https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

एखाद्या गडगज श्रीमंत असलेल्या उद्योगपतीच्या किंवा पाॕवरबाज राजकीय नेत्याच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या मैदानात तयार केलेल्या राजमहालात असले की सार्वजनिक सभांमधून किंवा टी.व्ही. सारख्या माध्यमांतून एकमेकांवर जबरी टीकेचे आसूड ओढणारी राजकीय मंडळी, मंत्री, संत्री त्यांच्या खास रूबाबात अशा ठिकाणी जमा होतात तेंव्हा या मंडळींचे एकमेकांना आलिंगन देणे, खळखळून हसत एकमेकांशी हातात हात घालून गोड बोलणे, हळूच कानात हसत हसत काहीतरी बोलणे वगैरे गोष्टी खरंच बघण्यासारख्या असतात. सामान्य माणसांना या असल्या राजेशाही थाटाच्या लग्न सोहळ्यासाठी ना कसले निमंत्रण असते ना आत प्रवेश असतो. काही माध्यमांतून अशा सोहळ्याचे दर्शन सामान्यांना घडते आणि त्यांचे डोळे दिपून जातात. डोळे दिपणे म्हणजे थक्क होणे. पण एकमेकांशी तावातावाने भांडणारी ही मंडळी अशा कार्यक्रमात एवढी दिलखुलास कशी होऊ शकतात याचे मात्र फार आश्चर्य वाटते. धर्म, जातपात काय किंवा इतर मुद्दे काय, लोकांच्या मेंदूचा किती भुगा करतात ही मंडळी आणि पुन्हा अशा सोहळ्यात एकत्र येऊन हसतात काय, खिदळतात काय! समाजातील सर्वसामान्य माणसांना वाकुल्या दाखवण्याचाच हा प्रकार नव्हे काय?

पण मी या राजकीय मंडळींना असे नावे ठेवले तर हीच मंडळी वकील म्हणून मला म्हणतील की "तुम्ही वकील मंडळी नाही का तुमच्या अशिलांच्या वतीने न्यायालयात तावातावाने युक्तिवाद करता व पुन्हा कोर्टाच्या कँटिनमध्ये एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारीत बसता किंवा वकिलांच्या खास मेळाव्यात न्यायाधीश मंडळींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून छान हितगुज करता, अगदी तसेच आमचे आहे". शेवटी ही राजकीय मंडळी आहेत. वेळ आली तर वकिलांचे सुद्धा तोंड बंद करतील मग सामान्य लोकांची तर गोष्टच विसरा. प्रश्न हा आहे की सर्वसामान्य लोकांनी यांचे हे असले विरोधाभासी वागणे निमूटपणे बघून ते सहजपणे घ्यायचे काय आणि ते किती घ्यायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

ढ पण चालू विद्यार्थी?

ढ पण चालू विद्यार्थी?

काही हुशार मुले ही जरा जास्तच हुशार असतात. ती ढ मुलांबरोबर संगनमत करून ढ मुलांच्या ऐवजी त्यांच्या वतीने स्वतःच परीक्षा देतात आणि ढ मुलांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करतात. याला प्रोक्झी तोतयेगिरी म्हणता येईल. अशी प्रकरणे आमच्या काळातही घडत होती व वर्तमान काळातही अशा बातम्या माध्यमातून येत असतात. ही अशी तोतयेगिरी हुशार विद्यार्थी ढ मुलांच्या मैत्रीसाठी किंवा त्यांच्या प्रेमापोटी करीत नाहीत तर अशा ढ मुलांकडून मिळणाऱ्या पैशासाठी करतात. अशाप्रकारे गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशासाठी हे अती हुशार विद्यार्थी नुसत्या विद्या देवतेशीच  गद्दारी करीत नाही तर अशा गैरव्यवहारात पैशाचा गैरवापर करून लक्ष्मी देवतेचाही अपमान करतात. लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. त्यामुळे ती याप्रकारच्या अप्रामाणिक विद्यार्थ्यांना कायम साथ देईलच असे नसते. पण विद्या देवता मात्र बौद्धिक मेहनतीचा आळस करणाऱ्या या ढ विद्यार्थ्यांना कायम लांबच ठेवते. तोतयेगिरी करणारे अती हुशार विद्यार्थीही कायद्याच्या कचाट्यात कधीतरी सापडतातच. एकवेळ लक्ष्मी देवता या ढ विद्यार्थ्यांना काही काळ जवळ करेल पण विद्या देवता मात्र अशा ढ विद्यार्थ्यांना तिच्याजवळ जराही फिरकू देत नाही. पण काही ढ मुले पुढे त्यांच्या चालूगिरीमुळे आयुष्यात नुसता भरपूर पैसाच नाही तर इतर बरेच काही मिळवतात व स्वतःला यशस्वी म्हणवून घेत समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवतात आणि विशेष म्हणजे समाजही अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांचा उदो उदो करण्यात कमीपणा मानत नाही. पण कोणता समाज? ज्या समाजात अप्रामाणिक व भ्रष्ट लोकांचा भरणा जास्त असतो अशाच समाजात अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांची चलती असते. पण तसे तर दुधात पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणारा दुधवालाही भरपूर पैसे मिळवून समाजात निर्लज्जपणे राहतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

