https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

कट्टरता अनैसर्गिक!

सामायिक साखळीत कट्टरतेला थारा नाही!

निसर्गातील विविधता मानव समाजात आलीय. निसर्गातील विविधतेत असलेले विशेष ज्ञान मिळवून त्या ज्ञानात प्रावीण्य मिळवून माणसे त्या त्या विषयातील तज्ज्ञ (स्पेशालिस्ट) होतात. या तज्ज्ञ मंडळीमुळे मानव समाजात विविधता निर्माण होते.

समाजात विविध प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीची विविधता व तिची विशेषतः निर्माण झाली आहे. विशिष्ट प्रांत, समूह, भाषा, धर्म, जात, संस्कृतीशी विशेष भावनिक जवळीक निर्माण झाली की त्यातून जी विशेष जाणीव निर्माण होते तिला अस्मिता म्हणतात. अस्मिता माणसाला त्या अस्मितेशी चिकटून रहायला व तिच्याशी काटेकोर रहायला शिकवते. त्यातून मानव समाजात तुकड्या तुकड्यांची कट्टरता निर्माण होते. ही कट्टरता अस्मितेचा अभिमान नाही तर गर्व करायला शिकवते. ही गर्वाची भावना अस्मितेचा अहंकार फुलवते जो समाज एकतेसाठी घातक असतो.

निसर्गात विविधता व विशेषतः असली तरी त्या विशेषतेची कट्टरता आहे का हा अभ्यासाचा विषय आहे. निसर्ग हा सर्वसमावेशक आहे. तो कोणत्याही विशेष पदार्थाला व त्याच्या विशेष गुणधर्माला कट्टर होऊ देत नाही. या नैसर्गिक सत्यावर आधारित "शेरास सव्वाशेर" ही म्हण  निर्माण झाली आहे. निसर्गाने विविधतेला एकत्र ठेवण्यासाठी समरसतेची एक साखळी निर्माण केली आहे. विविधता म्हणजे असमानता. पण या असमानतेतच सामायिक साखळी निर्माण करून निसर्गाने अटीशर्तीची समता (समानता) निर्माण केली आहे. कायद्यापुढे सर्व समान याचा अर्थ निसर्गापुढे सर्व समान. सामायिक  साखळीत निसर्ग कोणाचीही कट्टरता चालू देत नाही.

विविधतेची अर्थात विशेषतेची एकजूट करणे म्हणजे विशेषीकरणाचे (स्पेशलायझेशनचे) सामान्यीकरण (जनरलायझेशन) करणे. निसर्ग तेच करतोय व मानव समाजालाही तेच करावे लागतेय. सामान्यीकरणात विशेषतेला भाव असला तरी तिच्या कट्टरतेला थारा नसतो. तिथे शेरास सव्वाशेर ही व्यावहारिक म्हण प्रत्यक्षात कार्यरत असते. म्हणून तर कोणत्याही विशेष गोष्टीला अतिशय महत्व देणे किंवा तिच्याबद्दल एकदम काटेकोर (कट्टर) राहणे चूक!

एखादा मनुष्य एखाद्या विशिष्ट विषयात विशेष प्रावीण्य मिळवून त्या विषयात जरी तज्ज्ञ होऊ शकला तरी तो विविधतेने युक्त असलेल्या सर्व विषयात तज्ज्ञ होऊ शकत नाही. त्या अर्थाने मानव समाजातील सर्व व्यक्ती ज्ञान व कौशल्य यांच्या बाबतीत मरेपर्यंत सर्वसामान्य राहतात व सामान्य होऊन सामायिक साखळीला जोडल्या जातात. नैसर्गिकरीत्या सामायिक साखळीला असे जोडले गेल्यानंतर सर्व विषयातच नव्हे तर विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विषयाशी सुद्धा काटेकोर (कट्टर) राहण्याचा अट्टाहास करणे हे चुकीचे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१२.२०२१

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

सुखाने संसार करा!

सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!

