माणसांनी माणसांना माणूस म्हणून ओळखावे व माणूस म्हणून जपावे!
माणूस हा इतर प्राण्यांप्रमाणे सजीव म्हणजे जीव असलेला प्राणी आहे. पण हा जीव इतर प्राण्यांपेक्षा निसर्गात मोठी वळवळ व धडपड करतो. कारण या जीवाचा मेंदूच निसर्गातून तसा उत्क्रांत झालाय. माणसाचा जीव जन्मतो, जगतो व शेवटी मरतो. हा जीव मरतो म्हणजे माणसाचा देह त्याच्या मेंदूसह अर्थात मनासह मरतो. मानवी मेंदूतच माणसाचे मन असते. देह मरतो व देहासह देहाचे मनही मरते. शेवटी मृत्यू म्हणजे तरी काय तर देहातील चैतन्य संपणे. या चैतन्यालाच जीव म्हणावे काय? मग निर्जीव पदार्थांचे काय? त्यांच्यातही निसर्गाचे चैतन्य असतेच की! पण सजीव पदार्थांच्या चैतन्याला जीव म्हणायचे व निर्जीव पदार्थांच्या चैतन्याला शक्ती म्हणायचे. अर्थात जीवाचे चैतन्य ही फक्त शक्ती नसते तर स्वतःची जाणीव असलेली ती विशेष शक्ती असते. म्हणून मग सजीवाच्या जीवाला काहीजण आत्मा असे म्हणतात. जीव जातो याचा अर्थ सजीवाचा आत्मा शरीराला सोडून जातो असा घेतला जातो. सजीवाचा आत्मा त्याच्या शरीराला सोडून गेला की आत्मा नसलेले ते शरीर सजीव म्हणून निकामी होते. सजीवाचे चैतन्य म्हणजे विशेष शक्ती लाभलेला आत्मा व निर्जीव पदार्थांचे चैतन्य म्हणजे साधी शक्ती असा काहीसा फरक सजीव व निर्जीवात करता येईल. पण माणसे स्वतःच्या शरीरातच आत्मा आहे व इतर कीटक, रोगजंतू, प्राणी यांच्या शरीरात आत्मा नाही असे म्हणतील तर ते चुकीचे होईल. कारण सजीव म्हणजे जीव व जीव म्हणजे आत्मा असाच अर्थ घेता येईल. आता दररोज असंख्य कीटक, प्राणी त्यांचा जीव जाऊन मरतात म्हणजे त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात. त्या कीटक, प्राण्यांच्या जीवांची म्हणजे आत्म्यांची कधी भुते झाल्याचे ऐकिवात नाही. पण मृत माणसांच्या अतृप्त आत्म्यांची मात्र भुते होतात अशा काल्पनिक कथा रचल्या जातात. तशी बहुतेक सर्वच माणसे अतृप्त मनानेच मरतात. मग या लाखो, करोडो मृत माणसांची भुते दररोज रात्रीच्या वेळी धिंगाणा घालीत का फिरत नाहीत? अशा कल्पना ही थोतांडे आहेत. भित्यापोटी ब्रम्हराक्षस अशी मराठीत म्हण आहे. तिचा अर्थ हाच की जिथे भीती तिथे भूत! भुताची कल्पना एकदा मानवी मेंदूत (मनात) घट्ट रूतून बसली की मग एकटे असताना, भयाण काळोखात चालताना मन भुताच्या कल्पनेने घाबरून जाते व मग त्या कल्पनेचेच आभासी भूत तयार होऊन अशा घाबरलेल्या माणसाच्या समोर उभे राहते. मग अशा काल्पनिक भुताला पळवून लावण्यासाठी देव कल्पनेचा आधार घेतला जातो. पण हे सर्व भित्र्या मनाचे खेळ आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हा मानसशास्त्र विषयाचा भाग आहे. हल्ली तर काय माणसांना आभासी दुनियेतच जगणे आवडू लागलेय. आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिॲलिटी) तंत्रज्ञान हा या आवडीचाच एक भाग! इथे माणसाकडे आत्मा म्हणून नव्हे तर एक प्रगल्भ जीव म्हणून पाहिले पाहिजे व या जीवाला जपायला शिकले पाहिजे. कारण माणसाचा जीव मेला की तो माणूस या जगात पुन्हा कधीच दिसत नाही. म्हणून माणसांनी माणसांना माणूस म्हणून ओळखावे व माणूस म्हणून जपावे!
-ॲड.बी.एस.मोरे©१५.८.२०२०