https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, १२ जून, २०२०

नैसर्गिक तेच वैज्ञानिक!

नैसर्गिक तेच वैज्ञानिक!

निसर्ग व देव, भौतिक व आध्यात्मिक, विज्ञान व धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास केल्याने खूप काही शिकायला मिळते. लोक म्हणतात तुलना करू नये. पण मी या विचाराच्या विरूद्ध आहे. माझ्या मते तुलना केल्याशिवाय फरकच कळत नाही. जगातल्या कोणत्याच गोष्टी सारख्या नाहीत व सारख्या नसल्याने त्या समान नाहीत. अशा असमान गोष्टींची तुलना करून त्यांच्यात असलेला मूलभूत फरक शोधून काढल्याशिवाय त्या गोष्टींचे ज्ञान होत नाही. तसेच असमान असूनही या गोष्टी एकत्र कशा राहतात हे कळत नाही म्हणजे त्यांना एकत्र ठेवणारा समान धागा सापडत नाही. याच उत्सुकतेने मी कायद्याचे शिक्षण घेत असतानाच नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागलो. मानव समाज हा निसर्गाचाच एक भाग तरीही तो भाग विशेष म्हणून त्या भागाचे कायदेही विशेष हे मला हा तुलनात्मक अभ्यास करताना कळले. आता कोरोना विषाणूचेच  घ्या! अनेक कोरोना विषाणूंचा एक विशेष वर्ग, पण त्यातही वेगवेगळे प्रकार. सद्या जगाला सतावणारा कोविड-१९ हा या एकाच कोरोना वर्गातून निघालेला नवीन प्रकार. या एकाच वर्गातील वेगवेगळ्या कोरोना विषाणूंचा तुम्ही  तुलनात्मक अभ्यास केल्याशिवाय कोविड-१९ वर तुम्हाला ठराविक औषध किंवा लस कशी सापडणार? म्हणजे निसर्गात विषाणूंचे वर्ग, त्या वर्गातील जाती, पोट जाती असतात का? हा सर्व नैसर्गिक कायदा व सामाजिक कायदा यांच्यातील तुलनात्मक अभ्यासाचाच भाग आहे. या तुलनात्मक अभ्यासाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. अशाच उत्सुकतेपोटी मी निसर्ग व देव, भौतिक व आध्यात्मिक, विज्ञान व धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागलो. माझ्या या अभ्यासात मूलभूत मुद्दा हाच आहे की आईबाप असल्याशिवाय मुले होत नाहीत. तो जो काही टेस्ट ट्यूब बेबीचा कृत्रिम गर्भधारणेचा प्रकार आहे ना त्यातही परीक्षा नलिकेत मूल तयार होण्यासाठी स्त्री बीज व पुरूष बीज यांचे मिलन व फलन घडवून आणावे लागते. मग माझ्या डोक्यात हाच विचार कायम चालू आहे की आईबापाशिवाय मूल नाही तर निसर्गाचा कोणी आईबापच नाही का? म्हणजे निसर्ग नावाच्या भल्यामोठ्या अवाढव्य पसरलेल्या झाडाला त्या झाडाचे मूळच नाही, त्याला बूडच नाही? म्हणजे खाली पाया नसताना निसर्गाची इमारत उभी? हे कसे शक्य आहे? हे माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला पटत नाही आणि म्हणून मग देव ही संकल्पना मला सोडत नाही. मग मी निसर्गाचे मूळ किंवा बूड म्हणजे देव या संकल्पनेला घट्ट पकडून ठेवतो व त्यामुळे आस्तिक होतो. मी वनस्पती शास्त्रात हेच वाचले आहे व नंतरही प्रत्यक्षात हेच पाहिले आहे की झाडाचा वरचा भाग म्हणजे त्याचा शेंडा व त्याच्या फांद्या. पण त्याच्या तळाच्या भागाला खोड किंवा खुंट म्हणतात आणि या खोडाची मुळे आत जमिनीत खोलवर व सर्वदूर पसरलेली असतात. शेंडा नाही ना बुडखा नाही असे झाड कोणी बघितलेय काय? माझ्या मते आपण निसर्गाचा फक्त वरचा भाग विज्ञानाच्या माध्यमातून अभ्यासत आहोत व याच वरवरच्या अभ्यासावर आपले तंत्रज्ञान उभे आहे. आपले विज्ञान अजूनही निसर्गाच्या बुडाशी किंवा मुळाशी पोहचलेले नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. पण मग हे मूळ कसे असावे? या प्रश्नातूनच मग तर्कवितर्क सुरू होतात. मी सद्या तरी निसर्गाचे मूळ किंवा बूड म्हणजे निसर्गाची अलौकिक शक्ती असे धरून चाललोय. ही मूळ अलौकिक शक्ती म्हणजेच देव अशी माझी स्वतःपुरती मर्यादित असलेली आस्तिक धारणा किंवा संकल्पना आहे. पण मला जर कोणी नास्तिकाने सांगितले की "चल, तू मानतो ना देवाला मग तो देव किंवा त्याची ती अलौकिक शक्ती पुराव्यानिशी सिद्ध करून दाखव"! तर मी निसर्गाच्या बुडाशी मानलेले देवाचे मूळ सिद्ध करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग नास्तिकांशी वादविवाद सुरू होतात. मग मी म्हणतो की जगात वासने बरोबर प्रेमही आहे. वासना ही लैंगिक क्रियेने सिद्ध करून दाखवता येईल पण प्रेमाचा पुरावा कसा देता येणार? पण तरीही प्रेम हे सत्य आहे की नाही? सर्वच नैसर्गिक गोष्टी सिद्ध करता येतात का? म्हणून निसर्गाचे मूळ असलेला देव ही पण नैसर्गिक गोष्ट असूनही ती सिद्ध करता येत नाही, वगैरे वगैरे. मग पुढे वासना व प्रेम या दोन्हीही नैसर्गिक म्हणजे निसर्गातून निर्माण झालेल्या गोष्टींची अनुक्रमे भौतिक व आध्यात्मिक अशी विभागणी केली जाते. मग पुढे वासना भौतिक म्हणून वासनेचे भौतिक विज्ञान पुढे येते तर प्रेम आध्यात्मिक म्हणून प्रेमाचा आध्यात्मिक धर्म पुढे येतो. ही विभागणी फक्त आपल्या बुद्धीला या दोन गोष्टींतला तुलनात्मक फरक कळावा यासाठीच आहे हे लक्षात घ्यायला हवे. पण मूलतः वासना व प्रेम या दोन्ही गोष्टी नैसर्गिक आहेत आणि म्हणूनच नैसर्गिक सत्य या अर्थाने त्या वैज्ञानिक आहेत. याच भूमिकेतून माझ्या मते निसर्ग व देव या दोन गोष्टी वरवर वेगळ्या भासत असल्या तरी मूलतः त्या नैसर्गिक व म्हणूनच वैज्ञानिक आहेत. नैसर्गिक तेच वैज्ञानिक हेच मला म्हणायचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

