https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

लोकल ट्रेन्स चालू करो!

हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

मी वकील असलो तरी मीही बौद्धिक कष्ट करतो. व्यावसायिक आहे म्हणून मी कष्टकरी नाही असे कृपया समजू नका व मला कष्टातून वगळू नका. कामगारापेक्षा दयनीय अवस्था झालीय माझी. गेले पाच ते सहा महिने झाले एक पैशाची कमाई नाही वकिलीतून. घरीच बसलोय आतून लॉक लावून कारण बाहेर लॉकडाऊन आहे. मला मुंबईला जायचे आहे कमाई करायला. कृपया लोकल ट्रेन्स चालू करा. सर्वांनी असा जोर लावा की सरकारला उपाशी पोटाची जाणीव झाली पाहिजे. मी लोकल ट्रेन मधून तोंडाला स्वच्छ मास्क लावून व खिशात सॕनिटायझरची छोटीशी बाटली ठेऊन व शारीरिक अंतर राखून प्रवास करीन. पापी पेट का सवाल है. हमारी मांगे पुरी करो, लोकल ट्रेन्स चालू करो!

या पोस्टचा अर्थ एवढाच की नियमांत बसवून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करा. गर्दीचे नियोजन व सोशल डिस्टसिंग, मास्क, रेल्वे स्टेशन्सवर सॕनिटायझर सोय या सर्व गोष्टी नियमांत बसवायला हव्यात व मग लोकल सुरू करायला हवी. पण याला आणखी किती वेळ लावणार? सरकार काय कोर्टाशिवाय जागे होत नाही काय? आपण आवाज नाही निदान चुळबूळ तरी करायला हवी की नको. ऊठसूठ रिट रिट! त्या न्यायालयीन आदेशांना अर्थच उरणार नाही पुढे अशाने. आपण कोरोनावर लस येईपर्यंत  दोन चार वर्षे घरीच घाबरून बसू शकत नाही. आताही धोका स्वीकारून कामाला जाणारी माणसे आहेतच ना. काय करतील बिच्चारी! घरी उपाशी मरण्यापेक्षा काळजी घेऊन कामाला गेलेले बरे हाच विचार करून ती बाहेर पडलीत. काय  करायचेय त्या बसेसना घेऊन? बदलापूर, कल्याण, डोंबिवलीचे चाकरमानी दीड तासाचा मुंबई लोकल प्रवास काय बसने एवढया लांबून करणार? लाखो लोकांना घेऊन जाणारी लोकल. किती बसेस आहेत सरकार कडे लाखो लोकांना ६० ते ७० कि.मी. लांब अंतरावरून मुंबईला घेऊन जायला? लोकलला पर्याय नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

मिडिया ट्रायल व कायदा!

मिडिया ट्रायल व कायदा!

