माझ्या हातात सर्वोच्च सत्ता आली आणि मी कोरोनाला पळवून लावले!
काल असेच एक भारी स्वप्न मला पडले. माझ्या हातात अचानक सर्वोच्च सत्ता आली. मग मी जनतेला रेडिओ व टी.व्ही. वरून एक भाषण ठोकले. ते भाषण एकंदरीत असे होते.
"प्रिय नागरिक बंधू, भगिनींनो! अगोदर तुम्ही हे लक्षात घ्या की कोरोना विषाणूवर औषध नाही. पण हा विषाणू घशाला व फुफ्फुसाला किती त्रास देतो, तो कोणत्या माणसावर हिंसक हल्ला करून ठार मारतो व कोणत्या माणसाला फक्त अस्वलासारख्या गुदगुल्या करून सोडून देतो याची मी गोड बोलून चीनकडूनच माहिती काढून घेतली आहे. पण चीनवर माझा विश्वास नसल्याने त्याला क्रॉस चेक करण्यासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षाला तरी कोरोनाचे ज्ञान आहे का याची चाचपणी करून घेतली आहे. पण ही चौकशी करीत असताना मनातून दोघांनाही शिव्या हासडून शेवटी मी आपल्याच संशोधकांशी व मोठ्या डॉक्टरांशी चर्चा करून मूलभूत माहिती काढली आहे. हे सर्व काम मी दोन दिवसांत उरकले. मग मी तिसऱ्या दिवशी परदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांना भारतात येऊच दिले नाही. त्यांचा विमानतळांवरच मस्त बंदोबस्त केला. खाणे पिणे, वैद्यकीय सुविधा सगळ्या गोष्टी त्यांना विमानतळांवरच व तसेच त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या थ्री स्टार, फोर स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलात केल्या आहेत. पण परिस्थिती थोडी गंभीर असल्याने तुम्ही यापुढे फक्त आठ दिवस लॉकडाऊन मध्ये रहायचे आहे. तुम्ही आता मास्क व शारीरिक अंतर ठेऊन काम करण्याची संस्कृती आत्मसात करायला हवी. जी माणसे वृद्ध आहेत, न्यूमोनिया वगैरे होऊन गेलेल्या आजारांनी ज्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार आहेत त्यांना कोरोना विषाणू ठार मारू शकतो. अशा लोकांनी मात्र आठ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावरही घराबाहेर पडायचे नाही. बाकी ठणठणीत असलेल्या माणसांनी बिनधास्त मास्क लावून बाहेर पडायचे. पण शारीरिक अंतराचा नियम मोडायचा नाही. तसे केल्यास पोलीस त्यांना अटक करून सरळ जेलमध्येच रवानगी करतील. राखीव ठेवलेल्या काही विषाणूरोधक इंजेक्शन्सचा उपयोग फक्त १० ते २०% गंभीर रूग्णांवरच केला जाणार आहे. गंभीर रूग्ण कोण तर जुनाट आजारांनी अगोदरच प्रतिकार शक्ती कमकुवत झालेले रूग्ण ज्यांचे मूळचे आजार शरीरात कोरोना विषाणू घुसला की बळावतात. बाकीच्या ठणठणीत माणसांच्या शरीरात चुकून किंवा निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणू घुसलाच तर त्यांच्या मजबूत प्रतिकार शक्तीला, सशक्त मनोबलाला मदत म्हणून फ्लू वर असलेली औषधे देऊन त्यांनी घरी राहूनच बरे व्हायचे आहे. खाजगी रूग्णालयात जाऊन त्यांचा धंदा वाढवायचा नाही. सर्व सरकारी रूग्णालयांत, प्राथमिक आरोग्य केंद्रात फ्लूच्या गोळ्यांची, प्रतिकार शक्ती आणखी वाढवून शरीरातून कोरोना विषाणूची क्रियाशीलता संपवणाऱ्या टॉनिक्सच्या गोळ्यांची व्यवस्था केलेली आहे. तेंव्हा या कोरोनाला बिलकुल घाबरायचे नाही. आठ दिवसांनी लॉकडाऊन उठला की मास्क लावून शारीरिक अंतर नियमाचे पालन करीत व अधूनमधून हातावर सॕनिटायझर शिंपडत तुम्ही बिनधास्त कामाला जायचे आहे. उद्योगधंदे फक्त पहिले आठ दिवसच बंद राहतील. नंतर ते चालू होतील. हे सर्व नियमबद्ध कामकाज चालू असताना या विषाणूवर लस शोधण्याचे प्रयोग चालूच राहतील. पण लस कधी येईल याचा भरवसा देता येत नसल्याने उगाच ती गोष्ट डोक्यात घेऊन फिरू नका. कोरोना शरीरात घुसू नये म्हणून काळजी घ्यायची आहे. पण चुकून घुसलाच तर त्याची गच्छंती साध्या फ्लूच्या गोळ्यांनीही होते. पण हे फक्त ८०% ठणठणीत लोकांच्या बाबतीत होऊ शकते. बाकी २०% कमकुवत लोकांना धोका आहेच. त्यांनी जास्त काळजी घ्यायची आहे. पण त्यांच्यासाठीही ती विषाणूरोधक इंजेक्शन्स तयार ठेवलेली आहेतच व सोबत अॉक्सिजन, वेन्टिलिएटर्सची सोय आहे आणि ती सुध्दा सरकारी रूग्णालयांत! या २०% लोकांना या सरकारी रूग्णालयांत सहज प्रवेश मिळेल. बाकी ८०% ठणठणीत लोकांना रूग्णालयात अॕडमिट व्हायची गरजच भासणार नाही. आठ दिवस दम काढा. या आठ दिवसांत विमान तळावर असलेल्या भारतीयांनी व तुम्हीही मास्क वगैरे नियम पाळून संचार करायचा आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय करायचे आहेत. बाकी काय मी आहेच ना (मै हूं ना)"!
असे हे लय भारी स्वप्न मला पडले. यातले खरे काय, खोटे काय हे मला माहित नाही. पण मला हे असे स्वप्न पडले हे मात्र खरे आहे.
-ॲड.बी.एस.मोरे©१८.७.२०२०