https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!

सामाजिक सुसंस्कृतपणा व कायदा!

जंगली जनावरांच्या हिंस्त्र वर्तनाचा हळूहळू त्याग करीत जाऊन मानवी वर्तन सुधारत गेले व ते सुसंस्कृत झाले. निसर्ग विज्ञानाविषयी सुशिक्षित होणे व सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे यात फरक आहे. सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत असतोच असे नसते. तसे असते तर सुशिक्षित माणसांनी सामाजिक गुन्हे केलेच नसते. सामाजिक सुसंस्कृतपणाचे मी तीन भाग पाडले आहेत. पहिला भाग हा उच्च श्रेणीचा स्वर्गीय भाग म्हणजे सुसंस्कृत भाग, दुसरा भाग हा मध्यम श्रेणीचा अर्ध स्वर्गीय व अर्ध नरकीय भाग म्हणजे असंस्कृत भाग व तिसरा भाग हा कनिष्ठ श्रेणीचा नरकीय भाग म्हणजे गुन्हेगारी भाग! यातील सुसंस्कृत भागाला प्रोत्साहन देण्याचे व असंस्कृत भागाचे नियंत्रण करण्याचे काम दिवाणी कायदा (सिव्हिल लॉ) करतो तर गुन्हेगारी भागाचे नियंत्रण करण्याचे काम फौजदारी कायदा (क्रिमिनल लॉ) करतो. आता हे तीन भाग पुढील तीन उदाहरणांसह स्पष्ट करतो. स्वैराचारी लैंगिक वृत्तीला लगाम घालून विवाह बंधनात राहणारी किंवा एकटे राहूनही स्वैराचार न करणारी माणसे सुसंस्कृत होत, विवाह करूनही जोडीदाराला फसवून विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणारी माणसे असंस्कृत होत व एखाद्याच्या इच्छेविरूद्ध लैंगिक बलात्कार करणारी माणसे गुन्हेगार होत. सामाजिक सुसंस्कृतपणा हा नरकापासून स्वर्गापर्यंतचा अत्यंत अवघड प्रवास असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण सुसंस्कृतपणा हा कधीही एकतर्फी असू शकत नाही, जसे प्रेम हे एकतर्फी असू शकत नाही. सुसंस्कृतपणाची मैत्री असंस्कृतपणाशी कधीही होऊ शकत नाही मग सुसंस्कृतपणाने गुन्हेगारीला जवळ करणे हा तर टोकाचा प्रश्न जो तेंव्हाच निर्माण होतो जेंव्हा सुसंस्कृतपणाच्या चांगुलपणाला हिंस्त्र गुन्हेगारीचे आव्हान निर्माण होते. मानव समाज हा सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगार अशा तीन वर्गात विभागला गेला आहे. तसे नसते तर मग दिवाणी कायद्याबरोबर फौजदारी कायद्याची गरज मानव समाजाला भासलीच नसती. वरील तीन वर्गात विभागल्या गेलेल्या मानव समाजात राहताना जशास तसे या धोरणाचा नाइलाजाने अवलंब करावा लागतो. या धोरणानुसार कधी कोमल तर कधी कठोर वागावे लागते. संपूर्ण सुसंस्कृतपणा असलेली आदर्श समाजव्यवस्था अजून खूप दूर आहे. अर्थात स्वर्ग अजून खूप लांब आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

आयुष्याच्या ओंजळीत निसर्गाचे दान?

आयुष्याच्या ओंजळीत विविधतेने नटलेल्या अवाढव्य निसर्गाचे काय आणि किती भरून घेणार?