गुरुवार, ११ जून, २०२०

कोरोना लॉकडाऊन!

डोके चक्रावून गेलेय कोरोना मुळे व त्याच्या लॉकडाऊन मुळे!

माध्यमातून या कोरोना विषयीच्या उलट सुलट चर्चा ऐकून आता खूप कंटाळा आला. किती दिवस तेच तेच ऐकवत आम्हाला घरी कोंडून ठेवणार? लॉकडाऊन थोडा सैल केला म्हणून लोक गर्दी करू लागले म्हणून काय तुम्ही पुन्हा लॉकडाऊन वाढवणार आहात? आम्हाला तुम्ही का घाबरवत आहात? जनतेवर सगळा दोष टाकून देऊन तुमच्या नियोजनातील दोष तुम्ही का लपवून ठेवीत आहात? तुमच्या ढिसाळ कारभारामुळे सिरियस पेशंटस मेले त्यांच्या मृत्यूची तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहात का? रूग्णालयात सिरियस पेशंटनाच अॕडमिट करतात ना! त्यांची नीट सोय करता येत नाही आणि म्हणे लोकांना कोरोना होऊच नये म्हणून सगळ्यांची काळजी घेणार! कोरोनामुळे फारच थोडे लोक मरतात व तेही त्यांना इतर सिरियस आजार असल्यामुळे अशा बातम्या माध्यमातून आम्ही ऐकत आहोत. मग सगळे कोरोनावरच ढकलून मोकळे का होताय? कोरोना होऊनही हजारो लोक जर ठणठणीत रहात असतील व तो शरीरात घुसला तरी साध्या औषधांनी बरे होत असतील तर मग आम्हाला त्या कोरोनाची एवढी भीती तुम्ही का दाखवत आहात? इथे आमचा घरी बसूनच जीव चाललाय हे तुम्हाला कसे कळत नाही. जवळजवळ तीन महिने लॉकडाऊन केलात, मग गेला का हा कोरोना पळून? नाहीच जाणार तो जोपर्यंत त्याच्यावर लस निघत नाही तोपर्यंत. मग त्याला अंगावर घेऊनच प्रतिकारशक्ती वाढवत नको का आम्ही पोटापाण्याची कामे करायला? आता तरी तो बंद केलेला लॉक ओपन करा हो! तो लॉक ओपन करताना नीट नियोजन करून उघडा एवढीच आमची किमान अपेक्षा आहे. लोक कामासाठी बाहेर पडतील तेंव्हा त्यांच्यासाठी पूर्ण क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुली करा. मुंबईतील सर्व बसेस रस्त्यावर येऊ द्या व सर्व लोकल्स रेल्वे रूळांवरून धावू द्या. मोठी गर्दी होणार म्हणून का हे तुम्ही थांबवू शकणार आहात? गर्दी होणारच आणि गर्दीत मिसळलेला कोरोना लोकांना होणारच. त्याचा प्रसार आता रोखताच येणार नाही. मग मास्क लावा, जमेल तेवढे सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना देऊन लोकांना जाऊद्या ना आता तरी कामावर! डोके चक्रावून गेलेय कोरोनामुळे आणि त्याच्या लॉकडाऊन मुळे!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

