परमेश्वरा, सुख शांती!
परमेश्वर = निसर्ग/विश्व शरीराचा मेंदू (राजा),
सुख = सहज, सुंदर आर्थिक देवाणघेवाण,
शांती = क्लेशकारक आव्हाने/संकटे यातून
राजकीय सुटका.
-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०
परमेश्वरा, सुख शांती!
परमेश्वर = निसर्ग/विश्व शरीराचा मेंदू (राजा),
सुख = सहज, सुंदर आर्थिक देवाणघेवाण,
शांती = क्लेशकारक आव्हाने/संकटे यातून
राजकीय सुटका.
-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०
मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी मनसेचे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन!
आज सोमवार दिनांक २१ सप्टेंबर, २०२० च्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकांच्या मनातील खळबळ उघड करून मुंबई लोकल रेल्वे चालू करण्यासाठी सविनय कायदेभंगाचे अनोखे आंदोलन केले. मनसे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आज फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच चालू ठेवलेल्या मुंबई लोकल ट्रेन्समधून विनापरवानगी प्रवास करून व काही ठिकाणी शांततामय मार्गाने तो प्रयत्न करून महात्मा गांधीच्या मार्गाने सत्याग्रह केला व अन्यायकारक कायद्याच्या विरोधी सविनय कायदेभंग करण्याच्या महात्मा गांधीनी आम्हा भारतीयांना शिकवलेल्या मार्गाचा छान अवलंब केला. खरं तर, मनसेच्या खास खळ्ळ खट्याक स्टाईल आंदोलन करण्याच्या पद्धतीला बाजूला करणारे मनसेचे हे आंदोलन खरंच कौतुकास्पद आहे. एक वकील म्हणून मी या प्रश्नावर माझे कायदेशीर मत यापूर्वीच्या माझ्या दोन फेसबुक पोस्टसने जाहीरपणे मांडले होते. तसेच मी मा. राजसाहेब ठाकरे यांचा मनसे चाहता असल्याने या दोन्ही पोस्टस मी मनसेच्या फेसबुक पेज/ ग्रूप्सवर टाकल्या होत्या. माझी ती हाक मनसे नेतृत्वापर्यंत कुठेतरी पोहोचली असावी. तसेच मनसेने या प्रश्नावर जो जाहीर सर्व्हे घेतला होता त्यातही मी माझे मत हेच मांडले होते की आता बस्स झाले, लोकल ट्रेन्स चालू करा. लोकांनीही या मनसे सर्व्हेला भरभरून प्रतिसाद देऊन माझ्या मताप्रमाणेच मते मांडली होती. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे मनसेचे आजचे हे अनोखे सविनय कायदेभंग आंदोलन! मी स्वतः वकील असल्याने या आंदोलनात सामील झालो नाही. परंतु या आंदोलनातील मनसे मागणी ही पूर्णपणे कायदेशीर असल्याने माझा तिला पूर्ण म्हणजे १००% जाहीर पाठिंबा आहे. या मनसे मागणीत कोणता कायदा दडला आहे हे जर कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्यांनी माझे याविषयी लिहिलेले पूर्वीचे दोन फेसबुक लेख जरूर वाचावेत जे मी याखाली पुनःप्रसिद्ध करीत आहे. मला आशा आहे की, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सरकार योग्य ती दखल घेईल व मुंबई लोकल प्रवास योग्य त्या नियमांनुसार सर्वसामान्यांसाठी लवकरच निदान या महिनाअखेर तरी खुला करील.
जय महाराष्ट्र! जय मनसे!
-ॲड.बी.एस.मोरे©२१.९.२०२०
लोकल ट्रेन्स सरकारने चालू केल्यावर लोक शारीरिक अंतर कसे राखतील?
