https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेतो!

निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेतो!

मनुष्याच्या प्रत्येक कृतीत, मग ती वैचारिक कृती असो की प्रत्यक्ष कृती असो, त्या कृतीतला चळी, मंत्रचळी भाग काढून टाकून आवश्यक तोच भाग ठेवला पाहिजे. आवश्यक कृती ही गरज असते तर चळ, मंत्रचळी कृती ही चैन असते. आपण आपल्या जीवनात बऱ्याच अनावश्यक कृती करीत असतो. उदाहरणार्थ, मनाचे स्वप्नरंजन हे मनोरंजन असते व ते एका आवश्यक त्या मर्यादेपलिकडे अनावश्यक असते कारण त्याचे रूपांतर गरजेतून चैनीत होत असते. चैन ही स्वतःलाच नव्हे तर समाज व निसर्ग पर्यावरण यांनाही घातक असते. आर्थिक श्रीमंतीचे, राजकीय सत्तेचे वेड इतकेच काय देवाधर्माचे वेड ही सुद्धा चैनीची व म्हणून मनुष्य जीवनासाठी अनावश्यक गोष्ट होय. अती तिथे माती ही गोष्ट भौतिक गोष्टीतच नव्हे तर आध्यात्मिक गोष्टीतही खरी असते. म्हणूनच धर्मादाय समाजकारण कितीही उदात्त वाटले तरी ते मर्यादेपलिकडे नेले की स्वतःसाठी त्रासदायक होते. कारण ही दुनिया फार स्वार्थी आहे. तिला फुकटातील गोष्टी लाटायला, चाटायला आवडतात. तेंव्हा देवधर्मी आध्यात्मिक व समाजकर्मी धर्मादाय बाबतीत कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे.

मर्यादेपलिकडची ज्ञानलालसा सुद्धा चैनीची गोष्ट होऊ शकते कारण मनुष्याचे आयुष्यच मर्यादित आहे व या मर्यादित आयुष्यात निसर्गाचे अमर्यादित ज्ञान मिळवून मिळवून तरी किती मिळवणार? त्यामुळे ज्ञानकारण विषयात सुद्धा कुठेतरी थांबायला शिकले पाहिजे. मी हल्ली उतार वयात माझी आवश्यक कृती कोणती व माझी चळकृती कोणती हे प्रत्येक कृतीच्या वेळी निश्चित करून चळकृती सुरू झाली की "थांब थांब, चळाचा भाग सुरू झाला रे मना" असे मनाला बजावून मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करतो. पण बाल व तरूण वयात लागलेल्या चळकृती उतार वयातही सुटता सुटत नाहीत व त्या करताना शरीर व मनाची चांगली फजिती होते. तरीही उतार वयात जुनाट चळकृती होता होईल तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर बाल व तरूण वयात आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी पुढे उतार वयात अनावश्यक होत जातात कारण निसर्ग हळूहळू दिलेले हक्क काढून घेत असतो. मग माणसाने   परमेश्वराची कितीही आध्यात्मिक भक्ती करू देत निसर्ग हक्क काढून घेण्याची ही प्रक्रिया काही थांबवत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.११.२०२३

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

पदार्थ व त्यांची व्यवस्था!

निसर्गातील पदार्थ व त्यांच्या व्यवस्थेचे विज्ञान!

निसर्गाची उत्क्रांती होत असताना त्या उत्क्रांतीतून अगोदर विविध गुणधर्मी पदार्थ निर्माण झाले व नंतर त्यांच्या हालचालीची नैसर्गिक व्यवस्था निर्माण झाली की अगोदर पदार्थांच्या हालचालीची नैसर्गिक व्यवस्था निर्माण झाली व नंतर  विविध गुणधर्मी पदार्थ निर्माण होऊन ते तयार व्यवस्थेत बसवले गेले म्हणजे अगोदर पदार्थ व नंतर व्यवस्था की अगोदर व्यवस्था व नंतर पदार्थ, हे कळायला मार्ग नाही. पण वास्तवात या दोन्ही गोष्टी म्हणजे पदार्थ व व्यवस्था एकत्र आहेत हेच दिसते.