मैत्रकुल!

मैत्रकुल!

मैत्रकुल ही निराधार मुलामुलींना शिक्षण व निवारा देण्याचा प्रयत्न करणारी संस्था. या संस्थेच्या कल्याण येथील वसतीगृहात मी करोना लॉकडाऊन काळात भेट दिली होती व तिथल्या निराधार मुलामुलींशी चर्चा केली होती. तिथे मला असे कळले की या संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. किशोर जगताप हे दोन्ही पायांनी अपंग असल्याने व्हिलचेअर वर असतात. संस्थेचे चांगले कार्य बघून मी खरंच भारावून गेलो होतो. पण अचानक दि. ११.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात मैत्रकुल संस्थेचे संस्थापक श्री. किशोर जगताप यांच्याविरूद्ध विनयभंग व पोक्सो (बाल लैंगिक शोषण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली. याची योग्य ती पोलीस व न्यायालयीन चौकशी होईलच. पण एका चांगल्या सामाजिक कार्याला असले गालबोट लागणे हा मनाला धक्का होता. प्रामाणिकपणे समाजकार्य करणे हे तसेही आता धोक्याचे झाले आहे. कारण समाजातील विघ्नसंतोषी व भ्रष्टाचारी लोकांना प्रामाणिक या शब्दाचेच वावडे आहे. जेवढ्यास तेवढे असा हा कलियुगी जमाना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३

