आज फादर्स डे निमित्त माझ्या वडिलांना ही भावांजली!
(१) कठीण आहे मला माझ्या वडिलांविषयी शब्दांत व्यक्त होणे, पण तरीही कसाबसा व्यक्त होतोय. सातवीपर्यंत शिकलेले माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघ या मान्यताप्राप्त कामगार युनियनचे पुढारी झाले व काँग्रेसचे तत्कालीन मोठमोठे नेते इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, संगमा, वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्यांच्याबरोबर लहानपणी मी श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील बंगल्यावर व तरूण पणी श्री. वसंतदादा पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर गेलो होतो. मी इयत्ता सातवीत असताना दिल्लीला यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यात गिरणी कामगारांच्या बैठकीत त्या लहान वयातही धाडसाने छोटे भाषण केले होते व ते ऐकून यशवंतराव चव्हाणांनी मला जवळ ओढून घेतले होते. माझ्या वडिलांचे इंदिरा गांधी यांच्याबरोबरही फोटो होते. हे सर्व फोटोंचे पुढे काय झाले, ते कसे गहाळ झाले, माझ्या वडिलांच्या या मौल्यवान आठवणी कुठे आणि कशा अदृश्य झाल्या हे मला कळत नाही. या सर्व आठवणी वरळी बी.डी.डी. चाळीतील माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून मी १९८५ साली डोंबिवली गाठली व डोंबिवलीला पत्नी व मुलीसह वेगळा राहू लागलो. याचे कारण म्हणजे वरळीची १०×१२ फूटाची ती खोली खूप छोटी होती व त्या एवढ्या लहान खोलीत माझा धाकटा भाऊ, धाकटी भावजय यांचे कुटुंब, माझे आईवडील व पुन्हा माझे कुटुंब यांना एकत्र राहणे केवळ अशक्य होते.
(२) तरीही आईवडिलांना मी सोडले नव्हते. तिथे दर आठवड्याला जाऊन त्यांची नुसती वरवर चौकशी नाही तर थोरला मुलगा म्हणून काळजी घेणे हे कर्तव्य मी पार पाडीत होतो. माझे वडील खूप स्वाभिमानी असल्याने त्यांच्या औषधांचा खर्च ते स्वतःच करायचे. मी फक्त आईच्याच औषधपाण्याचा खर्च करायचो. धाकटा भाऊ व भावजय आईवडिलांसोबतच राहत असल्याने त्यांच्या जेवणाची व सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते सर्व जुने फोटो मी माझ्याबरोबर डोंबिवलीला घेऊन आलो नाही. उत्तर भारत सफरीचे वडिलांबरोबरचे माझे खूप फोटो होते. पण ते सर्व गहाळ झाले आहेत. त्यामुळे या लेखासोबत ते फोटो मी दाखवू शकत नाही.
(३) घरात माझ्या वडिलांनी त्यांच्या चारही मुलांना म्हणजे मी थोरला मुलगा, दोन धाकट्या बहिणी व एक सर्वात धाकटा भाऊ या सर्वांना शिक्षण घेण्याची संधी दिली. पण इतर तीनही भावंडे एस.एस.सी. च्या पुढे शिकलीच नाहीत. मी मात्र सातवी पी.एस.सी.ला (प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट) व अकरावी एस.एस.सी. ला (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन पुढे राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली व बी.कॉम.(अॉनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. एवढे उच्च शिक्षण पूर्ण केले व पुढे स्वतःच्या हिंमतीवर वकील झालो.
(४) माझ्या वडिलांना माझ्या शिक्षणाचा, माझ्या धाडसाचा खूप अभिमान होता. पुढारी असल्याने ते ज्या मिल मध्ये नोकरीला होते त्या व्हिक्टोरिया मिलमध्ये त्यांचा दबदबा होता. त्या मिलचे जनरल मॕनेजर सोनाळकर साहेब यांच्यापर्यंत त्यांची उठबस होती. माझ्या वडिलांनी मला एकदा सोनाळकर साहेबांच्या कॕबिनमध्ये रूबाबात नेले होते. तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष वसंतराव होशिंग, जनरल सेक्रेटरी भाई भोसले, संघाचे नंतरचे अध्यक्ष व शालिनीताई पाटील यांचे बंधू मनोहर फाळके यांच्याकडेही मला माझे वडील कौतुकाने घेऊन गेले होते. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांच्याकडेही माहिमला ज्योती सदन बंगल्यावर व नंतर मलबार हिल येथील मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. लहानपणीचा श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावरील माझ्या छोट्या भाषणाचा किस्सा तर वर सांगितलाच आहे.
(५) असे हे माझे वाघासारखे वडील २००९ साली के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आम्हाला कायमचे सोडून गेले त्यावेळी मी खऱ्या अर्थाने निराधार झालो. कारण मी महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री व नंतर काँग्रेसचे खासदार असलेले बॕ. ए. आर. अंतुले यांच्याविरूध्द सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यामुळे टी.व्ही. वर माझे सारखे नाव येऊ लागले होते. त्यातून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर असलेली काळजी, "बाळू, मला न विचारता तू एकट्यानेच एवढे मोठे धाडस का केलेस, आता ही रिट याचिका पुन्हा मागे घेता येईल का" हे मला माझ्या काळजीने सांगणे व नंतर मी न्यूमोनियाने खूप आजारी पडलो तेंव्हा माझ्या काळजीने कासावीस होणे या सर्व गोष्टी माझ्या वडिलांच्या मृत्यूबरोबर संपल्या होत्या.
(६) असा पाठिंबा देणारी एकही व्यक्ती जगात शिल्लक राहिली नव्हती व आताही अशी एकही व्यक्ती या जगात नाही हे मी जाहीरपणे सांगत आहे. आज माझी पत्नी माझ्या सोबत आहे, माझी मुलगीही माझ्यामागे पाठबळ म्हणून उभी आहे. पण माझ्या वडिलांची बरोबरी कोणच करू शकत नाही. माझे वडील हा माझा फार मोठा आधार होतो. तो आधार संपला आणि मी कमकुवत झालो. वकिली सुरू ठेवली पण राजकारणाचा नाद सोडून दिला.
(७) या लेखासोबत डावीकडे आहेत ते माझे वडील व उजवीकडे आहे तो मी त्यांचा मुलगा. आज फादर्स डे निमित्त एवढेच!
-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०