https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १० जून, २०२०

एक होती मावशी!

एक होती मावशी!

(१) एक होती मावशी, कृष्णाबाई माणिक भोसले तिचे संपूर्ण नाव, पण सगळ्यांची ती किसाबाई!  या मावशीचा नवरा अकाली वारला आणि कोणाचाही आधार नसलेल्या माझ्या या मावशीने आसरा घेतला तो वरळीच्या आमच्या घराचा! तान्ह्या बाळाला घेऊन ही मावशी आमच्या वरळीच्या घरी रहायला आली. ते तान्हे बाळ म्हणजे माझी मावस बहीण, माझी ताई!  मावशीला तिच्या सख्ख्या बहिणीचा म्हणजे माझ्या आईचा आधार वाटला याचे कारण म्हणजे दोघीही बहिणी बहिणी त्यांच्या आईवडिलांच्या जीव की प्राण होत्या. त्यांना भाऊ झालाच नाही. मग या दोन बहिणीच माझ्या आजोबा व आजीची दोन मुले झाली. माझ्या मावशीचे नाव होते कृष्णाबाई तर माझ्या आईचे नाव चंद्रभागा! पण या मुलींनाच माझ्या आजोबांनी मुले मानली व त्यांची लाडाने टोपण नावे ठेवली ती मुलांचीच. मावशी कृष्णाबाईचे नाव झाले किशाबापू तर आई चंद्रभागेचे नाव झाले चंदाबापू! त्या स्वातंत्र्यपूर्व काळात माझे आजोबा अशिक्षित असले तरी मनाने असे आधुनिक विचाराचे होते.

(२) सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी स्टेशनच्या अलिकडे व केम स्टेशनच्या पलिकडे असलेले ढवळस गाव हे माझे आजोळ! त्या गावच्या छोट्या डोंगरावर असलेली अंबाबाई हे तिथले ग्रामदैवत! या देवीच्या कुशीतच माझी मावशी व माझी आई या बहिणी वाढल्या. त्या एकत्र वाढल्या आणि म्हणूनच आयुष्यभराच्या कायम मैत्रिणी राहिल्या. माझ्या मावशीने म्हणूनच धाकट्या बहिणीच्या म्हणजे माझ्या आईच्या घराला आधार मानला. मी माझ्या आईचा थोरला मुलगा त्यामुळे धाकटे असण्याचा आनंद मला दिला तो माझ्या ताईने! हिराताई ही माझी मावस बहीण पण आमच्या घरात तिला थोरली मुलगी म्हणूनच वाढवले गेले. माझी ताई खूप गोड व शांत स्वभावाची जशी माझी मावशी! ही ताई माझी मावस बहीण, पण सख्ख्या बहिणी पेक्षाही जास्त ती माझ्या जवळची होती.

(३) माझी ही मावशी व माझी आई या दोघींनी आमच्या वरळीच्या घरात गिरणी कामगार व वरळी पोलीस यांच्यासाठी खाणावळ घातली होती. खूप कष्ट घेतले दोघी बहिणींनी त्या खाणावळीत. पण खाणावळ नुकसानीत गेली व मावशीसह आमची रवानगी माझ्या वडिलांनी पंढरपूरला केली. साधारण १९६३ चा तो काळ होता. मी त्यावेळी सहा वर्षाचा होतो. सांगोला रोडवरील संतपेठेतील पंढरपूर पालिकेच्या ९ नंबर शाळेत इयत्ता पहिलीत मला प्रवेश देण्यात  आला. त्या ९ नंबर शाळेची धमाल वेगळीच होती. पण माझ्या खोडकरपणाचा माझ्या मावशीला व आईला पंढरपूरच्या त्या पाच सहा वर्षांच्या काळात (१९६३ ते १९६८) खूप त्रास झाला हे विशेष.

(४) माझ्या मावशीला स्वच्छतेची खूप सवय! मी बाहेरून उनाडक्या करून यायचो व मग माझी मावशी मला ओढतच आम्ही पंढरपूरला ज्या हनिफ शेखच्या वाड्यात भाड्याने रहायचो त्या वाड्यातील कॉमन मोरीत न्यायची. तिथे मला ती साबण लावून अंघोळ घालायची. पण मला तिचा सगळ्यात मोठा राग यायचा तो म्हणजे दगडाने ती माझे पाय जोरात घासून माझ्या पायांचा मळ काढायची त्या गोष्टीचा!  पाय घासताना मी मोठ्याने बोंब मारायचो पण त्या वाड्यातील साराप्पा वगैरे सगळी मंडळी माझ्या मावशीलाच पाठिंबा द्यायचे व म्हणायचे "मावशी, घासा या काळ्याचे पाय चांगलेच, गावभर हिंडून आलाय मोठा"!

