https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
सोमवार, १ एप्रिल, २०२४
नाती जपली पाहिजेत!
रविवार, ३१ मार्च, २०२४
यशाचे गुपीत!
यशाचे गुपीत!
या जगात यशस्वी माणूस कधी खरे ज्ञान देत नाही व खरे ज्ञान देणारा माणूस कधी यशस्वी होत नाही. वरवरची माहिती देणारे भरपूर भेटतील पण त्या माहितीतला सार कोण देणार नाही. सार वाटत बसले तर यश कसे मिळणार? उद्योग, धंदा किंवा व्यवसायातील व्यवहार ज्ञान म्हणजे व्यापारी गुपीत. भांडवलदार लोक त्यांची व्यापारी गुपिते वाटत फिरत नाहीत. भांडवल म्हणजे नुसता पैसा, संपत्ती नव्हे तर ज्ञानही. मूर्ख लोक यशाची गुपिते गुप्त ठेवणाऱ्या धूर्त भांडवलदार लोकांच्या कंपूचे पाय चाटण्यात आयुष्य घालवतील पण खरे ज्ञान देणाऱ्या प्रामाणिक ज्ञानी माणसाला कधी किंमत देणार नाहीत. खरं तर असे ज्ञान फुकटात वाटत बसणाऱ्या माणसाला या जगात मूर्ख माणूस असे म्हणतात!
-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४
मुलांचे यश आणि आईबापांचा बडेजाव!
मुलांचे यश आणि आईबापांचा बडेजाव!
प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या यशाचा आनंद होणे हे नैसर्गिक आहे. परंतु आपण मनुष्य जन्म घेऊन आपण स्वतः आपल्या आयुष्यात काय कर्तुत्व गाजवले याकडे न बघता नुसत्या मुलांच्या यशाची टिमकी वाजवत फिरणे हे मला तरी पटत नाही. मी इतरांच्या अनुभवावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून बोलतो, लिहितो.
मीही बी.कॉम. (आॕनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी एवढे उच्च शिक्षण घेतलेय. परंतु उपयोग काय? या एवढ्या मोठ्या शिक्षणाचा ५% भाग सुद्धा मी माझ्या गेल्या ३६ वर्षांच्या वकिलीत वापरू शकलो नाही. अर्थात माझ्या शिक्षणाच्या मानाने मी ५% एवढेही यश माझ्या आयुष्यात मिळवू शकलो नाही. पण याच्या उलट माझी उच्च शिक्षित मुलगी व माझा उच्च शिक्षित जावई या दोघांनी थोड्याच काळात जगात व्यवहारी बनून या अल्प काळातच एवढे मोठे यश मिळवलेय की त्या यशाच्या ५% एवढेही यश मी माझ्या अख्ख्या आयुष्यात (६७ वर्षाच्या आयुष्यात) मिळवू शकलो नाही. मग मी काय माझ्या मुलीच्या व जावयाच्या यशाची टिमकी वाजवत गावभर फिरावे? मी स्वतः अयशस्वी वकील आहे हे तर जगजाहीर आहे आणि तरीही स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी मी माझ्या मुलीच्या व माझ्या जावयाच्या यशाची टिमकी वाजवत गावभर फिरू? हसतील ना लोक माझ्या या वेडेपणाला आणि हो असे करताना माझी मला स्वतःलाच लाज वाटेल त्याचे काय?
हेच कारण आहे की मी माझी पत्नी, माझी मुलगी व माझा जावई यांच्या सोबतचे कौटुंबिक फोटो समाज माध्यमावर टाकत नाही. तो आनंद फक्त स्वतःपुरताच, इतरांना काय पडलेय त्याचे? मी समाज माध्यमात फक्त माझे स्वतःचे अनुभव व विचार लिहितो. पण त्यालाही काही अर्थ राहिला नाही. अपयशी माणसाचे अनुभव व विचार वास्तव असले तरी लोकांना त्याची काहीही किंमत नसते व ती अपेक्षा करणेही चुकीचे. असो, यशाच्या धुंदीत जगणे सहज सोपे असते पण अपयश पचवून जगणे महाकठीण असते. माझ्या मनाला कसा आवर घालावा? ते गप्प बसत नाही. सारखे व्यक्त होत राहते. ही खरं तर माझी निरर्थक बडबड आहे. लोकांपासून अलिप्त राहू का मी? माझे बोलणे, लिहिणे बंद करू का मी? अशाप्रकारे मौन बाळगणे यालाच अध्यात्म म्हणू का मी?
-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४
आम्रपाली!
आम्रपाली!
पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम मानले गेले. स्त्रियांना तर प्रगत देशातही मतदानाचा अधिकार नव्हता. पती परमेश्वर कल्पनेवर आधारित सतीची परंपरा घालवण्यासाठी राजा राममनोहर राय या समाज सुधारकाला संघर्ष करावा लागला. राजकारणात स्त्रियांना किती टक्के आरक्षण द्यायचे यावर वादविवाद झाले. स्त्री पुरूष समानतेचे कायदे येण्यासाठी हजारो वर्षे जावी लागली. पण अजूनही स्त्री कडे भोगवस्तू म्हणून बघण्याची काही पुरूषांची सडकी मनोवृत्ती कायम आहे. आम्रपाली हा हिंदी चित्रपट छान आहे. आम्रपाली या वैशाली नगरातील वेश्येची (नगर वधूची) कथा ही तर हृदयाला पीळ पाडणारी आहे. कान्होपात्रा ही सुद्धा वेश्या होती. पण तिला श्रीविठ्ठल पांडुरंगाने त्याच्या हृदयात स्थान दिले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात याच कान्होपात्रेचे छोटेसे मंदिर आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, १.४.२०२४
आमच्या सिद्धीचे लग्न!
