https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
सोमवार, २२ जून, २०२०
आषाढ प्रारंभ दिनी अत्रे!
रविवार, २१ जून, २०२०
पुंगी ताईट व्यायाम!
अनलॉक २ मधील चालण्याचा पुंगी ताईट व्यायाम!
तीन महिन्यानंतर इमारतीच्या खाली उतरून आज रविवार, दिनांक २१ जून २०२० रोजी संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान डोंबिवली स्टेशन पर्यंत चालण्याचा व्यायाम केला. रस्त्यावर व रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट व भयाण शांतता आढळली. त्यातच तोंडावर मास्क लावून चालत असताना रस्त्यावरील कुत्री अंगावर भुंकत होती. त्यामुळे चालताना शरीर मोकळे होत असले तरी हळूहळू या व्यायामाचे रूपांतर पुंगी ताईट व्यायामात झाले. पुढे कोणी पोलीस तर हटकणार नाही ना याची भीती होतीच. रात्री जागून दुपार नंतर उशिरा उठणारा मी माणूस असल्याने सकाळ, दुपारचा व्यायाम शक्य नाही. बघूया उद्यापासून थोडे लवकर उठून कमीतकमी संध्याकाळी ६ ला असे पाय मोकळे करणे जमतेय का?
खरं म्हणजे,फक्त डॉक्टर, पोलीस व सरकारी खात्यातील इतर लोकांनाच अत्यावश्यक सेवक समजून लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायची परवानगी देणे हे चुकीचे आहे. वकिलांचा सुद्धा अत्यावश्यक सेवक वर्गात समावेश केला गेला पाहिजे. समजा कुठे घरगुती हिंसाचार वगैरे गोष्टी घडल्या तर लोक डॉक्टरकडे जाणार की वकिलाकडे? मग वकील अशा क्लायंटला घेऊन मध्यरात्री सुध्दा पोलीस स्टेशनला जाऊ शकतो की नाही? जरा कायदा नीट समजून घ्या हो!
-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०
फादर्स डे!
आज फादर्स डे निमित्त माझ्या वडिलांना ही भावांजली!
(१) कठीण आहे मला माझ्या वडिलांविषयी शब्दांत व्यक्त होणे, पण तरीही कसाबसा व्यक्त होतोय. सातवीपर्यंत शिकलेले माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघ या मान्यताप्राप्त कामगार युनियनचे पुढारी झाले व काँग्रेसचे तत्कालीन मोठमोठे नेते इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, संगमा, वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्यांच्याबरोबर लहानपणी मी श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील बंगल्यावर व तरूण पणी श्री. वसंतदादा पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर गेलो होतो. मी इयत्ता सातवीत असताना दिल्लीला यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यात गिरणी कामगारांच्या बैठकीत त्या लहान वयातही धाडसाने छोटे भाषण केले होते व ते ऐकून यशवंतराव चव्हाणांनी मला जवळ ओढून घेतले होते. माझ्या वडिलांचे इंदिरा गांधी यांच्याबरोबरही फोटो होते. हे सर्व फोटोंचे पुढे काय झाले, ते कसे गहाळ झाले, माझ्या वडिलांच्या या मौल्यवान आठवणी कुठे आणि कशा अदृश्य झाल्या हे मला कळत नाही. या सर्व आठवणी वरळी बी.डी.डी. चाळीतील माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून मी १९८५ साली डोंबिवली गाठली व डोंबिवलीला पत्नी व मुलीसह वेगळा राहू लागलो. याचे कारण म्हणजे वरळीची १०×१२ फूटाची ती खोली खूप छोटी होती व त्या एवढ्या लहान खोलीत माझा धाकटा भाऊ, धाकटी भावजय यांचे कुटुंब, माझे आईवडील व पुन्हा माझे कुटुंब यांना एकत्र राहणे केवळ अशक्य होते.
(२) तरीही आईवडिलांना मी सोडले नव्हते. तिथे दर आठवड्याला जाऊन त्यांची नुसती वरवर चौकशी नाही तर थोरला मुलगा म्हणून काळजी घेणे हे कर्तव्य मी पार पाडीत होतो. माझे वडील खूप स्वाभिमानी असल्याने त्यांच्या औषधांचा खर्च ते स्वतःच करायचे. मी फक्त आईच्याच औषधपाण्याचा खर्च करायचो. धाकटा भाऊ व भावजय आईवडिलांसोबतच राहत असल्याने त्यांच्या जेवणाची व सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते सर्व जुने फोटो मी माझ्याबरोबर डोंबिवलीला घेऊन आलो नाही. उत्तर भारत सफरीचे वडिलांबरोबरचे माझे खूप फोटो होते. पण ते सर्व गहाळ झाले आहेत. त्यामुळे या लेखासोबत ते फोटो मी दाखवू शकत नाही.
