https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १० जून, २०२०

वास्तविक मी!

आस्तिकतेतून वास्तविकतेकडे!

एकच गोष्ट दोन नजरेने वेगळी दिसते. डोळे दोनच आहेत. अर्थात सत्य दोन्ही स्वरूपात आहे हेच वास्तव. सत्याला दोन बाजू हे वास्तव. पण नास्तिक व आस्तिक एकतर्फी होऊन एकच वास्तव पकडतात. माझी आस्तिकता मात्र वेगळी आहे. ती नास्तिकताही पकडते व वास्तवात राहते. पण फक्त नास्तिकतेलाच पकडून राहणारे लोक आस्तिकतेला सत्य मानत नाहीत आणि म्हणून आस्तिक विरूद्ध नास्तिक वाद निर्माण होतो. अशा वादात मी नास्तिकांना रामराम करून त्यांचा निरोप घेतो व माझ्या आस्तिकतेतून वास्तविक होतो.

-ॲड.बी.एस.मोरे©११.६.२०२०

मंगळवार, ९ जून, २०२०

वाद संन्यास!

राजकारण संन्यासानंतर आता वाद संन्यास!

निसर्गाच्या प्रचंड मोठ्या पसाऱ्यातील ज्ञानाचा एक छोटासा भाग शिकल्याने मी स्वतःला ज्ञानी म्हणू शकत नाही. मग माझ्या अल्प ज्ञानावर आधारित तयार झालेली माझी वैयक्तिक मते ऊराशी बाळगून मी इतरांशी वाद कसा घालू शकतो? त्यामुळे मी आस्तिक आहे, तो का आहे, कसा आहे हे सांगून ठाम नास्तिक विचार असणाऱ्यांशी वाद घालण्यात मी खूप मोठी चूक केली असे मला वाटत आहे. म्हणून मी आता त्या वादातून पूर्णपणे माघार घेत आहे. निसर्ग व देव हे न सुटणारे कोडे आहे. मला या जगातील इतर बरीच कोडी सोडवताच आली नाहीत, मग एवढे मोठे कोडे माझ्यासारखा अल्पज्ञानी काय सोडवणार? जग दिवसेंदिवस बदलत आहे. नवनवीन तंत्रज्ञाने पुढे येत आहेत. अॉनलाईन शिक्षण व अॉनलाईन व्यवहार आता लोकांच्या अंगवळणी पडू लागले आहेत. हल्ली नव्यानेच विकसित झालेल्या गोष्टींनी मला पुन्हा  पूर्व प्राथमिक शाळेत आणून सोडलेय. जणू काही मला आता नव्याने बाराखडी शिकावी लागणार, नव्याने अंकलिपी शिकावी लागणार. पण नको आता हे नवीन शिक्षण! खूप कंटाळा आलाय शिक्षणाचा व ज्ञानाचा! नवीन पिढी या सर्व गोष्टी पटापट आत्मसात करू लागलीय. या पिढीचा वेग प्रचंड आहे. मनात धडकीच भरते हा वेग बघून. या नवीन पिढी पुढे मी अशिक्षित झालोय. नवोदित वकील किती सफाईदारपणे अॉनलाईन वकिली करतात व तसेच न्यायालयांत प्रत्यक्ष न जाता अॉनलाईन युक्तिवाद करतात. त्यांचे विशेष कौतुक आहेच, पण त्याचबरोबर आपण आता मागे पडत चाललो आहोत याची खंतही आहे. त्यामुळे या पिढीला नमस्कार करणे व त्यांच्याशी कसलाही वाद न घालता सरळ माघार घेणे मी पसंत करीन. नव्हे मी तसेच ठरवले आहे. हल्ली  स्मरणशक्ती पण कमकुवत होत चाललीय. कायद्याच्या जुन्या ज्ञानावर विसंबून काही बोलावे तर आपलेच हसू व्हायचे. पटकन सुप्रीम कोर्टाचा नवीन निकाल किंवा कायद्यात झालेला नवीन बदल नवोदित वकिलांनी समोर टाकला की मग आली का पंचाईत! सगळं अॉनलाईन होत गेल्याने कायद्याचे ज्ञान, बदल, न्यायालयाचे निकाल या सर्व गोष्टी वेगवान झाल्या आहेत. त्या वेगाबरोबर आता मी काय धावणार? मला ते करता येत नाही आणि मी नास्तिक विरूद्ध आस्तिक वादात पडतोय? चुकीचे आहे ते! म्हणून जसा मी राजकारण संन्यास घेतलाय तसा मी आता वाद संन्यास घेणार, नव्हे घेतलाच म्हणून समजा. आता वादच घालायचा नाही म्हटल्यावर मग मी कोर्टातील युक्तिवाद तरी कसा करणार? आयुष्यात धूर्तपणा कधी करताच आला नाही तर मग युक्ती काय करणार आणि युक्तीच नाही तर युक्तिवाद कसा करणार? एकंदरीत संन्यासी होण्याचीच ही लक्षणे नाहीत का! पण ही माझ्या आजाराची लक्षणे नव्हेत तर माझ्या शांतीची लक्षणे आहेत. राजकारण संन्यासी झाल्यानंतर मी आता वाद संन्यासी होत आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

