https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०
मोहरम (ताजिया)
निसर्ग विविधा व अनाकलनीय ईश्वर!
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
सगळेच ज्ञान व्यवहारात उपयोगी येत नाही!
सगळेच ज्ञान व्यावहारिक होत नाही!
आपला मोठा मेंदू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खूप काही ज्ञान साचवत जातो. या ज्ञानात माणसेही असतात. पण सगळ्याच ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येत नाही. व्यवहार म्हटले की पैसा आला. पैसा नसेल तिथे कसला व्यवहार? पण काही व्यवहार हे पैशाशिवाय असू शकतात. अशा व्यवहारात पैशाची नसली तरी प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होत असते. पण शेवटी असे संबंध भौतिक संपत्तीशी निगडीत असल्याने ते व्यावहारिकच असतात. पण आपण मिळविलेले सगळेच ज्ञान व्यावहारिक होऊ शकत नाही. माझी मूलभूत पदवी कॉमर्सची. पण सुरूवातीला अकाऊंटस क्लार्क म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी कंपनी सेक्रेटरी कोर्सचे इंटर पर्यंतचे शिक्षण घेतले. काही महिनेच कंपनी सेक्रेटरी सहाय्यक म्हणून काम केले व नंतर ते बंद झाले. त्या ज्ञानाचा आता व्यावहारिक उपयोग शून्य झाला आहे. नंतर मी एलएल. बी. करून वकिली सुरू केली. मूलभूत बी.कॉम. पदवी नंतरच्या तीन वर्षाच्या कायद्याच्या मोठ्या अभ्यासक्रमात अनेक कायद्यांचा अभ्यास केला पण वकिली सगळ्या कायद्यांत करता आली नाही. आता तर फक्त मालमत्ता कायद्यातच वकिली करतोय व तीही पार्ट टाईम. म्हणजे कायद्याच्या एकूण ज्ञानापैकी फक्त पाच ते दहा टक्के ज्ञानाचाच पैसे कमावण्यासाठी मला सद्या उपयोग होतोय. म्हणजे कायद्याचे बाकीचे ९० टक्के ज्ञान व्यवहारशून्य झाले. जी गोष्ट माझ्या शैक्षणिक ज्ञानाची तीच गोष्ट माणसांची. माझ्या आयुष्यात खूप माणसे आली. पण खूप मोठ्या कष्टाने मिळविलेल्या माझ्या शैक्षणिक ज्ञानाला आर्थिक किंमत देऊन मला पैसा कमवू देणारी माणसे किती मिळाली तर पाच टक्के सुद्धा नाहीत. या पाच टक्के माणसांचाच व्यावहारिक उपयोग झाला. बाकीची ९५ टक्के माणसे ही व्यावहारिक बनू शकली नाहीत. या माणसांत आईवडील, बहीणभाऊ, बायको व मुलगी व इतर नातेवाईक यांना वगळले आहे. कारण अशा जवळच्या नात्यांत व्यवहारापेक्षा माया, प्रेमाला जास्त महत्व असते. माझ्याशी मैत्री केलेले मित्र हळूहळू दूर झाले. म्हणजे दहा ते वीस मित्रांपैकी आता फक्त दोन ते पाचच मित्र शिल्लक राहिले. तेही आता माझ्या सारखे वृद्ध होऊन आपआपल्या संसारात, त्यांच्या मुला मुलींच्या संसारात, नातवंडात मग्न आहेत. मला अधूनमधून फोन करून तब्बेतीची चौकशी करतात एवढीच काय ती त्यांची आता मैत्री उरलीय. या सर्वाचा सार काय तर माणूस जे काही ज्ञान मिळवतो ज्यात माणसेही आली त्याचा व्यावहारिक उपयोग फार म्हणजे फारच कमी होत असतो. मग मोठ्या मेंदूत साचलेल्या इतर ९० ते ९५ टक्के ज्ञानाचे करायचे काय? तर त्या