https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

मोठ्या मेंदूची कवाडे उघडी करा!

मोठ्या मेंदूची सर्व कवाडे उघडी करा!

ज्ञानेंद्रियांचा संपर्क निसर्गाशी प्रस्थापित झाला की मग मोठ्या मेंदूच्या जाणिवा खुल्या होतात. मोठ्या मेंदूच्या जाणिवा पूर्ण खुल्या होत नाहीत तोपर्यंत त्या मेंदूला निसर्गाचे सत्य आहे त्याच स्वरूपात कळत नाही. पण ज्ञानेंद्रियांचा संपर्क  निसर्गाशी प्रस्थापित झाल्यावरही मोठा मेंदू पूर्ण जाणिवेने खुला होत नाही. अशा अर्धजागृत मेंदूला निसर्गाचे पूर्ण सत्य कळू शकत नाही. अशा अर्धजागृत मेंदूत काही जागा रिकाम्या राहतात. अशा रिकाम्या जागा काही काल्पनिक मिथ्ये, आभास यांनी भरल्या जातात आणि मग अर्धजागृत मेंदू अर्धसत्याबरोबर जगू लागतो. असा मेंदू म्हणजे अर्धज्ञानी मेंदू! अशा मेंदूला निसर्गाचे सत्य वेगळ्या आभासी स्वरूपात दिसू शकते. उदा. अंधारात हवेने खालीवर होणाऱ्या झाडाच्या फांद्या अशा मेंदूला लोंबकळणाऱ्या भुतांसारख्या भासू शकतात. पण हा निव्वळ भास आहे हे अशा अर्धजागृत, अर्धज्ञानी मेंदूला कळत नाही. नैसर्गिक सत्याविषयीच्या अर्ध्या ज्ञानाचा व अर्ध्या अज्ञानाचा हा दुष्परिणाम असतो. मोठा मेंदू हा जाणीवपूर्वक ऐच्छिक क्रिया करणारा मेंदू तर छोटा मेंदू हा मोठ्या मेंदूला थांगपत्ता लागू न देता गुपचूप अनैच्छिक क्रिया करणारा मेंदू. खरं तर, हे एकाच मेंदूचे दोन भाग पण त्यांच्या कार्यानुसार त्यांना मोठा मेंदू व छोटा मेंदू अशी नावे मेंदू शास्त्रज्ञांनी दिली आहेत. निसर्गाला निसर्ग म्हणूनच अनुभवायचे असेल तर मोठ्या मेंदूची सर्व कवाडे उघडी करा!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.८.२०२०

वैज्ञानिक दृष्ट्या मृत्यू म्हणजे काय?

मृत्यूचा वैज्ञानिक अर्थ!

