https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
बौद्धिक कौशल्याने व्हा ज्ञानबेटाचे राजे!
मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?
मानवी जीवनाला धर्माची आवश्यकता?
(१) मनुष्याला निसर्गाचे विज्ञान कळल्यावरही त्याच्या जीवनाला धर्म आवश्यक आहे का? तर माझे उत्तर हो असेच आहे. विज्ञानाने निर्जीव पदार्थ व मानवेतर प्राणी पूर्ण होतील पण मनुष्य हा धर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
हा विषय माझ्या विचार कक्षेत येण्याचे कारण म्हणजे कालपरवाच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यात धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानातील शब्दावरून रंगलेला पत्रवाद!(२) देश धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे देशातील नागरिक अधार्मिक असणे असा अर्थ बिलकुल होऊ शकत नाही. तसे असते तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा धर्म पाळण्याचे धार्मिक स्वातंत्र्य दिलेच नसते. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हाच की देशाचे सरकार कोणत्याही धर्माचा जाहीर उदोउदो करणार नाही की कोणत्याही धर्माकडे पूर्वग्रहदूषित नजरेने बघून त्या धर्माच्या लोकांवर अन्याय, अत्याचार करणार नाही. तसेच असे सरकार कोणत्याही धर्मासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार नाही. ज्या त्या धर्माचे अनुयायी त्यांच्या स्वतःच्या पैशाने त्यांच्या धर्माची स्वतंत्र प्रार्थनास्थळे निर्माण करून तिथे त्यांची धार्मिक प्रार्थना करू शकतात व सार्वजनिक उपद्रव होणार नाही व देशहिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या धर्माचा प्रचार व प्रसारही करू शकतात. धर्मनिरपेक्ष शब्दाचा हा अर्थ एवढा सरळस्पष्ट असताना असे वाद व तेही सरकारी पातळीवर का निर्माण होतात हेच कळत नाही.
(३) मला जर कोणी तुम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे असे मध्येच विचारले तर त्या माणसाचा खूप राग येतो. अरे बाबा, माझ्याकडे माणूस म्हणून बघ ना! माझ्या किंवा तुझ्या जात, धर्माने आपल्या मानवीय संबंधात बाधा यावी असे तुझ्या मनात का यावे? जो धर्म माणूस म्हणून जगायला शिकवत नाही तो धर्म नव्हे व जी जात माणसामाणसांत विद्वेषाची भिंत उभी करते ती जात नव्हे. असा धर्म, अशी जात ही संपूर्ण मानव समाजाची शत्रू असते. मला वृथा धर्माभिमान, वृथा जात अभिमान पसंत नाही. हो, मी जन्माने हिंदू धर्मीय व मराठा जातीय आहे हे मान्य व म्हणून माझ्या मराठी भाषेविषयी जसे मला पटकन प्रेम वाटते तसेच पटकन प्रेम मला माझ्या हिंदू धर्माविषयी व माझ्या मराठा जातीविषयी वाटते. हे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. तो लहानपणापासून असलेल्या सहवासाचा, संस्काराचा नैसर्गिक परिणाम असतो. पण याचा अर्थ असा नव्हे की मी दुसऱ्याच्या धर्माचा, जातीचा तिरस्कार करावा.
(४) मानवी जीवनाला जातीपातींच्या बंधनातून मुक्त करणे हे फार मोठे आव्हान आहे. ही वर्ण व जात व्यवस्था कशी निर्माण झाली, त्यामागे कोणत्या तरी विशेष वर्गाची विशेष सोय हाच प्रमुख उद्देश होता किंवा आहे का, की या वर्ण व जात व्यवस्थेला नैसर्गिक विज्ञानाचा शास्त्रीय आधार आहे या प्रश्नाचे उत्तर हा मोठा विषय आहे. आजचा माझा विषय हा मानवी जीवन हे धर्माशिवाय अपुरे या मुद्यावर प्रकाश टाकणारा आहे.
(५) धर्मात देव असलाच पाहिजे असे नाही. तसे असते तर बुद्ध हा धर्मच झाला नसता. पण बौद्ध धर्मीय बुद्ध हा धर्म नसून धम्म आहे असे मानतात. म्हणजे जो धर्म देव मानतो त्याला धर्म म्हणायचे व जो धर्म देव मानत नाही त्याला धम्म म्हणायचे. मी मात्र आजच्या माझ्या या विषयासाठी धर्म हाच शब्द प्रमाण मानतोय व त्या अर्थाने बुद्ध धम्मालाही बुद्ध धर्म मानतोय.
