https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
गुरुवार, २० जून, २०२४
Definition of Law by Adv.B.S.More
निसर्गशक्ती पुढे नतमस्तक!
फाफटपसारा व प्रतिसाद!
फाफटपसारा व प्रतिसाद!
आपली आवड व क्षमता लक्षात घेऊन आपली ज्ञान शाखा व कार्य शाखा निवडावी लागते. जगात जन्म घेतल्यावर आपल्या ज्ञानार्जनासाठी व कार्यासाठी निसर्गाने त्याच्या पदार्थीय विश्वात बरीच विविधता निर्माण केली आहे. ही विविधता माणसांतही उतरली आहे. जगात असलेल्या सगळ्याच गोष्टींना साधा स्पर्श करता येत नाही मग त्यात ज्ञान प्रवीण व कार्य प्रवीण होण्याची तर गोष्टच सोडा. त्यामुळे आपली आवड व क्षमता सोडून ही विविधता म्हणजे व्यक्तीसाठी फाफटपसाराच असतो. उतार वयातही आपली आवड व क्षमता लक्षात घेऊनच माध्यमातील बातम्या वाचाव्यात, बघाव्यात व ऐकाव्यात व आपल्या आवड व क्षमतेनुसार त्यातील काही गोष्टींनाच आपल्या आवड व क्षमतेनुसार योग्य तो प्रतिसाद द्यावा. बाकी उगाच फाफटपसारा वाढवत सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देण्यात व त्यांना प्रतिसाद देण्यात अर्थ नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४
प्रतिकार!
प्रतिकार!
माणूस पूर्णपणे सुसंस्कृत व समंजस व्हायला अजून खूप काळ लागणार आहे. लोकसंख्या वाढीने तर आता जीवघेण्या स्पर्धेतून अहंकार, द्वेष, मत्सर, हिंसक प्रवृत्ती यासारख्या नकारार्थी भावना अनेक पटीने वाढवल्या आहेत. या आव्हानात्मक वातावरणात अहिंसा तत्वाची नुसती जपमाळ ओढत बसण्यात अर्थ नाही कारण अन्यायाविरूद्ध जशास तसा प्रतिकार ही आजच्या काळाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज आहे व त्यासाठी आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे पुनर्जागरण व अनुपालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपल्या लढवय्या महापुरूषांच्या स्मृती जागृत करून अन्यायाविरूद्ध लढण्याची चेतना जागृत केली पाहिजे!
-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४
बुधवार, १९ जून, २०२४
अतिरेकी प्रेम, हिंसा व नेभळट समाज!
माझे पोदार काॕमर्स काॕलेज!
माझे पोदार काॕमर्स काॕलेज!
हेच ते माझे रमणीरंजन आनंदीलाल पोदार काॕलेज आॕफ काॕमर्स अँड इकाॕनाॕमिक्स (थोडक्यात पोदार काॕमर्स काॕलेज), माटुंगा, मुंबई ज्या काॕलेजात १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी काॕमर्स पदवीचे शिक्षण घेतले. या काॕलेजची मजा नंतर ना सिडनॕहम काॕमर्स काॕलेज मधून कंपनी सेक्रेटरी (इंटर) चा पार्ट टाईम अभ्यासक्रम करताना आली ना गव्हर्मेंट लाॕ काॕलेज मधून तीन वर्षाची पदव्युत्तर कायद्याची पदवी (एलएल.बी.) घेताना आली.
पोदार काॕलेजचा माझ्या बॕचचा फक्त एकच अशोक सावंत नावाचा मित्र फेसबुक माध्यमातून सद्या माझ्या संपर्कात आहे. बाकी सगळे विखुरले गेले. काही मित्र परदेशात स्थायिक झाले. त्या काॕलेजची एकही मैत्रीण माझ्या बिलकुल संपर्कात नाही. मी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) माध्यमातून या काॕलेजच्या समाज कार्यात सक्रिय होतो. पण अभ्यासू, गंभीर विद्यार्थी म्हणूनच काॕलेजमध्ये माझी ओळख होती व कदाचित त्यामुळे माझी काॕलेजच्या मुलींशी मैत्री तशी कमीच होती.
वर्गात अभ्यास वह्यांच्या माध्यमातून एका सुंदर मैत्रिणीशी छान जवळीक निर्माण झाली होती. पण नंतर तिचे व माझे कुठेतरी बिनसले आणि मग ती दूर झाली. वर्ग मैत्रिणीशी ही मैत्री सुरू असताना मी त्यावेळी प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर व रंजिता यांचा अखियों के झरोको से हा हिंदी चित्रपट सारखा बघत होतो. असो, ती गोड मैत्री सोडली तर मग काॕलेजच्या इतर कोणत्याही मुलीशी तशी मैत्री झालीच नाही. ती मैत्रीण आता कुठे असेल? असो, पण तिची गोड आठवण मात्र माझ्या जवळ कायम आहे.
माझा हा फोटो आमच्या पोदार काॕमर्स काॕलेजच्या गच्चीवरील टाॕवर खालील आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४
नैसर्गिक न्याय!
नैसर्गिक न्याय!
शब्दांचा फाफटपसारा वाढवत शब्दांतच अडकलेला व न्याय करू की नको या विचारातच अडकलेला कायदा न्याय करूच शकत नाही. काही आणीबाणीच्या प्रसंगी न्याय त्वरीत (झटपट) मिळणे आवश्यक असते. पण इतर सर्वसाधारण परिस्थितीतही न्याय योग्य वेळेत मिळणे आवश्यक असते. न्याय हा प्रमाणबद्ध म्हणजे जेवढ्यास तेवढा व जशास तसा असावा लागतो व तो विनाविलंब म्हणजे योग्य वेळेत मिळावा लागतो म्हणजे कालबद्ध असावा लागतो. त्वरीत न्याय म्हणजे घाईघाईत दिलेला न्याय नव्हे. न्यायाचा नैसर्गिक कालावधी म्हणजे काय हे कळण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गर्भधारणा झाल्यावर बाळाच्या आईने किती काळ त्या बाळाला पोटात घेऊन रहावे याला नैसर्गिक कालमर्यादा आहे. स्त्रीच्या बाबतीत ती कालमर्यादा साधारण नऊ महिने आहे. हीच कालबद्ध न्यायाची गोष्ट निसर्गातील (निसर्गात मानव समाजही येतो) सर्व प्रकारच्या न्यायात आहे मग त्याला नैसर्गिक न्याय म्हणा नाहीतर सामाजिक न्याय म्हणा. मानवनिर्मित कोणताही कायदा जो असा प्रमाणबद्ध व कालबद्ध न्याय देऊ शकत नाही तो अनैसर्गिक म्हणजे निसर्ग नियमांच्या विरूद्ध असलेला कायदा होय.
-©ॲड.बी.एस.मोरे, १९.६.२०२४