SHARING CARING CAUTION NOTICE

समाज माध्यमावरील शेअरिंग (SHARING) बद्दल केयरिंग (CARING) करण्याबाबतचे महत्वपूर्ण निवेदन!

समाज माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची पडताळणी करणे शक्य होत नसल्याने अशा माहितीवर विसंबून कृपया कोणतीही कृती करू नका. अशा माहितीची प्रत्यक्ष शहानिशा करून ती खरी की खोटी हे तपासण्याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. अशी खबरदारी न घेता अशा माहितीच्या आधारे केलेल्या कोणत्याही कृतीमुळे किंवा कोणत्याही व्यवहारामुळे जर कोणाचे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान झाले किंवा हानी झाली तर मी शेअरकर्ता त्यास जबाबदार राहणार नाही तर तो वापरकर्ताच त्यास पूर्णतः जबाबदार राहील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०


गावगप्पा!

समाज माध्यमावरील गावगप्पा!

(१) लोकांना तुमच्या ज्ञानाचे, विचाराचे काहीही पडलेले नाही. त्यांना त्यांच्या पोटापाण्याचे पडलेले आहे. आता जर ९८% लोक याच विचाराचे असतील तर मग त्यांच्यापुढे तुम्ही कसल्या गप्पा मारल्या पाहिजेत? शाळेतील मूलभूत शिक्षण, कॉलेजचे उच्च शिक्षण, त्यापुढील अती उच्च पदव्युत्तर शिक्षण आणि मग त्यापुढचा प्रगल्भ व्यावसायिक अनुभव एवढा मोठा प्रचंड ज्ञान पसारा डोक्यात घेऊन एखादी व्यक्ती समाज माध्यमावर तिचे विशेष ज्ञान व विशेष अनुभव व्यक्त करू लागली तर काय होईल? अशावेळी ९८% लोक जे सर्वसाधारण वर्गातले असतात म्हणजे यातून आपला फायदा काय याच संकुचित विचाराचे असतात त्यांच्या कडून विशेष अभिव्यक्तीवर लाईक्स त्या किती मिळणार व प्रतिक्रिया त्या किती येणार?

(२) हाच सर्वसाधारण अनुभव मी समाज माध्यमावर सातत्याने घेत आहे. मी माझ्या बाथरूम फेम गाण्याचा, वाकड्यातिकड्या नृत्याचा टिकटॉक व्हिडिओ किंवा गार्डन मध्ये फिरतानाचा माझा फोटो फेसबुक वर टाकला तर माझे लायक्स वाढतात. अशा करमणूक प्रधान पोस्टसवर प्रोत्साहनपर प्रतिक्रियाही येतात. हा समाज माध्यमावरील माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

(३) किती लोक जगाचे ज्ञान मिळविण्याच्या  ध्यासाने शिक्षणाला जवळ करतात? बहुसंख्य लोकांना शिक्षण हे पैसा कमावण्याचे साधन म्हणूनच हवे असते. साधा तांत्रिक डिप्लोमा घेऊन तुमची मासिक प्राप्ती ३०००० रूपये असेल व उच्च, अती उच्च शिक्षण घेऊन तुमची मासिक प्राप्ती फक्त १०००० रूपये एवढीच असेल तर जास्तीत जास्त लोक अल्प शिक्षण घेऊन सुखी राहण्याचा पर्याय स्वीकारतील. मी मात्र दुसरा पर्याय स्वीकारेन, नव्हे तोच पर्याय मी स्वीकारलाय. पैसा कमी चालेल पण ज्ञानात मी मागे असता कामा नये याच विचाराने मी जगलो आणि जगतोय. ज्ञानसाधनेला वाहून घेतलेला माझ्यासारखा माणूस मुळातच लोकांना आवडत नाही. कारण तो सर्वसाधारण विचार करणाऱ्या ९८% लोकांच्या विरूद्ध वागत असतो.