मानवी लैंगिकता व पुनरूत्पादन या नैसर्गिक क्रिया. या क्रियेवर सामाजिक शिस्तीचे बंधन घालण्याच्या उद्देशाने निर्माण झाली ती विवाह संस्था. या विवाह संस्थेतील कौटुंबिक व्यवहार नियंत्रित करणारा कायदा तो विवाह कायदा. विवाह कायदा हा नागरी (सिव्हिल) कायदा होय. मानवी लैंगिकतेच्या अतिरेकावर कठोर बंधन घालणारे फौजदारी कायदे सुद्धा मानव समाजाने निर्माण केले आहेत. उदा. बलात्कार प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायदा, मानवी तस्करी (जबरदस्तीने वेश्या व्यवसाय) कायदा इ.

विवाह बंधनात राहून संसार करणे हा जसा एक निर्मळ आनंद आहे तसे ते एक आव्हानही आहे कारण या बंधनात हक्क व कर्तव्ये यांच्यात समतोल साधण्याची कसरत नवरा व बायको दोघांनाही करावी लागते. ही कसरत ज्यांना नकोशी वाटते किंवा नीट जमत नाही ते विवाह बंधन तोडण्याच्या दिशेनेच विचार करून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतात.

एक वकील म्हणून घटस्फोट टाळण्याकडे मी नेहमीच प्रयत्नशील असतो. कारण घटस्फोट ही अत्यंत गंभीर परिस्थितीत निर्णय घेण्याची गोष्ट आहे. उदाहरणार्थ, नवरा बायको पैकी कोणी मनोरूग्ण असणे, पुरूषाची नपुंसकता, नवरा बायको पैकी कोणी व्यभिचारी असणे, सासर कडून हुंड्यासाठी होणार छळ, स्त्रीला चूल व मूल या कामापुरतीच समजून पुरूष प्रधान सासरकडून स्त्रीला मिळणारी कनिष्ठ  वागणूक इत्यादी. माझा मुख्य मुद्दा किरकोळ कारणांवरून नवरा बायकोत होणाऱ्या भांडणा पुरता मर्यादित आहे. मुलगी लग्न होऊन सासरी जाणे, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असे तिला तिच्या आईवडिलांनी म्हणणे, तसेच लग्न झाल्यावर मुलीने माहेरचे नाव सोडून देऊन नवऱ्याचे नाव व आडनाव लावणे ही पारंपरिक पद्धत आपल्याकडे अजून सुरूच आहे व ती बहुसंख्येने स्वीकारली गेली आहे.

