https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ११ जून, २०२०

कोरोना लॉकडाऊन!

डोके चक्रावून गेलेय कोरोना मुळे व त्याच्या लॉकडाऊन मुळे!

माध्यमातून या कोरोना विषयीच्या उलट सुलट चर्चा ऐकून आता खूप कंटाळा आला. किती दिवस तेच तेच ऐकवत आम्हाला घरी कोंडून ठेवणार? लॉकडाऊन थोडा सैल केला म्हणून लोक गर्दी करू लागले म्हणून काय तुम्ही पुन्हा लॉकडाऊन वाढवणार आहात? आम्हाला तुम्ही का घाबरवत आहात? जनतेवर सगळा दोष टाकून देऊन तुमच्या नियोजनातील दोष तुम्ही का लपवून ठेवीत आहात? तुमच्या ढिसाळ कारभारामुळे सिरियस पेशंटस मेले त्यांच्या मृत्यूची तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहात का? रूग्णालयात सिरियस पेशंटनाच अॕडमिट करतात ना! त्यांची नीट सोय करता येत नाही आणि म्हणे लोकांना कोरोना होऊच नये म्हणून सगळ्यांची काळजी घेणार! कोरोनामुळे फारच थोडे लोक मरतात व तेही त्यांना इतर सिरियस आजार असल्यामुळे अशा बातम्या माध्यमातून आम्ही ऐकत आहोत. मग सगळे कोरोनावरच ढकलून मोकळे का होताय? कोरोना होऊनही हजारो लोक जर ठणठणीत रहात असतील व तो शरीरात घुसला तरी साध्या औषधांनी बरे होत असतील तर मग आम्हाला त्या कोरोनाची एवढी भीती तुम्ही का दाखवत आहात? इथे आमचा घरी बसूनच जीव चाललाय हे तुम्हाला कसे कळत नाही. जवळजवळ तीन महिने लॉकडाऊन केलात, मग गेला का हा कोरोना पळून? नाहीच जाणार तो जोपर्यंत त्याच्यावर लस निघत नाही तोपर्यंत. मग त्याला अंगावर घेऊनच प्रतिकारशक्ती वाढवत नको का आम्ही पोटापाण्याची कामे करायला? आता तरी तो बंद केलेला लॉक ओपन करा हो! तो लॉक ओपन करताना नीट नियोजन करून उघडा एवढीच आमची किमान अपेक्षा आहे. लोक कामासाठी बाहेर पडतील तेंव्हा त्यांच्यासाठी पूर्ण क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुली करा. मुंबईतील सर्व बसेस रस्त्यावर येऊ द्या व सर्व लोकल्स रेल्वे रूळांवरून धावू द्या. मोठी गर्दी होणार म्हणून का हे तुम्ही थांबवू शकणार आहात? गर्दी होणारच आणि गर्दीत मिसळलेला कोरोना लोकांना होणारच. त्याचा प्रसार आता रोखताच येणार नाही. मग मास्क लावा, जमेल तेवढे सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना देऊन लोकांना जाऊद्या ना आता तरी कामावर! डोके चक्रावून गेलेय कोरोनामुळे आणि त्याच्या लॉकडाऊन मुळे!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

SHARING CARING CAUTION NOTICE

समाज माध्यमावरील शेअरिंग (SHARING) बद्दल केयरिंग (CARING) करण्याबाबतचे महत्वपूर्ण निवेदन!

समाज माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची पडताळणी करणे शक्य होत नसल्याने अशा माहितीवर विसंबून कृपया कोणतीही कृती करू नका. अशा माहितीची प्रत्यक्ष शहानिशा करून ती खरी की खोटी हे तपासण्याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. अशी खबरदारी न घेता अशा माहितीच्या आधारे केलेल्या कोणत्याही कृतीमुळे किंवा कोणत्याही व्यवहारामुळे जर कोणाचे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान झाले किंवा हानी झाली तर मी शेअरकर्ता त्यास जबाबदार राहणार नाही तर तो वापरकर्ताच त्यास पूर्णतः जबाबदार राहील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०


गावगप्पा!