हा प्रश्न "हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो" या माझ्या पूर्वीच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी उपस्थित केला. या प्रश्नाचे गांभीर्य आहेच. कारण मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे तूफान गर्दी व दरवाज्याला लटकत जाणे. पण किती दिवस आपण असेच घरी बसणार? आपल्याला आता कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. आता कामासाठी घराबाहेर पडल्यावर तोंडाला मास्क लावणे, सॕनिटायझरची छोटी बाटली जवळ ठेवणे व शारीरिक अंतर ठेऊन चालणे, प्रवास करणे ही काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. जे घेणार नाहीत त्यांना कोरोना चिकटेल. सरकार यात काय करणार? सगळ्या गोष्टी सरकारवर ढकलून देणे सोडले पाहिजे. गर्दी टाळून शिस्तीने लोकल ट्रेनमध्ये चढले पाहिजे. आपण मास्क लावायला आता शिकलो आहोत. आता लोकलचा प्रवास शारीरिक अंतर राखून शिस्तीने कसा करायचा हेही कोरोना आपल्याला शिकवेल. माणसे उपाशीपोटी मरण्यापेक्षा थोडा धोका स्वीकारून आपल्याला आता कामासाठी घराबाहेर पडावेच लागेल. म्हणूनच लोकल ट्रेन्स लवकर चालू करा असा माझा सरकारकडे आग्रह आहे. आपणास माझे हे म्हणणे पटत नाही का?
-ॲड.बी.एस.मोरे©५.९.२०२०
टीपः
माझा या विषयावरील पूर्वीचा लेख पुन्हा एकदा वाचा. तो खालीलप्रमाणेः
हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!
मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!
या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.
-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०
एक मोठा राजकीय कालखंड संपला!
(१) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (एस.ए.डांगे) व त्यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे हे दोघेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते! ही नावे आजच्या पिढीतील किती लोकांना माहित आहेत? कॉम्रेड एस.ए.डांगे हे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य. त्यांचे संबंध रशियाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत होते. कॉ. एस.ए.डांगे ९१ वर्षे जगले तर त्यांच्या कन्या कॉ. रोझा देशपांडे या ९२ वर्षे जगल्या. म्हणजे दोघांनीही आयुष्याची नव्वदी पार केली.
(२) ही दोन नावे माझ्या विशेष लक्षात राहिली कारण वरळी बी.डी.डी. चाळीत बालपण व तरूणपण जगत असताना मी गिरणगावातील कामगार चळवळीचा साक्षीदार आहे. खरं तर मुंबईतील गिरणी कामगारांची चळवळ म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची चळवळ. त्याकाळी वरळीतील जांबोरी मैदानात मी कॉम्रेड डांगे यांची भाषणे ऐकलीत. नंतर त्यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांनाही जवळून पाहिले आहे.
(३) तो काळच वेगळा होता. काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सलोखा हा भारत व रशिया यांच्या मैत्रीला कारणीभूत होता. याचे कारण म्हणजे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड एस.ए. डांगे यांची मैत्री! १९७६ मध्ये काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली घटना दुरूस्ती केली आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द घातला. यालाही काँग्रेसची कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली जवळीक कारणीभूत होती. अर्थात त्यावेळी काँग्रेसचे राजकारण डावीकडे वळले होते.
(४) कॉम्रेड रोझा देशपांडे, मृणाल गोरे यांच्या एकत्रित चळवळी मी जवळून पाहिल्या आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेने कम्युनिस्ट पक्षाला गिरणगावातून संपवले. कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून झाला आणि गिरणी कामगार चळवळीतून कम्युनिस्ट पक्ष हद्दपार झाला.
(५) काल दिनांक १९.९.२०२० रोजी कॉम्रेड रोझा देशपांडे यांचे दुःखद निधन झाले आणि एक मोठा राजकीय कालखंड संपला. त्यांच्या निधनाने तो सर्व इतिहास पुन्हा डोळ्यासमोरून सरकला. तो इतिहास आजच्या पिढीतील लोकांना कळावा म्हणून हा लेख लिहिला आहे. कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
-ॲड.बी.एस.मोरे©२०.९.२०२०
अध्यात्म हा देवाला निसर्गात बघण्याचा विषय!