प्रश्न हा आहे की मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेंव्हा ती आपल्या आईवडिलांना सोडून तर जात असतेच पण मोठ्या विश्वासाने आपले जीवन नवऱ्याला समर्पित करताना एकदम नवख्या घरात प्रवेश करीत असते. त्यामुळे तिला सुरूवातीला असुरक्षित वाटणे हे अगदी साहजिक आहे. त्यात जर सासरची मंडळी तिला स्वतःच्या मुलीसारखी वागणूक न देता परक्यासारखी वागणूक देऊ लागली तर संसार तणावपूर्ण होतो. अशावेळी नवऱ्या मुलाने स्वतःचे आईवडील, भाऊ, बहिणी व आपली बायको यांच्यात संतुलन साधायचे काम केले पाहिजे. ही गोष्ट खूप अवघड असते. खूप मोठे एकत्र कुटुंब असेल तर तिच्या आईवडिलांना सोडून संसार करायला आलेली मुलगी एकटी पडते. अशावेळी जर घाबरून तिने तिच्या आईवडिलांना फोन केले तर तिच्यावर संशय न घेता तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोणतेही आईवडील आपल्या मुलीचा संसार मोडावा असा प्रयत्न करणार नाहीत. तेंव्हा मुलीच्या संसारात मुलीची आई लुडबूड करून तिच्या संसारात आग लावते असा सर्वसाधारण  आरोप करणे चुकीचे आहे. मुलीच्या आईकडे बोट दाखवताना मुलाची आई अगदी गरीब गाय असते असा निष्कर्ष कोणी काढू नये. टाळी एका हाताने वाजत नसते. अशाही केसेस मी पाहिल्या आहेत की मुलगा जर एकुलता एक असेल तर अशा मुलाच्या आईला आपली सून आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करते की काय अशी भीती वाटल्याने अशी सासू सुनेला जाच करीत राहते. अशावेळी आईलाही सोडता येत नाही व बायकोला घेऊन वेगळेही राहता येत नाही अशी मुलाची पंचाईत होऊन जाते. याला अवघड जागेचे दुखणे म्हणतात. काही वेळा नवरा बायकोच्या किरकोळ भांडणात मुलाचे आईवडील, नातेवाईक नाक खुपसतात तसे मुलीचे आईवडील, नातेवाईकही नाक खुपसतात. नवरा बायकोच्या भांडणात असे इतरांनी नाक खुपसल्याने प्रश्न अवघड होऊन बसतात. टाळी एका हाताने वाजत नाही हे खरे आहे. कोणीही फक्त मुलीच्या आईवडिलांना किंवा फक्त मुलाच्या आईवडिलांना दोष देऊन मोकळे होऊ नये. पण शेवटी मुलगी ही तिच्या आईवडिलांना सोडून सासरच्या घरी संसार करायला आलेली असते. त्यामुळे सुरूवातीला तरी तिची बाजू कमकुवत असते हे विसरता कामा नये.

मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ एवढाच की लग्न करताना मुलाने व मुलीने नीट विचार करून लग्न करावे. एकदा लग्न केले की मग हे लग्न कायम टिकलेच पाहिजे हाच तो विचार असावा म्हणजे लग्नापूर्वी शिक्षण, आर्थिक पाया, दोन्ही कडील कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टींचा नीट अभ्यास, विचार करूनच लग्न करावे. दोघे नवरा बायको जर समविचारी, एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना समजून घेणारे असतील तर त्यांच्या संसाराला कोणाचीच दृष्ट लागू शकत नाही मग ते मुलाचे आईवडील असोत, मुलीचे आईवडील असोत की आणखी कोणी!

माझ्या वकिलीत वैवाहिक केसेस मध्ये मी जास्तीतजास्त संसार जोडण्याचेच प्रयत्न केले आहेत. मी नेहमी दोन्हीकडची माणसे एकत्र बोलावून दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोन्ही बाजूंना त्यांचे प्रश्न काय आहेत व त्यावर कायदा काय म्हणतो हे नीट समजावून सांगतो व मग समेट घडवून आणतो. ज्यांचे संसार मी जुळवले ती मंडळी अजूनही माझे नाव काढतात. एका केसमध्ये तर नवरा उद्योजक व बायको वकील होती. मी नवऱ्याचे वकीलपत्र स्वीकारले होते. तरी मी एका हॉटेलात नवरा व बायको दोघांना चहा प्यायला या, मला दोघांचे म्हणणे एकत्र ऐकायचे आहे असे सांगितले. तेंव्हा दोघांनी माझे म्हणणे ऐकले. त्या एकाच बैठकीत मी दोघांनाही त्यांच्या चुका समजावून सांगितल्या व आयुष्य खूप छोटे आहे, मस्त मजेत एकत्र संसार करा हे समजावून सांगितले. दोघांनाही ते मनापासून पटले. मग त्यांची घटस्फोटाची केस तडजोडीने मागे घेत असल्याचा अर्ज कोर्टात देऊन कोर्टाच्या सही शिक्क्यानिशी दोघांत समेट घडवून आणला. आज ते दोघेही नवरा बायको आनंदात संसार करीत आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा इंजिनियर झाला आहे व दोघेही नवरा बायको मला अधूनमधून फोन करून सांगतात की "सर, आमच्या मुलाचे लग्न जेंव्हा कधी ठरेल तेंव्हा आमच्या मुलाला व सुनेला आशीर्वाद द्यायला तुम्हाला लग्न कुठेही असले तरी यावेच लागेल"! वकिलीतला हा आनंद मला जीवनाचे खूप मोठे समाधान देतो.