(६) आजच्या विषयासाठी मी मानवी मेंदूच्या तीन गोष्टी आधारभूत धरल्या आहेत. एका बाजूला मानवी मनाची (मानवी मेंदूतच मानवी मन असते) आध्यात्मिक किंवा नैतिक भावना व दुसऱ्या बाजूला मानवी मनाची भौतिक वासना आणि दोन्हीच्या बरोबर मध्यभागी मानवी मनाची सारासार बुद्धी! या सारासार बुद्धीलाच सदसद्विवेकबुद्धी किंवा विवेकबुद्धी म्हणतात. या बुद्धीवर एकीकडून आध्यात्मिक भावनेचा तर दुसरीकडून भौतिक वासनेचा ताण असतो.
(७) हा धर्माचा विषय मला नीट समजण्यासाठी माझ्या बुद्धीने मानवी मनाच्या आध्यात्मिक किंवा नैतिक भावनेला धर्म असे नाव दिले व मानवी मनाच्या भौतिक वासनेला विज्ञान असे नाव दिले. विज्ञानाचा म्हणजे वासनेचा अतिरेक होऊन मध्यवर्ती केंद्रीय बुद्धी जनावरासारखी वासनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून या बुद्धीवर धर्माचा म्हणजे भावनेचा ताण हा हवाच! तसेच धर्माचा म्हणजे भावनेचा अतिरेक होऊन ही बुद्धी वेड्यासारखी भावनेच्या मागे फरफटत जाऊ नये म्हणून बुद्धीवर विज्ञानाचा म्हणजे वासनेचा ताण हा हवाच! या दोन्ही ताणांमध्ये संतुलन राखणे ही बुद्धीची कसोटी व मोठी जबाबदारी! या लेखाचा एवढाच सार एवढाच की नुसत्या विज्ञानाने मनुष्य जीवन पूर्ण होऊ शकत नाही. तसे असते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म (धम्म) स्वीकारलाच नसता.
(८) मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे हे माझे माझ्या वरील कारणमीमांसेवर आधारित वैयक्तिक मत आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांच्या मूर्त्या असोत, बुद्ध धर्मातील (धम्मातील) तथागत बुद्धाची मूर्ती असो, ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्ताची मूर्ती असो, पारसी धर्मातील अग्नी असो की मुस्लिम धर्मातील मक्केतील मशिदेचा फोटो असो, ही सर्व त्या त्या धर्माची प्रतिके आहेत. जसा भारताचा तिरंगा ध्वज हे भारत देशाचे प्रतीक आहे.
(९) ज्याप्रमाणे भारतीय नागरिक तिरंगा ध्वज या भारताच्या प्रतिकात भारतीय संविधानाला बघतात त्याप्रमाणे विविध धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक प्रतिकांत त्यांच्या धर्माचा सार बघतात. कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रतिकात तो धर्म एकवटलेला असतो. म्हणून तर या धार्मिक प्रतिकांना फार महत्व असते. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करणाऱ्या लोकांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की या देवदेवता ही हिंदू धर्माची प्रतिके आहेत. हिंदू धर्माच्या प्रतिकांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होय. असा फालतूपणा करण्याची हिंमत कोणीच करू नये.
(१०) कोणीच दुसऱ्या धर्माच्या प्रतिकांची किंवा दुसऱ्या धर्माची टिंगलटवाळी करू नये. धर्मनिरपेक्ष या शब्दात इतर धर्मांविषयीचे हे मूलभूत धार्मिक कर्तव्यही समाविष्ट आहे ही गोष्ट सगळ्या धर्माच्या लोकांनी सतत ध्यानात ठेवावी. मानवी जीवनाला विज्ञानासोबत धर्म हा अत्यंत आवश्यक आहे या वाक्याने हा लेख इथेच संपवतो.
-ॲड.बी.एस.मोरे©१५.१०.२०२०
१४ आॕक्टोबर धम्म चक्र प्रवर्तन दिन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अतिमागास, मागास जाती समाज जीवनात आजही अंधारच असता. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(१) एखाद्या व्यक्तीवर योगायोगाने अन्याय होणे व त्यामुळे त्याने दैव, नशीब, प्रारब्ध यासारख्या कल्पना कवटाळून बसणे व एखाद्या समाजावर एकाच पिढीत नव्हे तर पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेल्याने त्या समाजाचा देवावरील व दैव, प्रारब्ध वगैरे कल्पनांवरील विश्वास उडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
(२) मी हिंदू धर्मात व मराठा जातीत जन्मलो म्हणून मी शैक्षणिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत त्या धर्मामुळे किंवा त्या जातीमुळे सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलो असे नव्हते. सातवी पर्यंत शिकलेले वडील गिरणी कामगार, आई शालेय शिक्षणाने पूर्ण अशिक्षित व घरी चार मुले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा हलाखीच्या परिस्थितीत हिंदू धर्मीय मराठा हा शिक्का माझ्या मदतीला धावून आला नाही.