निसर्गाचा प्रचंड मोठा पसारा हा विविधतेच्या अनेक तुकड्यांत विखुरलेला आहे. यातील एकेक तुकडाच इतका मोठा आहे की या सर्व तुकड्यांनी बनलेला निसर्ग प्रचंड मोठा झाला आहे. किती प्रकारचे विविध सजीव व निर्जीव पदार्थ आणि या पदार्थांच्या किती ज्ञान शाखा! बापरे, यातील काय म्हणून व किती उचलणार? निसर्गाने भरभरून दिले पण दुबळी मनुष्याची झोळी! ही झोळी खरं तर निसर्गानेच दुबळी बनविली आहे ओंजळीएवढे आयुष्य मनुष्याला देऊन! या छोट्याशा ओंजळीत काय आणि किती मावणार अवाढव्य निसर्गाच्या विविध तुकड्यांचे? उपाशी माणसाला जेवणाचे ताट न देता अन्नधान्याचे कोठार व मोठी फळबागच दान दिली तर तो काय आणि किती खाईल? एवढ्या मोठ्या प्रमाणातील हे अन्नपदार्थ बघून त्या माणसाला त्या पदार्थांविषयी नक्कीच वीट, किळस, मळमळ, तिटकारा निर्माण होईल.  म्हणून मग निसर्गातील किती गोष्टींच्या मागे लागायचे, त्यांचा किती लोभ करायचा अर्थात कुठे थांबायचे हे माणसाला कळले पाहिजे. तसे नाही कळले तरी निसर्ग थांबवतो! उदाहरणार्थ, उपाशी माणसाला खायला बिस्कीटचा मोठा पुडा दिला तर पहिले बिस्कीट खाताना त्याला जो आनंद मिळेल तो हळूहळू पुढील बिस्कीटे खाताना कमी कमी होत जाईल व पुढे पुढे तर बिस्कीट खाण्याची त्याची इच्छाच नष्ट होईल. अशा अती तृप्त अवस्थेला संपृक्तता म्हणतात. तृप्ती, समाधान अवस्था ठीक पण त्यापलिकडे असलेली अती तृप्ती, अती समाधानाची स्थिती  किळसवाणी होय. एखाद्या निवडक गोष्टीचा ध्यास घेऊन तिचा अभ्यास करणे वेगळे व त्या गोष्टीचा लोभ जडून तिचे वेड लागणे वेगळे! कुठे थांबायचे ही अक्कल माणसाला आली नाही तर ती अक्कल निसर्ग शिकवतो!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.९.२०२०

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

अनैतिकतेच्या पायावर उभा नैतिकतेचा डोलारा!

अनैतिकतेच्या पायावर उभा मानवी नैतिकतेचा डोलारा!

(१) सृष्टीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केल्याशिवाय मानवी संस्कृतीचा अभ्यास अपूर्ण होय. मनुष्य प्राणी हा पर्यावरणीय साखळीचा कळस होय. या कळसाचा पाया काय तर निर्जीव पदार्थ, मग अर्धसजीव वनस्पती, मग वनस्पतीवर जगणारे शाकाहारी सजीव प्राणी, मग शाकाहारी सजीव प्राण्यांवर जगणारे मांसाहारी सजीव प्राणी व सर्वात शेवटी या सगळ्यांचे मिश्रण असलेला मनुष्य प्राणी जो शाकाहारी व मांसाहारी असा दोन्हीही आहे.

(२) ही पर्यावरणीय साखळी कशी उत्क्रांत होत गेली तो सृष्टीचा इतिहासही मोठा रोमांचकारक आहे. पण मनुष्यापर्यंतची उत्क्रांती पूर्ण झाली म्हणजे ती संपली असे नाही. ती चालूच आहे. पण आतापर्यंतच्या उत्क्रांतीतून तयार झालेल्या  पर्यावरणीय साखळीतील विविध सजीव व निर्जीव पदार्थ तरी कुठे परिपूर्ण, निश्चित वागत आहेत. नाहीतर पावसाचा लहरीपणा दिसलाच नसता. सृष्टीच्या पर्यावरणीय साखळीतील मानवेतर प्राणी व निर्जीव पदार्थ जर अधूनमधून लहरीपणाने वागतात, तर मग त्यांच्या मूलभूत पायावर उभा असलेला माणूस अधूनमधून लहरीपणाने वागला नाही तर नवलच! सृष्टीतील लहरीपणा व अनिश्चितता मानवी जीवनातही उतरली आहे.

(३) मानवी जीवनाचा व मानवी संस्कृतीचा मूलभूत पाया काय तर पर्यावरणीय साखळी! या साखळीच्या तळाला व मध्यवर्ती भागात काय आहे तर दलदल, हिंस्त्रपणा! चिखलात कमळ उमलते म्हणून चिखलाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मानवी जीवनाचे कमळ हे चिखलातून उमललेले आहे आणि या कमळाचे बंध चिखलाशी कायम आहेत. पर्यावरणीय साखळीतून मनुष्य उत्क्रांत झाल्यावर त्याची पुढील प्रगती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे चाललेला अविरत प्रवास! सृष्टीच्या उत्क्रांतीचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे असला तरी प्रकाशाचा पायाच मुळी अंधार आहे म्हणजेच दिव्याखाली अंधार आहे हे विसरून कसे बरे चालेल?