मी तुम्हाला घडलेली एक सत्यकथा सांगतोय. एका केसची ही सत्य गोष्ट आहे व ती प्रत्यक्षात घडली आहे. नवीनच लग्न झालेले! नवरा एका कॉलेजमध्ये प्राध्यापक तर बायको बारावी पर्यंत शिकलेली एक गृहिणी! नातेवाईकांनी ठरवून केलेले हे लग्न! पण शिक्षण व वैचारिक तफावत होती दोघांत! क्षुल्लक कारणांवरून दोघांत भांडणे व्हायची व त्याचा आवाज बाहेर जायचा. बायको तापट स्वभावाची अपरिपक्व स्त्री होती. प्राध्यापक नवऱ्याला खूप त्रास होत होता. पण आज सुधारेल, उद्या सुधारेल म्हणून तो शांत राहिला. आपल्या मुलीचा स्वभाव कसा आहे हे तिच्या आईवडिलांना चांगले ठाऊक होते. पण लग्न जमवताना तिच्या स्वभावाचा अंदाज येणे हे केवळ अशक्य होते. हळूहळू आपण फसलो आहोत हे प्राध्यापक नवऱ्याच्या लक्षात येऊ लागले. त्याने आपल्या व तिच्या नातेवाईकांना तिच्या स्वभावाची कल्पना दिली. पण सर्वांनी नवीन संसार आहे. भांड्याला भांडे लागणारच असे म्हणून त्या नवऱ्याला शांत केले. एके दिवशी कॉलेजला जाताना बायकोने वांग्याची भाजी जेवणात दिली. ती एकदम बेचव झाली म्हणून नवरा तिच्यावर भडकला. मग साध्या वांग्याच्या भाजीवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. ते भांडण शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही ऐकले. मग प्राध्यापक नवरा तणतणत कॉलेजला निघून गेला आणि इकडे त्याच्या बायकोने डोक्यात राग घेऊन घरात गळफास लावून आत्महत्या केली. नवरा कॉलेजवरून घरी आल्यावर बायको आतून दाराची कडी उघडेना म्हणून त्याने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी दरवाजा बाहेरून ढकलून ढकलून तोडला व मग सर्वांनी घरात बायकोचे फासावर लटकलेले शरीर पाहिले. प्राध्यापक नवरा तर डोक्यावर हात मारून सुन्न होऊन रडत बसला. कोणीतरी पोलीसांना कळवले. पोलीसांनी मृतदेह खाली उतरवून त्याचा पंचनामा केला व ॲम्ब्युलन्स बोलवून शव विच्छेदनासाठी तो मृतदेह जवळच्याच सरकारी रूग्णालयात पाठवला. चौकशीसाठी प्राध्यापक नवऱ्यास पोलीस स्टेशनला नेण्यात आले. पोलीसांनी सुरूवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद करून चौकशीला सुरूवात केली. तोपर्यंत ही बातमी मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली.  मुलीकडचे सर्व नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये येऊन "हा नवराच आमच्या मुलीला सारखा हुंड्यासाठी छळत होता, याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करा" असे म्हणून रडू लागले. काही नातेवाईक "आता मुलगी तर गेलीय, पण याला सोडायचा नाही" असे म्हणू लागले. मग पोलीसांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांचे जबाब घेतले. तर सगळ्यांनी "यांची सारखी भांडणे होत होती" अशी साक्ष दिली. मग गळ्याला फास लागल्याने मृत्यू असा शव विच्छेदनाचा अहवाल आला. पोलीसांनी प्राध्यापक नवऱ्याचे म्हणणे ग्राह्य न धरता भांडणे होत होती या प्राथमिक अंदाजावर संशयावरून नवऱ्यावर "आत्महत्येस प्रवृत्त करणे" हा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नवरा प्राध्यापक असल्याने मिडियाने आकाश पाताळ एक केले. पुढे ती केस कोर्टात चालली. शेवटी कोर्टाकडून तो नवरा निर्दोष सुटला. कारण त्यांच्यात भांडणे होत होती याशिवाय नवऱ्याविरूद्ध कोणताच पुरावा नव्हता. पण केसचा निकाल लागेपर्यंत त्या प्राध्यापक नवऱ्याची कॉलेजची चांगली नोकरी गेली होती व समाजात खूप बदनामी झाली होती. तो प्राध्यापक आता कसाबसा सावरला आहे. दुसरीकडे नोकरीला लागला आहे. फक्त वांग्याची भाजी एवढा मोठा अनर्थ घडवू शकते. अशा केसेस होत असतात. काही केसेस मध्ये आरोपी गुन्हेगार असतातही. पण काही केसेस मध्ये ते निष्पापही असतात. पण कोर्टाकडून हे सर्व ठरेपर्यंत माध्यमे जेंव्हा संवेदनशील केसेस मध्ये स्वतःच न्यायालये बनून आरोपी गुन्हेगारच आहे असे समाजापुढे ठसवण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्यांच्यावर कोर्टाने बंधन आणले पाहिजे. राज्य पोलीस असो किंवा सी.बी.आय. असो, या यंत्रणांनी आरोपपत्र तयार होऊन ते रितसर फौजदारी कोर्टात दाखल होईपर्यंत त्यांची चौकशी पूर्णपणे गुप्त ठेवली पाहिजे. चार्जशीट दाखल होईपर्यंत मिडियाला त्यांच्या समांतर चौकशी नुसार व तर्कानुसार समाजाला काय सांगायचे ते सांगू द्यावे पण काही झाले तरी पोलीस चौकशी ही गुप्तच राहिली पाहिजे. फौजदारी खटला हा कोर्टात खुला चालतो. त्या खटल्याचे रिपोर्टिंग मिडियाने करणे वेगळे व खटला रितसर उभा रहायच्या अगोदर मिडिया ट्रायल घेणे यात फरक आहे. वर उल्लेखित एका खऱ्या केसचे उदाहरण देऊन एक वकील या नात्याने मी एवढेच म्हणेल की, मिडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे हे मान्य केले तरी कायद्याच्या प्रक्रियेवर या मिडियाचा प्रभाव पडेल अशा कोणत्याही कृत्यापासून मिडियाला रोखलेच पाहिजे!