विविध गुणधर्मी असंख्य सजीव व निर्जीव पदार्थ व त्यांच्यामधील नैसर्गिक हालचालीची नैसर्गिक व्यवस्था व तसेच या नैसर्गिक व्यवस्थेच्या अंतर्गत जन्म घेऊन जगणारी, मरणारी व आहे त्या माणसांच्या पुनरूत्पादन क्रियेतून पुन्हा पुन्हा जन्मणारी करोडो माणसे व त्यांच्या सामाजिक हालचालीची सामाजिक व्यवस्था या सर्वांचे ज्ञान म्हणजेच विज्ञान. नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांच्या नियमांनाच एकत्रितपणे कायदा असे म्हणतात. नैसर्गिक व्यवस्थेचा नैसर्गिक कायदा (नॕचरल लाॕ) असतो व सामाजिक व्यवस्थेचा सामाजिक कायदा (सोशल लाॕ) असतो. या दोन्ही कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास हा माझा आवडीचा संशोधनाचा विषय आहे.

नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थेच्या अंतर्गत हालचाल करणारी करोडो माणसे पृथ्वीवर जन्माला येतात, जगतात व मरतात. पण त्यापैकी किती लोकांचा आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येतो? फक्त काही माणसेच आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष संपर्कात  येतात. अशी प्रत्यक्ष संपर्कातील माणसे प्रथमतः कौटुंबिक नाते संबंधातील असतात व नंतर त्यांच्या माध्यमातून जवळ येणारी नातेवाईक मंडळी असतात. अशा जवळच्या नात्यांतील संबंध हे अनौपचारिक व वैयक्तिक स्वरूपाचे असतात ज्यात मायाप्रेम या भावनेचा भाग जास्त व कोरड्या, औपचारिक व्यवहाराचा भाग कमी असतो. त्यानंतर आपला प्रत्यक्ष संबंध येतो तो शैक्षणिक, आर्थिक व राजकीय गरजांतून निर्माण होणाऱ्या औपचारिक, कोरड्या व्यावहारिक संबंधाचा ज्यात गरज सरो व वैद्य मरो, कामापुरता मामा व ताकापुरती आजी अर्थात वापरा आणि फेका असा हिशोब असतो. पण शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा व राजकारण यासारख्या औपचारिक व्यवहार संबंधातूनही वैयक्तिक पातळीवरील जवळचे मैत्रीचे संबंध निर्माण होऊ शकतात. या मर्यादित संबंधाच्या बाहेर संबंध नसलेल्या करोडो अनोळखी लोकांचा प्रचंड मोठा परीघ आपल्या अवतीभोवती असतो व आपण अप्रत्यक्षरीत्या या परिघाचा भाग असतो. जवळच्या प्रत्यक्ष संबंधातील मर्यादित माणसांच्या बाहेर असलेल्या या परिघातील अनोळखी लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हालचाली समाज निर्मित वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ या पारंपरिक व हल्ली उदयास आलेल्या समाज माध्यमांतून आपल्याला कळत असतात. या परिघातील अनोळखी माणसांच्या हालचालीच्या बातम्या आपल्या वैयक्तिक जीवनावर किती परिणाम करतात हे आपला या बातम्यांना प्रतिसाद किती यावर अवलंबून असते. पण सगळ्याच बातम्या मनाला लावून घ्यायच्या नसतात. करोडो माणसे सामाजिक व्यवस्थेत एकाच लयीत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकतील असे नसते. काही माणसे या व्यवस्थेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. तीच गोष्ट असते नैसर्गिक व्यवस्थेतील लहरीपणाची. तिथेही सगळंच सुरळीत चालेल असे नसते. अधून मधून ऊन, पाऊस, वारा यासारखे निसर्ग घटक नैसर्गिक व्यवस्थेत गोंधळ उडवून देण्याचे काम करीत असतात. विविध नैसर्गिक आपत्ती हा निसर्ग घटकांच्या अशा लहरी गोंधळाचाच भाग. पण शेवटी अधून मधून गोंधळ घालणाऱ्या या निसर्ग व समाज घटकांचा योग्य बंदोबस्त करण्याची ताकद नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांमध्ये असते. निसर्ग व समाज घटकांना निसर्गाने व समाजाने नैसर्गिक व सामाजिक व्यवस्थांच्या दावणीला घट्ट आवळून बांधलेले असते.