(३) घरात माझ्या वडिलांनी त्यांच्या चारही मुलांना म्हणजे मी थोरला मुलगा, दोन धाकट्या बहिणी व एक सर्वात धाकटा भाऊ या सर्वांना शिक्षण घेण्याची संधी दिली. पण इतर तीनही भावंडे एस.एस.सी. च्या पुढे शिकलीच नाहीत. मी मात्र सातवी पी.एस.सी.ला (प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट) व अकरावी एस.एस.सी. ला (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन पुढे राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली व बी.कॉम.(अॉनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. एवढे उच्च शिक्षण पूर्ण केले व पुढे स्वतःच्या हिंमतीवर वकील झालो.
(४) माझ्या वडिलांना माझ्या शिक्षणाचा, माझ्या धाडसाचा खूप अभिमान होता. पुढारी असल्याने ते ज्या मिल मध्ये नोकरीला होते त्या व्हिक्टोरिया मिलमध्ये त्यांचा दबदबा होता. त्या मिलचे जनरल मॕनेजर सोनाळकर साहेब यांच्यापर्यंत त्यांची उठबस होती. माझ्या वडिलांनी मला एकदा सोनाळकर साहेबांच्या कॕबिनमध्ये रूबाबात नेले होते. तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष वसंतराव होशिंग, जनरल सेक्रेटरी भाई भोसले, संघाचे नंतरचे अध्यक्ष व शालिनीताई पाटील यांचे बंधू मनोहर फाळके यांच्याकडेही मला माझे वडील कौतुकाने घेऊन गेले होते. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांच्याकडेही माहिमला ज्योती सदन बंगल्यावर व नंतर मलबार हिल येथील मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. लहानपणीचा श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावरील माझ्या छोट्या भाषणाचा किस्सा तर वर सांगितलाच आहे.
(५) असे हे माझे वाघासारखे वडील २००९ साली के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आम्हाला कायमचे सोडून गेले त्यावेळी मी खऱ्या अर्थाने निराधार झालो. कारण मी महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री व नंतर काँग्रेसचे खासदार असलेले बॕ. ए. आर. अंतुले यांच्याविरूध्द सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यामुळे टी.व्ही. वर माझे सारखे नाव येऊ लागले होते. त्यातून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर असलेली काळजी, "बाळू, मला न विचारता तू एकट्यानेच एवढे मोठे धाडस का केलेस, आता ही रिट याचिका पुन्हा मागे घेता येईल का" हे मला माझ्या काळजीने सांगणे व नंतर मी न्यूमोनियाने खूप आजारी पडलो तेंव्हा माझ्या काळजीने कासावीस होणे या सर्व गोष्टी माझ्या वडिलांच्या मृत्यूबरोबर संपल्या होत्या.
(६) असा पाठिंबा देणारी एकही व्यक्ती जगात शिल्लक राहिली नव्हती व आताही अशी एकही व्यक्ती या जगात नाही हे मी जाहीरपणे सांगत आहे. आज माझी पत्नी माझ्या सोबत आहे, माझी मुलगीही माझ्यामागे पाठबळ म्हणून उभी आहे. पण माझ्या वडिलांची बरोबरी कोणच करू शकत नाही. माझे वडील हा माझा फार मोठा आधार होतो. तो आधार संपला आणि मी कमकुवत झालो. वकिली सुरू ठेवली पण राजकारणाचा नाद सोडून दिला.
(७) या लेखासोबत डावीकडे आहेत ते माझे वडील व उजवीकडे आहे तो मी त्यांचा मुलगा. आज फादर्स डे निमित्त एवढेच!
-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०
शनिवार, २० जून, २०२०
चाळीतला सीमावाद!
चाळीतला सीमावाद!
