https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०
मोठ्या मेंदूची कवाडे उघडी करा!
मोठ्या मेंदूची सर्व कवाडे उघडी करा!
ज्ञानेंद्रियांचा संपर्क निसर्गाशी प्रस्थापित झाला की मग मोठ्या मेंदूच्या जाणिवा खुल्या होतात. मोठ्या मेंदूच्या जाणिवा पूर्ण खुल्या होत नाहीत तोपर्यंत त्या मेंदूला निसर्गाचे सत्य आहे त्याच स्वरूपात कळत नाही. पण ज्ञानेंद्रियांचा संपर्क निसर्गाशी प्रस्थापित झाल्यावरही मोठा मेंदू पूर्ण जाणिवेने खुला होत नाही. अशा अर्धजागृत मेंदूला निसर्गाचे पूर्ण सत्य कळू शकत नाही. अशा अर्धजागृत मेंदूत काही जागा रिकाम्या राहतात. अशा रिकाम्या जागा काही काल्पनिक मिथ्ये, आभास यांनी भरल्या जातात आणि मग अर्धजागृत मेंदू अर्धसत्याबरोबर जगू लागतो. असा मेंदू म्हणजे अर्धज्ञानी मेंदू! अशा मेंदूला निसर्गाचे सत्य वेगळ्या आभासी स्वरूपात दिसू शकते. उदा. अंधारात हवेने खालीवर होणाऱ्या झाडाच्या फांद्या अशा मेंदूला लोंबकळणाऱ्या भुतांसारख्या भासू शकतात. पण हा निव्वळ भास आहे हे अशा अर्धजागृत, अर्धज्ञानी मेंदूला कळत नाही. नैसर्गिक सत्याविषयीच्या अर्ध्या ज्ञानाचा व अर्ध्या अज्ञानाचा हा दुष्परिणाम असतो. मोठा मेंदू हा जाणीवपूर्वक ऐच्छिक क्रिया करणारा मेंदू तर छोटा मेंदू हा मोठ्या मेंदूला थांगपत्ता लागू न देता गुपचूप अनैच्छिक क्रिया करणारा मेंदू. खरं तर, हे एकाच मेंदूचे दोन भाग पण त्यांच्या कार्यानुसार त्यांना मोठा मेंदू व छोटा मेंदू अशी नावे मेंदू शास्त्रज्ञांनी दिली आहेत. निसर्गाला निसर्ग म्हणूनच अनुभवायचे असेल तर मोठ्या मेंदूची सर्व कवाडे उघडी करा!
-ॲड.बी.एस.मोरे©२६.८.२०२०
वैज्ञानिक दृष्ट्या मृत्यू म्हणजे काय?
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
वेडेपणा म्हणजे काय?
रविवार, २३ ऑगस्ट, २०२०
बुद्धी दे!
गणपती बाप्पा, वाचव रे बुद्धीला निर्बुद्धांच्या तावडीतून!
बुद्धीमान लोकांनी बनविलेले सरकारी नियम बुद्धीमान लोकांनीच अंमलात आणायला हवेत की नकोत? त्यांची अंमलबजावणी जर निर्बुद्ध लोकांच्या हातात दिली तर त्या नियमांचे तीन तेरा वाजतील नाहीतर काय होईल? यालाच म्हणतात माकडाच्या हातात कोलीत देणे. हे असे लिहिण्यालाही तसेच कारण घडतेय. सुका व ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबीन्स मध्ये ठेवला नाही तर तो उचलला जाणार नाही असा सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नियम आला. पर्यावरण रक्षणासाठी हे ठीकच आहे. पण या कोरोना लॉकडाऊन काळात होते काय की सोसायटीत कचरा उचलायला घाबरून कोणी येतच नाही. मग होते काय की, प्रत्येकजण सुक्या व ओल्या कचऱ्याचे ते दोन डस्टबीन्स स्वतःच उचलून घेऊन जवळच्याच एखाद्या कचरा पॉईंटवर जातात व तिथे ते दोन्हीही डस्टबीन्स एकत्र ओतून घरी परत येतात. याचा अर्थ असा की, त्या कचरा पॉईंटवर सुका व ओला कचरा एक होतो. मग तिथे पालिकेची घंटा गाडी येऊन सुक्या व ओल्या कचऱ्याचा तो एकच ढीग उचलून घेऊन जाते. असेच जर करायचे होते तर मग हा कचरा विभाजनाचा नियम केलाच कशाला? खरं तर त्या कचरा पॉईंटवर पालिकेने एका ऐवजी दोन कचरा कुंड्या (सिमेंटचे दोन मोठे हौद) ठेवल्या पाहिजेत व एका कुंडीवर सुका कचरा व तसेच दुसऱ्या कुंडीवर ओला कचरा अशी मोठी अक्षरे रंगविली पाहिजेत व तसे न करणाऱ्यास मोठा दंड ठोठावला जाईल असा ठळक अक्षरात तिथे बोर्ड लावला पाहिजेत. पण या नियमाची वाट दोन्ही बाजूंकडून ही अशी लावली जाते. कचऱ्याच्या बाबतीत जर हे असे होत असेल तर कोरोना उपचार व नियमांच्या बाबतीत काय होत असेल? बापरे, कल्पनाच करवत नाही! निर्बुद्ध माणसांच्या घोळक्यात बुद्धीमानांनी आपली बुद्धी पाजळू नये. बुद्धीमान लोकांना जगायचे असेल तर त्यांनीही निर्बुद्धांबरोबर निर्बुद्ध व्हावे असाच धडा या अनुभवातून मिळतो. गणपती बाप्पा, अरे काय चाललेय हे! तू तर बुद्धीचे दैवत पण इथे बुद्धीच संकटात सापडलीय! वाचव रे बाबा तुझ्या बुद्धीला या निर्बुद्धांच्या तावडीतून!
-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०
टीपः
हा निर्बुद्धपणा काय एकाच पालिकेकडून होतो का? तर नाही हेच उत्तर आहे. कारण असा सावळागोंधळ सगळीकडेच चालू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही पोस्ट सर्वसाधारण निरीक्षण म्हणून वाचावी. माझे काही चुकले असेल तर चुकभूल द्यावी घ्यावी!
-ॲड.बी.एस.मोरे©२३.८.२०२०