मृत्यूच्या भीती ऐवजी मृत्यूचा अभ्यास करायला या कोरोनाने मला भाग पाडले. मृत्यू तर येणार आहेच, मग त्याला सामोरे जायची तयारी नको का करायला? उगाच काल्पनिक अध्यात्माला किंवा एखाद्या भविष्यवेत्त्याला जवळ करीत आभासात राहून मृत्यूला जवळ करायचे की निसर्गाचे विज्ञान समजून घेऊन सत्य स्वरूपात मृत्यूला जवळ करायचे या दोन्ही पर्यायांत मी विज्ञानाचा पर्याय स्वीकारलाय. कारण मेंदूचे कार्य हे भावनांच्या, कल्पनांच्या, आभासाच्या पलिकडचे आहे. हवेतला प्राणवायू व अन्न, पाण्यातील पोषक द्रव्ये रक्त शोषण करते. याच रक्ताच्या ताकदीने माणूस जगतो. माणसाची फुफ्फुसे व त्याचे हृदय हे अवयव या रक्ताशी संबंधित कार्य करतात. कोरोना विषाणू एकदा का फुफ्फुसांत घुसला की तो हे रक्ताचे मूलभूत कार्यच बिघडवतो. या विषाणूमुळे रक्तच जर खराब म्हणजे विषारी झाले तर मग जीवन कसे शक्य होणार? म्हणून मग रक्त शुद्धीकरणाची औषधे दिली जात असावीत. मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही म्हणून असावीत हा शब्द वापरला आहे. मानवी मेंदू हा दोन भागात विभागला गेलाय. जाणिवेने ऐच्छिक कामे करणारा मोठा मेंदू हा एक भाग व शरीर सुरळीत चालण्यासाठी जन्मापासून मृत्यूपर्यंत अनैच्छिक कामे करीत असलेला छोटा मेंदू हा दुसरा भाग! मोठ्या मेंदूला इजा पोहोचून त्या मेंदूची जाणीव नष्ट झाल्यामुळे माणूस कोमात गेला तरी माणूस  जिवंत राहू शकतो. पण ते जगणे जाणीव नसलेले असते. अशा जगण्यात फुफ्फुसे व हृदय यांचे कार्य चालू असते. कारण त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा छोटा मेंदू व्यवस्थित कार्य करीत असतो. म्हणजे माणूस मोठा मेंदू मृत झाल्याने मरत नाही तर छोटा मेंदू मृत झाल्याने मरतो. कारण छोटा मेंदू मृत झाला की फुफ्फुसे व हृदय यांचे कार्य पुढे चालूच शकत नाही. याचा अर्थ हा की, कोरोना फुफ्फुसांतून हृदयाच्या मार्फत रक्तात मिसळतो. मग त्या विषाणूमुळे विषारी झालेले रक्त मोठ्या मेंदूला बाद करते व शेवटी छोट्या मेंदूला बाद करून कोरोनाग्रस्त रूग्णाला मारते. हा माझा अभ्यास आहे. पण मी वैद्यकीय तज्ज्ञ नसल्याने असे ठामपणे म्हणू शकत नाही. तरीही माझा हा अभ्यास हवेतला नाही. डॉ. प्रेमानंद रामाणी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मेंदू सर्जनने लिहिलेले मेंदूची ओळख हे पुस्तक माझ्या अभ्यासाचा आधार आहे. कालच न्यायवैद्यक शास्त्रावरील रायबहादूर जयसिंग पी. मोदी या माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकात वेडेपणा म्हणजे काय ही जी माहिती लिहिलीय ती मी फेसबुक पोस्टने वाचकांना सांगितली. आज माझ्या संग्रहातील या दुसऱ्या वैज्ञानिक पुस्तकावर आधारित ही मेंदू व मृत्यू संबंधीची महत्त्वाची माहिती मी आजच्या फेसबुक पोस्टने वाचकांना समाज प्रबोधनाच्या दृष्टीने सांगत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२५.८.२०२०

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

वर्गीकरण!

वेडेपणा म्हणजे काय?

कायद्याच्या भाषेत वेडेपणा (insanity) कशाला म्हणतात?

(१) भ्रम (delusion)
(२) खोटी कल्पना (hallucination)
(३) भास (illusion)
(४) आवेश (impulse)
(५) कल्पनेने पछाडणे, घेरणे (obsession)
(६) खूळ, मूर्खपणा, विक्षिप्तपणा, उन्माद 
     (lunacy, lucid interval)  

संदर्भः Medical Jurisprudence and Toxicology by Rai Bahadur Jaising P. Modi

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

बुद्धी दे!

गणपती बाप्पा, वाचव रे बुद्धीला निर्बुद्धांच्या तावडीतून!