समाज माध्यमावरील गावगप्पा!

(१) लोकांना तुमच्या ज्ञानाचे, विचाराचे काहीही पडलेले नाही. त्यांना त्यांच्या पोटापाण्याचे पडलेले आहे. आता जर ९८% लोक याच विचाराचे असतील तर मग त्यांच्यापुढे तुम्ही कसल्या गप्पा मारल्या पाहिजेत? शाळेतील मूलभूत शिक्षण, कॉलेजचे उच्च शिक्षण, त्यापुढील अती उच्च पदव्युत्तर शिक्षण आणि मग त्यापुढचा प्रगल्भ व्यावसायिक अनुभव एवढा मोठा प्रचंड ज्ञान पसारा डोक्यात घेऊन एखादी व्यक्ती समाज माध्यमावर तिचे विशेष ज्ञान व विशेष अनुभव व्यक्त करू लागली तर काय होईल? अशावेळी ९८% लोक जे सर्वसाधारण वर्गातले असतात म्हणजे यातून आपला फायदा काय याच संकुचित विचाराचे असतात त्यांच्या कडून विशेष अभिव्यक्तीवर लाईक्स त्या किती मिळणार व प्रतिक्रिया त्या किती येणार?

(२) हाच सर्वसाधारण अनुभव मी समाज माध्यमावर सातत्याने घेत आहे. मी माझ्या बाथरूम फेम गाण्याचा, वाकड्यातिकड्या नृत्याचा टिकटॉक व्हिडिओ किंवा गार्डन मध्ये फिरतानाचा माझा फोटो फेसबुक वर टाकला तर माझे लायक्स वाढतात. अशा करमणूक प्रधान पोस्टसवर प्रोत्साहनपर प्रतिक्रियाही येतात. हा समाज माध्यमावरील माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

(३) किती लोक जगाचे ज्ञान मिळविण्याच्या  ध्यासाने शिक्षणाला जवळ करतात? बहुसंख्य लोकांना शिक्षण हे पैसा कमावण्याचे साधन म्हणूनच हवे असते. साधा तांत्रिक डिप्लोमा घेऊन तुमची मासिक प्राप्ती ३०००० रूपये असेल व उच्च, अती उच्च शिक्षण घेऊन तुमची मासिक प्राप्ती फक्त १०००० रूपये एवढीच असेल तर जास्तीत जास्त लोक अल्प शिक्षण घेऊन सुखी राहण्याचा पर्याय स्वीकारतील. मी मात्र दुसरा पर्याय स्वीकारेन, नव्हे तोच पर्याय मी स्वीकारलाय. पैसा कमी चालेल पण ज्ञानात मी मागे असता कामा नये याच विचाराने मी जगलो आणि जगतोय. ज्ञानसाधनेला वाहून घेतलेला माझ्यासारखा माणूस मुळातच लोकांना आवडत नाही. कारण तो सर्वसाधारण विचार करणाऱ्या ९८% लोकांच्या विरूद्ध वागत असतो.

(४) हे सर्व माहित असूनही मी समाज माध्यम जवळ केले. कारण अशा माध्यमावर ९८% लोक हे निव्वळ करमणूकीसाठी फेरफटका मारायला येत असले तरी २% लोक हे माझे खरे चाहते असतात. याच २% लोकांसाठी मी समाज माध्यमावर व्यक्त होत असतो. मग इतरांनी माझ्या पोस्टसकडे ढुंकूनही बघितले नाही तरी मला त्याचे काही वाटत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

एकाच दगडावर पाय!

एकाच दगडावर पाय!