माझा जन्म १९५७ चा, म्हणजे १९६२ साली भारत व चीन यांच्यात सीमावादातून जे युद्ध झाले त्यावेळी मी जेमतेम पाच वर्षाचा होतो. पहिली इयत्तेत सुध्दा प्रवेश न घेतलेल्या मला त्या बाल वयात काय माहित असणार भारत काय, चीन काय? पण मुंबईत वरळी बी.डी.डी. चाळीत असलेली आमची खोली व समोरची खोली यांच्यात एक अलिखित सीमारेषा आहे हे मात्र कळत होते. मुंबईत वरळी, डिलाईल रोड, नायगाव याठिकाणी बी.डी.डी. चाळी आहेत. प्रत्येक चाळीला तळ मजला धरून एकूण चार मजले. चाळीच्या प्रत्येक मजल्यावर १०×१२ फूटाच्या एकूण २० खोल्या. म्हणजे चार मजल्यावर एकूण ८० खोल्या. एकाच चाळीत राहणाऱ्या या ८० खोल्यांत गिरणी कामगारांची ८० कुटुंबे संसार करायची. अर्थात सरकारी भाडेतत्वावरील त्या छोट्या खोल्या हीच चाळीत राहणाऱ्या सर्व गिरणी कामगारांची स्थावर मिळकत होती व मिलमधून मिळणारा पगार हेच त्या सर्वांचे आर्थिक उत्पन्न होते. म्हणजे सगळ्या कुटुंबाची परिस्थिती सारखी होती. पण तरीही त्यांच्यात अधूनमधून छोटे सीमावाद चालू असायचे. प्रत्येक भाडेकरूने स्वतःचे सामान म्हणजे चिनपाट (सार्वजनिक संडास करण्यासाठी लागणारा पत्र्याचा छोटा डबा किंवा प्लॅस्टिकची छोटी बादली), कपडे वाळू घालण्यासाठी लागणारा स्टूल, कपडे वाळू घालण्यासाठी आवश्यक असलेल्या दोऱ्या इत्यादी गोष्टी स्वतःच्याच अंगण भागात ठेवणे हा नियम होता. दोन खोल्यांमधील अंगण भागाचे म्हणजे वटणाचे (corridor) एका सीमारेषेने दोन भाग केलेले होते. अलिकडच्या खोलीचे सामान अलिकडच्या अंगण भागात, तर पलिकडच्या खोलीचे सामान पलिकडच्या अंगण भागात आणि मध्ये अंगण सीमारेषा अशी ती व्यवस्था होती. गणपती, नवरात्र, दिवाळी सारख्या सणात रांगोळी, आकाश कंदील, पणत्या वगैरे गोष्टी प्रत्येकाने स्वतःच्या अंगणातच लावणे हाही नियम होता. दोन अंगण भागांमधील सीमारेषा ओलांडून कोणीही दुसऱ्याच्या अंगण भागात अतिक्रमण करायचे नाही हे ठरलेले होते. हे सर्व एकमेकांच्या सहकार्याने अगदी व्यवस्थित चालायचे. आम्ही लहान मुले मात्र या सीमारेषा ओलांडून एकमेकांच्या खोल्यांत घुसून धुडघूस घालायचो. पण आमचे सगळ्या खोल्यांत स्वागतच व्हायचे. इतकेच नव्हे तर आमच्या आया एकमेकींच्या खोल्यांत जाऊन बिनधास्त गप्पा मारीत बसायच्या. इतकेच नव्हे तर घरी केलेल्या मोदक, लाडू, करंजी, मच्छी, मटण वगैरे खाद्य पदार्थांचीही मुक्त देवाणघेवाण व्हायची. कोणाकडे बारसे, लग्नकार्य असले तर मजल्यावर (माळ्यावर) राहणारे शेजारी एकमेकांच्या मदतीला धावायचे. पण तरीही सीमारेषा या होत्याच. अधूनमधून क्षुल्लक सीमावाद व्हायचे, धुसफूस व्हायची, छोटी भांडणे व्हायची, पण पुन्हा सर्वजण एक व्हायचे. हळूहळू वय व शिक्षण वाढत गेले तसे आर्थिक व्यवहाराचा व राजकीय सीमावादाचा हा पसारा फार मोठा आहे हे मला कळू लागले. आमची चाळ एकच पण त्या चाळीतील ८० खोल्यांच्या सीमा वेगवेगळ्या, तशी पृथ्वी एकच पण या पृथ्वीवरील विविध देशांच्या सीमा वेगवेगळ्या हे हळूहळू कळू लागले. आता तर हेही कळलेय की या जगात कोणतीही व्यक्ती व कोणताही देश आत्मनिर्भर नाही. सगळेजण एकमेकांवर अवलंबून आहेत. आमच्या आया जशा एकमेकींना मोदक, लाडू, करंज्या, मच्छी, मटण द्यायच्या तसे जगातील देश एकमेकांशी आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण करतात. तरीही त्यांच्यात अधूनमधून सीमावाद उफाळून येतोच. मग त्यांच्यात छोटी, मोठी युद्धे होतात. युद्ध ज्वराने सगळे वातावरण तापते. पण नंतर ही युद्धे संपतात, नव्हे ती संपवावीच लागतात. कोण युद्धात जिंकतो तर कोण हारतो. मग जिंकणारा देश व हरणारा देश यांच्यात तहाचे करार होतात. त्या देशांत आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होतात. जगात हे असेच चालू आहे आणि असेच चालू राहणार आहे. हे सर्व नीट समजून घ्यायला मला बी.डी.डी.चाळीतील त्या सीमारेषा व ते छोटे सीमावाद अजूनही मदत करतात. लहानपणीच्या या अनुभवाचा मी माझ्या वकिलीतही उपयोग करतो हे विशेष!
