धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे लागते!
श्री. रविंद्र मालुसरे, अध्यक्ष, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, आपण रामायणावर हे छान लिहिले आहे ते मी समाज माध्यमावर शेअर करतो. पण धर्माचे राजकारण करणाऱ्यांना हे कितपत रूचेल? सद्या वाल्मिकी रामायणाचाच गाजावाजा होताना दिसत आहे. तुलसीदासांचे रामायण पण आहे. भृगू ऋषी यांनी पण टीकात्मक रामायण लिहिले आहे असे कुठेतरी वाचण्यात आले. पण बहुसंख्य लोकांना धार्मिक भावनांवर डोलताना भौतिक वास्तवाचा अर्थात आकाशात उडताना पृथ्वीवरील जमिनीचा विसर पडताना दिसतो. लोकांच्या याच भावनिक मानसिकतेचा राजकारणी लोक फायदा उठवतात व धर्माला राजकारणाच्या दावणीला बांधतात. पण राजकारण्यांचा हा धूर्तपणा लोकांना कळत नाही. धर्माचा राजकारणासाठी वापर होऊ नये असे कितीही वाटले व ते असंविधानिक असले तरी तसा वापर होतोच. यावर रोखठोक बौद्धिक विचार मांडण्याची सोय नाही. कारण धर्मभावनेने बेभान झालेले लोक अंगावरून चवताळून येतात. त्यांना वास्तव लेखन आवडत नाही. मला सुद्धा समाज माध्यमावर फार सांभाळून लेखन करावे लागते. खूप बौद्धिक कष्टाने मिळवलेले वकील पद व वयाचे ज्येष्ठत्व याची बिलकुल पर्वा न करता ओळख पाळख नसलेले पण स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्र झालेले फेसबुकी मित्र अशा स्पष्ट लिखाणावर सरळ सरळ शिव्या द्यायला कमी करत नाहीत. मला असे अनुभव अधूनमधून येतात. मग खालची बौद्धिक पातळी असलेल्या चुकून माझे मित्र झालेल्या लोकांना मला ब्लॉक करावे लागते. म्हणून तर मी माझे फेसबुक खाते निवडक वैचारिक मित्रांसाठी मर्यादित ठेवले आहे. आपले लेखन छान असते. धन्यवाद!
-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१.२०२४
https://poladpuraasmita.blogspot.com/2024/01/blog-post_21.html