(३) अशा हलाखीच्या परिस्थितीत खाजगी कंपन्यांत नोकऱ्या करीत खुल्या वर्गात शिक्षण घेत वकील होणे ही साधी गोष्ट नव्हती. ज्यांनी ज्ञान, पैसा व सत्ता या तिन्ही क्षेत्रातील जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांनी मी हिंदू-मराठा म्हणून माझे कुठेही आदराने स्वागत केले नाही. स्वतःच हिंमत करून कष्ट घेत व अपमान सहन करीत वकील झालो व स्वतःला थोडेफार का असेना पण ज्ञान व पैसा या दोन गोष्टींत कनिष्ठ श्रेणीतून मध्यम श्रेणीत घेऊन आलो. माझ्या या खडतर प्रवासात मी हिंदू-मराठा आहे म्हणून मला कसलीही मदत झाली नाही. म्हणजे मी जो वकील झालो तो हिंदू धर्मामुळे किंवा मराठा जातीमुळे नाही तर माझ्या मेहनती मुळे झालो हे सत्य आहे.
(४) मग मी असा विचार करतोय की मराठा जातीत जन्मून जरा मला शैक्षणिक व आर्थिक बाबतीत काहीच फायदा झाला नाही तर मग या जातीला उच्च जात समजायची कशी? ही सुद्धा मागासवर्गीय जातच झाली. भले ती अनुसूचीत जाती जमाती सारखी अतिमागास जात नसेल. पण ती मध्यम मागास जात तर निश्चितच आहे. केवळ या जातीतली बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी गर्भश्रीमंत व सत्ताधारी आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज हा उच्च जातीचा पुढारलेला समाज असे समजणे चुकीचे आहे. माझे एकट्याचेच उदाहरण नाही तर हलाखीत खिचपत पडलेली माझ्यासारखी लाखो करोडो कुटुंबे मराठा समाजात आहेत हे सत्य आहे.
(५) खरे खोटे मला माहित नाही, पण महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी म्हणे मराठा समाजालाही आरक्षण घ्या असे सांगितले होते. मग मराठा समाजाने ते आरक्षण का घेतले नाही की त्यावेळी मराठा समाजाच्या मूठभर श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मराठा समाजाला त्यापासून वंचित ठेवले हे कळायला मार्ग नाही. जे झाले ते झाले पण आज सकल मराठा समाज जागृत झाला आहे. तो उच्च जातीचा खोटा शिक्का मराठा समाजाला नको आहे. सत्य परिस्थिती स्वीकारून मराठा समाजाला मागास जातीचा समाज म्हणून मान्यता मिळणे व त्या आधारे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.
(६) अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलाय ही गोष्ट मनाला खूप भावली. मी आज विचार करतोय की, अज्ञान, गरिबी, अस्पृश्यतेच्या दलदलीत (दलित हा शब्द याच दलदलीवरून निर्माण झाला असावा बहुतेक) पिढ्यानपिढ्या पिचत ठेवलेल्या अतिमागास जातींतील लोकांना मोठ्या हिंमतीने अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याने या पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अशा अतिमागास व काही इतर मागास जातीत जन्मलेल्या लोकांची स्थिती आजही त्यावेळी होती तशीच अंधारमय राहिली असती.
(७) मी ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो, करोडो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचा विचार करतो तेंव्हा त्यांचा तो निर्णय किती तर्कशुद्ध होता हे मनाला पटते. पिढ्यानपिढ्या दलदलीत खिचपत ठेवलेल्या एवढया मोठ्या अतिमागास समाजाला उचलून वर काढायला जेंव्हा कोणताच देव पुढे येत नाही तेंव्हा त्या देवावर विश्वास का ठेवावा व जो धर्म एखाद्या समाजाला अस्पृश्य लेखतोय त्या धर्मात तरी का रहावे? डॉ. आंबेडकर यांचे हे क्रांतिकारक विचार म्हणूनच मला पटतात. मला जर कोणी अस्पृश्य म्हणून लेखले असते तर मीही हेच केले असते. मी हिंदू धर्मात राहूनही बौद्ध धर्माचे बौद्धिक विचार स्वीकारू शकतो व मराठा समाजाचा असूनही अतिमागास समाज बांधवांचा मित्र होऊ शकतो. हा माझा व्यापक दृष्टिकोन मला माझ्या शिक्षणाने दिलाय! १४ अॉक्टोबर, १९५६ या क्रांतिकारी दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या निमित्त आज १४ अॉक्टोबर या दिनी सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०
देव, दानव, मानव!