(५) माझी मावशी अधूनमधून मला सांगोला रोडवरील दुसऱ्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करताना घेऊन जायची. तिथे भर ऊनात ती भाजी खुरपायची. मी लांब झाडाखाली सावलीला बसलेलो असायचो. मग मध्येच मला माझ्या मावशीची दया यायची. मग मी त्या शेतमजूर बायकांच्या घोळक्यात जाऊन खुरपे घेऊन मावशीला शेतातून भाजी काढण्यासाठी पुढे व्हायचो. पण थोडे काम केले की माझे गुडघे ऊनाने तापायचे व मला त्रास व्हायचा. ते बघून माझी मावशी मला पुन्हा त्या झाडाखाली सावलीला जाऊन बस म्हणायची. संध्याकाळ झाली की तो शेतमालक मावशीला कामाची मजूरी द्यायचा व सोबत सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे मोठे पेंडके द्यायचा. मग हनिफ शेख वाड्यात त्या पालेभाज्यांचे फुकट वाटप व्हायचे व राहिलेली भाजी आम्ही जेवणात वापरायचो. इतकी पालेभाजी दररोज बघून मला पालेभाजी खाण्याचा जाम वैताग यायचा. पण मावशी म्हणायची "गप्प गुमाने खा, भाज्या तब्बेतीला चांगल्या असतात"!

(६) साधारण १९६९ च्या दरम्यान आम्ही सर्व मुंबईला परत आलो. मग सहावी व सातवी इयत्ता मी वरळीच्या आंबेडकर म्युनिसिपल शाळेत पूर्ण केल्या. त्यावेळी माझ्या मावशीचे व माझ्या आईचे घरात कशावरून भांडण झाले हे माहित नाही. पण मी शाळेतून घरी आलो तर आईकडून कळले की मावशी घर सोडून गेली. मला मावशीचा खूप लळा होता. मी आईवर ओरडत रडू लागलो. "माझी मावशी कुठाय, मला मावशी पाहिजे" म्हणून आरडाओरड करू लागलो. मग आईच म्हणाली, "जा शोध तिला आणि परत घरी घेऊन ये, तिकडे जांबोरी मैदानावर रडत बसली असेल"! मग मी माझे दफ्तर तसेच घरात फेकून दिले व जांबोरी मैदानाकडे धावत सुटलो. त्या मैदानात मावशी दिसलीच नाही. मग तिथल्या चाळी चाळीतून तिचा शोध घेऊ लागलो. अचानक १८ व १९ नंबर चाळींच्या जवळील ओट्यावर मावशी तिचे छोटे बोचके घेऊन रडत बसलेली दिसली. मी पटकन तिला मागून पकडले व म्हंटले "आता कुठे जाशील माझ्या तावडीतून, चल पटकन घरी, मी शाळेतून तसाच इकडे आलोय न जेवता, चल दोघे मिळून जेवण करू"! पण मावशी घरी यायलाच तयार होईना. मग मीही तिला म्हणालो "तू येत नाही तोपर्यंत मी पण इथेच बसून राहणार, आईला बसूदे तिकडे एकटीच काळजी करीत"! मग मात्र मावशी माझ्याबरोबर निघाली व घरी परत आली. तेंव्हा त्या मजल्यावरील शेजाऱ्यांना "बघा, मी कसा मावशीला परत घेऊन आलो" म्हणत रूबाबात घरात प्रवेश केला.

(७) त्यावेळी काँग्रेस सरकारने संजय गांधी निराधार योजना आणली होती. त्या योजने अंतर्गत प्रत्येक निराधार व्यक्तीला दरमहा १०० रूपये (रक्कम नीट आठवत नाही) निराधार भत्ता मिळायचा. एकदा मावशी मला एकांतात म्हणाली "बाळू, तू एवढे शिक्षण घेतोस, मग माझी त्या संजय गांधी योजनेत निराधार म्हणून नोंद कर ना, तेवढेच जवळ थोडे पैसे राहतील माझ्या"! पण अशी का म्हणालीस म्हणून मीच मावशीवर रागावलो. "मी तुझा मुलगा असताना तू स्वतःला अशी निराधार का समजतेस"? ते ऐकून मावशी काहीच बोलली नाही. पण तिचे ते तसे गप्प बसणे माझ्या मनाला चटका लावून गेले.