-ॲड.बी.एस.मोरे©३.९.२०२०

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

मराठी मुस्लिम अस्मिता अभियान!

मराठी मुस्लिम अस्मिता अभियान!

मला मराठी मुस्लिम अस्मिता अभियान ही संकल्पना खूप आवडली. महाराष्ट्राची मराठी माती, मराठी संस्कृती व मराठी भाषा यांच्याशी समरस झालेल्या माझ्या असंख्य मुस्लिम बंधू व भगिनींनो तुम्ही जर जाहीरपणे मराठी मनाला हात घालणारे हे अभियान चालवत असाल तर मला याचा खूप आनंद होतोय. मी हिंदू धर्मीय असलो तरी इतर कोणत्याही धर्माचा तेवढाच आदर करतो जेवढा मी माझ्या हिंदू धर्माचा करतो. निसर्गातील देवाला समजून घेण्याच्या आपल्या धार्मिक संकल्पना व त्या देवाची आराधना करण्याच्या आपल्या धार्मिक पद्धती आपआपल्या धर्मानुसार वेगळ्या असतीलही पण प्रादेशिक संस्कृती हे सर्व धर्मांना एकत्र करणारे एक अजब असे भावनिक रसायन आहे. म्हणूनच भारतीय हिंदू, भारतीय मुस्लिम, भारतीय ख्रिश्चन व भारतीय संस्कृतीशी समरस  झालेले असे अनेक विविध धर्मीय भारतीय हे त्यांच्या धार्मिक विविधतेसह एक आहेत. काही विघ्नसंतोषी लोक या एकतेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे काही लोक हे भारतीय म्हणून आपल्या सर्वांचे शत्रू आहेत. आपल्या भारतात विविध प्रांताची राज्ये बनली आहेत. त्या राज्यांची सुद्धा एक विशेष अशी प्रादेशिक संस्कृती, प्रादेशिक भाषा व प्रादेशिक अस्मिता आहे. जशी महाराष्ट्राची मराठी संस्कृती, मराठी भाषा व मराठी अस्मिता!  महाराष्ट्रात राहणाऱ्या भारतीय मुस्लिम बंधू व भगिनींनो, आपण महाराष्ट्राच्या मराठी संस्कृती, मराठी भाषा व मराठी अस्मितेविषयी इतके भावूक व जागृत आहात हे या मराठी मुस्लिम अस्मिता अभियानातून कळले व खूप आनंद झाला. मी आपणास आवर्जून सांगतो की, पंढरपूर शहरात माझे बालपण हनीफ शेख यांच्या वाड्यात गेले आहे. त्या वाड्यात हनीफ शेख या घरमालकाचे भाडेकरू म्हणून राहताना त्यांच्या कुटुंबाशी आम्ही एकरूप झालो होतो. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा सलीम शेख हा माझा जिवलग मित्र होता, तर त्यांची थोरली मुलगी साराप्पा ही मला माझ्या थोरल्या बहिणी सारखी होती. साराप्पा ही मला "ये काळ्या" म्हणूनच हाक मारायची. पण त्यात खूप माया, आपुलकी होती. मी सलीम बरोबर पंढरपूर पालथे घालायचो. हनीफ शेख यांच्या घरात मी जेवायचो, चहा घ्यायचो. सलीमही माझ्या घरी जेवायचा. गणपती, दसरा व दिवाळी या सणात आम्ही केलेले गोडधोड पदार्थ हनीफ शेख यांच्या घरी जात तर इद वगैरे मुस्लिम सणातील शिरकुंबा सारखे पदार्थ शेख यांच्या घरातून आमच्या घरी येत. आमचे धर्म वेगळे होते पण आम्हाला त्या वेगळेपणाची कधीच जाणीव झाली नाही. उलट आमच्या धार्मिक विविधतेचा आम्ही आनंद घ्यायचो. या प्रत्यक्ष अनुभवाचा एकच सार की, मित्रांनो जरी आपले धर्म वेगळे असले तरी माणूस म्हणून आपण एक आहोत. म्हणूनच मराठी मुस्लिम अस्मिता अभियानाचे मी आनंदाने अभिनंदन व स्वागत करतो. आज एका मुस्लिम बांधवाची मला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याच्या फेसबुक प्रोफाईल वर या अनोख्या अभियानाची अक्षरे मला दिसली व इतर पोस्टसही चांगल्या दिसल्या म्हणून मी लगेच ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि तीही आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी!