ज्ञानाचा आवडता छंद जपण्यासाठी उपयोग करून त्यातून स्वतःसाठी मानसिक समाधान, आनंद मिळवायचा. माझे फेसबुक लिखाण हे माझ्या त्या छंदाचा, आनंदाचा भाग आहे जिथे मी माझे ९५ टक्के ज्ञान फुकट शेअर करीत आहे. फुकटच म्हणायचे कारण या मुक्त लिखाणातून मला पैसा मिळत नाही. अर्थात माझ्या लिखाणाचा व्यावहारिक उपयोग शून्य आहे. पण तरीही माझे हे लिखाण मला आनंद देत असल्याने ते व्यर्थ जात आहे असे सुद्धा म्हणता येणार नाही. कारण मानसिक आनंद, समाधानाची पैशात किंमत करता येत नाही. तीच गोष्ट माणसांची! माझ्या ओळखीची जी काही माणसे आहेत त्यापैकी आता फार थोडी माणसे व्यावहारिक उपयोगासाठी शिल्लक राहिली आहेत. बाकीची फक्त अधूनमधून हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी शिल्लक आहेत. त्यातूनही काही माणसे गप्पा मारता मारता स्वतःचेच काहीतरी पुढे दामटतात. हे दामटणे अती झाले की मग त्या गप्पांचा उपद्रव होतो. मग अशा माणसांना मला हळूच बाजूला करावे लागते, नव्हे कायमचे ब्लॉकच करावे लागते. धड व्यवहार नाही, धड मानसिक आनंद नाही, उलट उपद्रवच! कशाला हवीत अशी उपद्रवी माणसे केवळ ओळख म्हणून जवळ? ज्ञानाचा वारंवार उपयोग झाला नाही तर मोठा मेंदू असे निरूपयोगी ज्ञान हळूहळू डिलीट करतो. तेच काम तो माणसांविषयीही करतो कारण माणसे ही सुद्धा ज्ञानाचाच एक भाग असतो!
-ॲड.बी.एस.मोरे©२९.८.२०२०
कोरोना जोमात, आम्ही कोमात!
कोरोना जोरात, आम्ही कोमात!
कोरोना जोरात आहे. आमच्या सोसायटीतले दोघे कोरोनाने मेले. लोकल ट्रेन्स चालू होऊन मी पूर्ववत पार्ट टाईम वकिली कामानिमित्त मुंबईला जात नाही तोपर्यंत मी कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवले आहे. तसेच मी व्हॉटसअप बंद केले आहे. जाम टरकलोय मी! सद्या फेसबुकवर फुसफुस करणे एवढेच माझे काम! अजून तरी घरी बसून दोन वेळेला दोन घास गिळायला मिळत आहेत व कोणत्याही औषधाशिवाय तंदुरूस्त आहे हे नशीब! आज एका श्रीमंत क्लायंटने फोन करून सांगितले की त्यांच्या हायफाय सोसायटीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बहुतेक जण खाजगी लॕब्सकडून कोरोना चाचणी करून घेत आहेत. एका व्यक्ती साठी एका चाचणीचा दर सात हजार रूपये. म्हणजे घरात पाच माणसे असतील तर पाच जणांनी मिळून ७०००×५ = ३५,०००/- रूपये एका घरामागे द्यायचे. त्या सोसायटीत समजा एकूण घरे १०० असतील तर त्या खाजगी लॕबची कमाई १०० घरांच्या एका सोसायटीमागे पस्तीस लाख रूपये. श्रीमंतांच्या या हायफाय सोसायट्या त्या सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि सचिवाला गाठून खाजगी कोरोना टेस्टसाठी तयार करायच्या असा धंदा जर सुरू असेल तर मग कोरोनापेक्षा हा धंदाच जोरात असे म्हणावे लागेल. खरे खोटे तो निसर्गच जाणो! पण या श्रीमंत क्लायंटच्या फोनमुळे साधारण अंदाज आला. या श्रीमंत क्लायंटला माहित आहे की मी गेली सहा महिने वकिलीतून एकही पैसा मिळविला नाही. शेवटी