(४) पण माणूस जरी प्रकाशात आला असला तरी अंधाराने त्याची पाठ सोडलेली नाही. हे म्हणजे चिखलाने कमळाची पाठ न सोडणे असे आहे. हे असे आहे की, निसर्गातील देवाने मनुष्याला स्वर्गात आणून सोडले तरी त्याला नरकापासून मुक्त केले नाही, प्रकाशात आणले तरी अंधारापासून मुक्त केले नाही व नैतिकतेचा सुगंध दिला तरी अनैतिकतेच्या दुर्गंधीपासून मुक्त केले नाही. तसे नसते तर मग आपल्या समाजाची रचना जातीपातीच्या उतरंडीवर उभी राहिली नसती, कायदेशीर अर्थव्यवस्थेबरोबर बेकायदेशीर समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली नसती व सुसंस्कृत समाजात अंडरवर्ल्डची उपस्थिती दिसली नसती.

(५) मानवी वस्तीची निर्मिती जंगलाशेजारीच झाली आहे. मानवी वस्तीला स्वर्ग व जंगलाला नरक मानले तर मग नरक हाच स्वर्गाचा शेजारी आहे असे मान्य करावे लागेल. पण जंगलांना नरक मानून जंगले नष्ट करता येतील का? तसे केले तर जंगलातील जैव विविधता नष्ट होईल व हवेतील प्राणवायू व पाऊसपाणी नष्ट होऊन मनुष्याचे जगणेच अशक्य होईल. सत्य काय तर अंधाराशिवाय प्रकाश नाही, जंगलाशिवाय मनुष्य जीवन नाही, चिखलाशिवाय कमळ नाही व अनैतिकतेशिवाय नैतिकता नाही. म्हणजेच नरकाशिवाय स्वर्ग नाही. स्वर्गाची वाट नरकातून जाते जशी गुलाबाची वाट काट्यांतून जाते. हेच तर निसर्गाचे वैज्ञानिक सत्य आहे. नरक हाच स्वर्गाचा पाया हेच ते आश्चर्यकारक नैसर्गिक सत्य!

(६) नरकापासून जशी स्वर्गाची मुक्ती नाही तशी अनैतिकतेपासून नैतिकतेची मुक्ती नाही. खरं तर अनैतिकतेच्या पायावरच मानवी नैतिकतेचा डोलारा उभा आहे. अर्थात मानवी नैतिकतेची इमारत अनैतिकतेच्या मूलभूत पायापासून अलग करता येणार नाही जसे मनुष्य जीवन हे जंगलापासून अलग करता येणार नाही. पण नरक व स्वर्ग, जंगल व मनुष्य जीवन व तसेच अनैतिकता व नैतिकता यांना आपआपल्या मर्यादा आहेत. निसर्गातील देवाने कोणालाही अमर्यादित स्वातंत्र्य बहाल केलेले नाही. प्रत्येक  जण वाजवी मर्यादांच्या बंधनात आहे.

(७) निसर्गातील देवाने घालून दिलेली मर्यादेची लक्ष्मणरेषा जो कोणी ओलांडेल त्याचा विनाश अटळ आहे. त्यापासून स्वर्ग व नरक, प्रकाश व अंधार, नैतिकता व अनैतिकता या दोन्ही गोष्टी मुक्त नाहीत. म्हणून मानवी वस्तीने जंगले तोडू नयेत, जंगलावर अतिक्रमण करू नये. पण मानवी वस्तीच्या शेजारी जंगल कायम राहणार हे नक्की! कारण जंगल हाच मनुष्य जीवनाचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या शेजारी शेजारी राहणार. त्यातून माणसे अधूनमधून जंगलात जाण्याचे धाडस करणार व जंगली जनावरे सुद्धा मानवी वस्त्यांत येण्याचे धाडस करणार. त्यामुळे जंगले व मानवी वस्त्या यांच्या सीमारेषा निश्चित करून मध्ये कुंपण हे घातलेच पाहिजे. असे कुंपण हीच दोन्हीमधील मर्यादेची लक्ष्मणरेषा असेल.