(४) हे सर्व माहित असूनही मी समाज माध्यम जवळ केले. कारण अशा माध्यमावर ९८% लोक हे निव्वळ करमणूकीसाठी फेरफटका मारायला येत असले तरी २% लोक हे माझे खरे चाहते असतात. याच २% लोकांसाठी मी समाज माध्यमावर व्यक्त होत असतो. मग इतरांनी माझ्या पोस्टसकडे ढुंकूनही बघितले नाही तरी मला त्याचे काही वाटत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

एकाच दगडावर पाय!

एकाच दगडावर पाय!

अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या बुडाशी किंवा मुळाशी देव आहे याच तार्किक संकल्पनेवर माझी आस्तिकता उभी आहे. पण देवाचे अस्तित्व मानणाऱ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यासारख्या अनेक धर्मात या बुडाविषयी किंवा मुळाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. देवाची प्रार्थना करण्याच्या अनेक धर्माच्या अनेक पद्धती वेगळ्या आहेत. त्यांची तत्वेही वेगळी आहेत. पण प्रत्येक धर्मात काहीना काहीतरी सर्वसमावेशक अशा चांगल्या पद्धती आहेत, चांगली तत्वे आहेत. म्हणूनच माझा जन्मधर्म जरी हिंदू असला तरी इतर धर्माचे मला आवडणारे विचार मी जवळ घेतो. माझे हे असे इतर धर्माना जवळ घेणे त्या धर्मातील काही लोकांना आवडत नाही व हिंदू धर्मातील काही लोकांना पण आवडत नाही. माझ्या या अशा वागण्याची तिकडचे व इकडचे म्हणजे  दोन्हीकडचे लोक ढोंगी सर्वधर्मसमभाव म्हणून हेटाळणी करतात. काहीजण तर म्हणतात की, मी एका दगडावर पाय ठेवायचा सोडून दोन नाही तर अनेक दगडांवर पाय ठेवून चाललोय.  नास्तिक लोकांशी तर माझे पटणे अशक्यच आहे. कारण ते निसर्गाच्या बुडालाच मानायला तयार नाहीत. मला या लेखातून सर्वांना एवढेच सांगायचे आहे की मी एकाच दगडावर पाय ठेऊन आहे आणि तो म्हणजे निसर्गाचे बूड किंवा मूळ अर्थात देव!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

आभासी सत्य!

आभासातही सत्य असू शकते!

अॉनलाईन संवादात लांबचा माणूस जवळ नसताना तो आपल्या जवळ असल्यासारखा व जवळ राहून आपल्याशी बोलत असल्यासारखा आभास होतो. पण या आभासातही सत्य हेच असते की अॉनलाईन संवाद करणारा तो माणूस तिकडे प्रत्यक्षात हजर असतो. म्हणजे त्या व्यक्तीचे अस्तित्व सत्य असते. पूर्वी पोस्टाचा पत्रव्यवहार चालायचा. पत्रातील शब्दांत पत्र पाठवणारी व्यक्ती दिसायची. जणू काही ती आपल्याशी प्रत्यक्षात बोलतच आहे असा आभास व्हायचा. पण अशा आभासातही सत्य हेच असायचे की पत्र पाठवणारी ती व्यक्ती तिकडे प्रत्यक्षात आहे. याचाच अर्थ हा आहे की जगातील काही आभासी गोष्टी या सत्यच असतात. त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत हेही पुराव्यानिशी सिद्ध करता येते. पण देवाचे अस्तित्व तर अशा पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही. तरीही माझ्यासारख्या आस्तिकाला देवाचे अस्तित्व निसर्गात पदोपदी जाणवते. असे जाणवणे हा पुराव्याने सिद्ध करता न येणारा आभास असतो. पण म्हणून काय अशी जाणीव असत्य मानायची? आपले आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरील प्रेम प्रत्यक्ष मोजमाप घेऊन काटेकोर पुराव्याने सिद्ध करता येत नाही म्हणून काय ते खोटे मानायचे?