-ॲड.बी.एस.मोरे©१.९.२०२०

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

अनंत चतुर्दशी!

अनंत चतुर्दशी, आज गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देताना!

आज मंगळवार दिनांक १ सप्टेंबर, २०२० हा अनंत चतुर्दशीचा दिवस! कोरोनाची जागतिक साथ नसती तर लालबागच्या राजासह मुंबई, पुणे व इतर शहरांतील मोठे गणपती आज वाजत गाजत विसर्जनासाठी निघाले असते. रस्ते गणेश भक्तांनी ओसंडून वाहिले असते. मुंबईतील मोठ्या गणपतींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होते. केवढा मोठा जनसागर लोटतो तिथे! मी माझ्या शालेय व कॉलेज जीवनात बाप्पाची मोठी विसर्जन मिरवणूक लॕमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या गेटवर बसून बघायचो. कारण त्या पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या पोलीस चाळीत आमच्या ओळखीचे पोलीस मित्र राहात होते. त्यामुळे तिथे त्यांच्या घरातील कुटुंब सदस्यांबरोबर त्या गेटवर बसून हळूहळू पुढे सरकणारे मोठे गणपती बघायचो. समोरच असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक जाडजूड मुलगा एकेक गणपती तिथे येऊन थांबला की मग मस्त नृत्य करायचा. त्याच्या नृत्याकडे बघत गणेशोत्सव मंडळाची माणसेही नाचायची. आता तो मुलगा माझ्या सारखाच  वृद्ध झालाय. दोन वर्षापूर्वी गणपती विसर्जन मिरवणूकीत तिकडे गेलो होतो तेंव्हा तो वृद्ध झालेला मुलगा आजारी असून अंथरूणावर खिळला असल्याचे कळले. त्यामुळे त्याची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही. पण मी त्यावेळी वयाची लाज न बाळगता लहान होऊन विसर्जन मिरवणूकीत नाचलो होतो. कोणी काही का म्हणेना पण गणपती बाप्पा जाताना मनाला वाईट वाटते हे मात्र नक्की! यामागे खूप मोठी आध्यात्मिक भावना आहे. दरवर्षी माणसे जन्म घेतात व मरतात. मरतात म्हणजे ती अनंतात विलीन होतात. ब्रम्हांड म्हणा नाहीतर अंतराळ म्हणा ते अनंत आहे. मेल्यावर त्या अनंतात विलीन व्हायचे. अनंत चतुर्दशी मधला अनंत शब्द हा त्या अनंताचेच प्रतीक असावा. गणेश मूर्तीचे विसर्जन म्हणजे या जगात जे जे नित्य नियमाने निर्माण होते त्याचा हळूहळू ऱ्हास होत नित्य नियमाने ते अनंतात विलीन होते असा अर्थ घेता येईल. त्याच निसर्ग नियमाने गणपती बाप्पा येतो, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याबरोबर राहतो व शेवटी आपला निरोप घेऊन अनंत चतुर्दशी दिवशी अनंतात विलीन होतो तो कायमचा नाही तर पुन्हा पुढील वर्षी परत येण्यासाठी! निसर्गाचे प्रतिनिधित्व करणारी किती छान आध्यात्मिक कल्पना व श्रद्धा! यातला अर्थ ज्यांना कळत नाही त्यांनी या श्रद्धेला अंधश्रध्दा म्हटले तरी त्याची लाखो गणेश भक्तांना पर्वा नसते. ही आध्यात्मिक देव श्रद्धा पिढ्यानपिढ्या अशीच चालू राहणार यात शंकाच नाही. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील गावी छोटे गणपती सुद्धा अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जित होतात. आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला माझी एवढीच प्रार्थना आहे की बाबा रे, तू जाताना तुझ्याबरोबर त्या विषारी कोरोनाला घेऊन जा व त्याला अनंतातच गाडून टाक म्हणजे मग आम्हाला मोकळा श्वास घेता येईल. मग पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीला तुझे मस्त स्वागत करू. तुझ्या पुढे नाचू, गाऊ! हे २०२० वर्ष या कोरोना विषाणूने पार विषारी करून टाकले रे! तू विघ्नहर्ता आहेस! तूच या विषाणूचा नाश करशील अशी आमची श्रद्धा आहे. तुला निरोप देताना वाईट वाटतेय. पण पुढच्या वर्षी मात्र तुझा उत्सव जंगी होणार हे नक्की!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