आॕनलाईन शिक्षण व व्यवहार!

धन्य धन्य ते अॉनलाईन शिक्षण व त्या अॉनलाईन ज्ञानावरील आधारित तो अॉनलाईन व्यवहार!

विधी शिक्षणातीलच काय पण इतर कोणत्याही शिक्षणातील सर्वच गोष्टी अॉनलाईन करणे म्हणजे जगाचा मूलभूत आधार ज्याला ज्ञान म्हणतात तोच अॉनलाईन करणे. आता यापुढे  अॉनलाईन ज्ञानसंपन्न झालेले लोक अॉनलाईन व्यवहार संपन्न होतील. अॉनलाईन लग्न हा सुध्दा एक गंमतीदार प्रकार या कोरोना काळात सुरू झालाय. हा कोरोना म्हणजे जगाचा नियंत्रक होणार आहे काय पुढील काळात? असो, आम्ही म्हातारे वकील आता या नवीन गंमती जमती बघत मरणार. आमच्या मृत्यू समयी ही मोठी करमणूक निसर्गाने निर्माण केली तो निसर्गही धन्य व त्याच निसर्गाने निर्माण केलेला तो माणूसही धन्य!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

कालाय तस्मै नमः!

कालाय तस्मै नमः!

काळानुसार बदलले पाहिजे हे खरे आहे. पण बदल स्वीकारण्यासाठी जो चपळपणा व जो आत्मविश्वास तरूण वयात असतो तो उतार वयात राहत नाही. उदाहरणार्थ, मी लहानपणी किंवा तरूण वयात पोहायला शिकलो नाही. आता या वयात पोहणे शिकणे हे मला कठीणच जाणार. तसेच या वयात ड्रायव्हिंग शिकण्याचे आहे. हल्ली १२ ते १४ वयाची लहान मुले सुद्धा  सहजपणे स्कूटर चालवायला शिकतात. पण मी आता स्कूटर शिकायला गेलो किंवा इतर काही माझ्यासाठी नवीन असलेल्या तांत्रिक गोष्टी शिकायला गेलो तर मला ते शिकणे नीट जमणार नाही. कारण आता तो पूर्वीचा जोर, उत्साह, उमेद, आत्मविश्वास राहिला नाही. मनात इच्छा असूनही ते कठीण वाटते. तेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत. पण नाईलाजच झाला तर मात्र बळेच अॉनलाईन वकिलीच्या काही बेसिक गोष्टी मला शिकाव्या लागतील. कालाय तस्मै नमः!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

मनी नाही भाव, देवा मला पाव!

मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव!