वैतागून मी बायकोचे मंगळसूत्र मोडले. ते पैसे संपल्यावर गेल्या महिन्यापासून माझी विवाहित मुलगी आम्हा नवरा बायकोला पोटासाठी पैसा देत आहे. इथे माझी खाण्यापिण्याची पंचायत आहे आणि हा श्रीमंत क्लायंट मला घाबरवून मीही त्यांच्या हायफाय सोसायटी प्रमाणे सात हजार रूपये वाली खाजगी कोरोना टेस्ट करून घ्यावी व बायकोचीही तशी टेस्ट करून घ्यावी हा सल्ला मला देत आहे. मग हे लचांड एकदा का मागे लावून घेतले की मग ते खाजगी लॕबवाले पुन्हा हात धुवून मागे लागणार नाहीत याची काय शास्वती? मला त्या श्रीमंत क्लायंटच्या श्रीमंत सल्ल्याचा खूप राग आला. त्याला मग आडवे घ्यावेच लागले फोनवरून! त्याला मी सरळ सांगितले की मी मरण्याची जय्यत तयारी केली आहे. कालच माझ्याच मरण तिरडीची पोस्ट मी फेसबुक वर टाकलीय. आमचीच टेस्ट काय तर संपूर्ण गरीब भारतीय जनतेच्या टेस्टस करणे व त्यांना सरकारी रूग्णालयात योग्य ती वैद्यकीय ट्रीटमेंट देणे ही भारतीय संविधानाने सरकारची जबाबदारी आहे. कारण भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना जगण्याचा मूलभूत हक्क बहाल करते. तो अधिकार सरकारला देता येत नसेल तर आमचे नशीब! हे त्या क्लायंटला सुनावल्यावर त्या श्रीमंत क्लायंटला माझा खूप रागआला. त्याचा अहंकार जागृत झाल्याचे फोनवरून कळले. म्हणजे यापुढे त्या श्रीमंत क्लायंटकडून पुढची कामे मिळणे बंद! बंद तर बंद, पण फालतू श्रीमंती सल्ले ऐकून घेणार नाही. काय वैताग आणलाय या कोरोनाच्या अर्धवट ज्ञानाने! तो कोरोना प्रत्यक्षात तर दूरच राहिलाय अजून तरी माझ्यापासून, पण ही असली माणसे आजूबाजूला आहेत त्यांचे हे असले मोठे सल्ले ऐकून अंगात खरंच कोरोना घुसलाय की काय असे क्षणभर वाटले. अरे बाबांनो, तुम्ही श्रीमंत आहात आणि आम्ही गरीब! तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे? तुमची परिस्थिती काय आणि आमची परिस्थिती काय? आणि असले श्रीमंती सल्ले तुम्ही गरिबांना देता! यापूर्वीच मी व्हॉटसअप बंद करून टाकलेय. आता तर कोणालाही प्रत्यक्ष भेटायचे नाही हे ठरवलेय. नशिबाने जगलो, वाचलो व पुन्हा लोकल ट्रेनने मुंबईला पार्ट टाईम वकिलीसाठी जाऊ लागलो तर तोंडाला मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून भेटेनही. पण असले श्रीमंती सल्ले देणाऱ्या लोकांना बिलकुल भेटणार नाही!
-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०
बुध्दंम् सरणम् गच्छामी!
*!! भवतु सब्ब मंगलम् !!*
(सगळ्यांचे कल्याण होवो)
*" बुध्दं सरणं गच्छामि "*
(मी बुद्धास अर्थात माझ्या सदसद्विवेकबुद्धीस
शरण जात आहे)
*" धम्मं सरणं गच्छामि "*
(मी बुद्ध विचारांच्या तत्वज्ञानास शरण जात
आहे)
*" संघं सरणं गच्छामि "*
(मी सदसद्विवेकबुद्धीला शरण जाऊन मनावर
विजय प्राप्त करीत जगाचे कल्याण व
जगात शांती प्रस्थापित करू शकणाऱ्या
सबळ मनाच्या आदर्श लोकसमूहाला शरण
जात आहे)
🌹🌹🌹सबका मंगल हो🌹🌹🌹
-ॲड.बी.एस.मोरे©२८.८.२०२०