(८) अशी ही माझी मावशी ताईच्या लग्नानंतर तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी गोव्याला व नंतर पुण्याला जावयाच्या (म्हणजे माझ्या भाऊजीच्या) घरी रहायला गेली. माझी ताई अधूनमधून आजारी असायची. त्यामुळे तिच्या चारही मुलांना (दोन मुली व दोन मुले) माझ्या मावशीनेच लहानाचे मोठे केले हे ती मुलेही मान्य करतील. मावशीने सगळीकडेच कष्ट उपसले, आमच्या घरीही आणि ताईच्या घरीही! ही मावशी गोवा व पुणे येथील भाऊजीच्या घरी असल्याने मी बिनधास्त शाळा, कॉलेजच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला व नंतर पुण्याला जायचो. तिथे माझ्या अंघोळीपासून माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था मावशीच करायची. तिथे सुध्दा तिची ती स्वच्छतेची सवय पदोपदी दिसायची.

(९) अशी ही मावशी पुण्याच्या घरी वृध्दावस्थेत पोटाच्या विकाराने हे जग सोडून कायमची निघून गेली. ती गेल्याचा मला पुण्याहून फोन आला. पण मला कळून चुकले होते की मी कितीही ठरवले तरी तिला लहानपणी जसे घरी परत घेऊन आलो होतो तसे आता तिला परत घेऊन येणे मला शक्य होणार नाही. मी पहाटे पुण्याला पोहोचलो पण त्याअगोदरच मावशीचा मृत देह स्मशानात अग्निच्या स्वाधीन झाला होतो. एवढे मोठे आयुष्य, एवढा मोठा सहवास एका क्षणात संपला होता. तिथे जमा झालेल्या नातेवाईकांबरोबर मावशीच्या काही आठवणी शेअर केल्या. पण ही मावशी माझ्यासाठी काय होती हे मी इतरांना काय आणि किती सांगणार. या मावशीचा माझ्याकडे फोटो सुध्दा नाही. पण तिचा निरागस, भोळा चेहरा मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. म्हणतात ना "आई मरावी आणि मावशी उरावी"! अगदी तशीच होती माझी ही मावशी. पण ही मावशी अगोदर गेली व माझी आई नंतर गेली. हे वयानुसार झाले असावे. कारण दोन बहिणीत मावशी थोरली तर आई धाकटी होती. माझ्या या मावशीचा ना जन्मदिन मला आठवत ना मृत्यूदिन. माझ्यासाठी तर सगळेच दिवस तिचे स्मृतिदिन!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०


वास्तविक मी!

आस्तिकतेतून वास्तविकतेकडे!

एकच गोष्ट दोन नजरेने वेगळी दिसते. डोळे दोनच आहेत. अर्थात सत्य दोन्ही स्वरूपात आहे हेच वास्तव. सत्याला दोन बाजू हे वास्तव. पण नास्तिक व आस्तिक एकतर्फी होऊन एकच वास्तव पकडतात. माझी आस्तिकता मात्र वेगळी आहे. ती नास्तिकताही पकडते व वास्तवात राहते. पण फक्त नास्तिकतेलाच पकडून राहणारे लोक आस्तिकतेला सत्य मानत नाहीत आणि म्हणून आस्तिक विरूद्ध नास्तिक वाद निर्माण होतो. अशा वादात मी नास्तिकांना रामराम करून त्यांचा निरोप घेतो व माझ्या आस्तिकतेतून वास्तविक होतो.

-ॲड.बी.एस.मोरे©११.६.२०२०

मंगळवार, ९ जून, २०२०

वाद संन्यास!

राजकारण संन्यासानंतर आता वाद संन्यास!