देव नागडा आहे, उघडा आहे! त्याला देवाचे निर्गुण स्वरूप म्हणतात. निसर्गाचे तेच तर मूळ आहे, बूड आहे. पण माणूस वेडा आहे, नव्हे तो अतिशहाणा आहे. त्याला देव कळलाच नाही. तो झाडाचे मूळ सोडून झाडाच्या फांद्यानाच जग समजू लागला. मग त्या निर्गुण, नागड्या, उघड्या देवाची माणसालाच लाज वाटली म्हणून त्यानेच स्वतःला देवात पाहिले आणि स्वतःप्रमाणे त्याने निर्गुण देवाला सगुण रूप देत देवाच्या अंगावर कपडे चढविली, दागिने घातले आणि स्वतःच्या रूपाला देवात बघत त्याने निर्गुण देवाला सगुण देव बनविला. अरे खुळ्या माणसा, देव काय भाजीपाला आहे काय त्याला हवे तसे नाचवायला! मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव! खरी गंमत हीच आहे की, नास्तिकाला त्याच्या डाव्या डोळ्याने दिसणारा निसर्ग आस्तिकाला त्याच्या उजव्या डोळ्याने ईश्वर दिसतो!

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०

सोमवार, ८ जून, २०२०

कोरोना मरण अर्धवटरावांच्या संगतीत!

अर्धवटरावांच्या संगतीतले कोरोना मरण!

कोरोनाचा रूग्ण मेल्यावर त्याचा श्वासोच्छवास बंद होतो. म्हणजे त्याच्या नाका तोंडातून कोरोना इतर लोकांच्या नाकातोंडात जाण्याचा धोका कमी होतो. मग प्रश्न राहतो त्याच्या मृत शरीराच्या बाह्य भागाला कोरोना विषाणूचे कण  पेशंटच्या मृत्यूपूर्व शारीरिक हालचालीमुळे चिकटून राहिलेत का याचा. प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस व इतर मेडिकल स्टाफ यांनी सुरक्षा कवच घालून मृत शरीराला सुरक्षित कपड्याने पूर्ण झाकूनच ते प्रेत अगदी तसेच सुरक्षितपणे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यू दाखल्यासह नातेवाईकांच्या ताब्यात डायरेक्ट स्मशानभूमीत जाणाऱ्या ॲम्ब्युलन्ससह दिले पाहिजे. पण एवढी साधी गोष्ट तरी व्यवस्थित पार पाडली जातेय का? योग्य प्रशिक्षणाशिवाय कोरोनाशी लढायला गेल्यावर शेवटी काय होणार आणि म्हणे आम्ही कोरोनावर मात करणारे कोरोना योध्दे! कोरोनामुळे मेलेल्या रूग्णाच्या मृत शरीराचा श्वासोच्छवास पूर्णपणे बंद असतो. त्या मृत शरीराचे शवविच्छेदन करणाऱ्या मेडिकल स्टाफला मात्र सुरक्षा कवच घालूनच शवविच्छेदन करावे लागते. पण एकदा का मृत शरीर स्वच्छ कपड्यात नीट झाकले व त्या कपड्यावर जंतुनाशक फवारा मारला की ते झाकलेले मृत शरीर नातेवाईकांनी उचलायलाही काही भीती नसते. मृत शरीराला स्पर्श न करता अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांच्या अंगावर तो कोरोना विषाणू काय हवेतून उडत उडत येतो? मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या किती लोकांना पूर्ण ज्ञान आहे कोरोना रूग्णाच्या मृत शरीरापासून इतरांनी कशी काळजी घ्यायची याचे? तेही अर्धवटराव व नातेवाईक बिच्चारे तर आणखीनच अर्धवटराव! नको रे बाबा असले कोरोना मरण अर्धवटरावांच्या संगतीतले! 

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०

काळतोंड्या कोरोना!

कुठून आलास रे काळतोंड्या कोरोना?