रविवार, १० डिसेंबर, २०२३

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

शाळा, काॕलेजातील मुले सहलीच्या निमित्ताने पाण्याजवळ गेली आणि खोलीचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात, नदीत, तलावात बुडाली, अशा बातम्या अधूनमधून माध्यमात येतात व मन सुन्न होते. खरंच पाणी आणि आगीशी खेळ नको. पट्टीचे पोहायला येत असेल तर पाण्यात व अग्नीसुरक्षा तंत्रात तज्ञ असाल तर आगीत उतरावे न पेक्षा नको. तसेच अनोळखी ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी एकट्याने जायचे दिवसाही धाडस नको, मग रात्रीची तर गोष्टच सोडा. आठवा ती मुंबईतील ओसाड शक्ती मिल कंपाऊंड मध्ये एकटे जाण्याचे धाडस केल्याने महिला पत्रकारावर बलात्कार झाल्याची भयानक घटना. आठवा ती एका मुलुंडच्या जंगलात सकाळी एकटे जाण्याचे धाडस केल्याने वकिलाला बिबट्या वाघाने खाल्ल्याची काही वर्षापूर्वीची भयानक घटना. मी साधारण १९६२ ते १९६६ या पाच वर्षाच्या काळात पंढरपूरला १ ली ते ५ वी इयत्तेत शाळेत शिकत होतो तेंव्हा तिथल्या चंद्रभागा नदीच्या पाण्यात किनाऱ्यापासून छातीभर पाण्यापर्यंत चालत जाऊन तिथेच पोहायचा प्रयत्न करायचो. पोहण्यात तरबेज असणारी कोळ्याची पोरे पुढे खोल नदी पात्रात बिनधास्त पोहायची. त्यांचे ते पोहणे बघून मला एकदा सहज पुढे जाण्याचा मोह झाला. पण एक पाऊल पुढे टाकल्याबरोबर पाणी गळ्याला लागले. मग घाबरून लगेच उलटा होऊन पोहत मागे फिरलो. कसले ते पोहणे. नुसतेच कडेकडेने तरंगणे. नदीच्या गावात पंढरपूरी राहूनही मी पोहायला शिकलो नाही. कोणी मला शिकवलेही नाही. मात्र तरीही ती चंद्रभागा नदी उनाडक्या करण्याचे माझे आवडते ठिकाण होते. पण तरीही जपून वागलो  म्हणून वाचलो. मस्ती कधीकधी जिवावर बेतते हे मात्र खरे. अगदी साठ वयात मी लोणावळ्याला एका रिसाॕर्ट मध्ये वरून गोल गोल चक्राकार फिरत खाली छातीभर पाण्यात घसरत येण्याचा आगाऊपणा केला होता. खाली पाणी छातीभर असले तरी वरून गोल चक्राकार फिरत येताना वेग भलताच वाढतो व त्या जोराने माणूस त्या पाण्यात खाली जाऊन गोल गटांगळ्या खात राहतो. मला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीनंतर मृत्यूच्या दाढेतला तो फार भयंकर अनुभव ६० वयात लोणावळा रिसाॕर्ट मध्ये आला. याला कारण माझी निर्बुद्ध मस्ती. बुद्धी दिलीय ना त्या निसर्गाने म्हणा की परमेश्वराने मग ती नीट वापरा आणि भलते सलते धाडस करू नका. निसर्गाचे विज्ञान वरवर दिसते तेवढे खरंच सोपे नाही. त्यातील काही भागाचेच तंत्र तुम्ही आयुष्यात अवगत करू शकता. विज्ञानाच्या सर्वच शाखांत तुम्ही तज्ञ होऊ शकत नाही. मग जिथे अज्ञान आहे किंवा अर्धवट ज्ञान आहे तिथे भलते सलते धाडस करू नका. देव अशावेळी वाचवायला येत नाही. कारण असे संकट तुम्ही निर्बुद्धपणे स्वतःहून ओढवून घेतलेले असते जे निसर्गाच्या नियमांविरूद्ध असते. मित्रांनो, जीव खूप मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.१२.२०२३

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

अवास्तवाशी मैत्री?

अवास्तवाशी मैत्री?

सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आणि लाचखोर, भ्रष्टाचारी शासकीय कर्मचाऱ्यांवर या केसेस पडल्यावर न्यायालयांत त्यांची दोषसिद्धी होऊन या लोकांना  शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त ८ टक्के म्हणजे केसेस पडल्यावर ९२% लोक न्यायालयातून निर्दोष सुटले. गुरूवार, दिनांक ७.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात ही बातमी वाचली व एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक वकील म्हणून माझे मन सुन्न झाले. वकील हा खरं तर न्यायासाठी लढणारा न्यायदूत असतो. पण अशा   वातावरणात त्याची वकिली कशी  चालणार?

इंग्रजीत ट्रूथ इज बिटर म्हणजे सत्य कटू असते अशी म्हण आहे. पण सत्य नुसते कटू नसते तर ते भयानक असते असे म्हणावे लागेल. कारण भ्रष्टाचारी सोडा पण खून, बलात्कार यासारखे भयंकर हिंसक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार सुद्धा पुराव्याअभावी संशयाचा फायदा मिळून न्यायालयांतून निर्दोष सुटून पुन्हा राजरोसपणे असले गुन्हे करण्यासाठी मोकाट सुटतात तेंव्हा मात्र कायदा, शासन व न्याय या तिन्ही गोष्टींवरील लोकांचा विश्वास उडतो.