अवाढव्य पसरलेल्या निसर्गाच्या बुडाशी किंवा मुळाशी देव आहे याच तार्किक संकल्पनेवर माझी आस्तिकता उभी आहे. पण देवाचे अस्तित्व मानणाऱ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यासारख्या अनेक धर्मात या बुडाविषयी किंवा मुळाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. देवाची प्रार्थना करण्याच्या अनेक धर्माच्या अनेक पद्धती वेगळ्या आहेत. त्यांची तत्वेही वेगळी आहेत. पण प्रत्येक धर्मात काहीना काहीतरी सर्वसमावेशक अशा चांगल्या पद्धती आहेत, चांगली तत्वे आहेत. म्हणूनच माझा जन्मधर्म जरी हिंदू असला तरी इतर धर्माचे मला आवडणारे विचार मी जवळ घेतो. माझे हे असे इतर धर्माना जवळ घेणे त्या धर्मातील काही लोकांना आवडत नाही व हिंदू धर्मातील काही लोकांना पण आवडत नाही. माझ्या या अशा वागण्याची तिकडचे व इकडचे म्हणजे  दोन्हीकडचे लोक ढोंगी सर्वधर्मसमभाव म्हणून हेटाळणी करतात. काहीजण तर म्हणतात की, मी एका दगडावर पाय ठेवायचा सोडून दोन नाही तर अनेक दगडांवर पाय ठेवून चाललोय.  नास्तिक लोकांशी तर माझे पटणे अशक्यच आहे. कारण ते निसर्गाच्या बुडालाच मानायला तयार नाहीत. मला या लेखातून सर्वांना एवढेच सांगायचे आहे की मी एकाच दगडावर पाय ठेऊन आहे आणि तो म्हणजे निसर्गाचे बूड किंवा मूळ अर्थात देव!

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

आभासी सत्य!

आभासातही सत्य असू शकते!

अॉनलाईन संवादात लांबचा माणूस जवळ नसताना तो आपल्या जवळ असल्यासारखा व जवळ राहून आपल्याशी बोलत असल्यासारखा आभास होतो. पण या आभासातही सत्य हेच असते की अॉनलाईन संवाद करणारा तो माणूस तिकडे प्रत्यक्षात हजर असतो. म्हणजे त्या व्यक्तीचे अस्तित्व सत्य असते. पूर्वी पोस्टाचा पत्रव्यवहार चालायचा. पत्रातील शब्दांत पत्र पाठवणारी व्यक्ती दिसायची. जणू काही ती आपल्याशी प्रत्यक्षात बोलतच आहे असा आभास व्हायचा. पण अशा आभासातही सत्य हेच असायचे की पत्र पाठवणारी ती व्यक्ती तिकडे प्रत्यक्षात आहे. याचाच अर्थ हा आहे की जगातील काही आभासी गोष्टी या सत्यच असतात. त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत हेही पुराव्यानिशी सिद्ध करता येते. पण देवाचे अस्तित्व तर अशा पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही. तरीही माझ्यासारख्या आस्तिकाला देवाचे अस्तित्व निसर्गात पदोपदी जाणवते. असे जाणवणे हा पुराव्याने सिद्ध करता न येणारा आभास असतो. पण म्हणून काय अशी जाणीव असत्य मानायची? आपले आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरील प्रेम प्रत्यक्ष मोजमाप घेऊन काटेकोर पुराव्याने सिद्ध करता येत नाही म्हणून काय ते खोटे मानायचे?

-ॲड.बी.एस.मोरे©१२.६.२०२०

कचरा माझा सांगाती!

कचरा माझा सांगाती!