(८) या लेखाचे तात्पर्य काय, तर मनुष्याला त्याच्या आयुष्यात पूर्ण सुख व शांती लाभूच शकत नाही. कारण स्वर्गाचा पायाच मुळी नरक आहे. या पायाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कमळाला चिखलाकडे दुर्लक्ष करून चालेल का? पण म्हणून काय कमळाने चिखलाला सतत घाबरून रहावे? तसेच सद्या आलेल्या कोरोना महामारीचे आहे. हा कोरोना विषाणू कुठून आला? जंगलातून आला की मानवी वस्त्यांतच तयार झाला याचा शोध घेताना हेही ध्यानात ठेवले पाहिजे की सद्याचा कोविड-१९ हा कोरोना विषाणू निघून गेला किंवा नष्ट केला गेला तरी पुन्हा अशा प्रकारचे विषाणू निर्माण होणारच नाहीत असे नाही. याचे कारण म्हणजे  स्वर्गाला कायम नरकाची सोबत आहे व मानवी वस्त्यांना कायम जंगलाची सोबत आहे.

(९) सद्या तरी कोरोनाची दहशत भयंकर आहे. मास्क लावून बाजारात फिरताना माणसे पूर्वीसारखी आनंदी दिसत नाहीत. वातावरणात उदासीनता आहे. कारण कोरोनाचा दंश भयंकर आहे. त्याचे विष उतरून कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण कोरोना निगेटिव्ह झाला तरी अशा रूग्णाला सोडून जाताना कोरोना रूग्णाचे अवयव फार अशक्त करून जातो. एकप्रकारचे अपंगत्वच ते! काही माणसे कोरोनातून मुक्त झाल्यावरही अवयव अशक्त व पुढे निकामी झाल्याने मृत्यू पावतात. प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे काल ७४ व्या वर्षी दुःखद निधन झाले ते कोरोनामुक्त झाल्यानंतर! का तर कोरोना दंशाने त्यांची फुफ्फुसे व इतर अवयव निकामी झाले म्हणून. हे सर्व भयंकर आहे.

(१०) निसर्गातील देवाने मनुष्याला पर्यावरणीय साखळीच्या सर्वोच्च पदावर आणून खरंच स्वर्ग दाखवला म्हणून त्या देवाचे आभार मानणे हे योग्यच होय. पण याच देवाने या स्वर्गाचा पाया नरक आहे हे निश्चित करून नरकापासून स्वर्ग मुक्त नाही हे मनुष्याला बजावले आहे. हा देव याच पायाभूत नरकातून मनुष्यापुढे कायमच काहीना काहीतरी जगण्याची आव्हाने, संकटे निर्माण करीत असतो. त्याबद्दल या देवाला काय म्हणावे? मनुष्याने त्याचे आभार मानावेत की अशा संकटांशी लढण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना करावी?

-ॲड.बी.एस.मोरे©२५.९.२०२०

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

#कपलचॕलेंज एक हलकट कल्पना!

#couplechallenge एक हलकट कल्पना!

दुसऱ्यांच्या बायका बघून समाधान मानणाऱ्या कोणत्या तरी भुक्कड आंबट शौकिनाने ही #couplechallenge ची भन्नाट कल्पना काढलेली दिसतेय! लोकांना कोरोनाने आणि लॉकडाऊनच्या बेकारीने त्रस्त केलेय आणि काही लोकांना असल्या कल्पना सुचतात आणि काहीजण त्याला बळीही पडतात. कसले #challenge आणि कसले काय!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.९.२०२०

मी तसा भित्राच!

मी तसा भित्राच!

पुरूषांनी घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकताना काळजी घ्यावी व शक्यतो असे फोटो टाकू नयेत याविषयी मी आज दोन पोस्टस फेसबुकवर लिहिल्या. त्यावर पाठिंबा व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या कमेंटस आल्याने माझ्या या दोन्ही पोस्टस स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरल्या. या दोन्ही पोस्टसमुळे मी मागासलेला, जुनाट विचाराचा आहे असाही समज निर्माण झाला. याविषयी मला एवढेच म्हणायचे आहे की, मला जे योग्य वाटले ते मी लिहिले. कोणत्याही स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा घालणे हा जर भित्रेपणा असेल तर तो मी माझ्यापुरता जरूर करणार व मी तसा भित्रा आहे असे जाहीरपणे लोकांना सांगणार. मग लोकच ठरवतील की माझ्याशी मैत्री करायची की नाही व केली असेल तर ती ठेवायची की नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०

फेसबुकवर घरातील स्त्रियांचे फोटो?

#challenge
फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो पुरूषांनी शेअर करावेत की करू नयेत, एक आव्हान!

