सामाजिक समानतेचा मूलभूत हक्क!
भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन योग्य होय. गुरूवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२३ च्या लोकसत्तेत ही बातमी वाचली व हिंदू समाजात स्वागतार्ह बदल होत आहेत याची ही झलक बघायला मिळाली. भारतीयत्व म्हणजे सनातन हिंदुत्व (आदिम भारतीय जीवनशैली) याचा स्वीकार होण्यासाठी व त्यातून भेदभाव नसलेला अखंड भारत निर्माण होण्यासाठी "जातीपाती तोडो, भारत समाज जोडो" अशी प्रतिज्ञा सर्व भारतीयांनी केली पाहिजे असे मला वाटते.
भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे. असे स्पष्ट प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले.
ते म्हणाले "आरक्षण हा विषय आर्थिक समानता आणण्यापुरता मर्यादित नाही. सामाजिक समानता आणणे आवश्यक आहे. सामाजिक समानता आल्याशिवाय काहीही शक्य नाही. त्यामुळे आरक्षण कधी पर्यंत राहील असा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांनी हा विचार करावा की, काही लोकांनी दोन हजार वर्षे अन्याय, त्रास सहन केला, मग आम्ही दोनशे वर्षे कष्ट भोगले तर काय बिघडणार आहे"?
याचा अर्थ आणखी दोनशे वर्षे तरी भारतीय समाजमनाच्या मानगुटीवर बसलेले जातीपातीचे भूत खाली उतरणार नाही. दोन हजार वर्षाचे हे जुने भूत पुढील दोनशे वर्षात खाली उतरेल का व संपूर्ण सामाजिक क्रांती होऊन भारतात सामाजिक समानता प्रस्थापित होईल का हा प्रश्नच आहे. म्हणजे भारतातून जातीपातीचा पूर्ण अंत होत नाही तोपर्यंत भारतात संविधानाने मागास जातीवर्गांना दिलेले आरक्षण चालूच राहणार. सामाजिक समानतेचा मूलभूत हक्क आरक्षणात समाविष्ट आहे हा अर्थ यातून निघतो.
डॉ. मोहन भागवत म्हणतात की महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. एकलव्य व कर्ण ही तर या जातीपातीची ठळक उदाहरणे. विशेष म्हणजे आपण ज्या श्रीकृष्णाला परमेश्वराचा अवतार मानतो त्या श्रीकृष्णालाही त्याच्या दैवी शक्तीने समाजातील ही जातीची कीड नष्ट करता आली नाही. याचा अर्थ जातीपातीवर आधारित सामाजिक असमानता हा भारतीय समाजाला लागलेला फार जुनाट रोग आहे. महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध चुलत भावंडांमध्ये राज्य वाटणीच्या अर्थात आर्थिक व राजकीय मुद्यांवर लढले गेले आणि याच युद्धाच्या युद्धभूमीवर अवतारी श्रीकृष्णाने मानवी जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान सांगणारी गीता अर्जुनाला सांगितली आहे.
वरील अभ्यासातून मला एवढेच कळते की, देवावर श्रद्धा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जातीपाती देवाने निर्माण केल्या नाहीत तर त्या माणसांनीच निर्माण केल्या व म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीपातीचे भूत डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या अत्यंत संकुचित मनाच्या माणसांबरोबर तीव्र संघर्ष करावा लागला. खरं तर देव अन्याय करीत नाही तर संकुचित मनाची माणसेच माणसांवर अन्याय करतात व देवाच्या नावाने काहीही खपवण्याचा प्रयत्न करतात.
-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२३