(१) निसर्गाने निर्माण केलेल्या जगातील सर्व सुंदर गोष्टींतून टाकावू कचरा निर्माण होतो. पण हा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न माणसापुढे निर्माण झाला तेंव्हा त्याचे उत्तरही निसर्गानेच दिले. एका बाजूने निर्माण केलेल्या माझ्या चांगल्या गोष्टींतून तुम्ही निर्माण केलेला वाईट कचरा शेवटी दुसऱ्या बाजूने मीच आत घेणार पण कचरा सामावून घेण्याची माझी ती दुसरी बाजू तुम्ही नीट समजून घ्या, असे निसर्गाने माणसाला सांगून टाकले व माणसाच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

(२) निसर्ग त्याच्या एका नाकपुडीतून श्वास बाहेर सोडतो तेंव्हा त्या बाह्य श्वासाने चांगल्या गोष्टी निर्माण करतो. पण बाहेर पडलेल्या त्या चांगल्या गोष्टींतून निसर्गानेच निर्माण केलेले सजीव जेंव्हा कचरा तयार करतात तेंव्हा त्या कचऱ्याने निसर्गाच्या पर्यावरणात विषारी प्रदूषण कायम राहू नये म्हणून निसर्ग त्याच्या दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत घेतो व त्या अंतर्श्वासाने तो कचरा आत घेऊन कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करून त्या कचऱ्यातून चांगल्या गोष्टींची निर्मिती करीत बाह्य श्वासाने त्या चांगल्या गोष्टी पर्यावरणात सोडतो. ही प्रक्रिया निरंतर चक्राकार सुरू आहे.

(३) पण पुन्हा प्रश्न अती बुद्धीमान माणसाच्या अक्कलेचा! माणसाला कचरा शोषून घेणाऱ्या  निसर्गाच्या अंतर्श्वासाची ती नाकपुडीच सापडत नाही. मग माणूस पर्यावरणातला दूषित कचरा निसर्गाच्या बाह्य श्वास नाकपुडीतच कोंबण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, समुद्र ओला आहे तर मग ओला कचरा स्वतंत्र नाल्यामार्फत त्या समुद्रात सोडला पाहिजे व जमीन सुकी आहे तर मग सुका कचरा सुक्या जमिनीवरच सुक्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड वर जमा करून त्या सुक्या कचऱ्याची जमिनीवरच पुनःप्रक्रिया केली पाहिजे की नको! पण डॉक्टरांना जशी कधीकधी पेशंटची नस सापडत नाही तशी माणसालाही निसर्गाच्या अंतर्श्वासाची नाकपुडी सापडत नाही. मग होते काय की अती शहाणा माणूस पर्यावरणातील ओला व सुका कचरा एकत्रितपणे स्वच्छ पाणी देणाऱ्या नद्यांत बिनधास्तपणे फेकून देतो आणि त्या नद्यांचेच नाले करून टाकतो. मग स्वच्छ पाणी कुठून मिळणार? पाण्याचेच काय पण हा माणूस हवेतही विषारी वायू सोडून देऊन शुध्द हवाही प्रदूषित करून टाकतो.

(४) गंमत ही की निसर्गाची ही साधी गोष्ट समजण्यासाठी माणसाला मोठमोठया कचरा नियोजन, कचरा प्रक्रिया, नदी स्वच्छता इत्यादी  तज्ज्ञांची गरज लागते. सरकारचे स्वच्छता अभियान हा त्यातलाच एक भाग! पण आपण फक्त या पदार्थ कचऱ्याच्याच नियोजनाविषयी का बोलावे? माणसाच्या मनात नकारात्मक भावनांचा, निरर्थक विचारांचा जो मानसिक कचरा दररोज तयार होतो त्याचे काय करायचे? तो कचरा कुठे नेऊन टाकायचा? आत्मचिंतन करून तो मानसिक कचरा प्रत्येकाला स्वतःच स्वतःच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून नष्ट करता येईल का जेणेकरून मानवाचे सामाजिक पर्यावरण बिघडणार नाही! कचरा विलगीकरण मुद्यावरून राजकारण तापत असताना माझ्या डोक्यात हा सरळ साधा विचार आला आणि आज मी तो तुमच्यापुढे मांडला!