माझे पती व पत्नी दोघांनाही एवढेच सांगणे की विवाह, संसार, मुलांचे संगोपन हा अनुभव खरं तर स्वर्गसुख आहे. तुम्ही शेवटपर्यंत एकमेकांचे आधार आहात. संसारातील किरकोळ भांडणे स्वतःच मिटवा. तुमच्या संसारात कोणालाही नाक खुपसू देऊ नका मग ते तुमचे आईवडील का असेनात! सुखाने संसार करा, घटस्फोट टाळा!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१

किती चांगले होते ते दिवस?

किती चांगले होते ते दिवस!

किती चांगले होते ते जंगली दिवस आम्हा वाघ, सिंहाचे! हवा मोकळी, स्वच्छ पाणी मुबलक आणि खायला काय तर हरणे, ससे, रानडुकरे यांची निसर्गाकडून भरपूर पैदास! भूक लागली की थोडे धावायचे आणि अगदी सहज शिकार करायची, मिटक्या मारीत मांस खायचे, वरून पाणी प्यायचे, जोडीदार मिळविण्यासाठी थोडी मारामारी करायची आणि मस्त ताणून द्यायची.

पण हा माणूस नावाचा प्राणी कुठून पैदा झाला माहित नाही आणि याने आमची वाट लावली. हा अतिशय बुद्धीमान आणि धूर्त, बेरका प्राणी. या प्राण्याने काय केले तर स्वतःची लोकसंख्या वाढवत आमची जंगले बळकावली, डोंगरे फोडली, मुक्तपणे वाहणाऱ्या नद्या अडवून त्यावर धरणे बांधली आणि आम्हा सगळ्यांच्या बोकांडी हा माणूस बसला. आम्ही जंगलाचे राजे, पण या माणसांनी आमचे काय केले तर आम्हाला सर्कस मध्ये खेळ खेळायला भाग पाडले. सर्कस मधल्या त्या रिंग मास्तरची हिंमत केवढी मोठी! आम्हाला चाबकाचे फटके मारायचा. काहींनी तर आम्हाला माणसांची करमणूक करणाऱ्या चित्रपटात वापरून घेतले. हाथी मेरे साथी हा राजेश खन्नाचा हिंदी चित्रपट बघा म्हणजे कळेल आमचा वापर. पण शेवटी काही दयावान माणसांना आमची दया आली. त्यातून पुढे मग तो सर्कस प्रकार बंद झाला. पण या दयेचा परिणाम तसा तात्पुरता होता. काही अतिशहाण्या माणसांनी मग आमची वाघ व सिंह अशा दोन जातीत विभागणी करून आमच्यापैकी वाघांना ताडोबा जंगलात बंदिस्त केले तर आमच्यापैकी सिंहाना गिर जंगलात बंदिस्त केले. अशाप्रकारे या धूर्त माणसांनी आम्हा वाघ, सिंहाची जातीपातीत विभागणी करून आम्हाला जंगल आरक्षणात बंदिस्त केले.

ती कुत्री या महाधूर्त, बेरक्या माणसांत कशी माणसाळली हे कळत नाही. माणसे खरवस खात असताना शेपूट हलवत एखादा तरी खरवसचा तुकडा फेकावा म्हणून माणसांपुढे लाळघोटेपणा करीत उभी असतात. आम्हाला हे कधीच जमणार नाही कारण जंगले संपली तरी आम्ही जंगलचे राजे आहोत. पण आता नावालाच राजे राहिलो आहोत. आमची राज्ये खालसा करून या धूर्त माणसांनी आमच्या ऊरावर आता सिमेंटची जंगले बांधली आहेत व त्यातील काडेपेट्यांसारख्या घरात ही माणसे स्वतःसाठी शांती शोधत देवाचे अध्यात्म करीत बसलीत. आमचे नैसर्गिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन कसली मिळणार यांना शांती! खरंच किती चांगले होते ते दिवस!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.११.२०२१

दोन वर्ग!

