अवास्तवाशी मैत्री?
सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आणि लाचखोर, भ्रष्टाचारी शासकीय कर्मचाऱ्यांवर या केसेस पडल्यावर न्यायालयांत त्यांची दोषसिद्धी होऊन या लोकांना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त ८ टक्के म्हणजे केसेस पडल्यावर ९२% लोक न्यायालयातून निर्दोष सुटले. गुरूवार, दिनांक ७.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात ही बातमी वाचली व एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक वकील म्हणून माझे मन सुन्न झाले. वकील हा खरं तर न्यायासाठी लढणारा न्यायदूत असतो. पण अशा वातावरणात त्याची वकिली कशी चालणार?
इंग्रजीत ट्रूथ इज बिटर म्हणजे सत्य कटू असते अशी म्हण आहे. पण सत्य नुसते कटू नसते तर ते भयानक असते असे म्हणावे लागेल. कारण भ्रष्टाचारी सोडा पण खून, बलात्कार यासारखे भयंकर हिंसक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार सुद्धा पुराव्याअभावी संशयाचा फायदा मिळून न्यायालयांतून निर्दोष सुटून पुन्हा राजरोसपणे असले गुन्हे करण्यासाठी मोकाट सुटतात तेंव्हा मात्र कायदा, शासन व न्याय या तिन्ही गोष्टींवरील लोकांचा विश्वास उडतो.
वरीलप्रमाणे कायद्याचे राज्य या संकल्पनेवरील लोकांचा विश्वास उडाला की मग लोक अवास्तव गोष्टींच्या नादी लागतात कारण त्यांना भयानक वास्तव झेपत, पचत नाही. मनाला काल्पनिक, खोटं, भ्रामक, आभासी समाधान देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींचे पेव समाजात फुटलेय. अंधश्रद्धा हा त्यातलाच एक भाग. अशा आभासी, खोट्या मानसिक समाधानासाठी अवास्तव, निरर्थक गोष्टींत गुंतवून घेण्याची लोकांची मानसिकता ओळखून तिचा गैरफायदा घेण्याच्या कुहेतूने काही धूर्त लोकांनी आभासी गोष्टींचे उद्योगधंदे सुरू केले ज्यावर या धूर्त लोकांचे अर्थकारण व राजकारणही चालू आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी लोकांची परिस्थिती आहे. स्वतःची बुद्धी नीट वापरून अशा परिस्थितीवर मात करण्याचे सोडून लोक देवधर्माच्या नादी लागून या संकटातून सुटण्यासाठी नवस, उपवास यासारखी धार्मिक कर्मकांडे करतात तेंव्हा मात्र ही परिस्थिती आणखी बिकट होते. कारण या परिस्थितीला देव नाही तर लोकांची भ्रामक मानसिकता जबाबदार असते.
-©ॲड.बी.एस.मोरे, ९.१२.२०२३