(१) कोरोना लॉकडाऊनचा मार्च २०२० पासून सुरू असलेला मोठा काळ हा माझ्या ज्ञानाच्या पुनर्विचाराचा, माझ्या मनात साचलेल्या खोट्या समजूती दूर करण्याचा, माझ्या पुनर्जन्माचा अर्थात मीच मला नव्याने भेटण्याचा, म्हणजेच माझ्या आत्मपरीक्षणाचा, आत्मचिंतनाचा मोठा काळ!
(२) या काळात निसर्ग व देव, विज्ञान व धर्म, भौतिकता व आध्यात्मिकता या गहन विषयांवर सखोल आत्मचिंतन झाले. या आत्मचिंतनातून मला निसर्गातच देव गवसला व विज्ञानातच धर्म कळला. हेही कळले की, मी आतापर्यंतच्या आयुष्यात देवाला मंदिरात व देव प्रतिमांमध्ये बघत होतो व तिथे आध्यात्मिक भावनेने माझ्या हृदयाला झोकून देत होतो. पण प्रत्यक्षात मात्र माझ्या जवळ असलेल्या देवाकडे दुर्लक्ष करीत होतो.
(३) या आत्मचिंतनातून हे कळले की, खरं तर मनुष्य जीवन हे इतर प्राणीमात्रांपासून वेगळ्या असलेल्या उच्च भौतिक कर्मांनीच बहुतांशी व्यापले आहे. या मानवी भौतिक कर्मांना उच्च शब्द चिकटल्याने ही कर्मे केवळ भौतिक न राहता भौतिक-आध्यात्मिक, वैज्ञानिक-धार्मिक अशी संमिश्र नैसर्गिक झाली आहेत. ही भौतिक कर्मे केवळ भौतिक वासनांच्या दबावाखाली व वासनांध घिसाडघाईने पार पाडावयाची नसून ती उच्च आध्यात्मिक दर्जाने पार पाडावयाची आहेत. विवाहसंस्था हा लैंगिकतेत आध्यात्मिक भावविश्वाचा अनुभव घेण्याचा एक उत्तम नमुना आहे.
(४) मनुष्याने त्याच्या जीवनात पार पाडावयाची उच्च दर्जेदार भौतिक कर्मे हा खरं तर निसर्गात असलेल्या देवाचाच आदेश आहे हे मला माझ्या आत्मचिंतनातून कळले. या भौतिक कर्मांनाच आध्यात्मिक दर्जा देऊन त्या कर्मांत मनुष्याने आपले हृदय झोकून दिले पाहिजे. हृदय झोकून देणे म्हणजे मनापासून, आंतरिक समाधानाने भौतिक कर्म पार पाडणे. अर्थात निसर्गाची भौतिक कर्मे आध्यात्मिक दर्जाने लक्षपूर्वक व हृदयापासून पार पाडली पाहिजेत.
(५) या आत्मचिंतनातून मानवी अर्थकारणात व राजकारणात सुद्धा अध्यात्म आहे हे मला छान कळले. उदाहरणार्थ, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी राज्यकारभार हा लोकांचे विश्वस्त म्हणूनच पार पाडला पाहिजे. कारण लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो व या विश्वासात उच्च दर्जाचा आध्यात्मिक भाव असतो.