बुद्धीमान लोकांनी बनविलेले सरकारी नियम बुद्धीमान लोकांनीच अंमलात आणायला हवेत की नकोत? त्यांची अंमलबजावणी जर निर्बुद्ध लोकांच्या हातात दिली तर त्या नियमांचे तीन तेरा वाजतील नाहीतर काय होईल? यालाच म्हणतात माकडाच्या हातात कोलीत देणे. हे असे लिहिण्यालाही तसेच कारण घडतेय. सुका व ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबीन्स मध्ये ठेवला नाही तर तो उचलला जाणार नाही असा सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नियम आला. पर्यावरण रक्षणासाठी हे ठीकच आहे. पण या कोरोना लॉकडाऊन काळात होते काय की सोसायटीत कचरा उचलायला घाबरून कोणी येतच नाही. मग होते काय की, प्रत्येकजण सुक्या व ओल्या कचऱ्याचे ते दोन डस्टबीन्स स्वतःच उचलून घेऊन जवळच्याच एखाद्या  कचरा पॉईंटवर जातात व तिथे ते दोन्हीही डस्टबीन्स एकत्र ओतून घरी परत येतात. याचा अर्थ असा की, त्या कचरा पॉईंटवर सुका व ओला कचरा एक होतो. मग तिथे पालिकेची घंटा गाडी येऊन सुक्या व ओल्या कचऱ्याचा तो एकच ढीग उचलून घेऊन जाते. असेच जर करायचे होते तर मग हा कचरा विभाजनाचा नियम केलाच कशाला? खरं तर त्या कचरा पॉईंटवर पालिकेने एका ऐवजी दोन कचरा कुंड्या (सिमेंटचे दोन मोठे हौद) ठेवल्या पाहिजेत व एका कुंडीवर सुका कचरा व तसेच  दुसऱ्या कुंडीवर ओला कचरा अशी मोठी अक्षरे रंगविली पाहिजेत व तसे न करणाऱ्यास मोठा दंड ठोठावला जाईल असा ठळक अक्षरात तिथे बोर्ड लावला पाहिजेत. पण या नियमाची वाट दोन्ही बाजूंकडून ही अशी लावली जाते. कचऱ्याच्या बाबतीत जर हे असे होत असेल तर कोरोना उपचार व नियमांच्या बाबतीत काय होत असेल? बापरे, कल्पनाच करवत नाही! निर्बुद्ध माणसांच्या घोळक्यात बुद्धीमानांनी आपली बुद्धी पाजळू नये. बुद्धीमान लोकांना  जगायचे असेल तर त्यांनीही निर्बुद्धांबरोबर  निर्बुद्ध व्हावे असाच धडा या अनुभवातून मिळतो. गणपती बाप्पा, अरे काय चाललेय हे! तू तर बुद्धीचे दैवत पण इथे बुद्धीच संकटात सापडलीय! वाचव रे बाबा तुझ्या बुद्धीला या निर्बुद्धांच्या तावडीतून!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०

टीपः

हा निर्बुद्धपणा काय एकाच पालिकेकडून होतो का? तर नाही हेच उत्तर आहे. कारण असा सावळागोंधळ सगळीकडेच चालू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही पोस्ट सर्वसाधारण निरीक्षण म्हणून वाचावी. माझे काही चुकले असेल तर चुकभूल द्यावी घ्यावी!

-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

गणपती बाप्पा मोरया!