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

कचरा माझा सांगाती!

कचरा माझा सांगाती!

(१) निसर्गाने निर्माण केलेल्या जगातील सर्व सुंदर गोष्टींतून टाकावू कचरा निर्माण होतो. पण हा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न माणसापुढे निर्माण झाला तेंव्हा त्याचे उत्तरही निसर्गानेच दिले. एका बाजूने निर्माण केलेल्या माझ्या चांगल्या गोष्टींतून तुम्ही निर्माण केलेला वाईट कचरा शेवटी दुसऱ्या बाजूने मीच आत घेणार पण कचरा सामावून घेण्याची माझी ती दुसरी बाजू तुम्ही नीट समजून घ्या, असे निसर्गाने माणसाला सांगून टाकले व माणसाच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

(२) निसर्ग त्याच्या एका नाकपुडीतून श्वास बाहेर सोडतो तेंव्हा त्या बाह्य श्वासाने चांगल्या गोष्टी निर्माण करतो. पण बाहेर पडलेल्या त्या चांगल्या गोष्टींतून निसर्गानेच निर्माण केलेले सजीव जेंव्हा कचरा तयार करतात तेंव्हा त्या कचऱ्याने निसर्गाच्या पर्यावरणात विषारी प्रदूषण कायम राहू नये म्हणून निसर्ग त्याच्या दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत घेतो व त्या अंतर्श्वासाने तो कचरा आत घेऊन कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करून त्या कचऱ्यातून चांगल्या गोष्टींची निर्मिती करीत बाह्य श्वासाने त्या चांगल्या गोष्टी पर्यावरणात सोडतो. ही प्रक्रिया निरंतर चक्राकार सुरू आहे.

(३) पण पुन्हा प्रश्न अती बुद्धीमान माणसाच्या अक्कलेचा! माणसाला कचरा शोषून घेणाऱ्या  निसर्गाच्या अंतर्श्वासाची ती नाकपुडीच सापडत नाही. मग माणूस पर्यावरणातला दूषित कचरा निसर्गाच्या बाह्य श्वास नाकपुडीतच कोंबण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, समुद्र ओला आहे तर मग ओला कचरा स्वतंत्र नाल्यामार्फत त्या समुद्रात सोडला पाहिजे व जमीन सुकी आहे तर मग सुका कचरा सुक्या जमिनीवरच सुक्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड वर जमा करून त्या सुक्या कचऱ्याची जमिनीवरच पुनःप्रक्रिया केली पाहिजे की नको! पण डॉक्टरांना जशी कधीकधी पेशंटची नस सापडत नाही तशी माणसालाही निसर्गाच्या अंतर्श्वासाची नाकपुडी सापडत नाही. मग होते काय की अती शहाणा माणूस पर्यावरणातील ओला व सुका कचरा एकत्रितपणे स्वच्छ पाणी देणाऱ्या नद्यांत बिनधास्तपणे फेकून देतो आणि त्या नद्यांचेच नाले करून टाकतो. मग स्वच्छ पाणी कुठून मिळणार? पाण्याचेच काय पण हा माणूस हवेतही विषारी वायू सोडून देऊन शुध्द हवाही प्रदूषित करून टाकतो.

(४) गंमत ही की निसर्गाची ही साधी गोष्ट समजण्यासाठी माणसाला मोठमोठया कचरा नियोजन, कचरा प्रक्रिया, नदी स्वच्छता इत्यादी  तज्ज्ञांची गरज लागते. सरकारचे स्वच्छता अभियान हा त्यातलाच एक भाग! पण आपण फक्त या पदार्थ कचऱ्याच्याच नियोजनाविषयी का बोलावे? माणसाच्या मनात नकारात्मक भावनांचा, निरर्थक विचारांचा जो मानसिक कचरा दररोज तयार होतो त्याचे काय करायचे? तो कचरा कुठे नेऊन टाकायचा? आत्मचिंतन करून तो मानसिक कचरा प्रत्येकाला स्वतःच स्वतःच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून नष्ट करता येईल का जेणेकरून मानवाचे सामाजिक पर्यावरण बिघडणार नाही! कचरा विलगीकरण मुद्यावरून राजकारण तापत असताना माझ्या डोक्यात हा सरळ साधा विचार आला आणि आज मी तो तुमच्यापुढे मांडला!

-ॲड.बी.एस.मोरे©११.६.२०२०