(६) खरं तर, अध्यात्म हा मिथ्या कल्पनांच्या आभासात, स्वप्नवत जगात जगण्याचा, निव्वळ भावनिक श्रद्धेनेच देवाकडे बघण्याचा, किंवा मानवी बुद्धीने कल्पनेबरोबर मैत्री करून तिच्या भोवती रूंजी घालत तिच्या संगतीत स्वतःची बौद्धिक करमणूक, मनोरंजन करून घेण्याचा वरवरचा विषय नसून तो निसर्गाच्या सत्यात जगण्याचा व निसर्गातच देवाला बघण्याचा खोल विषय आहे. निसर्गाच्या विज्ञानाला देवाचा धर्म करून ते विज्ञान धर्माने जगत श्रेष्ठ मनुष्य जीवनाचे सार्थक करण्याचे मोठे आव्हान या अध्यात्मात आहे. माझे या गहन विषयावरील आत्मचिंतन पूर्ण झाले आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o
टीपः
माझ्या वरील आत्मचिंतनाला समर्पक असे एक अत्यंत सुंदर असे मराठी गीत मला आठवले. या गीताचे बोल आहेत "शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी". हे गीत शब्दबद्ध केलेय गीतकार वंदना विटणकर यांनी व गायलेय महान गायक मोहम्मद रफी यांनी. विशेष म्हणजे या गीताला संगीत दिलेय ते मा. राजसाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी. अर्थात या गीताशी संबंधित तीनही व्यक्ती या महान कलाकार. त्यांच्या नखाजवळही मी बसू शकत नाही. परंतु या कोरोना लॉकडाऊन काळात ईश्वरावर मी जे आत्मचिंतन केलेय व त्याच आत्मचिंतनावर आधारित वर जो काही लेख लिहिला आहे त्याचे व या अर्थपूर्ण गीताचे सूर जवळजवळ जुळत असल्याने मी हे गीत माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या गीतात माझ्या ईश्वरी आत्मचिंतनाचा आत्मा आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©१९.९.२०२०
https://youtu.be/AEmVdkzU03o
फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर हृदय शेअर करता येत नाही!
फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर तुम्ही तुमचे ज्ञान, अनुभव व विचार शेअर करू शकाल पण हृदय नाही. इथे हृदय म्हणजे मनापासून माया, प्रेम ही भावना! ही भावना मेंदूतच असते, पण तिच्या जाणिवेला नीट समजण्यासाठी हृदय हा शब्दप्रयोग केला जातो. हृदय हे तुमच्या खास माणसांसाठी खाजगी असते. मेंदूतील बुद्धी प्रमाणे ते सार्वजनिक होऊ शकत नाही. असे खास लोक तुमचे कुटुंब सदस्य, तुमचे जवळचे नातेवाईक व तुमचे काही थोडेच खास मित्र असू शकतात. अशा जवळच्या लोकांबरोबरचे खाजगी संबंध हे बुद्धीशी निगडीत असलेल्या केवळ शैक्षणिक पांडित्यावर व तसेच आर्थिक, राजकीय व्यवहारावर अवलंबून नसतात. तर ते हृदयातून असतात. म्हणूनच अशा मायाप्रेमाच्या खाजगी संबंधाना हृदयस्पर्शी संबंध म्हणतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर असे फार जवळचे हृदयस्पर्शी संबंध प्रस्थापित होणे मला तरी अशक्य वाटते. म्हणूनच यापुढे फेसबुकवर बौद्धिक विचार लिहायचे तर आपल्यावर माया प्रेम करणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना, खास मित्रांना अधूनमधून फोन करीत रहायचे मी ठरवलेय. या कोरोनामुळे सहा महिने झाले मी घरात बिनकामाचा बसून आहे. त्यामुळे माझे डोके फिरल्यासारखे झाल्याने या गणपतीत मी नेहमीप्रमाणे कोणत्याच नातेवाईकाला फोन केला नाही. पण काल सर्वपित्री अमावास्या झाली आणि मग थोडा भानावर आलो. माणसे सोडून जातात आणि जे मायाप्रेमाचे बोलायचे असते ते राहूनच जाते. म्हणून आहे तोपर्यंत बोलून घ्या. मायाप्रेमाचे जवळचे संबंध कायम ठेवा. हे फेसबुक वगैरे समाजमाध्यम निव्वळ टाईमपास करमणूक व निरर्थक वादविवाद घालत बसण्याचे माध्यम झालेय असे वाटते. पैसे कमावण्याचा सद्या कामधंदा नाही अर्थात आर्थिक लाभाची वकिली बंद आहे म्हणून मी फेसबुकवर ज्ञान व अनुभव फुकट वाटत गेलो. पण या फुकट ज्ञान वाटपातून या फेसबुकवर किंवा एकंदरीतच समाजमाध्यमांवर हृदयस्पर्शी संबंध प्रस्थापित होणे तसे कठीणच आहे हे माझ्या लक्षात आलेय. जवळच्या माणसांना भले माझे बौद्धिक कळणार नाही पण त्यांना मायाप्रेमाची भावना आहे याची मला जाणीव आहे. म्हणून कधी व्हॉटसॲप तर कधी प्रत्यक्ष फोन करून मी यापुढे जवळच्या नातेवाईकांशी व काही थोड्या खास मित्रमंडळींशी बोलत राहण्याचे ठरवले आहे. सर्वपित्री अमावास्येने ही जाणीव जागृत केली म्हणून तिचे व माझ्या पितरांचे आभार मानावे तितके थोडेच!