श्रीगणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज शनिवार दिनांक २२ अॉगष्ट २०२० रोजी श्रीगणेश चतुर्थी आली आहे. गेल्या वर्षी २०१९ साली ती २ सप्टेंबरला आली होती तर २०१८ साली ती १३ सप्टेंबरला आली होती. अर्थात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही हिंदू कालगणना तारीख इंग्रजी कॕलेंडरच्या पुढे मागे होते. गणपतीला हिंदू धर्मात बुद्धीचे दैवत मानले आहे. हे दैवत सुखकर्ता व दुःखहर्ता/विघ्नहर्ता ही असल्याने या दैवताची आराधना चांगल्या कार्याचा आरंभ करण्यापूर्वी करतात. शिवपार्वती हे या दैवताचे उगमस्थान! म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेची पूजा, व्रत करतात. निसर्ग सृष्टीची रचना व व्यवस्था समजून घेऊन त्या नुसार वर्तन व्हावे म्हणून योग्य मार्गदर्शनाची गरज असते व ते काम बुद्धी करते. निसर्ग व्यवस्थेनुसार योग्य वर्तन होण्यासाठी मानवी मनातील वासना व भावना यावर नियंत्रण व त्यात संतुलन ठेवण्यासाठीही बुद्धीचा उपयोग होतो. आज या बुद्धी देवतेचे आगमन झाले आहे. मात्र कोरोना विषाणूचे संकट/विघ्न चालू असल्याने यावर्षीचा गणेशोत्सव डामडौलात साजरा करता येत नाही. तरीही साध्या पद्धतीने का होईना पण लोक श्रीगणेश मूर्ती घेऊन आले आहेत व श्री गणेशाची यथासांग पूजा अर्चा करीत आहेत. गौरी गणपतीचा सण खरंच खूप आनंदाचा! या सणातील श्रद्धा व उत्साह मला खूप भावतो कारण तो लोकांना जवळ करतो! श्रीगणेश चरणी एवढीच प्रार्थना की, बाबारे हे कोरोनाचे संकट आता लवकरात लवकर दूर कर कारण तू विघ्नहर्ता आहेस व सरकार नावाच्या व्यवस्थेला चांगली बुद्धी देऊन ही टाळेबंदी लवकर उठवायला सांग व मुंबईच्या लोकल ट्रेन्स लवकर सुरू होऊ देत. गणपती बाप्पा मोरया!

-ॲड.बी.एस.मोरे©२२.८.२०२०

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कायदा व धर्म वेगळे नाहीत!

कायदा व धर्म यांना वेगळे समजणे मुळातच चुकीचे!

मानव समाज हा निसर्ग सृष्टीचाच एक छोटा भाग आहे. त्यामुळे फुले व काटे या दोन्ही गोष्टी जशा निसर्गाच्या भाग आहेत तशाच त्या मानव समाजाच्याही भाग आहेत. या दोन्ही भागांतील फुलांचा आस्वाद कसा घ्यायचा याचे आर्थिक नियम व या दोन्ही भागांतील काट्यांना बाजूला कसे करायचे याचे राजकीय नियम निसर्गाच्या मूलभूत कायद्यात आहेत व हा नैसर्गिक कायदा निसर्गाच्या विज्ञानाचा भाग आहे. निसर्गातील व समाजातील फुलांचे आकर्षण व निसर्गातील व समाजातील काट्यांची भीती प्रत्येक मनुष्याला असते. प्रत्येक माणूस या सर्व फुलांना एकटाच ओरबाडू लागला व सर्व काट्यांशी एकटाच लढू लागला तर त्यातून समाजातील एकही माणूस आर्थिकदृष्ट्या सुखी व राजकीयदृष्ट्या शांत, सुरक्षित होऊ शकणार नाही. म्हणून निसर्गाच्या आर्थिक व राजकीय कायद्याचाच पूरक भाग असलेला समाजाचा आर्थिक व राजकीय कायदा बुद्धीमान माणसांनी शोधला व त्या सामाजिक कायद्याच्या अंमलबजावणी साठी मानव समाजातूनच एक स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण केली. समाजाचे नीतीनियम पाळले नाहीत तर समाजाकडून कोणालाच फुलांचे सुख मिळणार नाही व कोणालाच काट्यांपासून संरक्षण मिळणार नाही असा या सामाजिक कायद्याचा दंडक असतो. निसर्गाच्या व मानव समाजाच्या कायद्यांत समाविष्ट असलेल्या नीतीनियमांनाच नीतीधर्म म्हणता येईल. म्हणून कायदा व धर्म यांना वेगळे समजणे हे मुळातच चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मी सायन्स लॉ एक्सप्रेस नावाचे फेसबुक पेज सुरू केले व माझ्या फेसबुक खात्याचेही तेच नाव आहे. निसर्ग, निसर्गाचे विज्ञान, त्या विज्ञानात असलेला कायदा व त्या कायद्याचाच धर्म असा माझ्या ज्ञान, विचारांचा सारांश आहे. तो सर्वांना तसा पटेलच असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की या लेखातील पटेल तेवढेच घ्यावे व बाकीचे सोडून द्यावे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.८.२०२०