-ॲड.बी.एस.मोरे©१.९.२०२०

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

साथी!

साथी चित्रपटाने करून दिली प्रेम धर्माची जाणीव!

(१) कालच्या मध्यरात्री (३० अॉगष्टची रात्र व ३१ अॉगष्टची पहाट, २०२०) राजेंद्रकुमार व वैजयंती माला यांचा १९६८ सालचा जुना चित्रपट टी.व्ही. वर पाहिला. मनाला खूपच भावला हा चित्रपट! गाणी तर सुंदर आहेतच, पण कथानक सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे. या चित्रपटाचा शेवट सिमी गरेवाल हिने वैजयंती मालास म्हटलेल्या एका वाक्याने होतो. त्या अर्थपूर्ण वाक्यातूनच हा लेख बनला. "लो शांती, संभाल लो अपना पती, संभाल लो अपना धर्म" हेच ते वाक्य!

(२) प्रेमाला धर्म चिकटलेला असतो हेच या वाक्यातून कळते. तुम्ही जेंव्हा एखादी व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी वर मनापासून खरे प्रेम करता तेंव्हा त्या व्यक्ती, भाषा, राष्ट्र इत्यादी विषयी प्रेमाचा धर्म निर्माण होतो. याच प्रेम धर्माला तुम्ही प्रेम कायदा असेही म्हणू शकाल. या प्रेम धर्मात तुम्ही ज्या व्यक्तीवर, भाषेवर किंवा राष्ट्रावर प्रेम करता त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राकडून तुम्हाला जसे काही प्रेमाचे हक्क प्राप्त होतात तशी तुमची त्या व्यक्ती, भाषा किंवा राष्ट्राविषयी काही प्रेम कर्तव्येही निर्माण होतात ज्या कर्तव्यांत तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग असतो. उलट अशा प्रेम धर्मात हक्क कमी व त्यागाची कर्तव्येच जास्त असतात. थोडक्यात प्रेमात हक्क कमी व कर्तव्ये, त्याग, जबाबदाऱ्या जास्त असतात.

(३) तुम्ही जेंव्हा विवाह करता तेंव्हा तुम्हाला तुमच्या जीवनसाथी कडून काही हक्क प्राप्त होतात. पण या हक्कांबरोबरच त्या जीवनसाथी विषयी तुमची काही कर्तव्येही निर्माण होतात. अशा कर्तव्यांत तुम्हाला तुमच्या स्वार्थाचा काही अंशी त्याग करून जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. जीवनसाथी कडून मिळणाऱ्या नुसत्या सुखातच नाही तर तिच्या दुःखातही सहभागी होण्यालाच विवाह धर्म म्हणतात व हा विवाह धर्म हाच प्रेम धर्म असतो. काल साथी चित्रपट पाहताना या विवाह धर्माची, प्रेम धर्माची, प्रेम कायद्याची नैसर्गिक जाणीव झाली.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.८.२०२०

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

मोहरम (ताजिया)

मोहरम (ताजिया)!

आज रविवार दिनांक ३० अॉगष्ट २०२० मोहरम (ताजिया) निमित्त मुस्लिम बंधू भगिनींना इमाम हुसेन यांचा मानवतावादी शांती संदेश! मी बालपणात पंढरपूरला असताना आजच्या दिवशी मुस्लिम मित्रांबरोबर ताजिया बनवायचो व ताजिया (डोले) जुलूस मध्ये सामील व्हायचो. सलीम शेख हा माझा शाळेतला मुस्लिम मित्र होता. त्याच्या बरोबर मी सांगोला रोडवरील संतपेठ (पंढरपूर) येथील मशिदीत ताजिया बनवायला मदत करायचो. आम्ही दोघे पंढरपूर मधील सगळे ताजिये (डोले) चंद्रभागा नदीत विसर्जित होईपर्यंत नदीकाठी थांबायचो. खूप छान वाटत असे. ताजिया बनवणे हे खूप सुंदर कलाकृतीचे काम असते. पंढरपूरात हिंदू व मुस्लिम एकमेकांच्या सण व उत्सवात सहभागी होतात. दोन्ही समाजात तिथे खूप भाईचारा आहे. आज ती आठवण आली.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर!

निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर/देव!

(१) निसर्ग कशाला म्हणायचे? निसर्गाची संपूर्ण व्याख्या काय? पृथ्वीवरील सजीव निर्जीव सृष्टी व ग्रह, ताऱ्यांसह असलेल्या विश्वाच्या संपूर्ण  पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे का? विश्वाच्या पर्यावरणाचे मानवी मेंदूला आकलन होण्याच्या आतच माणूस मरतो. कारण मानवी आयुष्य खूप लहान आहे. नुसते लहानच नव्हे तर ते क्षणभंगुरही आहे. काही माणसांच्या वाट्याला ७० ते ८० वर्षांचे परिपक्व आयुष्यही येत नाही. आयुष्याचे पान ७० ते ८० वर्षांत पिकायच्या आतच काही माणसे विविध आजारांनी, खून किंवा आत्महत्येने किंवा अपघाताने मरतात. पण जी माणसे ७० ते ८० वयापर्यंत जगतात (अपवादात्मक बाब म्हणून काही थोडी माणसे आयुष्याची शंभरी सुद्धा गाठतात) त्यांना साधे पृथ्वीवरील पर्यावरण नीट लक्षात येत नाही मग त्यांना विश्वाचे पर्यावरण काय कळणार? याचा अर्थ हाच की पृथ्वीवर जन्मलेला कोणताही माणूस हा पूर्ण ज्ञानी होऊन मरत नाही. 

(२) जर विश्वाच्या संपूर्ण पर्यावरणाला निसर्ग म्हणायचे तर मग या निसर्गाचे ज्ञान हे अगाध आहे. नुसते पृथ्वीवरील सजीव, निर्जीव सृष्टीचे पर्यावरणच समजणे कठीण आहे मग विश्वाच्या पर्यावरणाची तर गोष्टच वेगळी! म्हणजे निसर्ग हा मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर आहे. पण हा निसर्ग असा कसा तयार झाला? त्याच्या मागे ईश्वर/देव म्हणून कोणती तरी अद्भुत शक्ती आहे का या प्रश्नावर माणसाचा मेंदू ठाम होऊ शकत नाही. मग नास्तिक देव नाही म्हणोत की आस्तिक देव आहे म्हणोत. पण माणसांना जसे आईबाप असतात तसा निसर्गात ईश्वर/देव आहे असे मानून चालले तर मग हा ईश्वर/देव आपल्या पृथ्वीवरच किती विविध रूपात व गुणांत अवतीर्ण झालाय याची गोळाबेरीज केली तरी डोके गरगर फिरायला लागते.

(३) पृथ्वीला लाभलेला सूर्य हा तारा तर चंद्र हा उपग्रह, पृथ्वीवरील हवा, पाणी, जमीन व त्यात असलेले विविध निर्जीव पदार्थ, या सर्वांवर जगणाऱ्या पृथ्वीवरील विविध वनस्पती, विविध पक्षी, प्राणी व माणसे! केवढी ही विविधता या पृथ्वीवर! या विविधतेतच राहणारा निसर्गातील ईश्वर/देव! या सर्व विविध गोष्टी या जणू त्या ईश्वराचेच विविध अवतार ही सुद्धा एक वेगळी कल्पना! म्हणजे देव सूर्य, चंद्रात आहे, देव हवा, पाणी, जमीन यात आहे, देव झाडांत आहे, देव फुलाफळांत आहे, देव पक्षांत आहे, देव प्राण्यांत आहे व देव माणसांतही आहे. मग अशी जर कल्पना करून चालायचे तर मग कशा कशाच्या व कोणा कोणाच्या म्हणून पाया पडायचे?