पण शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय? निसर्ग म्हणजे विश्व व विश्व म्हणजे प्रचंड मोठी अंतराळ पोकळी (स्पेस)  व त्या पोकळीतील विविध पदार्थांचा महासंघ. विश्वाचा/निसर्गाचा निर्माता व नियंता कोणीतरी आहे (ज्याला परमेश्वर म्हणतात) हा तर्क आहे तार्किक मानवी बुद्धीचा जो तर्क वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता आलेला नाही. तो परमेश्वर कोणाला कधी दिसत नाही की कोणाच्या  जवळ येऊन बोलत नाही. त्यामुळे त्याचे अस्तित्व विश्वात/निसर्गात खरंच आहे का हा प्रश्नही चौकस मानवी बुद्धीपुढे निर्माण होतो. पण परमेश्वर असो वा नसो, निसर्ग मात्र त्याच्या पदार्थांसह व पदार्थांच्या व्यवस्थेसह अस्तित्वात आहे हे वास्तव आहे. हे वास्तव नीट तपासून व स्वीकारून वास्तवात असलेल्या नैसर्गिक, सामाजिक व्यवस्थांनुसार जगणे व जगण्याची हालचाल करणे एवढेच माणसाच्या हातात आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.११.२०२३

रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

चळमुक्ती!

चळापासून मुक्ती हाच शांतीचा आध्यात्मिक मार्ग!

गरज व चैन यात फरक आहे. गरज ही आवश्यकतेपुरती मर्यादित असते तर चैन ही आवश्यकतेची मर्यादा ओलांडून बेभान होते. माणसाने आवश्यकतेपुरत्याच त्याच्या इच्छा मर्यादित ठेवल्या तर त्याला चैनीचा चळ लागत नाही.

आवश्यकतेपलिकडे जाण्याची मानवी मनाची ओढ, हाव मनाला चळी बनवते. काही अती हुशार माणसे या ओढीला, हावेलाच महत्वाकांक्षा असे गोंडस नाव देतात. ही हाव किंवा महत्वाकांक्षा गरजा अकारण वाढवते व चैनीचे रूपांतर गरजेत करून टाकते. हा एक भयंकर चळ आहे.

जगाला स्वतःपुढे झुकवण्याची मानवी मनाची राजकीय इच्छा माणसाला सत्तापिपासू बनवते व जगातील जास्तीतजास्त संपत्तीची मक्तेदारी स्वतःकडे असावी ही मानवी मनाची आर्थिक इच्छा माणसाला अतीश्रीमंत होण्याचे वेड लावते. मानवी मनाच्या या दोन्ही इच्छा म्हणजे मानवी मनाचा भयंकर मोठा चळ होय. हा चळ माणसाच्या वैयक्तिक आरोग्यासाठीच नव्हे तर जगाच्या नैसर्गिक व सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा घातक होय.

सातत्यपूर्ण शिक्षणातून (माणसाने मरेपर्यंत विद्यार्थी म्हणून जगावे) जगाचे ज्ञान मिळविण्याचा मानवी मनाचा ध्यास हा चळ नव्हे. ज्ञानाने माणूस आकाशातून जमिनीवर येतो व शांत होतो, विनम्र होतो. ज्ञानी मनाला अंधश्रद्धा चिकटत नाही. ज्ञानी मनुष्य निसर्गाचे विज्ञान व परमेश्वराचे अध्यात्म यांचे मर्म जाणून दोन्हीत सुवर्णमध्य साधतो. त्यामुळे तो विज्ञानाने भौतिक चंगळवादी व आध्यात्मिक धर्माने देवभोळा, देववेडा होत नाही. तो विज्ञानातील धर्म व धर्मातील विज्ञान म्हणजे निसर्गातील परमेश्वर व परमेश्वरातील निसर्ग जाणतो.

जर वैद्यकीय विज्ञानानुसार मंत्रचळ (इंग्रजीत आॕब्सेसिव्ह कंम्पलसिव्ह डिसआॕर्डर थोडक्यात ओसीडी) हा मानसिक आजार आहे तर मग मी असे म्हणेल की जगातील राजकीय  सत्तापिपासू व आर्थिक संपत्तीवेडे अतीश्रीमंत लोक हे या मानसिक आजाराने ग्रासलेले भयंकर मंत्रचळी लोक होत.

माणसाने अतीगरीब नसावे व अतीश्रीमंतही नसावे. त्याचा स्वार्थ मर्यादित असावा म्हणजेच मध्यम असावा. माझ्या मते, मंत्रचळ म्हणा किंवा चळ म्हणा त्यापासून मुक्ती हाच शांतीचा आध्यात्मिक मार्ग होय.

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.११.२०२३

संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

भावनांना आवर घातला पाहिजे. वास्तव स्वीकारले पाहिजे. जुन्या पिढीतील जी माणसे जिवंत आहेत व बदललेल्या परिस्थितीतही व नवीन काळातही शरीराने नसली तरी मनाने तरी पूर्वीसारखी आहेत त्यांनाच फोन व व्हॉटसॲप संपर्कात ठेवणे याला उतार वयात अर्थ आहे. बाकी आपुलकीने चांगल्या संपर्कात असलेल्या जुन्या पिढीने जन्माला घातलेल्या नव्या पिढीशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा होय. एकतर ही नवीन पिढी जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टींना व त्यांच्या अनुभव विचारांना कालबाह्य समजत असते व तरूण रक्तामुळे स्वतःच्याच मस्तीत जगत असते.

