डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याने पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अतिमागास, मागास जाती समाज जीवनात आजही अंधारच असता. धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(१) एखाद्या व्यक्तीवर योगायोगाने अन्याय होणे व त्यामुळे त्याने दैव, नशीब, प्रारब्ध यासारख्या कल्पना कवटाळून बसणे व एखाद्या समाजावर एकाच पिढीत नव्हे तर पिढ्यानपिढ्या अन्याय होत गेल्याने त्या समाजाचा देवावरील व दैव, प्रारब्ध वगैरे कल्पनांवरील विश्वास उडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
(२) मी हिंदू धर्मात व मराठा जातीत जन्मलो म्हणून मी शैक्षणिक, आर्थिक, राजकीय या तिन्ही मूलभूत गोष्टींच्या बाबतीत त्या धर्मामुळे किंवा त्या जातीमुळे सोन्याचा किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आलो असे नव्हते. सातवी पर्यंत शिकलेले वडील गिरणी कामगार, आई शालेय शिक्षणाने पूर्ण अशिक्षित व घरी चार मुले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशा हलाखीच्या परिस्थितीत हिंदू धर्मीय मराठा हा शिक्का माझ्या मदतीला धावून आला नाही.
(३) अशा हलाखीच्या परिस्थितीत खाजगी कंपन्यांत नोकऱ्या करीत खुल्या वर्गात शिक्षण घेत वकील होणे ही साधी गोष्ट नव्हती. ज्यांनी ज्ञान, पैसा व सत्ता या तिन्ही क्षेत्रातील जागा अडवून ठेवल्या होत्या त्यांनी मी हिंदू-मराठा म्हणून माझे कुठेही आदराने स्वागत केले नाही. स्वतःच हिंमत करून कष्ट घेत व अपमान सहन करीत वकील झालो व स्वतःला थोडेफार का असेना पण ज्ञान व पैसा या दोन गोष्टींत कनिष्ठ श्रेणीतून मध्यम श्रेणीत घेऊन आलो. माझ्या या खडतर प्रवासात मी हिंदू-मराठा आहे म्हणून मला कसलीही मदत झाली नाही. म्हणजे मी जो वकील झालो तो हिंदू धर्मामुळे किंवा मराठा जातीमुळे नाही तर माझ्या मेहनती मुळे झालो हे सत्य आहे.
(४) मग मी असा विचार करतोय की मराठा जातीत जन्मून जरा मला शैक्षणिक व आर्थिक बाबतीत काहीच फायदा झाला नाही तर मग या जातीला उच्च जात समजायची कशी? ही सुद्धा मागासवर्गीय जातच झाली. भले ती अनुसूचीत जाती जमाती सारखी अतिमागास जात नसेल. पण ती मध्यम मागास जात तर निश्चितच आहे. केवळ या जातीतली बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी गर्भश्रीमंत व सत्ताधारी आहेत म्हणून संपूर्ण मराठा समाज हा उच्च जातीचा पुढारलेला समाज असे समजणे चुकीचे आहे. माझे एकट्याचेच उदाहरण नाही तर हलाखीत खिचपत पडलेली माझ्यासारखी लाखो करोडो कुटुंबे मराठा समाजात आहेत हे सत्य आहे.
(५) खरे खोटे मला माहित नाही, पण महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी म्हणे मराठा समाजालाही आरक्षण घ्या असे सांगितले होते. मग मराठा समाजाने ते आरक्षण का घेतले नाही की त्यावेळी मराठा समाजाच्या मूठभर श्रीमंत व सत्ताधारी नेत्यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मराठा समाजाला त्यापासून वंचित ठेवले हे कळायला मार्ग नाही. जे झाले ते झाले पण आज सकल मराठा समाज जागृत झाला आहे. तो उच्च जातीचा खोटा शिक्का मराठा समाजाला नको आहे. सत्य परिस्थिती स्वीकारून मराठा समाजाला मागास जातीचा समाज म्हणून मान्यता मिळणे व त्या आधारे आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.
(६) अशा परिस्थितीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत) मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिलाय ही गोष्ट मनाला खूप भावली. मी आज विचार करतोय की, अज्ञान, गरिबी, अस्पृश्यतेच्या दलदलीत (दलित हा शब्द याच दलदलीवरून निर्माण झाला असावा बहुतेक) पिढ्यानपिढ्या पिचत ठेवलेल्या अतिमागास जातींतील लोकांना मोठ्या हिंमतीने अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतीसूर्याने या पृथ्वीवर जन्म घेतला नसता तर अशा अतिमागास व काही इतर मागास जातीत जन्मलेल्या लोकांची स्थिती आजही त्यावेळी होती तशीच अंधारमय राहिली असती.
(७) मी ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो, करोडो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचा विचार करतो तेंव्हा त्यांचा तो निर्णय किती तर्कशुद्ध होता हे मनाला पटते. पिढ्यानपिढ्या दलदलीत खिचपत ठेवलेल्या एवढया मोठ्या अतिमागास समाजाला उचलून वर काढायला जेंव्हा कोणताच देव पुढे येत नाही तेंव्हा त्या देवावर विश्वास का ठेवावा व जो धर्म एखाद्या समाजाला अस्पृश्य लेखतोय त्या धर्मात तरी का रहावे? डॉ. आंबेडकर यांचे हे क्रांतिकारक विचार म्हणूनच मला पटतात. मला जर कोणी अस्पृश्य म्हणून लेखले असते तर मीही हेच केले असते. मी हिंदू धर्मात राहूनही बौद्ध धर्माचे बौद्धिक विचार स्वीकारू शकतो व मराठा समाजाचा असूनही अतिमागास समाज बांधवांचा मित्र होऊ शकतो. हा माझा व्यापक दृष्टिकोन मला माझ्या शिक्षणाने दिलाय! १४ अॉक्टोबर, १९५६ या क्रांतिकारी दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या निमित्त आज १४ अॉक्टोबर या दिनी सर्वांना धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-ॲड.बी.एस.मोरे©१४.१०.२०२०