(४) पृथ्वीवर असलेल्या पर्यावरणात निर्जीव व सजीव पदार्थांची परिवर्तनशील चक्रे आहेत. उदाहरणार्थ, मानवी जीवनाचे जन्म, जीवन व मृत्यू हे चक्र! पृथ्वीवरील निसर्गाच्या विविधतेत माणसांची विविधता समाविष्ट आहे. सर्व माणसांसाठी माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीने बनविलेला कायदा जरी समान असला तरी माणसे पूर्णपणे समान नाहीत. त्यांच्यात कला व गुणांची, बौद्धिक सामर्थ्याची विविधता आहे. अशी ही विविध प्रकारची माणसे या पृथ्वीवर जन्मतात, जीवन जगतात, जगताना सृष्टीतील व त्यांच्याकडील विविधतेची खास देवाणघेवाण करतात व शेवटी मरतात. हे जीवन चक्र असेच पिढ्यानपिढ्या चालू आहे.

(५) मानवी मन फार वेगळे आहे. जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या मनाने स्वतःच्या मनावर ताबा मिळवायचा असतो. हे आव्हान पेलताना मनातील सदसद्विवेकबुद्धी मनुष्याच्या मदतीला धावून येते. पण मानवी सदसद्विवेकबुद्धी सगळ्या माणसांत सारखी असत नाही. याला ज्ञान व बौद्धिक सामर्थ्यात असलेला फरक या कारणांबरोबर पृथ्वीवरील प्रादेशिक विविधतेतील विषमता वगैरे सारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामुळे सर्व माणसांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सामूहिक कायदा असणे आवश्यक ठरते. हा सामूहिक कायदा समाजाच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धी मधून निर्माण होतो. पण कायद्याची ही प्रक्रिया खूप कठीण आहे. 

(६) आता प्रश्न निर्माण होतो की जर निसर्गाच्या विविधतेत विविध रूप, गुणांत ईश्वर वावरतोय तर मग तो मानव समाजाच्या सदसद्विवेकबुद्धी मधून तयार झालेल्या कायद्यातही असलाच पाहिजे. पण या कायद्याचे ज्ञान व समज किती जणांना असते? मग वकील व न्यायाधीशांना कायदा जास्त समजतो म्हणून त्यांनाच देव मानायचे का? असे अनेक प्रश्न निसर्गातील देव निर्माण करतो.

(७) महत्त्वाची गोष्ट हीही आहे की, प्रादेशिक विविधतेत प्रादेशिक विषमताही आहे. त्यामुळे निरनिराळ्या राष्ट्रांची प्रादेशिक संस्कृती सारखी नाही. या संस्कृतीत धर्म संस्कृती, देव संस्कृती, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती इत्यादी गोष्टी येतात. या सगळीकडे सारख्या नाहीत. आपण भारतीय भारतात जन्मलो, इथेच वाढलो म्हणून  आपल्या मनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. पण समजा आपण इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, जपान, चीन या ठिकाणी जन्म घेऊन तिथेच वाढलो असतो तर आपले धर्म कोणते असते व आपले देव कोणते असते? आपण काय खाल्ले असते? चीनमध्ये जन्मलो असतो व तिथेच वाढलो असतो तर आपणही तिथल्या खाद्य संस्कृती प्रमाणे साप, पाली, उंदरे, झुरळे, कुत्री यासारखे प्राणी बिनधास्त खाल्ले असते का? हे प्रश्न आपल्या बुद्धीला पडले पाहिजेत. तरच आपल्याला निसर्ग, देव या संकल्पना नीट समजतील. एवढे मात्र खरे की निसर्गातील विविधतेमुळे (निसर्ग विविधा) निसर्गातील ईश्वर/देव मात्र अनाकलनीय झाला आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०

टीपः 

माझे ज्ञान व माझा अनुभव यांच्याशी माझ्या मनातील सदसद्विवेकबुद्धीचा सतत चाललेला सुसंवाद म्हणजेच माझे सातत्यपूर्ण विचार! हा लेख या विचारांतूनच तयार झाला आहे. तो माझ्या वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीवर आधारित असल्याने तो सर्वांनाच पटेल असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की, त्यांना या लेखातील काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांचे योग्य ते परीक्षण करून योग्य कारणमीमांसेसह टीका करावी पण कुचेष्टेने हास्य किंवा रागाच्या तयार इमोजी वगैरे टाकून माझ्या लेखाची चेष्टा करू नये किंवा वाद घालू नयेत.

-ॲड.बी.एस.मोरे©३०.८.२०२०