काळाचा काळ तो महाकाळ, ज्याच्या पुढे झुकतात सगळे सदा सर्वकाळ!
काळाचा काळ तो महाकाळ! कोण आहे तो? सर्व देव व दैत्य यांच्यापेक्षाही खूप मोठा म्हणजे महान ईश्वर अर्थात महेश्वर आहे का तो? पण हे कसे कळणार? फक्त निसर्गात जे घडत असते त्यावरून आपण फक्त अंदाज बांधणार. सत्य काय ते त्या महाकाळालाच माहित! निसर्गात काळानुसार निर्माण होणारी परिस्थिती ही या महाकाळाचीच निर्मिती असावी का? आपण सर्व वेळोवेळी म्हणजे काळानुसार बदलणाऱ्या परिस्थितीचे गुलाम असतो. ज्यांच्या आई व वडिलांनी एके काळी सत्ता, संपत्तीच्या जोरावर राज्य केलेले असते अशा राजांची मुले पुढील काळात रंक झालेली आपल्याला का दिसतात?चित्रपट सृष्टीतील घराणी घ्या किंवा राजकीय सृष्टीतील घराणी घ्या किंवा इतर कोणतीही नावाजलेली घराणी घ्या, या घराण्यांची पुढील काळात पूर्ण वाताहत झालेली दिसते. हा ऱ्हास पुढील काळात कधीतरी, कुठून तरी सुरू होतो आणि घराणेशाहीला घरातूनच कीड लागून एकेकाळी सर्वसत्ताधीश असलेली घराणी काळाच्या ओघात नामशेष होतात. घराण्यातील पुढील पिढीला घराण्याचा मोठा वारसा पुढे जपता येत नाही. अशी घराणी इतिहासात जमा होतात. आईवडील मुलांसाठी खूप काबाडकष्ट घेऊन त्यांच्या यशाची काही गणिते मांडतात व तशा योजना आखतात. पण काही मुले नेमकी आईवडिलांच्या योजनांविरूद्ध वर्तन करून त्या योजना धुळीला मिळवतात. त्यामुळे किती योजनाबद्ध रहावे याला मर्यादा आहेत. कारण काळाचा व काळाचा काळ असलेल्या महाकाळाचा महिमा मोठा असतो. या महाकाळालाच कोण महेश्वर म्हणतो, कोण नियती म्हणतो तर कोण निसर्ग म्हणून मोकळा होतो. काळानुसार परिस्थिती बदलते व मग कालच्या परिस्थितीशी सुसंगत असलेले कायदे आजच्या परिस्थितीत असंगत होतात. म्हणून तर काळानुसार कालबाह्य झालेले कायदे नेहमी बदलावे लागतात. त्यामुळे आज अस्तित्वात असलेले कायदे एकदम परफेक्ट (परिपूर्ण) व निश्चित मानण्याचे कारण नाही. म्हणून अशा कायद्यांच्या जोरावर केली जाणारी हुकूमशाही ही तात्पुरती असते. पण मनाची संभ्रमावस्था टाळण्यासाठी आजच्या परिस्थितीशी सुसंगत असणारे आजचे कायदे पाळणे हे नैसर्गिक आहे. कारण तो महाकाळाने निर्माण केलेल्या आजच्या परिस्थितीचा सर्वोच्च हुकूम असतो व अशा हुकूमाची हुकूमशाही ही नैसर्गिक असते. आपण निसर्गातील ज्या मुख्य शक्तींना अर्थात देवांना मानतो व भजतो त्या देव देवतांनाही महाकाळाने निर्माण केलेल्या परिस्थिती नुसार बदलावे लागते, वागावे लागते. मग आपले काय? म्हणून भूतकाळात रमणे आणि/किंवा भविष्यकाळात गमणे चूक! त्याऐवजी वर्तमान काळातील परिस्थिती ओळखून त्यानुसार कायदे करणे व त्या वर्तमान कायद्यांनुसार वागणे हेच योग्य होय. म्हणूनच कालाय तस्मै नमः असे म्हणतात. काळाचा काळ महाकाळ! त्या महाकाळाचा सर्वोच्च हुकूम मानण्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. काळाचा काळ तो महाकाळ, ज्याच्या पुढे झुकतात सगळे सदा सर्वकाळ!
-ॲड.बी.एस.मोरे©१४.७.२०२०