ज्या लोकांना आपल्या बायको, मुली, सूना, आया बहिणींचे फोटो फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर एक आव्हान व मर्दुमकी म्हणून बिनधास्त टाकायचेत त्यांनी ते खुशाल टाकावे. कोणी फेसबुक इनबॉक्स मध्ये काय केले हे बघण्यापेक्षा अशा व्यक्तीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी पटतायत का बुद्धीला ही गोष्ट महत्त्वाची. माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हलकट टोळीच्या हनी ट्रॕपमध्ये मीही एकदा सापडलो. आता लोक म्हणतील काका पण चाबरट आहेत. मग कशाला मोठ्या गोष्टी करतात आणि लोकांना शहाणपण शिकवतात. पण मीही माणूस आहे. मी फसलो, चुकलो पण घाबरलो नाही. भले भले चुकतात त्यात माझे काय? चुकलो म्हणजे चुकलो? पण मी आता आदळाआपट करीत नाही तर माझ्या चुकीतून लोकांना सावध करतो. काय केले असेल त्या हनी ट्रॕप टोळीने! माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला माझे बायको बरोबरचे जे फोटो फेसबुकवर टाकले होते तेच मला व्हॉटसॲपवर पाठवून देऊन मला पैसे मागितले. मग मी ते संभाषण वगैरेचे स्क्रीन शॉटस घेऊन डोंबिवली पोलीस स्टेशन व ठाणे सायबर गुन्हे शाखेस लगेच ईमेलने लेखी तक्रार केली. आता ती टोळी मी त्यांच्या धमकीला जुमानले नाही म्हणून माझ्या बायकोच्या फोटोंचा कदाचित गैरवापरही करतील. मग विचार आला की बायकोचे फोटो फेसबुकवर टाकले नसते तर बरे झाले असते. मी नंतर माझ्या बायकोचे ते सगळे फोटो फेसबुकवरून डिलिट केले. माझ्या मुलीने तर मला सक्त ताकीद दिलीय की तिचे फोटो कधीही फेसबुक किंवा कोणत्याच समाज माध्यमावर टाकायचे नाहीत म्हणून. मुलगी एम.बी.ए. व मोठ्या कंपनीची व्यवस्थापक आहे. पण ती जेंव्हा मला हे सांगते तेंव्हा ती मागासलेल्या विचाराची झाली का? फेसबुकवर काही नासके आंबे घुसले आहेत. एक नासका आंबा खरंच आंब्याची अख्खी करंडी नासवतो. विषाची परीक्षा का घ्या? तरीही जर कोणाला आपल्या घरातील स्त्रियांचे फोटो फेसबुकवर टाकण्यात कौतुक वाटत असेल तर त्यांनी घरातील त्या स्त्रियांची परवानगी घेऊन खुशाल टाकावेत. पण तत्पूर्वी फेसबुकवर अशाही गोष्टी चालतात याचीही त्यांना कल्पना द्यावी. बाकी आपण सूज्ञ आहातच!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.९.२०२०

#कपलचॕलेंज!

#challenge 
तुमची बायको दाखवा,
तुमची सुंदर मुलगी दाखवा,
अशा रिकाम्या परंतु #भविष्यात_घातक_ठरू_शकणाऱ्या_चॅलेंजस चा महापूर सध्या FB वर पहायला मिळतो आहे.#आपलं_प्रदर्शन_जगात_जाते_कृपया हे आपण टाळले पाहिजे F.B वर चांगले लोक जेवढे  आहेत तेवढे  वाईट आहेत हॅकर्स आहेत 
FB वरून मुलींचे व स्त्रियांचे फोटो घेऊन घाणेरड्या पेजेस वर टाकण्याचे नीच प्रकार सातत्याने होत असताना, असले प्रकार होत आहे. आणि यात सुशिक्षित म्हणवणारे  लोकच दिसून येतात..

आपल्या घरातील लक्ष्मी, स्त्रिया प्रदर्शनाची वस्तू आहेत का? 
उद्या आपल्या घरातील स्त्रीच्या फोटो सह चुकीची पोस्ट दिसली तर दोष कुणाला द्यायचा..?
याचा ही विचार करायला हवा...
 
अशी रिकामे आव्हाने घेऊन काय दाखविले जाते..??

आव्हान स्वीकारायचे तर,
स्वच्छतेचे, 
कोरोना विरुद्ध लढण्याचे,
या अवघड काळात अन्न, वस्त्र वाटपाचे
किमान चार विद्यार्थ्यांना वही पुस्तक देण्याचे घ्यायला हवे....

कृपया जरा तरी विचार करा....

(फेसबुक वरून साभार)