या कोरोनाने मला खूप काही शिकवले. हे माझे, ते तुझे या वादाच्या बूडालाच काडी लावली या कोरोनाने! या कोरोना लॉकडाऊन काळात आजूबाजूला माणसे मरताना बघतोय. कोरोनाग्रस्त रूग्ण मेल्याचे सोडा पण साध्या आजाराने किंवा वयोमानानुसार माणूस मेला तरी त्याच्या मयताकडे आणि मयताच्या कुटुंब सदस्यांकडे लोक टवकारून बघतात. मेलेल्या माणसाबरोबर किती आनंदाने दिवस घालवले असतील त्या कुटुंब सदस्यांनी! घरातला कुटुंब प्रमुख जाणे म्हणजे घराचा वटवृक्षच ढासळणे. पण हाच वटवृक्ष या कोरोना काळात ढासळला तर कसले दुःख आणि कसले रडणे! हळूच ॲम्ब्युलन्स बोलवायची, त्यात तो मयत झालेला  वटवृक्ष कोंबायचा आणि तोंडाला मास्क लावून घाबरत घाबरत तो वटवृक्ष धार्मिक विधी प्रमाणे जाळायला नाहीतर पुरायला स्मशानभूमीत किंवा कबरस्थानात न्यायचा. काय पण हा विचित्र अंत माणसाचा! कुठून आला आणि कोणी आणला हा कोरोना? वाट लावलीय सगळ्या माणसांची या नवीन विषाणूने! या काळात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अर्धवटराव मात्र असा आव आणतात त्यांच्या  शहाणपणाचा की बोलायलाच नको! हे सगळे कोरोनाग्रस्त वातावरण बघून कोरोनाची भीती कमी आणि आजूबाजूला वावरणाऱ्या अर्धवट लोकांचीच भीती जास्त वाटू लागलीय. आता पावसाळ्यात थंडी, ताप, सर्दी, खोकला हे नेहमीचे आजार (सॉरी आजाराची लक्षणे) होणारच ना! पण ही सामान्य लक्षणे घेऊन  आपल्या फॕमिली डॉक्टरकडे जायची पण भीती वाटू लागलीय. काही भरवसा नाही त्या डॉक्टरचाही! चुकून त्याला कोरोनाचा संशय यायचा आणि मग ती महागडी कोरोना टेस्ट करायला सांगायचा. आणि त्या डॉक्टरलाच लक्षणे नसलेला कोरोना असला तर? बापरे, म्हणजे आली का नसती पंचाईत! घरात तीन महिने बसून कंटाळा आलाय. पण लॉकडाऊन उठवल्याने लोकल ट्रेन्स सुरू झाल्या तरी त्या ट्रेन्समधून डोंबिवली वरून मुंबईला कामाला जायची भीतीच वाटणार. किती वेळ तो मास्क तोंडाला लावून ठेवायचा! गुदमरून जायला होते. मोकळा श्वास घेता येत नाही. आणि ट्रेन मध्ये तीन फूटाचे अंतर ठेऊन कसे बसणार व कसे उभे राहणार? आणि ट्रेनला लटकत जाणाऱ्यांचे काय होणार? मला क्लायंटकडे भेट द्यावी लागते तेंव्हा तिथे लिगल टायपिस्टला जवळ बसून तोंडाने डिक्टेशन द्यावे लागते. आता मास्क लावून असे डिक्टेशन मी कसे देणार? या सगळ्या गोष्टी, हे सगळे विचित्र प्रश्न डोक्यात सारखे घोंघावत राहतात. या कोरोनाने माझ्यासाठी मात्र एक गोष्ट चांगली केली. माझी मरणाची भीतीच घालवून टाकली. मी आता बिनधास्त झालोय. मरायला तयार झालोय. पण काही मित्र फोनवर म्हणतात "अरे, तू खूप तयार झाला असशील कोरोनाशी लढत लढत कोरोना योध्दा म्हणून मरायला, पण तुझ्या बरोबर राहणाऱ्यांचे काय, तू मरशील पण वर जाताना त्यांना कोरोना चिकटवून जाशील त्याचे काय"? म्हणजे आली का पंचाईत! धड जगताही येत नाही आणि धड मरताही येत नाही. कुठून आलास रे काळतोंड्या कोरोना?

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०