आमच्या सिद्धीचे लग्न!
मॕट्रीमोनी ताई, सगळंच काही बायोडाटात मांडता येत नाही. पण मुलाचा काका म्हणून सांगतो की, ज्या मुलीचे आमच्या सिद्धीबरोबर (सिद्धांत विठ्ठल मोरे) लग्न होईल तिच्या आयुष्याचे कल्याण होईल. मी जे खडतर जीवन अनुभवलेय त्याही पेक्षा जास्त खडतर जीवन आमच्या सिद्धीने अनुभवलेय व तरीही ३२ वर्षे झाले तो संयम पाळून आहे. या मुलाची उंची, त्याचे गोरेपण, त्याचा हँडसमपणा, त्याचे बोलणे, त्याचा स्वभाव बघून नुसत्या आकर्षणावर भाळणाऱ्या मुली प्रेमासाठी त्याच्या मागे लागल्या नसतील का? पण आमचा मुलगा घरंदाज, सुसंस्कृत व विवेकी आहे म्हणून ३२ वर्षे झाले तरी असल्या वरवरच्या प्रेमाच्या नादाला तो लागला नाही याचा आम्हाला अभिमान आहे. मी माझा विवाह जमवून लग्न केलेय. लग्ना अगोदर तीन मुलींनी माझ्या सोबत प्रेमाचे नाटक करून मला नाकारले ते चांगले झाले. कारण म्हणून तर ३९ वर्षे माझ्याबरोबर माझ्या खडतर परिस्थितीतही संसार करणारी पत्नी मला मिळाली. माझ्या मुलीनेही ३२ व्या वर्षीच वधूवर सूचक विवाह संस्थेच्या माध्यमातूनच जमवून लग्न केले. लग्नाअगोदर बाॕय फ्रेंड, प्रेम नाही केले. उच्च शिक्षण व उच्च करियरचे ध्येय समोर असल्याने संयम पाळला. पण खरं तर इथे शिक्षणापेक्षा मुलामुलींवरील योग्य संस्काराचा व सुसंस्कृतपणाचा प्रश्न असतो. नुसत्या फोटोवरून व बायोडाटा वरून माझ्या पुतण्याची (सिद्धीची) कसली वर परीक्षा घेणार तुमच्या संस्थेत नाव नोंदवलेल्या मुली? त्याला प्रत्यक्ष बघितल्यावर, त्याच्याशी बोलल्यावरच आमचा मुलगा कसा आहे हे त्या मुलींना कळेल. मी मात्र ठामपणे हेच म्हणेल की आमच्या सिद्धीला ज्या मुली नाकारतील त्यांचे ते दुर्दैव असेल आणि त्याला समजूतदार, संसारी, चांगली मुलगी मिळण्याचे ते सुदैव असेल. आमचे चोहोकडून तसे प्रयत्न चालू आहेत. योग आला की तसेच होईल. हे लग्न जमवायचे काम चाललेय, नोकरी मिळविण्याचे नव्हे म्हणून सरळस्पष्ट लिहिले हे लक्षात घ्यावे.
-ॲड. बळीराम मोरे (मुलाचा काका), १.४.२०२४
गुरुवार, २८ मार्च, २०२४
आमचा सुवर्णकाळ!
काल्पनिक आभासी मिथ्य कथा!
काल्पनिक आभासी मिथ्य कथा!
मित्रहो, कृपया मला पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मिथ्या, अंधश्रद्ध कथांचे लिखाण किंवा व्हिडिओज पाठवू नका. मी विज्ञाननिष्ठ माणूस आहे. अशा कथांत सांगितलेले सर्व काल्पनिक, आभासी असते. असे काहीही प्रत्यक्षात होत नाही. या सगळ्या कल्पना आहेत. वास्तव फार वेगळे आहे. मनाला विरंगुळा म्हणून सुद्धा मी असले लिखाण वाचत नाही, व्हिडिओज बघत नाही. याला इंग्रजीत मिथॉलॉजी (मिथ्य) म्हणतात. खरे सांगायचे तर, आता जसे काही लेखक काल्पनिक कथा, कादंबऱ्या लिहितात ज्यावर काही चित्रपटही येतात अगदी तसेच विज्ञानाने अप्रगत असलेले पूर्वीचे लोक असल्या काल्पनिक कथा रचायचे. पुढे लोकांनी या मिथ्य कथांना तिखटमीठ लावून त्यात चमत्कार घुसवून त्या कथा खऱ्या वाटतील अशी त्यांची रचना केली. असो, यावर अधिक भाष्य करणार नाही. लोकांना माझे हे म्हणणे पटावे अशी माझी अपेक्षा नाही. लोकांनी त्यांना जे योग्य वाटेल ते करावे. मला जे योग्य वाटेल ते मी केले व करीत आहे समाजातील अंधश्रद्ध लोकांची पर्वा न करता. सत्य हे कटू असते. लोकांना ते कसे आवडेल? म्हणून ते लोकांना समजावून सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही. तरीही माझी भूमिका एकदा स्पष्ट केल्यावर सुद्धा जर कुणी मला त्याचे किंवा तिचे ते न पटणारे लिखाण, व्हिडिओ पाठवले तर या सर्वांना मी माझे स्मरणपत्र (रिमांइडर) पाठवतो.
-©ॲड.बी.एस.मोरे, २८.३.२०२४