नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम!
निसर्गाने त्याच्या उत्क्रांतीतून काय पण नमुने बनवून ठेवलेत या जगात. या नमुन्यांची विविधता नुसती वरवर बघितली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. मग ती तपासायला गेल्यावर तर काय मेंदूचा पार भुगाच होऊन जातो.
या जगात निर्जीव पदार्थांचे नमुने किती, अर्धसजीव वनस्पतींचे नमुने किती, सजीव प्राणी म्हणजे पाण्यात राहणारे मासे, हवेत उडणारे पक्षी, किटक, जमिनीवर सरपटणारे प्राणी, जमिनीवरील शाकाहारी, मांसाहारी चार पायांचे प्राणी, दोन पायांची व दोन हातांची माणसे यांचे नमुने किती, बापरे या सर्वांचा अभ्यास करून या सर्वांबरोबर राहणे म्हणजे केवढे कठीण काम.
वरील नमुनेदार पदार्थ, वनस्पती, पक्षी, प्राणी, माणसे त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार या जगात नमुनेदार हालचाल करीत असतात. या सर्वात माणूस हा खास नमुनेदार प्राणी. हा खास नमुना निसर्गाने काय विचार करून बनवला असेल (उत्क्रांत केला असेल) हे कळायला मार्ग नाही आणि निसर्गाला मन, बुद्धी आहे का व तो विचार करतो का हे कळायला पण मार्ग नाही.
निसर्गाचा खास नमुना असलेल्या बुद्धिमान माणसाने त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याचे जीवन खास नमुनेदार बनविलेले आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या जीवनाला वैज्ञानिक व तांत्रिक, कलात्मक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, शासकीय, कायदेशीर, सांस्कृतिक, आध्यात्मिक आकार दिला आहे जो आकार खास नमुनेदार आहे.
मनुष्याने त्याच्या जीवनाला विशेष आकार देताना निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम ओळखला. या नियमानुसार जो बलवान तोच श्रेष्ठ हे त्याला कळले. मग श्रेष्ठ नव्हे तर सर्वश्रेष्ठ होण्यासाठी त्याने इतर प्राण्यांपेक्षा अधिक बलवान व्हायचे ठरवले. त्यासाठी त्याने सामाजिक जीवन स्वीकारून समूहाने रहायचे ठरवले. त्यातून कुटुंबे, समाज गट, निरनिराळी राज्ये, राष्ट्रे निर्माण झाली. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये महाशक्ती (सुपर पाॕवर) बनण्याची स्पर्धा सुरू झाली आणि या सर्वांचा मूळ पाया काय तर बळी तो कानपिळी हा मूलभूत निसर्ग नियम.
गंमत ही की बळी तो कानपिळी या नियमाला बुद्धिमान माणसाने देव कल्पनेतून आध्यात्मिक रंग दिला. म्हणजे काय तर मनुष्य जीवनाला त्रासदायक असलेल्या नमुनेदार जगातील ज्या ज्या उपद्रवी गोष्टी असतील त्यांना मनुष्याने दुष्ट राक्षस अशी उपमा देऊन टाकली. त्यातून वाईट, विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांवरही राक्षस असा शिक्का बसला. मग या दुष्ट राक्षसांचा संपूर्ण विनाश करण्यासाठी किंवा त्यांचा विनाश होत नाही म्हणून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मानवी जीवन कल्याणकारी व संरक्षक शक्ती ज्या ज्या माणसांनी सिद्ध केल्या त्या त्या बलवान माणसांना देवत्व प्राप्त झाले. असे देवराज्य स्थापन करणारे महान राजे पूजनीय झाले. असे राजेच काय पण समाज कल्याणकारी काम करणारे महापुरूष सुद्धा वंदनीय झाले. लोक त्यांना वंदन करू लागले. मग पुढे लोकांनी त्यांचे पुतळे निर्माण केले. देव व राक्षस यांच्यातील युद्धाच्या मुळाशी शेवटी आहे काय तर निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम. असे आहे हे नमुनेदार जग व या जगाचा बळी तो कानपिळी हा निसर्ग नियम.
-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१.२०२४