उतार वयात स्वतःच्या मुलांशीही जपून बोलावे, वागावे लागते मग इतरांच्या मुलांशी काय बोलणार? मला हे कळायला जरा उशीरच झाला म्हणायचे नाहीतर माझ्या विचार, लेखांतून विशेष संपर्कात नसलेल्या जुन्या पिढीशी व संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेल्या नवीन पिढीशी संपर्क साधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत राहिलो नसतो.

मला काळजी याच गोष्टीची वाटते की जिवंत असताना संपर्कक्षेत्राच्या बाहेर असलेली ही माणसे मी शरीर व मनाने मेल्यावर माझ्या मयताला केवळ औपचारिकता म्हणून येतील का? मी मेलेला असल्यामुळे त्यांना "कारे बाबांनो, जिवंतपणी कुठे गेला होता तुम्ही" असा जाबही विचारू शकणार नाही. तेंव्हा माझा हा लेख हेच माझे मृत्यूपत्र समजून माझ्या  जिवंतपणी संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या अशा लोकांनी माझ्या अंत्यविधीला उगाच हजेरी लावू नये हीच मृत्यूपूर्व माझ्या अंतरात्म्याची इच्छा. अच्छे थे वो दिन लेकिन अब नही रहे! संबंध संपत चालले, छोड दो इन बातों को!

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.११.२०२३

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

गिरण्यानंतर आता बी.डी.डी. चाळीही इतिहासजमा!

आमचा इतिहास भूतकाळात जमा!

वरळी बी.डी.डी. चाळी हळूहळू इतिहासात जमा होऊ लागल्यात. जांबोरी मैदानाशेजारच्या ३० ते ३५, ८, ९ व ११, नालंदा बुद्ध विहारच्या शेजारील ३९ व ४० व तबेला म्युनि. शाळेजवळील १०८ व १०९ अशा एकूण १३ बी.डी.डी. चाळी तोडून पोलीस मैदानात व इतर परिसरात वरळीतील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाचे काम जोरात चालू आहे. गिरण्या संपल्या व आता त्या बी.डी.डी. चाळीही संपत चालल्या. जांबोरी मैदानातील ललित कला भवन व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळही ओस पडलेय. शेजारचे अंबादेवी मंदिर मात्र होते तसे होत्या त्या ठिकाणी आहे. वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ५३, ६८, ७८, २०, १३ या चाळींत जांबोरी मैदानासमोरील ४९ नंबर चाळीतील आमच्या मराठा मंदिर वरळी हायस्कूलमधील माझे काही मित्र रहायचे. आता ते लांब रहायला गेलेत. आज त्यापैकी एका मित्राच्या १३ नंबर चाळीत जाऊन आलो. २० नंबर चाळीतही गेलो. मी माझ्या आईवडील व भावंडांसह ८४ नंबर चाळीतील ६६ नंबर खोलीत रहायचो. शेजारचा तेलगु मित्र आता ११० नंबर चाळीत रहातोय. पण आज त्याच्याकडे गेलो नाही. कारण मला एकट्यानेच वरळी परिसरात भटकंती करायची होती. जांबोरी मैदानात उद्या रविवार दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ संविधान दिनी आयोजित केलेल्या ज्वाला रॕलीची तयारी चालू असलेली दिसली. मोठे व्यासपीठ, मोठा मंडप व बैठक व्यवस्था या सर्वांनी जांबोरी मैदानाचे रूपांतर ज्वाला नगरात केल्याचे दिसले. त्या ठिकाणी मला ज्वाला महारॕलीच्या कार्यकर्त्यांकडून कढी भात देण्यात आला. सोबत थंड पाण्याची मोठी बाटलीही देण्यात आली. तो कढी भात मी जांबोरी मैदानातच बसून खाल्ला. शरीराने मागे जाता येत नसले तरी मनाने मागे जाऊन माझा भूतकाळ, जुना इतिहास मी आज जागवला आणि वर्तमानकाळातील बदल देखील पाहिले.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.११.२०२३

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म!

विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म!