निसर्गाच्या प्रचंड मोठ्या पसाऱ्यातील ज्ञानाचा एक छोटासा भाग शिकल्याने मी स्वतःला ज्ञानी म्हणू शकत नाही. मग माझ्या अल्प ज्ञानावर आधारित तयार झालेली माझी वैयक्तिक मते ऊराशी बाळगून मी इतरांशी वाद कसा घालू शकतो? त्यामुळे मी आस्तिक आहे, तो का आहे, कसा आहे हे सांगून ठाम नास्तिक विचार असणाऱ्यांशी वाद घालण्यात मी खूप मोठी चूक केली असे मला वाटत आहे. म्हणून मी आता त्या वादातून पूर्णपणे माघार घेत आहे. निसर्ग व देव हे न सुटणारे कोडे आहे. मला या जगातील इतर बरीच कोडी सोडवताच आली नाहीत, मग एवढे मोठे कोडे माझ्यासारखा अल्पज्ञानी काय सोडवणार? जग दिवसेंदिवस बदलत आहे. नवनवीन तंत्रज्ञाने पुढे येत आहेत. अॉनलाईन शिक्षण व अॉनलाईन व्यवहार आता लोकांच्या अंगवळणी पडू लागले आहेत. हल्ली नव्यानेच विकसित झालेल्या गोष्टींनी मला पुन्हा  पूर्व प्राथमिक शाळेत आणून सोडलेय. जणू काही मला आता नव्याने बाराखडी शिकावी लागणार, नव्याने अंकलिपी शिकावी लागणार. पण नको आता हे नवीन शिक्षण! खूप कंटाळा आलाय शिक्षणाचा व ज्ञानाचा! नवीन पिढी या सर्व गोष्टी पटापट आत्मसात करू लागलीय. या पिढीचा वेग प्रचंड आहे. मनात धडकीच भरते हा वेग बघून. या नवीन पिढी पुढे मी अशिक्षित झालोय. नवोदित वकील किती सफाईदारपणे अॉनलाईन वकिली करतात व तसेच न्यायालयांत प्रत्यक्ष न जाता अॉनलाईन युक्तिवाद करतात. त्यांचे विशेष कौतुक आहेच, पण त्याचबरोबर आपण आता मागे पडत चाललो आहोत याची खंतही आहे. त्यामुळे या पिढीला नमस्कार करणे व त्यांच्याशी कसलाही वाद न घालता सरळ माघार घेणे मी पसंत करीन. नव्हे मी तसेच ठरवले आहे. हल्ली  स्मरणशक्ती पण कमकुवत होत चाललीय. कायद्याच्या जुन्या ज्ञानावर विसंबून काही बोलावे तर आपलेच हसू व्हायचे. पटकन सुप्रीम कोर्टाचा नवीन निकाल किंवा कायद्यात झालेला नवीन बदल नवोदित वकिलांनी समोर टाकला की मग आली का पंचाईत! सगळं अॉनलाईन होत गेल्याने कायद्याचे ज्ञान, बदल, न्यायालयाचे निकाल या सर्व गोष्टी वेगवान झाल्या आहेत. त्या वेगाबरोबर आता मी काय धावणार? मला ते करता येत नाही आणि मी नास्तिक विरूद्ध आस्तिक वादात पडतोय? चुकीचे आहे ते! म्हणून जसा मी राजकारण संन्यास घेतलाय तसा मी आता वाद संन्यास घेणार, नव्हे घेतलाच म्हणून समजा. आता वादच घालायचा नाही म्हटल्यावर मग मी कोर्टातील युक्तिवाद तरी कसा करणार? आयुष्यात धूर्तपणा कधी करताच आला नाही तर मग युक्ती काय करणार आणि युक्तीच नाही तर युक्तिवाद कसा करणार? एकंदरीत संन्यासी होण्याचीच ही लक्षणे नाहीत का! पण ही माझ्या आजाराची लक्षणे नव्हेत तर माझ्या शांतीची लक्षणे आहेत. राजकारण संन्यासी झाल्यानंतर मी आता वाद संन्यासी होत आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

आॕनलाईन शिक्षण व व्यवहार!

धन्य धन्य ते अॉनलाईन शिक्षण व त्या अॉनलाईन ज्ञानावरील आधारित तो अॉनलाईन व्यवहार!

विधी शिक्षणातीलच काय पण इतर कोणत्याही शिक्षणातील सर्वच गोष्टी अॉनलाईन करणे म्हणजे जगाचा मूलभूत आधार ज्याला ज्ञान म्हणतात तोच अॉनलाईन करणे. आता यापुढे  अॉनलाईन ज्ञानसंपन्न झालेले लोक अॉनलाईन व्यवहार संपन्न होतील. अॉनलाईन लग्न हा सुध्दा एक गंमतीदार प्रकार या कोरोना काळात सुरू झालाय. हा कोरोना म्हणजे जगाचा नियंत्रक होणार आहे काय पुढील काळात? असो, आम्ही म्हातारे वकील आता या नवीन गंमती जमती बघत मरणार. आमच्या मृत्यू समयी ही मोठी करमणूक निसर्गाने निर्माण केली तो निसर्गही धन्य व त्याच निसर्गाने निर्माण केलेला तो माणूसही धन्य!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

कालाय तस्मै नमः!

कालाय तस्मै नमः!

