त खोलवर विचार न करणे.
(९) आपली शारीरिक, बौद्धिक, आर्थिक, राजकीय ताकद चाचपून दुनियादारी करणे. ती जेवढी कमी तेवढे उत्तम.
(१०) लोक फार शहाणे असतात. स्वतःचे झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून वाकून बघत असतात. अशा लोकांना हेरून त्यांच्याशी वास्तव गोष्टींवर, स्वतःच्या अभ्यासातून मिळवलेल्या सत्य ज्ञानावर व तसेच स्वतःच्या अनुभवावर जास्त चर्चा न करणे. त्यांच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवणे.
(११) खेळाडू व कलाकार यांच्या करमणूकीच्या कार्यक्रमांत जास्त न रमणे. कारण अशी करमणूक हे काल्पनिक स्वप्नरंजन असते. स्वतःच स्वतःची करमणूक करून घेण्यास शिकणे.
(१२) इतकेच काय परमेश्वर कधी प्रत्यक्ष दिसणार नाही की जवळ बसून आपल्याशी हितगुज करणार नाही हे पक्के ध्यानात ठेवून त्याच्या जास्त नादी न लागणे. अंधश्रद्ध मनाने जास्त देवधर्म व देवप्रार्थना न करणे. होता होईल तेवढी तिर्थस्थळे टाळणे कारण त्या ठिकाणी भाविक गर्दी करतात. त्यांच्या जीवघेण्या गर्दीत गुदमरून जाऊन मौल्यवान जीव जाण्याचा धोका असतो. अशा प्रसंगी तिथे कोणताही देव जीव वाचवायला धावून येत नाही. अर्थात या आध्यात्मिक बाबतीत जेवढ्यास तेवढे वागणे.

वरील टच अँड गो पद्धतीने उतार वयातील जीवन मंद ज्योतीप्रमाणे सहजसुंदर, सुखी व शांत होते. मी माझ्या उतार वयात वरील टच अँड गो पद्धत अवलंबित आहे. पण त्यासाठी मनाची प्रगल्भता, ठाम निश्चय व कौशल्य(प्रफेशनल स्किल) या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे मी करतो म्हणून तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू नका. ते धोक्याचे होऊ शकते. कोणी तसा अवलंब केल्याने कोणाचे काही नुकसान झाल्यास त्याला मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.१२.२०२३

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

माझे लेखन विज्ञान, धर्म व कायदा या तीनच गंभीर विषयांवर व त्यांच्या अंतर्गत संबंधाच्या तुलनात्मक अभ्यासावर आधारित संशोधनपर, सखोल चिकित्सक व विश्लेषक असते म्हणून ते सगळ्यांना रूचत नाही. जगातील बाकी सगळ्या गोष्टी या तीन प्रमुख विषयांशी निगडीत व त्यांच्यात समाविष्ट आहेत. पण लोकांना मूलभूत गोष्टींऐवजी त्यांच्या भोवती फिरणाऱ्या वरवरच्या गोष्टीत रूची असल्याचे दिसते. त्यामुळे माझा मूलभूत अभ्यास, विचार व लेखन कुठे आणि कोणाबरोबर शेअर करायचे हा माझा कायमचा प्रश्न व सततची खंत राहिली आहे. कारण या मूलभूत विषयांत रूची असणारी माणसे माझ्या संपर्क व संगत क्षेत्राच्या बाहेर फार दूरवर आहेत ज्यांच्यापर्यंत मी ना कधी पोहोचू शकलो ना आता उतार वयात कधी पोहोचू शकेन. सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३