-ॲड.बी.एस.मोरे©११.६.२०२०

बुधवार, १० जून, २०२०

एक होती मावशी!

एक होती मावशी!

(१) एक होती मावशी, कृष्णाबाई माणिक भोसले तिचे संपूर्ण नाव, पण सगळ्यांची ती किसाबाई!  या मावशीचा नवरा अकाली वारला आणि कोणाचाही आधार नसलेल्या माझ्या या मावशीने आसरा घेतला तो वरळीच्या आमच्या घराचा! तान्ह्या बाळाला घेऊन ही मावशी आमच्या वरळीच्या घरी रहायला आली. ते तान्हे बाळ म्हणजे माझी मावस बहीण, माझी ताई!  मावशीला तिच्या सख्ख्या बहिणीचा म्हणजे माझ्या आईचा आधार वाटला याचे कारण म्हणजे दोघीही बहिणी बहिणी त्यांच्या आईवडिलांच्या जीव की प्राण होत्या. त्यांना भाऊ झालाच नाही. मग या दोन बहिणीच माझ्या आजोबा व आजीची दोन मुले झाली. माझ्या मावशीचे नाव होते कृष्णाबाई तर माझ्या आईचे नाव चंद्रभागा! पण या मुलींनाच माझ्या आजोबांनी मुले मानली व त्यांची लाडाने टोपण नावे ठेवली ती मुलांचीच. मावशी कृष्णाबाईचे नाव झाले किशाबापू तर आई चंद्रभागेचे नाव झाले चंदाबापू! त्या स्वातंत्र्यपूर्व काळात माझे आजोबा अशिक्षित असले तरी मनाने असे आधुनिक विचाराचे होते.

(२) सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्टेशनच्या अलिकडे व केम स्टेशनच्या पलिकडे असलेले ढवळस गाव हे माझे आजोळ! त्या गावच्या छोट्या डोंगरावर असलेली अंबाबाई हे तिथले ग्रामदैवत! या देवीच्या कुशीतच माझी मावशी व माझी आई या बहिणी वाढल्या. त्या एकत्र वाढल्या आणि म्हणूनच आयुष्यभराच्या कायम मैत्रिणी राहिल्या. माझ्या मावशीने म्हणूनच धाकट्या बहिणीच्या म्हणजे माझ्या आईच्या घराला आधार मानला. मी माझ्या आईचा थोरला मुलगा त्यामुळे धाकटे असण्याचा आनंद मला दिला तो माझ्या ताईने! हिराताई ही माझी मावस बहीण पण आमच्या घरात तिला थोरली मुलगी म्हणूनच वाढवले गेले. माझी ताई खूप गोड व शांत स्वभावाची जशी माझी मावशी! ही ताई माझी मावस बहीण, पण सख्ख्या बहिणी पेक्षाही जास्त ती माझ्या जवळची होती.

(३) माझी ही मावशी व माझी आई या दोघींनी आमच्या वरळीच्या घरात गिरणी कामगार व वरळी पोलीस यांच्यासाठी खाणावळ घातली होती. खूप कष्ट घेतले दोघी बहिणींनी त्या खाणावळीत. पण खाणावळ नुकसानीत गेली व मावशीसह आमची रवानगी माझ्या वडिलांनी पंढरपूरला केली. साधारण १९६३ चा तो काळ होता. मी त्यावेळी सहा वर्षाचा होतो. सांगोला रोडवरील संतपेठेतील पंढरपूर पालिकेच्या ९ नंबर शाळेत इयत्ता पहिलीत मला प्रवेश देण्यात  आला. त्या ९ नंबर शाळेची धमाल वेगळीच होती. पण माझ्या खोडकरपणाचा माझ्या मावशीला व आईला पंढरपूरच्या त्या पाच सहा वर्षांच्या काळात (१९६३ ते १९६८) खूप त्रास झाला हे विशेष.