काळानुसार बदलले पाहिजे हे खरे आहे. पण बदल स्वीकारण्यासाठी जो चपळपणा व जो आत्मविश्वास तरूण वयात असतो तो उतार वयात राहत नाही. उदाहरणार्थ, मी लहानपणी किंवा तरूण वयात पोहायला शिकलो नाही. आता या वयात पोहणे शिकणे हे मला कठीणच जाणार. तसेच या वयात ड्रायव्हिंग शिकण्याचे आहे. हल्ली १२ ते १४ वयाची लहान मुले सुद्धा  सहजपणे स्कूटर चालवायला शिकतात. पण मी आता स्कूटर शिकायला गेलो किंवा इतर काही माझ्यासाठी नवीन असलेल्या तांत्रिक गोष्टी शिकायला गेलो तर मला ते शिकणे नीट जमणार नाही. कारण आता तो पूर्वीचा जोर, उत्साह, उमेद, आत्मविश्वास राहिला नाही. मनात इच्छा असूनही ते कठीण वाटते. तेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत. पण नाईलाजच झाला तर मात्र बळेच अॉनलाईन वकिलीच्या काही बेसिक गोष्टी मला शिकाव्या लागतील. कालाय तस्मै नमः!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

मनी नाही भाव, देवा मला पाव!

मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव!

देव नागडा आहे, उघडा आहे! त्याला देवाचे निर्गुण स्वरूप म्हणतात. निसर्गाचे तेच तर मूळ आहे, बूड आहे. पण माणूस वेडा आहे, नव्हे तो अतिशहाणा आहे. त्याला देव कळलाच नाही. तो झाडाचे मूळ सोडून झाडाच्या फांद्यानाच जग समजू लागला. मग त्या निर्गुण, नागड्या, उघड्या देवाची माणसालाच लाज वाटली म्हणून त्यानेच स्वतःला देवात पाहिले आणि स्वतःप्रमाणे त्याने निर्गुण देवाला सगुण रूप देत देवाच्या अंगावर कपडे चढविली, दागिने घातले आणि स्वतःच्या रूपाला देवात बघत त्याने निर्गुण देवाला सगुण देव बनविला. अरे खुळ्या माणसा, देव काय भाजीपाला आहे काय त्याला हवे तसे नाचवायला! मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव! खरी गंमत हीच आहे की, नास्तिकाला त्याच्या डाव्या डोळ्याने दिसणारा निसर्ग आस्तिकाला त्याच्या उजव्या डोळ्याने ईश्वर दिसतो!

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०

सोमवार, ८ जून, २०२०

कोरोना मरण अर्धवटरावांच्या संगतीत!

अर्धवटरावांच्या संगतीतले कोरोना मरण!

कोरोनाचा रूग्ण मेल्यावर त्याचा श्वासोच्छवास बंद होतो. म्हणजे त्याच्या नाका तोंडातून कोरोना इतर लोकांच्या नाकातोंडात जाण्याचा धोका कमी होतो. मग प्रश्न राहतो त्याच्या मृत शरीराच्या बाह्य भागाला कोरोना विषाणूचे कण  पेशंटच्या मृत्यूपूर्व शारीरिक हालचालीमुळे चिकटून राहिलेत का याचा. प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस व इतर मेडिकल स्टाफ यांनी सुरक्षा कवच घालून मृत शरीराला सुरक्षित कपड्याने पूर्ण झाकूनच ते प्रेत अगदी तसेच सुरक्षितपणे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यू दाखल्यासह नातेवाईकांच्या ताब्यात डायरेक्ट स्मशानभूमीत जाणाऱ्या ॲम्ब्युलन्ससह दिले पाहिजे. पण एवढी साधी गोष्ट तरी व्यवस्थित पार पाडली जातेय का? योग्य प्रशिक्षणाशिवाय कोरोनाशी लढायला गेल्यावर शेवटी काय होणार आणि म्हणे आम्ही कोरोनावर मात करणारे कोरोना योध्दे! कोरोनामुळे मेलेल्या रूग्णाच्या मृत शरीराचा श्वासोच्छवास पूर्णपणे बंद असतो. त्या मृत शरीराचे शवविच्छेदन करणाऱ्या मेडिकल स्टाफला मात्र सुरक्षा कवच घालूनच शवविच्छेदन करावे लागते. पण एकदा का मृत शरीर स्वच्छ कपड्यात नीट झाकले व त्या कपड्यावर जंतुनाशक फवारा मारला की ते झाकलेले मृत शरीर नातेवाईकांनी उचलायलाही काही भीती नसते. मृत शरीराला स्पर्श न करता अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांच्या अंगावर तो कोरोना विषाणू काय हवेतून उडत उडत येतो? मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या किती लोकांना पूर्ण ज्ञान आहे कोरोना रूग्णाच्या मृत शरीरापासून इतरांनी कशी काळजी घ्यायची याचे? तेही अर्धवटराव व नातेवाईक बिच्चारे तर आणखीनच अर्धवटराव! नको रे बाबा असले कोरोना मरण अर्धवटरावांच्या संगतीतले! 

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०