-ॲड.बी.एस.मोरे©१८.९.२०२०
या पितरांनो या!
(१) आज गुरूवार, दिनांक १७ सप्टेंबर, २०२० हा भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस! आज आहे सर्वपित्री अमावास्या म्हणजे आपल्या पितरांचे सार्वत्रिक श्राद्ध घालण्याचा दिवस! श्राद्ध या शब्दात श्रद्धा हा शब्द आहे व श्रध्देत असते ती शुद्ध भावना! आपले पितर म्हणजे आपले दिवंगत आई-वडील, सासू-सासरे, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा व अन्य नातेवाईक जे मृत पावले आहेत त्या सर्वांचे आदरयुक्त स्मरण व पूजन करण्याचा आज दिवस! पितर म्हणजे पूर्वज!
(२) देवापुढे भक्ती भावाने ठेवलेला प्रसादाचा नैवेद्य देव खात नाही व पितरांपुढे आदर भावाने ठेवलेला श्राद्धाचा नैवेद्य पितर खात नाहीत हे सांगायला आम्हाला कोणत्याही पंडिताची गरज नाही. आम्हाला ते माहीत नाही असे जर या पंडितांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही हे सर्व का करतो हे जरा आम्हाला नावे ठेवणाऱ्या अशा लोकांनी नीट समजून घ्यावे. आपण भारतीय लोक आता जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यामागे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग आहे. त्यांच्या स्मृतिदिनाला त्यांचे स्मरण करून त्यांना आपण आदरांजली वाहतो की नाही? ती जर अंधश्रध्दा नाही तर मग आम्ही आमच्या पितरांना भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात व शेवटी सर्वपित्री अमावास्येला आमच्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जर आदरांजली वाहण्याचे कर्तव्य पार पाडीत असू तर ती अंधश्रद्धा कशी? हे मात्र खरे की जिवंतपणी आईवडिलांना त्रास देऊन ते मृत झाल्यावर त्यांना अशी धार्मिक आदरांजली वाहणे हा शुद्ध दांभिकपणा झाला.
(३) आम्ही आज जे जीवन जगत आहोत, ज्या काही थोड्याफार सुखसोयी उपभोगत आहोत त्यामागे आमच्या पितरांचे कष्ट आहेत, त्याग आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पितरांविषयी कृतज्ञ आहोत. त्याच कृतज्ञतेपोटी आज आम्ही सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आमच्या सर्व पितरांचे स्मरण करून त्यांचे आदराने मनोभावे पूजन करून भावनिक श्रध्देने त्यांना श्राद्धाचा नैवेद्य दाखवत आहोत. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांचे स्मरण व पूजन करणे हे तर वंशजांचे कर्तव्यच आहे असे जर आमचे हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगत असेल तर त्यात चुकीचे काय आहे?
