निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची, पण तरीही आत्म्याचे परमात्म्याशी मिलन शक्य!
(१) निसर्ग म्हणजे तरी काय? विश्वातील ग्रह, ताऱ्यांचा समुच्चय (अवकाश) व पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या विविध सजीव व निर्जीव पदार्थांचा समुच्चय (सृष्टी) यांची गोळाबेरीज अर्थात संपूर्ण अवकाश व संपूर्ण सृष्टी व या अवकाश व सृष्टीची रचना व व्यवस्था अर्थात संपूर्ण विश्व व सृष्टीचे पर्यावरण असा निसर्गाचा अर्थ घेता येईल.
(२) अशा या निसर्गाची रचना व व्यवस्था फार गुंतागुंतीची आहे. पण ती अनाकलनीय आहे असेही म्हणता येणार नाही. कारण विज्ञानाने अर्थात मानवी बुद्धीच्या संशोधनातून मानवाला प्राप्त झालेल्या ज्ञानाने निसर्ग रचनेचे व निसर्ग व्यवस्थेचे गूढ बऱ्याच अंशी उघड केले आहे. पण विज्ञानाने निसर्गातील सगळ्याच गोष्टी उघड केलेल्या नाहीत. निसर्गात अजून बरीच गुपिते दडली आहेत. ती गुपिते उलघडण्याच्या मार्गावर विज्ञानाचा खडतर व लांबचा प्रवास चालू आहे.
(३) हेही खरे आहे की, विज्ञानाला आतापर्यंत गवसलेले निसर्गाचे सत्य हे अचंबित करून टाकणारे आहे. निसर्गातील आश्चर्ये बघून नुसते कौतुकच वाटत नाही तर आश्चर्यचकित व्हायला होते. कौतुक व आश्चर्य यांचे मिश्र भाव निर्माण करणाऱ्या निसर्गाच्या या सत्यात स्वर्गसुखाचा आनंद आहे तशा नरकयातनांचे दुःखही आहे. स्वर्गसुखाचा आनंद देणाऱ्या सहज व सुंदर आर्थिक देवाणघेवाणीच्या कोमल बागा आहेत तशी नरकयातनांचे दुःख देणारी काटेरी जंगले सुद्धा आहेत.
(४) या काटेरी जंगलातूनच सहज, सुंदर अशा आर्थिक देवाणघेवाणीचा मार्ग जात असल्याने अर्थात नरकातून स्वर्गाचा मार्ग जात असल्याने सुख देणाऱ्या स्वर्गाच्या वाटेवरील जंगली काटे दूर करण्याचे आव्हान म्हणजे संकटातून सुटका करून घेण्याचे राजकीय आव्हान यशस्वीपणे पेलल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. म्हणजेच खडतर राजकारणाशिवाय सहज आनंद देणारे अर्थकारण नाही असा याचा सरळसाधा अर्थ!
(५) मनुष्य जीवनाचे अर्थकारण हे गुलाबाच्या फुलाप्रमाणे कोमल आहे तर मनुष्य जीवनाचे राजकारण हे त्या फुलाला चिकटलेल्या काट्यां प्रमाणे कठोर आहे. निसर्गाचे हे दुहेरी सत्य अनुभवताना मानवी मनाला निसर्गातील देव आठवला नाही तर नवलच! मग या अदृश्य देवाची आध्यात्मिक भक्ती करताना मानवी मन दोन गोष्टी करते. एक म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद दिल्याबद्दल देवाचे आर्थिक आभार मानणे व दोन म्हणजे नरकयातनांचे दुःख सहन होत नाही म्हणून या यातनांतून अर्थात स्वर्गाच्या आर्थिक मार्गावरील संकटांच्या आव्हानातून सुटका होण्यासाठी देवाची राजकीय प्रार्थना करणे.
(६) म्हणजे देवाची मानवी भक्ती आध्यात्मिक असत नाही तर ती स्वार्थी, भौतिक, आर्थिक व राजकीय असते. सद्याच्या कोरोना विषाणूच्या संकटातून मुक्तता करून घेण्यासाठी जर मनुष्य देव प्रार्थना करेल तर ती भौतिक-राजकीय प्रार्थना असेल. अशाप्रकारे निसर्गाची भौतिकता हीच मनुष्याला देवाची आध्यात्मिकता शिकवते असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत वैयक्तिक असल्याने त्यावर कृपया धार्मिक वादविवाद नकोत!