(४) माझ्या मावशीला स्वच्छतेची खूप सवय! मी बाहेरून उनाडक्या करून यायचो व मग माझी मावशी मला ओढतच आम्ही पंढरपूरला ज्या हनिफ शेखच्या वाड्यात भाड्याने रहायचो त्या वाड्यातील कॉमन मोरीत न्यायची. तिथे मला ती साबण लावून अंघोळ घालायची. पण मला तिचा सगळ्यात मोठा राग यायचा तो म्हणजे दगडाने ती माझे पाय जोरात घासून माझ्या पायांचा मळ काढायची त्या गोष्टीचा!  पाय घासताना मी मोठ्याने बोंब मारायचो पण त्या वाड्यातील साराप्पा वगैरे सगळी मंडळी माझ्या मावशीलाच पाठिंबा द्यायचे व म्हणायचे "मावशी, घासा या काळ्याचे पाय चांगलेच, गावभर हिंडून आलाय मोठा"!

(५) माझी मावशी अधूनमधून मला सांगोला रोडवरील दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करताना घेऊन जायची. तिथे भर ऊनात ती भाजी खुरपायची. मी लांब झाडाखाली सावलीला बसलेलो असायचो. मग मध्येच मला माझ्या मावशीची दया यायची. मग मी त्या शेतमजूर बायकांच्या घोळक्यात जाऊन खुरपे घेऊन मावशीला शेतातून भाजी काढण्यासाठी पुढे व्हायचो. पण थोडे काम केले की माझे गुडघे ऊनाने तापायचे व मला त्रास व्हायचा. ते बघून माझी मावशी मला पुन्हा त्या झाडाखाली सावलीला जाऊन बस म्हणायची. संध्याकाळ झाली की तो शेतमालक मावशीला कामाची मजूरी द्यायचा व सोबत सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे मोठे पेंडके द्यायचा. मग हनिफ शेख वाड्यात त्या पालेभाज्यांचे फुकट वाटप व्हायचे व राहिलेली भाजी आम्ही जेवणात वापरायचो. इतकी पालेभाजी दररोज बघून मला पालेभाजी खाण्याचा जाम वैताग यायचा. पण मावशी म्हणायची "गप्प गुमाने खा, भाज्या तब्बेतीला चांगल्या असतात"!

(६) साधारण १९६९ च्या दरम्यान आम्ही सर्व मुंबईला परत आलो. मग सहावी व सातवी इयत्ता मी वरळीच्या आंबेडकर म्युनिसिपल शाळेत पूर्ण केल्या. त्यावेळी माझ्या मावशीचे व माझ्या आईचे घरात कशावरून भांडण झाले हे माहित नाही. पण मी शाळेतून घरी आलो तर आईकडून कळले की मावशी घर सोडून गेली. मला मावशीचा खूप लळा होता. मी आईवर ओरडत रडू लागलो. "माझी मावशी कुठाय, मला मावशी पाहिजे" म्हणून आरडाओरड करू लागलो. मग आईच म्हणाली, "जा शोध तिला आणि परत घरी घेऊन ये, तिकडे जांबोरी मैदानावर रडत बसली असेल"! मग मी माझे दफ्तर तसेच घरात फेकून दिले व जांबोरी मैदानाकडे धावत सुटलो. त्या मैदानात मावशी दिसलीच नाही. मग तिथल्या चाळी चाळीतून तिचा शोध घेऊ लागलो. अचानक १८ व १९ नंबर चाळींच्या जवळील ओट्यावर मावशी तिचे छोटे बोचके घेऊन रडत बसलेली दिसली. मी पटकन तिला मागून पकडले व म्हंटले "आता कुठे जाशील माझ्या तावडीतून, चल पटकन घरी, मी शाळेतून तसाच इकडे आलोय न जेवता, चल दोघे मिळून जेवण करू"! पण मावशी घरी यायलाच तयार होईना. मग मीही तिला म्हणालो "तू येत नाही तोपर्यंत मी पण इथेच बसून राहणार, आईला बसूदे तिकडे एकटीच काळजी करीत"! मग मात्र मावशी माझ्याबरोबर निघाली व घरी परत आली. तेंव्हा त्या मजल्यावरील शेजाऱ्यांना "बघा, मी कसा मावशीला परत घेऊन आलो" म्हणत रूबाबात घरात प्रवेश केला.