देव, दानव, मानव!
नुसत्या आध्यात्मिक धर्माला कवटाळून देवाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही देव नाही व नुसत्या भौतिक विज्ञानाला कवटाळून मनगटाच्या जोरावर जग जिंकायला माणूस काही दानव नाही, देवाची आध्यात्मिक मनःशक्ती व निसर्गाची भौतिक शरीर शक्ती या दोन्ही शक्तींना सोबत घेऊन सारासार विचार करणाऱ्या बुद्धीच्या जोरावर जगावर राज्य करणारा माणूस हा देव नाही की दानव नाही तर तो फक्त माणूस आहे!
-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०
मॉडर्न आर्ट
माणूस व निसर्ग!
माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार झाला आणि निसर्ग हात चोळत बसला?
सृष्टीला रचतानाच सृष्टीची नियमबद्ध हालचाल चालू राहण्यासाठी सृष्टी व्यवस्था निर्माण करून तुमचे जीवन-तुमची जबाबदारी असे सजीवांना सांगून निसर्ग हात झटकून मोकळा झाला. मग माणसाने पुढे होऊन ती जबाबदारी अंगावर घेत निसर्गाने निर्माण केलेली सृष्टी व सृष्टी व्यवस्था स्वतःच्या दावणीला बांधत स्वतःला सोयीस्कर वाटणारा स्वतःच्या फायद्याचा कायदा त्या मूळ व्यवस्थेतूनच निर्माण केला व त्या कायद्याच्या जिवावर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असे म्हणत हा माणूस निसर्गाला वाकुल्या दाखवत बसला. हे बघून, कशाला हा असला माणूस मी बनवला असे म्हणत निसर्ग हात चोळत बसला असेल. वैतागून हात चोळता चोळता निसर्गाला स्वतःच्याच चुकीचा राग आला की मग अवर्षण, अतीवृष्टी, पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा मारा निसर्ग त्यानेच निर्माण केलेल्या माणसांवर करतो. कोरोना विषाणू हा त्यातलाच एक प्रकार! पण माणूस महावस्ताद! तो त्याच्या बुद्धीच्या जोरावर असल्या नैसर्गिक आपत्तींनाही तोंड देतो व फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने झेप घेतो. खरंच काय बरे वाटत असेल निसर्गाला की निसर्गातील देवाला या असल्या माणसाकडे बघून?
-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
गाठ पडली ठका ठका!
गाठ पडली ठका ठका!
राजकारण, धर्म, जात हे विषय हल्ली फारच धोक्याचे वाटू लागलेत. लोक खूप संवेदनशील असतात या विषयांवर! म्हणून हल्ली मी या विषयांवर सावधपणे व्यक्त होतोय. यात वाद वाढत गेले तर लोक भावनातिरेकाने जीव घ्यायला कमी करीत नाहीत. हे समाजमाध्यम आहे. हितशत्रू लोक प्रतिक्रिया देत नसतीलही पण गुपचूप तुमच्या लिखाणाचे वाचन करीत नसतील कशावरून? मी पूर्वी खूप सडेतोड लिहायचो. पण हल्ली तसले रोखठोक लिखाण कमी केलेय. आपण पोटतिडकीने लिहून काही उपयोग नाही हे कळून चुकलेय. माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या चाव्या मोठ्या लोकांच्याच हातात आहेत हेच खरे! त्यांना राग आला तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला चिलटा सारखे चिरडून मारतील हे सत्य लक्षात घेऊन हळूहळू सावध लिहायला, सावध प्रतिक्रिया द्यायला शिकत चाललोय. काही धूर्त मंडळी ही खूप हुशार, कावेबाज, दगाबाज असतात. ज्या गोष्टी मला या ६४ वयात कळू लागल्यात त्या काही लोकांना तरूणपणातच त्यांच्या घरातूनच कळलेल्या असतात. त्यामुळे मध्यम वयातच अशा व्यक्ती व्यवहार चतुर झालेल्या असतात. त्यांच्यापुढे या उतार वयात मी शहाणपणाचा आव आणून समीक्षा करणे हा मूर्खपणा होय! म्हणून माझे सामान्य जीवन आनंदात व शांतीत जगण्याचा प्रयत्न करतोय. जवळ नुसते ज्ञान असून उपयोग नसतो. इतरही बऱ्याच गोष्टी जवळ लागतात मोठी हिंमत करायला. त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे स्वतःचा वकूब बघून वागायला हवे. नाहीतर गाठ पडली ठका ठका असे व्हायचे!
-ॲड.बी.एस.मोरे©१३.१०.२०२०