सर्वसामान्य माणूस कोणाला म्हणायचे?

ज्ञान, संपत्तीचे प्रतिनिधित्व करणारा पैसा व शस्त्रबळाचा धाक दाखवणारी सत्ता ही मानवी जगात मानाने जगण्याची तीन प्रमुख साधने आहेत. या साधनांची मालकी कोणाकडे हा मूलभूत प्रश्न आहे. सुशिक्षित, ज्ञानी माणसे ज्ञान साधनाची मालक असतात, अतिश्रीमंत भांडवलदार मंडळी ही संपत्ती आणि/किंवा पैसा साधनाची मालक असतात व प्रभावशाली राजकारणी मंडळी ही शस्त्र आणि/किंवा सत्ता साधनाची मालक असतात.

पण बारकाईने बघितले तर सुशिक्षित, ज्ञानी माणसे ही ज्ञान साधनाची फक्त नावाला मालक असतात कारण त्यांचे ज्ञान भांडवलदार व राजकारणी यांच्या अर्थात अनुक्रमे पैसा व सत्ता यांच्या दावणीला बांधलेले असते. अर्थात इतर शारीरिक श्रमिक मंडळीप्रमाणे ही बौद्धिक श्रमिक मंडळीही भांडवलदार व राजकारणी यांची गुलाम असतात. म्हणजे समाजात ज्ञान, संपत्ती (पैसा), सत्ता (शस्त्र ) या तीन साधनांचे मालक दोनच, एक श्रीमंत भांडवलदार व दोन प्रभावशाली राजकारणी! हे दोन मालक हेच खरे असामान्य लोक, बाकीचे सर्व (सुशिक्षित, ज्ञानी धरून) सर्वसामान्य लोक! अर्थात मानव समाजात दोनच वर्ग व ते म्हणजे साधन मालक अर्थात शोषक वर्ग व मालकांचा गुलाम श्रमिक अर्थात शोषित वर्ग! शोषक वर्ग हा असामान्य वर्ग तर शोषित वर्ग हा सर्वसामान्य वर्ग!

वाईट याचेच वाटते की शोषित वर्ग हा बहुजन समाज वर्ग पण त्यांच्यात पुन्हा जाती पातीचे वर्ग (उच्च जातवर्ग व मागास जातवर्ग) असे वर्ग पाडले जाऊन या बहुजन समाजाचे मालक वर्गाकडून आणखी शोषण होण्यासाठी मदतच होते. जातीपाती नसत्या तर बहुजन शोषित वर्ग एक होऊन साधनांची मालकी स्वतःकडे दाबून ठेवणाऱ्या मूठभर शोषक वर्गाशी बौद्धिक व शारीरिक श्रम भांडवलाच्या जोरावर प्रभावी संघर्षकर्ता झाला असता व त्या संघर्षातून साधनांची मालकी काही प्रमाणात का असेना पण स्वतःकडे खेचून घेऊ शकला असता.

पण बहुजन समाजातच जातीपातीवरून संघर्ष होतोय आणि मूठभर मालक (शोषक) वर्ग आणखी पॉवरफुल होतोय. कधी संपणार हे दुष्टचक्र? आज क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून हा लेख संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.११.२०२१

सर्वसामान्य माणूस!

सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचे फायदे!

१. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने जास्तीच्या पैशाचे काय करायचे याची त्यांना चिंता नसते.

२. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने आपोआप त्यांच्या चैनीला चाप बसून त्यांच्या गरजा कमी होतात.

३. असामान्य माणसांना जास्त लोक ओळखत असतात त्यामुळे त्यांच्या हालचालीवर लोकांचे जास्त लक्ष असते. पण सर्वसामान्य माणसांना कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर वडापाव खाता येतो व टपरीवर चहा पिता येतो.