(४) मला माझे आजी-आजोबा आठवत नाहीत तसे माझ्या पत्नीलाही तिचे आजी-आजोबा आठवत नाहीत. त्यांचे फोटोही नाहीत. आम्हा दोघांच्या स्मरणात आमचे आईवडील आहेत, त्यांचा संसार आहे, त्यांनी आम्हाला मोठ्या कष्टाने कसे वाढवले हे सर्व आहे. या आठवणी आम्ही विसरूच शकत नाही. त्या अधूनमधून येतच असतात. पण हिंदू धर्मशास्त्राने पूर्वजांचे स्मरण व पूजन करण्यासाठी वर्षातून ठराविक काळ व त्या काळातला सर्वपित्री अमावास्येचा दिवस ही जी काय वंशजांसाठी सोय करून ठेवली आहे ती चांगलीच आहे.
(५) ही सर्व कारणमीमांसा माझ्या तार्किक मेंदूचे बौद्धिक आहे, पण त्यासोबत माझ्या आईवडिलांबद्दल असलेली माझी कृतज्ञतेची भावनाही आहे. माझ्या पत्नीला मात्र माझ्या बौद्धिक तर्कशास्त्राशी काहीही घेणेदेणे नाही. तिच्याजवळ आहे ती फक्त शुद्ध भावना! म्हणून तिने बाजारातून दाराला लावण्यासाठी आज हार आणला व दारात रांगोळी काढली. याच शुद्ध भावनेने की जणुकाही तिचे आईवडील व माझे आईवडील आज आमच्या घरी येणार आहेत. त्यांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजे. मग तिने तिचे आईवडील व माझे आईवडील या चौघांसाठी एकच श्राद्धाचा नैवेद्य बनवला. त्यामागे पुन्हा एकत्र कुटुंबाची भावना! आम्ही तो नैवेद्य आमच्या सदनिकेच्या गॕलरीत त्यांचे स्मरण करीत आदर भावाने ठेवला. उदबत्ती लावून त्या नैवेद्याचे पूजन केले. ते करताना असे वाटत होते की जणूकाही आम्ही आमच्या घरी आलेल्या आमच्या आईवडिलांना घास भरवत आहोत. ही भावना फार महत्त्वाची आहे. याच आदर भावनेला हिंदू धर्मशास्त्राने धार्मिक अधिष्ठान दिले आहे. एवढी साधी गोष्ट काही लोकांना कळत नाही याचे आश्चर्य वाटते.
(६) आज आमच्या आईवडिलांच्या आठवणींने आमचे मन हेलावून गेले व मग माझ्या तोंडून पुष्पांजली या जुन्या हिंदी चित्रपटातील मुकेश या महान गायकाने गायलेले, आनंद बक्षी या मोठ्या गीतकाराने शब्दबद्ध केलेले, लक्ष्मीकांत प्यारेलाल या मोठ्या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेले हे दर्दभरे गीत आपोआप बाहेर पडले "दुनिया से जानेवाले, जाने चले जाते है कहाँ"!
-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२०
https://youtu.be/OstZ_yFGa1I
तन, मन, धनाचा फॉर्म्युला वापरा व मैत्री जुळवा आणि टिकवा!