-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०
सार्थक झाले!
आज माझ्या फेसबुक लिखाणाचे खरे सार्थक झाले!
आज शनिवार, दिनांक २० जून, २०२० हा माझा सार्थक दिन! आज मी खूश आहे, आनंदी आहे. कारण गेली पाच वर्षे फेसबुकवर मी जे सातत्याने लिखाण करतोय त्याचे सार्थक झाले. माझे हे तिसरे फेसबुक खाते. पहिल्या दोन फेसबुक खात्यांवर प्रत्येकी ५००० मित्र व तेवढेच अनुयायी म्हणजे जवळजवळ एकूण २०००० लोकांना मी माझ्या ज्ञान, अनुभव व विचार यांनी आकर्षित केले. पण त्या आकर्षक करणाऱ्या मित्र, अनुयायी संख्येवर मी खूष नव्हतोच! मला जे हवे ते त्या रेकॉर्ड ब्रेक संख्येतून मला मिळतच नव्हते. म्हणून माझे सर्व लिखाण व्यर्थ गेले या भावनेतून मी ती दोन्ही फेसबुक खाती बंद करून टाकली. तरीही अजून एकदा प्रयत्न करून बघू व मी जे लिहितोय ते बरोबर आहे का याची पुन्हा एकदा चाचपणी करू या विचाराने मी हे सद्याचे तिसरे फेसबुक खाते उघडले. पहिले खाते मी ठरवून राजकारणापासून अलिप्त ठेवले होते, दुसरे खाते मी काही अंशी राजकारणाला जोडले व आता पुन्हा हे तिसरे खाते राजकारणापासून मी ठरवून अलिप्त केले. पण आजपर्यंत मला जे हवे होते ते मला माझ्या फेसबुक लिखाणातून मिळतच नव्हते. काय हवे होते मला? पैसा, सत्ता, प्रतिष्ठा? बिलकुल नाही. पण मला जे हवे होते ते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या एका गावातील २२ वर्षाच्या एका मराठी शेतकरी तरूणाने मला देऊन टाकले. काय दिले त्याने मला तर त्याने प्रत्यक्ष फोन करून मला तो जे मनापासून बोलला ते ऐकून मी स्वतःच चाट पडलो. त्या तरूणाने मला सांगितले की, माझे विचार तो दररोज नुसते वाचतच नाही तर त्या विचारांचे मोबाईलने स्क्रीन शॉटस घेऊन त्यांची तो अधूनमधून उजळणी करतो. माझ्या विचारांनी त्याच्या जीवनात बदल झाला. त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. तो आता १४ वी ला आहे व "कायदा हा माझा श्वास" हा फेसबुक वरील माझा लेख त्याने वाचल्याने ग्रॅज्यूएट झाल्यावर कायद्याचे पुढील शिक्षण घेण्याचे त्याने ठरवले आहे व त्यासाठी तो पंढरपूर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. तसेच माझ्या विचारांतून त्याला अगोदरच कायद्याचे मूलभूत शिक्षण प्राप्त झाले आहे व होत आहे. त्याची आई चार वर्षापूर्वी वारली. वडील आहेत व तोच थोरला असल्याने धाकटया भावंडांची आता त्याच्यावर जबाबदारी आहे. तरीही माझ्या विचारांमुळे त्याला सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे व त्यामुळेच आता त्याला या सर्व जबाबदाऱ्यांची भीती वाटेनाशी झाली आहे. हे सर्व त्याच्या तोंडून प्रत्यक्षात ऐकताना मला एकच जाणीव झाली की माझ्या फेसबुक लिखाणाचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले. हजारो लोकांतून मी एका तरूणाला योग्य दिशा देऊ शकलो आणि त्यातच मी जिंकलो, हीच ती माझी जाणीव! ही जाणीव मी त्या तरूणालाही "तूच माझा खरा शिष्य" असे लिहून शेअर करीत आहे, कारण माझा खरा शिष्य तोच आहे हे त्याने आज सिद्ध केले आहे. ही माझी स्वतःची आत्मप्रौढी नसून हा माझ्या जीवनाचा १००% सत्य अनुभव आहे!