४. सर्वसामान्य माणसांकडे पैसा खूप कमी असल्याने त्यांना गँगस्टर्स कडून खंडणीची धमकी येण्याची भीती नसते. तसेच इनकम टॕक्स, ईडीच्या धाडीची भीती नसते. त्यामुळे त्यांना शांत झोप लागते.

५. सर्वसामान्य माणसे वस्तू खरेदी करताना न लाजता किंमतीची घासाघीस करू शकतात.

६. असामान्य माणसांना आयुष्याचे जोडीदारही असामान्य लागतात. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली तर एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला भारी पडू शकतो. सर्वसामान्य नवरा बायकोचे तसे नसते. त्यांच्यात भांडणे झाली तरी दोघेही कमकुवत असल्याने एकमेकांना नीट समजून घेऊन दोघेही तडजोड करून सामोपचाराने संसार करतात.

७. कुठे परगावी फिरायला गेले तर असामान्य माणसे भारी लॉजमध्ये जातात. सर्वसामान्य माणसे मात्र साधे लॉज शोधतात पण त्यातला आनंद लय भारी असतो.

८. सर्वसामान्यांना त्यांच्या मुलांना भारी शाळांत घालता येत नाही कारण त्यांच्याकडे मोठी फी देण्यासाठी पैसा नसतो. पण त्यांची मुले हुशार असतात. ती ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या शाळांत शिकूनही श्रीमंत मुलांना शिक्षणात भारी पडतात.

९. असामान्य माणसे आजारी पडली की भारी डॉक्टर्स, भारी रूग्णालये गाठतात. सर्वसामान्य माणसांना गल्लीतला साधा डॉक्टर पुरेसा होतो. जास्त आजारी पडल्यावर सरकारी रूग्णालये सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी जवळजवळ फुकट तत्पर असतात. शेवटी काय मरण जवळ आल्यावर असामान्य माणसे पंचतारांकित रूग्णालयात तळमळत मरतात व सर्वसामान्य माणसे सरकारी रूग्णालयात तळमळत मरतात. शेवटी वेदना, तळमळ दोन्ही रूग्णालयात असते. मग फरक काय पडतो, इथे मेले काय आणि तिथे मेले काय?

सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्याचे आणखी तसे खूप फायदे आहेत. असामान्य माणसांना त्यांच्या असामान्यत्वाची टिमकी वाजवत जगू द्या. त्यांना जास्त भाव देऊ नका. सर्वसामान्य जगण्यातला मुक्त आनंद घ्या.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.११.२०२१

हनी ट्रॕप व हॕकर्स!

हॕकर्स व हनी ट्रॕपवाल्यांनी फेसबुकवर हा काय खेळ चालवलाय?

