धाकटया बहिणीला थोरल्या भावाचे पत्र!
प्रिय भगिनी,
तुझ्या डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांनी तुला हे जग प्रत्यक्षात कसे आहे हे दाखवले आणि मन नावाच्या तुझ्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने तुला परमेश्वर नावाच्या अलौकिक शक्तीची सहावी जाणीव करून देत अप्रत्यक्ष जाणिवेतला परमेश्वर समोर उभा केला. पण याच परमेश्वराने, तुझ्या तरूण वयात तुझी शक्ती व्यवस्थित असताना, तुझा उत्साह चांगला असताना तुझ्या जीवनसाथीला म्हणजे तुझ्या पतीला अचानक तुझ्यापासून हिरावून घेतले आणि तरीही या परमेश्वराचे तू गुणगाण गातेस? त्याला उलट जाब का विचारत नाहीस?
ज्यांचे सर्व काही नीट चालले आहे त्यांना खुशाल त्या परमेश्वराची जपमाळ ओढत बसू देत पण तुझे काय? तू आयुष्यात कोणतीही वाईट करणी केली नाहीस. इमाने इतबारे संसार केलास. तुझ्या मुलांना असेल त्या कठीण परिस्थितीत वाढवलेस आणि तरीही हा परमेश्वर तुलाच असली भयानक शिक्षा करतोय? आणि उतार वयातही पुन्हा आणखी त्रास देतोय?
तुझ्या मुलांचा संसार चांगला चाललाय यात आई म्हणून तुला मोठे समाधान असणे हे ठीक आहे. पण या परमेश्वराने तुझा संसार मध्येच मोडला त्याचे काय करायचे? "दो हंसो का जोडा बिछड गयो रे" हे गाणे म्हणत रडत बसायचे का? की त्या परमेश्वराच्या नावाने खडे फोडत बसायचे? दुसरे करतात म्हणून तूही त्यांची री ओढत बसायचे का?
हा परमेश्वर कोणाला चांगला तर कोणाला वाईट. त्याचा थांगपत्ता ना कोणाला लागला आणि ना कोणाला कधी लागेल. याचा अर्थ असा नव्हे की परमेश्वरावर श्रद्धा ठेवू नये. जरूर ठेवावी. पण भोळी, आंधळी श्रद्धा ठेवू नये. चांगली डोळस श्रद्धा ठेवावी. बुद्धीने नीट विचार करून वास्तव नीट समजून घ्यावे. ज्या लोकांची बुद्धी भ्रमिष्ट झालीय अशा लोकांच्या नादी लागू नये. ही माणसे वास्तव नीट समजून न घेता विचित्र वागतात व स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही त्रास देतात जो त्रास कधीकधी फार भयंकर असतो. अशा लोकांचा विचार करून स्वतःचे आयुष्य बिघडवू नकोस. लोकांच्या नाकावर टिच्चून मस्त जग. तुझा जीवनसाथी आता परत येणार नाही. पण सगळं काही संपलेले नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी अजूनही तुझी सोबत करीत आहेत. तुझी चांगली मुले, चांगल्या सुना, चांगली नातवंडे यांचा चांगला गोतावळा व आधार तुला आहे. वृद्धाश्रमातील लोकांचे दुःख तुझ्या वाट्याला आले नाही त्याबद्दल त्या परमेश्वराचे थोडे आभार मान. पण त्याचे जास्त आभार बिलकुल मानू नकोस. कारण याच परमेश्वराने तरूण वयात तुझा जीवनसाथी तुझ्यापासून हिरावून नेलाय. नुसत्या जगाशीच नव्हे तर परमेश्वराबरोबरही व्यवहारी वाग कारण जगाचा व्यवहार त्यानेच निर्माण केलाय. तेव्हा व्यवहारी बन व खंबीर मनाने मस्त जग!
-बाळू दादा, १९.५.२०२४