(७) त्यावेळी काँग्रेस सरकारने संजय गांधी निराधार योजना आणली होती. त्या योजने अंतर्गत प्रत्येक निराधार व्यक्तीला दरमहा १०० रूपये (रक्कम नीट आठवत नाही) निराधार भत्ता मिळायचा. एकदा मावशी मला एकांतात म्हणाली "बाळू, तू एवढे शिक्षण घेतोस, मग माझी त्या संजय गांधी योजनेत निराधार म्हणून नोंद कर ना, तेवढेच जवळ थोडे पैसे राहतील माझ्या"! पण अशी का म्हणालीस म्हणून मीच मावशीवर रागावलो. "मी तुझा मुलगा असताना तू स्वतःला अशी निराधार का समजतेस"? ते ऐकून मावशी काहीच बोलली नाही. पण तिचे ते तसे गप्प बसणे माझ्या मनाला चटका लावून गेले.

(८) अशी ही माझी मावशी ताईच्या लग्नानंतर तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी गोव्याला व नंतर पुण्याला जावयाच्या (म्हणजे माझ्या भाऊजीच्या) घरी रहायला गेली. माझी ताई अधूनमधून आजारी असायची. त्यामुळे तिच्या चारही मुलांना (दोन मुली व दोन मुले) माझ्या मावशीनेच लहानाचे मोठे केले हे ती मुलेही मान्य करतील. मावशीने सगळीकडेच कष्ट उपसले, आमच्या घरीही आणि ताईच्या घरीही! ही मावशी गोवा व पुणे येथील भाऊजीच्या घरी असल्याने मी बिनधास्त शाळा, कॉलेजच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला व नंतर पुण्याला जायचो. तिथे माझ्या अंघोळीपासून माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था मावशीच करायची. तिथे सुध्दा तिची ती स्वच्छतेची सवय पदोपदी दिसायची.

(९) अशी ही मावशी पुण्याच्या घरी वृध्दावस्थेत पोटाच्या विकाराने हे जग सोडून कायमची निघून गेली. ती गेल्याचा मला पुण्याहून फोन आला. पण मला कळून चुकले होते की मी कितीही ठरवले तरी तिला लहानपणी जसे घरी परत घेऊन आलो होतो तसे आता तिला परत घेऊन येणे मला शक्य होणार नाही. मी पहाटे पुण्याला पोहोचलो पण त्याअगोदरच मावशीचा मृत देह स्मशानात अग्निच्या स्वाधीन झाला होतो. एवढे मोठे आयुष्य, एवढा मोठा सहवास एका क्षणात संपला होता. तिथे जमा झालेल्या नातेवाईकांबरोबर मावशीच्या काही आठवणी शेअर केल्या. पण ही मावशी माझ्यासाठी काय होती हे मी इतरांना काय आणि किती सांगणार. या मावशीचा माझ्याकडे फोटो सुध्दा नाही. पण तिचा निरागस, भोळा चेहरा मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. म्हणतात ना "आई मरावी आणि मावशी उरावी"! अगदी तशीच होती माझी ही मावशी. पण ही मावशी अगोदर गेली व माझी आई नंतर गेली. हे वयानुसार झाले असावे. कारण दोन बहिणीत मावशी थोरली तर आई धाकटी होती. माझ्या या मावशीचा ना जन्मदिन मला आठवत ना मृत्यूदिन. माझ्यासाठी तर सगळेच दिवस तिचे स्मृतिदिन!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०