फेसबुक हॕकर्स व हनी ट्रॕपवाले हल्ली मोकाट सुटलेले दिसतात. गेल्या आठवड्यात मलाही माझ्या फेसबुक मेसेंजर इनबॉक्स मध्ये माझ्या एका फेसबुक मित्राने एक लिंक पाठवली व मला इशारा केला (केला इशारा जाता जाता) की ती लिंक उघडू नये. कारण त्याच लिंकने त्याचे फेसबुक खाते हॕक झाले आहे. पण मला जाम चरबी. मी ती लिंक उघडली जेणेकरून माझे फेसबुक खाते हॕक होईल व इकडेतिकडे फिरत राहील. काय माहित कदाचित माझे ते खाते फिरतही असेल. बोंबलत फिरू द्या त्याला मला काही फरक पडत नाही. कारण एकदा असेच एका बदमाश टोळीने माझ्या फेसबुक इनबॉक्स मध्ये मध्यरात्री घुसून मला मधाचे बोट दाखवून हनी ट्रॕप केले होते. मग मी त्या टोळीलाच त्याचवेळी ट्रॕप करून ठाणे सायबर पोलिसांना पहाटे तक्रार केली. आता पुन्हा हा नवीन हॕक लिंकचा प्रकार. या लोकांना काय कामधंदा नाही काय? कशाला उगाच त्रास देतात माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला? मी त्यांचे काय वाकडे केले आहे? आता त्या फेसबुक मित्राला तरी मला तसली लिंक पाठवायची काय गरज होती? त्याचे खाते हॕक झाले म्हणून माझेही खाते हॕक व्हावे अशी त्याची इच्छा होती काय? अरे बाबा, तुझे हॕक झालेले ते खाते माझ्या फेसबुक मित्र यादीत ठेऊन काय करू? इतर मित्रांना पण तो हॕक वायरस चिकटायचा व करोना विषाणू प्रमाणे  त्रास द्यायचा. थांब आता मी तुलाच ब्लॉक करतो असे इनबॉक्स मध्ये लिहून मी जाता जाता इशारा करणाऱ्या त्या मित्रालाच ब्लॉक करून टाकले व त्या हॕक झालेल्या खात्याचा संबंध तोडून टाकला. थोडक्यात काडीमोडच घेतला मी. एकतर रोज नवीन नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाने माझे डोके फिरायची वेळ आलीय म्हातार वयात आणि आता या वयात असल्या भलत्याच तांत्रिक भानगडी ऊरावर घेऊन कोण बसतोय. माझ्याकडे आता वकिलीची जास्त कामे नाहीत हे तरीषअनोळखी लोकांना कसे काय कळते बुवा? अधूनमधून सारखे माझ्या फोनवर लघुसंदेश येत असतात की घरी बसून दररोज १००० रूपये कमवा म्हणून. मी काय या लोकांना कामाची किंवा पैशाची भीक मागत फिरतोय काय? मग वैतागून मी तो तसला एस.एम.एस. फोनमध्ये दिसला रे दिसला की लगेच डिलिट करून टाकतो. कुठून हे असले अॉनलाईन तंत्रज्ञान आलेय काय माहित? पूर्वी किती मस्त होते. सगळं हाताने लिहायचे. साधे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र लिहिण्यात किती मजा होती. चोरी लगेच पकडली जायची. मी एकदा असेच हस्तलिखित प्रेमपत्र कॉलेजमध्ये एका मुलीच्या वहीत कोंबले होते. पण माझ्या हस्ताक्षरावरून माझी ती चोरी पकडली गेली होती. मग त्या मुलीने नंतर माझ्याशी बोलणेच सोडले होते. हल्ली काय कोणीपण उठतो आणि दुसऱ्याचे इलेक्ट्रॉनिक लिखाण चोरतो व स्वतःच्या नावाने खपवतो. कसला कॉपीराईट कायदा आणि कसले काय? या डिजिटल किंवा अॉनलाईन तंत्रज्ञानाने माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची मात्र अधूनमधून बोबडी वळत असते हे मात्र खरे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१

https://www.tv9marathi.com/crime/cyber-crime/marathi-actress-shubhangi-gokhale-facebook-account-hacked-appeals-friends-to-not-click-on-suspicious-links-in-messenger-586075.html

चौकट!

चौकट!

चौकटीबाहेर जाऊन जीवन जगण्याचा किंवा प्रवाहाविरूद्ध पोहण्याचा प्रयास हा शेवटी महागात पडतो. याचा अर्थ असा नव्हे की माणसाने प्रवाहपतित होऊन जीवन जगावे. तसे असते तर मनुष्य जनावरांच्या पातळीवर जंगली जीवनच जगत राहिला असता.