वरीलप्रमाणे कायद्याचे राज्य या संकल्पनेवरील लोकांचा विश्वास उडाला की मग लोक अवास्तव गोष्टींच्या नादी लागतात कारण त्यांना भयानक वास्तव झेपत, पचत नाही. मनाला काल्पनिक, खोटं, भ्रामक, आभासी समाधान देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींचे पेव समाजात फुटलेय. अंधश्रद्धा हा त्यातलाच एक भाग. अशा आभासी, खोट्या मानसिक समाधानासाठी अवास्तव, निरर्थक गोष्टींत गुंतवून घेण्याची लोकांची मानसिकता ओळखून  तिचा गैरफायदा घेण्याच्या कुहेतूने काही धूर्त लोकांनी आभासी गोष्टींचे उद्योगधंदे सुरू केले ज्यावर या धूर्त लोकांचे अर्थकारण व राजकारणही चालू आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी लोकांची परिस्थिती आहे. स्वतःची बुद्धी नीट वापरून अशा परिस्थितीवर मात करण्याचे सोडून लोक देवधर्माच्या नादी लागून या संकटातून सुटण्यासाठी नवस, उपवास यासारखी धार्मिक कर्मकांडे करतात तेंव्हा मात्र ही परिस्थिती आणखी बिकट होते. कारण या परिस्थितीला देव नाही तर लोकांची भ्रामक मानसिकता जबाबदार असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.१२.२०२३

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

LIFE IS A CIRCLE!

LIFE IS A CIRCLE!

The life is a circle. You have to go round this life circle touching diverse life points standing on this circle for your touch and temporary stay at those points. Since these life points standing  on the life circle are meant only for your temporary stay with them you are not supposed to get struck with any one life point for long time. But some life points on life circle are very tricky and they tempt you to get struck with them for long time thereby trapping you in a vicious circle. This tricky situation demands intelligent move from you to get away from such silly points & their vicious circle fot moving on to the next life points waiting for you for your touch. This is challenging job. Live with this reality of life without getting trapped in vicious circle including that of imaginary things bombarded on your mind by some fools or crooks!

-©Adv.B.S.More, 9.12.2023

ओसीडी बाबा की जय!

ओसीडी बाबा की जय!

माझ्या जीवन चक्रातील त्याच त्या जीवन बिंदूंवर मी पुन्हा पुन्हा गोल फिरत येतोय व त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतोय म्हणून मी स्वतःचे उप नामकरण ओसीडी बाबा असे केले आहे. ओसीडी चा इंग्रजी विस्तार आॕब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसआॕर्डर असा आहे व याला मराठीत मंत्रचळ असे म्हणतात. हा एक मानसिक आजार आहे असे वैद्यकीय शास्त्र म्हणते. तसे असेल तर हा आजार हे माझे वास्तव आहे.

थोडक्यात मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे व या वास्तवात मी जगतो. आभासी चलनवलनात व भ्रामक कल्पनांत जगण्यापेक्षा मला वास्तविक होऊन वास्तवात जगणे पसंत आहे. आता माझ्या या चक्री वास्तवापेक्षा लोकांचे वास्तव जर वेगळे असेल तर त्यांचे माझे न जुळल्याने ते माझी चेष्टा करीत राहून मला त्यांच्यापासून लांब ठेवणार हे आलेच. हेही माझे एक वास्तव आहे व लहानपणापासूनच मी जगापासून थोडा हटके वागत असल्याने या वास्तवाचा अनुभव लहानपणापासून मी घेत आलो आहे. या वास्तवाचा स्वीकार मी केला आहे.

म्हणून माझी थोडक्यात ओळख लोकांना करून देण्यासाठी मी माझे उपनामकरण ओसीडी बाबा असे केले आहे जेणेकरून लोक त्यांना माझा ओसीडी आजार लागू नये म्हणून मला आणखी लांब ठेवतील. ओसीडी बाबा हे उपनामकरण आध्यात्मिक नसून वास्तविक आहे कारण मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे. लोक माझ्यापासून लांब राहिल्याने ओसीडी बाबा म्हणून ते माझा जयजयकार करणार नाहीत. मग त्यांनी मी स्वतःच माझा तसा जयजयकार करण्यापासून मला रोखू नये ही त्यांच्याकडून माझी किमान, माफक अपेक्षा आहे. ओसीडी बाबा की जय!

-©ॲड.बी.एस.मोरे उर्फ ओसीडी बाबा, ८.१२.२०२३