-ॲड.बी.एस.मोरे©२०.६.२०२०
शुक्रवार, १९ जून, २०२०
गुळाला मुंगळे स्वार्थाचे
गुरुवार, १८ जून, २०२०
कायदा माझा श्वास!
कायदा हा माझा श्वास!
(१) प्रत्येकाला नैसर्गिक जीवन जगण्याचा, तसेच नैसर्गिक मरण्याचा मूलभूत नैसर्गिक अधिकार आहे. आत्महत्या काय किंवा खून काय, हे दोन्हीही अनैसर्गिक मृत्यूचे प्रकार होत आणि म्हणून या दोन्ही मृत्यूची पोलीस चौकशी ही होतेच! आत्महत्येचे कारण काय, ती स्वतःच्या इच्छेने केलीय की तिला इतर कोणी जबाबदार आहे म्हणजे आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलेय का याची पोलीस चौकशी होते. तसेच खून कोणी केला याची खूनाच्या हेतूसह पोलीस चौकशी होते. या चौकशीत जर कोणी दोषी आढळले तर मग अशा गुन्हेगाराला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला किंवा खून करणाऱ्याला फौजदारी कायद्यानुसार कडक शिक्षा होते! कारण प्रत्येकाला नैसर्गिक जीवन जगण्याचा व तसेच नैसर्गिक मरण्याचा मूलभूत नैसर्गिक अधिकार आहे. पण इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे मरणे हे संवेदनशील आहे कारण अन्नसाखळीत मनुष्याला निसर्गाने त्याच्या उत्क्रांती प्रक्रियेतून सर्वोच्च पातळीवर आणून ठेवलेय.
(२) नैसर्गिक मरणापेक्षा नैसर्गिक जगण्याचा विषय हा मनुष्यासाठी खूप मोठा विषय आहे. माणसाचे नैसर्गिक जगणे हे इतर प्राण्यांच्या नैसर्गिक जगण्यापेक्षा खूप वेगळे आहे. त्याच्या जगण्याला माया, प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च भावनांची व देव, धर्मासारख्या आध्यात्मिक भावनांची जोड आहे. म्हणूनच माणसाचे नैसर्गिक जगणे हे दिवाणी कायद्याने जास्त व फौजदारी कायद्याने कमी नियंत्रित आहे. अनैसर्गिक जगण्याच्या प्रकारात बलात्कारासारख्या अनैसर्गिक लैंगिकतेचा प्रकार येतो व म्हणूनच बलात्कार हा फौजदारी कायद्यानुसार गुन्हा आहे व अशा गुन्ह्यासाठी फौजदारी कायद्यात कडक शिक्षा आहे.
(३) माणसाचे नैसर्गिक जगणे हे फक्त मनुष्य समाजापुरतेच मर्यादित नाही. निसर्गात जे इतर प्राणीमात्र, वनस्पती आहेत त्यांच्या नैसर्गिक जगण्यात मनुष्याने किती लुडबूड करावी व एकंदरीतच नैसर्गिक पर्यावरणाशी मनुष्याने कसे जुळवून घ्यावे हा मोठा विषय माणसाच्या नैसर्गिक जगण्यात येतो. या सर्व नैसर्गिक गोष्टींचा समावेश कायद्याच्या दिवाणी व फौजदारी या दोन प्रमुख शाखांत केला गेला आहे. माणसाचे इतर माणसांबरोबरचे उच्च पातळीवरील नैसर्गिक जगणे म्हणजे काय हा दिवाणी कायद्याचा फार मोठा विशेष भाग आहे.
(४) माणूस हे काही कृत्रिम यंत्र नाही. तो पण एक नैसर्गिक प्राणी आहे. या नैसर्गिक प्राण्याचे नैसर्गिक जगणे व नैसर्गिक मरणे म्हणजे काय हे जर नीट समजून घ्यायचे असेल तर हिमालय पर्वताची उंची, सागराची खोली व पृथ्वीची रूंदी असलेल्या दिवाणी व फौजदारी कायद्यांचा नुसता वरवर नाही तर सखोल अभ्यास करा. कायदा हे माझे फक्त पैसे कमावण्याचे साधन नाही तर तो माझा श्वास आहे, जो श्वास मी प्रत्येक क्षणाला आत घेतो व बाहेर सोडतो. माझे शरीर, माझे मन, माझे जीवन (तन, मन, जीवन) संपूर्णपणे कायद्याने व्यापलेले आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©१९.६.२०२०