पण तरीही आयुष्याला चौकट हवी. बेभान, मुक्त जीवन म्हणजे कटी पतंग जीवन. म्हणून मी पुरूष मुक्ती व स्त्री मुक्ती या दोन्ही विचारांना अतिरेकी विचार समजतो. याचे कारण म्हणजे निसर्गाची चौकटच अशी आहे की स्त्री व पुरूष दोघेही एकमेकांसाठी बनले आहेत. त्यांचे एक होणे, एकत्र राहणे, एकमेकांसाठी जगणे हेच तर स्त्री शक्ती व पुरूष शक्ती यांच्या निर्मितीच्या मागील निसर्गाच्या अनाकलनीय मुळाचे अर्थात परमेश्वराचे मूळ उद्दिष्ट आहे. स्त्री मुक्ती काय किंवा पुरूष मुक्ती काय हे अतिरेकी विचार या मूळ उद्दिष्टाला, पायाला छेद देणारे घातक विचार आहेत.

मानवी जीवनाला दोन चौकटी आहेत. एक चौकट ही निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व दुसरी चौकट ही समाजाची पूरक सामाजिक चौकट! या दोन्ही चौकटींची मिळून कायदेशीर चौकट तयार होते. मनाचे काल्पनिक बुडबुडे व निसर्गाचे वास्तव सत्य यात फरक आहे. 

निसर्गाच्या वैज्ञानिक चौकटीत राहून माणसांनी माणसांसाठी तयार केलेली सामाजिक चौकट म्हणजे सामाजिक कायद्यांची (नीतीनियमांची) चौकट ही बुद्धीच्या जोरावर समाजमनाने तयार केलेली विशेष चौकट होय. जंगली जनावरे निसर्गाच्या मूळ चौकटीतच जीवन जगणे पसंत करतात कारण त्यांना उच्च श्रेणीची कुशाग्र मानवी बुद्धी नसते. त्यामुळे बळी तो कानपिळी या निसर्गाच्या मूळ जंगली नियमापलिकडे ती विचार करू शकत नाही. निसर्गातील मूळ शक्तीला म्हणजे अनाकलनीय परमेश्वरालाच या जंगली नियमाचा उबग आल्याने त्याने उच्च बुद्धीचा मनुष्य प्राणी निर्माण केला असावा.

पण सगळी माणसे सारख्या बुद्धीमत्तेची का दिसत नाहीत? सगळी माणसे समान बौध्दिक पातळीवर असती तर त्यांच्यात खरी समानता निर्माण झाली असती. पण मानवी समतेचे तत्व सामाजिक कायद्यात समाविष्ट केले असले तरी प्रत्यक्षात ते दिसत नाही याचे कारण म्हणजे माणसांमधली असमान बौध्दिक पातळी.

आता मी सांगत असलेल्या वरील दोन चौकटी किती जणांना नीट समजल्या आहेत? मुळात या दोन चौकटी अस्तित्वात आहेत का इथूनच वादाला सुरूवात होईल. देव अस्तित्वात आहे की नाही अर्थात ती कल्पना आहे की वास्तव आहे या वादाप्रमाणेच या दोन चौकटी वास्तवात आहेत की त्या केवळ कल्पना आहेत इथून या आंतरमानवी वादाला सुरूवात होईल. याचे मूळ कारण म्हणजे या दोन चौकटी समजून घेण्याची निरीक्षणशक्ती व आकलनक्षमता अर्थात बुद्धी  सगळ्या माणसांना सारखी असत नाही. म्हणून तर समाजात खालच्या पातळीवरील कनिष्ठ न्यायालयांपासून वरच्या पातळीवरील उच्च व सर्वोच्च न्यायालयांपर्यंत खालून ते वर अशा चढत्या क्रमाने वेगवेगळी न्यायालये आहेत.

या लेखाचा सार एवढाच आहे की वरील दोन चौकटीत राहून बंदिस्त जीवन जगताना मानवी मनाची घालमेल, कुतरओढ झाली तरी या दोन चौकटीत राहून जीवन जगणे मनुष्याच्या हिताचे आहे. निसर्गाची मूळ वैज्ञानिक चौकट व मानव समाजाची पूरक सामाजिक चौकट या चौकटी पलिकडे निसर्गातील देवाचा कोणता धर्म नाही की कोणते अध्यात्म नाही. जे काही आहे ते या दोन चौकटीतच आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२९.११.२०२१