माणसांचे संबंध का दुरावतात या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मानवी संबंध का जुळतात व टिकतात या प्रश्नाकडे वळले पाहिजे. अधिक खोलात जाऊन विचार केला तर बहुतांशी संबंध हे उपयुक्ततेवर अवलंबून असल्याचे दिसून येते. आता या संबंधाचा काय फायदा म्हणजे काय उपयोग असा सोयीचा विचार बहुतेक माणसे करतात की नाही हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे. एखाद्या आकर्षणातून एकत्र आलेली माणसे फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे आकर्षण हे नव्याचे नऊ दिवस अशा तात्कालिक स्वरूपाचे असते. मग मानवी संबंध कसे जुळतात व ते कसे टिकतात हा विषय महत्त्वाचा ठरतो. मानवी संबंध जुळणे व टिकणे ही एक प्रक्रिया आहे व त्या प्रक्रियेला एक मूलभूत पाया, आधार आहे. हा पाया तीन मूलभूत तत्वांनी बनला आहे. तन-मन-धन हीच ती मूलभूत तत्वे! तन (शरीर) अर्थात शारीरिक उपयुक्तता. उदा. शारीरिक श्रम. मन म्हणजे भावना व बुद्धी यांचे मिश्रण. पण या मिश्रणात उपयुक्ततेच्या दृष्टीने भावनेपेक्षा बुद्धी वरचढ ठरते. मानवी बुद्धीची उपयुक्तता म्हणजे ज्ञान व बौद्धिक हुशारीची उपयुक्तता. धन म्हणजे पैसा! पैशाने बऱ्याच गोष्टी बाजारातून विकत घेता येतात ज्या गोष्टी मानवी जीवनाला आवश्यक असतात. म्हणून मानवी जीवनात पैशाचे फार महत्व आहे. पण पैशाने मानवी संबंध जुळतात तसे ते बिघडतातही. याचे मुख्य कारण म्हणजे पैशाची योग्य व्यावहारिक देवाणघेवाण न होणे. शारीरिक श्रम विकणारे मजूर व बौद्धिक श्रम विकणारे व्यावसायिक अशी तन व मनाची सामाजिक विभागणी करता येईल. या दोन्ही श्रमांना जोडणारा दुवा म्हणजे पैसा अर्थात धन! या तिन्ही गोष्टी जेंव्हा एकत्र येऊन त्यांची व्यावहारिक देवाणघेवाण कायम स्थिर राहते तेंव्हा मानवी संबंध जुळतात व टिकतातही. पण मन म्हणजे केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील यासारख्या व्यावसायिकांचे विशेष ज्ञान व बौद्धिक कौशल्य किंवा हुशारी नव्हे. मानवी संबंधात व्यावहारिक ज्ञान व अक्कलहुशारी ज्याला इंग्रजीत कॉमन सेन्स म्हणतात हाही बुद्धीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. एखाद्या व्यक्तीकडे बुद्धीचा हा मूलभूत भागच नसेल तर मग अशा व्यक्ती बरोबर संबंध जुळणेच कठीण असते, मग ते टिकण्याची तर बातच नाही. हे सत्य आहे की फक्त हवापाण्याच्या मनोरंजक गप्पा मारण्यासाठी एकत्र आलेली मंडळी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. नीट बारकाईने बघितले तर समाज माध्यमांवर अशा मंडळींचा राबता असल्याचे दिसून येते. पण हे संबंध फार तकलादू असतात. म्हणून माझ्या मते फेसबुक मैत्री हा कायम टिकणारा प्रकार नव्हे! तन, मन व धन या तीन गोष्टींना वैवाहिक संसारात सुद्धा खूप महत्त्व आहे. गृहिणी असलेली पत्नी घरात संसारासाठी शारीरिक कष्ट उपसतेय व पती मात्र घराबाहेर जाऊन घरखर्च चालवण्यासाठी पैशाची थोडीही कमाई करीत नाही असा संसार किती दिवस टिकेल? या ठिकाणी मनातील प्रेम भावनेचा (ज्याला सोयीसाठी हृदय असा शब्द वापरलाय) प्रश्न निर्माण होतो. ज्या संबंधात तन (शरीर), मन (बुद्धी) व धन (पैसा) यांची योग्य व्यावहारिक देवाणघेवाण सुरळीतपणे व तसेच सातत्याने चालू आहे तिथेच हृदयस्पर्शी प्रेम व त्या प्रेमावर आधारित हृदयस्पर्शी मैत्री निर्माण होऊ शकते व अशी मैत्री कायम टिकूही शकते. अशी मैत्री मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी तन, मन व धनाचा फॉर्म्युला वापरा!
-ॲड.बी.एस.मोरे©१७.९.२०२०