हायड्रोजनचे दोन अणू (ॲटम) व आॕक्सिजनचा एक अणू (ॲटम) रासायनिक प्रक्रियेतून एकत्र आले की त्यातून पाणी हे संयुग तयार होते. पाण्याच्या संयुगाचा सूक्ष्म कण म्हणजे पाण्याचा रेणू (माॕलिक्युल). मूलद्रव्यांच्या अतिसूक्ष्म कणांना अणू (ॲटम) असे म्हणतात तर संयुगांच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू (माॕलिक्युल) असे म्हणतात. रेणू हा अणू पेक्षा थोडा मोठा असतो. अणू व रेणूत हा असा फरक आहे. गणितात एक अधिक एक मिळून दोनच होतात. हे भौतिक व रसायन शास्त्रीय अचूक, स्पष्ट, निश्चित गणिती निसर्ग विज्ञान होय. वनस्पती शास्त्र व मानवेतर जीवशास्त्र हे अचूक गणिती विज्ञान नसले तरी जवळजवळ निश्चित, स्पष्ट असे विज्ञान होय. पण मानवी जीवन विज्ञान हे अचूक गणिती विज्ञान नाही की जवळजवळ स्पष्ट, निश्चित विज्ञान नाही. ते निसर्गाचे अंदाजे, अस्पष्ट, अनिश्चित विज्ञान होय. याचे कारण म्हणजे इतर प्राणी मात्रांना असलेल्या जैविक वासना मनुष्य प्राण्यालाही असल्या तरी मानवी भावना व मानवी बुद्धी या दोन गोष्टी इतर निर्जीव व सजीव पदार्थांपासून पूर्णतः नसल्या तरी बऱ्याच अंशी वेगळ्या आहेत. म्हणून मानवी जीवन विज्ञान हे इतर विज्ञानांशी जोडले गेलेले पण तरीही एक स्वतंत्र विज्ञान आहे.

अचूक गणिती व जवळजवळ स्पष्ट, निश्चित विज्ञान व मानवी भावना आणि तर्कबुद्धी यांची अर्थपूर्ण देवाणघेवाण होऊन त्यातून मानवी जीवनविषयक तत्वज्ञान तयार होते. हे तत्वज्ञान संपूर्ण मानव समाजाने मान्य केले की त्याचा सामाजिक कायदा बनतो. याउलट मानवी जीवनविषयक तत्वज्ञानाला परमेश्वर श्रद्धा व भक्तीची जोड दिली की त्या तत्वज्ञानाचा धर्म होतो. अध्यात्म हे फक्त परमेश्वर श्रद्धा व भक्तीशी निगडित आहे. त्याचा बौद्धिक तत्वज्ञानाशी संबंध नाही. पण हेच अध्यात्म जर तत्वज्ञानाशी जोडले तर त्याचा धर्म बनतो. या धर्मातून अध्यात्म म्हणजे परमेश्वर बाजूला केला की शिल्लक राहते ते तत्वज्ञान ज्याला कायदा म्हणून समाज मान्यता मिळते. कायदा समाजमान्य झाला म्हणून धर्म समाजमान्य होईल असे नसते. म्हणून तर जगातील धर्माधर्मांमध्ये वाद आहेत. विज्ञान, तत्वज्ञान, कायदा व धर्म या गोष्टी एकमेकांशी संलग्न व एकमेकांत गुंतलेल्या आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.११.२०२३

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

बदलणाऱ्या भूमिका!

बदलणाऱ्या भूमिका!

विविध गुणधर्माचे विविध निर्जीव व सजीव पदार्थ ही आहे आपल्या सृष्टीची रचना. या पदार्थांबरोबर विविध प्रकारचे अनेकविध व्यवहार करताना अनेकविध भूमिका पार पाडणे हे आहे मनुष्य जीवनाचे सार. माणसाला सतत एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत यावे लागते व हेच मोठे आव्हान असते. अशा अनेक आव्हानांशी माणसे दररोज सामना करीत असतात. हे इतके सहजपणे घडत असते की कित्येक वेळा एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत आपण कधी आलो हे आपल्याला कळतही नाही. भूमिकांची ही अशी सतत अदलाबदल होत असताना एखाद्या गोष्टीलाच बराच काळ धरून बसणे, तिला चिकटून राहणे, तिच्यात गुंतून राहणे म्हणजे वाट बघत असलेल्या दुसऱ्या अनेक भूमिकांना ताटकळत ठेवणे होय. एक भूमिका संपली की लगेच ती सोडून देऊन आवश्यक त्या दुसऱ्या भूमिकेत शिरता आले पाहिजे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.११.२०२३