(७) आता पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मग निसर्गात देव आहे हे मान्य करायचे की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मी मनुष्याच्या शरीर रचनेचे उदाहरण समोर ठेवतो. आपले शरीर अनेक मांस पेशींचा समुच्चय असलेल्या अनेक मांसल अवयवांनी बनलेले आहे. या बहु अवयवी शरीराच्या इमारतीला हाडांचा आधार आहे. म्हणजे हाडांच्या सांगाड्यावर आपल्या शरीराची इमारत उभी आहे. आता या शरीर इमारतीचा राजा कोण तर आपला मेंदू! याच तर्काने गुंतागुंतीच्या मानवी शरीराला जर मेंदू नावाचा राजा आहे तर मग गुंतागुंतीच्या निसर्ग शरीराला देव नावाचा राजा का असू नये? हा देव राजाच निसर्ग रचनेचा निर्माता व निसर्ग व्यवस्थेचा नियंत्रक किंवा व्यवस्थापक असे का मानू नये? केवळ हा निसर्गराजा (देव) दिसत नाही म्हणून?
(८) याच वैज्ञानिक तर्काने मी निसर्गात देवाचे अस्तित्व मानतो. पण शरीराच्या राजाचे अर्थात मेंदूचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येते तसे निसर्गाच्या राजाचे अर्थात देवाचे अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येत नाही हे खरे आहे. पण जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पुराव्याने सिद्ध करता येत नाहीत. पण त्या नसतातच असे नसते. केवळ पुरावा नाही म्हणून संशयाचा फायदा देऊन कोर्टातून निर्दोष सुटलेले आरोपी हे गुन्हेगार नसतातच असे ठामपणे म्हणता येईल का? मग नास्तिक लोक केवळ पुराव्याचे तुणतुणे वाजवीत निसर्गात देव नाहीच असे ठामपणे कसे म्हणू शकतात? माझी देवाविषयीची आस्तिकता ही अशी वैज्ञानिक तर्कावर आधारित आहे व हा तर्क पुराव्याने सिद्ध करता येत नाही म्हणून त्याला कोणी कचराकुंडीत टाकून देईल तर तो त्याचा निर्णय असेल. माझ्या या वैज्ञानिक तर्काला कोणी कचराकुंडी दाखवली म्हणून मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मी वैज्ञानिक आस्तिक आहे.
(९) आपल्या शरीराची रचना व व्यवस्था जशी गुंतागुंतीची आहे तशीच निसर्गाची रचना व व्यवस्था गुंतागुंतीची आहे. आपल्या शरीर व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना आपल्या मेंदूला किती त्रास होतो याचा अनुभव आपण प्रत्येकजण पदोपदी घेत असतो. मेंदू आपल्या शरीर अवयवांचे नियंत्रण करू शकतो कारण हे अवयव त्यांच्या ठिकाणी नीट कार्य करीत असतात म्हणून! पण शरीराचे बहुतेक अवयव नीट काम करेनासे झाले म्हणजे जर आपल्या शरीराला बहुअवयव बिघाडाचा मोठा आजार (मल्टिपल अॉर्गन डिसअॉर्डर) झाला तर आपल्या मेंदूची स्थिती काय होईल? याला शारीरिक आणीबाणी म्हणतात.
(१०) देशाच्या निरनिराळ्या राज्यांत व देशाच्या नागरिकांत योग्य समन्वय राहिला नाही की मग देशातही अराजक निर्माण होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा कस लागतो. याच न्यायाने निसर्गाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे व्यवस्थापन व नियंत्रण करताना निसर्गाच्या राजाचा म्हणजे देवाचा कस लागत असेल का? जर आपल्या शरीराच्या बहुतेक अवयवांचे नटबोल्टस सैल झाले तर ते घट्ट करायला आपला मेंदू कुठेकुठे म्हणून धावेल? तो एकाग्र मनाने, एकचित्ताने कार्य करू शकेल का? आपल्या मेंदूची ही एवढी अवघड स्थिती तर देवाची स्थिती काय असेल?
(११) मला एवढे कळते की, मनुष्य जीवन अनमोल आहे. त्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर भौतिक वासना,आध्यात्मिक भावना व दोन्हीत संतुलन ठेवणारी सदसद्विवेकबुद्धी या तिन्हीचे मिश्रण असलेला मानवी मेंदू जो मानवी शरीराचा राजा आहे तो म्हणजेच मानवी आत्मा व निसर्गाचा राजा म्हणजे देव तो म्हणजे परमात्मा यांचे म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे मिलन हे मनुष्याच्या जिवंतपणीच शक्य आहे, मनुष्य मेल्यावर नाही. मनुष्य मरतो म्हणजेच त्याचा मेंदू मरतो. मनुष्य मेल्यावर जर त्याचा आत्माच शिल्लक रहात नाही तर त्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन कसे शक्य आहे? म्हणून जिवंतपणीच मनुष्याने त्याचे माणूसपण जपले पाहिजे. आत्मा (स्वतःचा मेंदू) व परमात्मा (निसर्गाचा मेंदू) यांच्यातील समन्वयाचा अर्थात मिलनाचा अनुभव घेत हे माणूसपण जपणे सर्व माणसांना शक्य आहे असे मला वाटते.
-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०