https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २४ जून, २०२०

अडगळ!

अडगळ!

बाळा गाऊ कशी अंगाई या १९७७ सालच्या मराठी चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले व आशा काळे यांच्यावर चित्रित झालेले "संसार मांडते मी" हे गाणे मला फार आवडते. लग्न झाल्यावर मग नवरा बायकोचा संसार सुरू होतो व त्यानंतर घर घेण्यापासून त्या घरात संसाराला लागणाऱ्या एकेक वस्तू आणण्यास सुरूवात होते. त्या संसारोपयोगी वस्तू खरेदी करून घरात आणताना नवरा व बायकोची एकमेकांबरोबर भावनिक जवळीक निर्माण होत असताना त्या वस्तूंबरोबर सुध्दा भावनिक जवळीक निर्माण होत असते. त्या वस्तूंची घरात योग्य ठिकाणी नीट मांडणी करीत असताना नवऱ्यापेक्षा बायकोची लगबग खूप मोठी असते. नवरा बायकोचे वय वाढत जाते तसे त्यांच्या संसाराचेही वय वाढत जाते. मग हळूहळू सुरूवातीला हौसेने आणलेल्या घरातील संसारोपयोगी वस्तू जुन्या होत जातात. पण वय वाढल्याने जशी नवरा बायकोतील भावनिक जवळीक घट्ट होत जाते तशी त्या दोघांची संसारासाठी दोघांनी मिळून घरात आणलेल्या वस्तूंशीही भावनिक जवळीक घट्ट होत जाते. पण पुढे मुले मोठी होतात. चांगली कमावती होतात. मग त्यांना घरात नवीन बदल करण्याची इच्छा होते. कारण त्यांच्या तरूण रक्ताला नाविन्याची ओढ असते. मग ती मुले आईवडिलांना म्हणतात की, "घरातील वस्तू आता खूप जुन्या झाल्यात, आम्ही आमच्या खर्चाने नवीन आणतो, घराच्या लाद्या जुन्या स्टाईलच्या खडबडीत आहेत, आम्ही आमच्या खर्चाने नवीन चकचकीत लाद्या बसवतो". खरं तर या गोष्टी वृध्द झालेल्या नवरा बायकोला पटत नाहीत. एकेक वस्तू गोळा करताना त्यांनी स्वतःचा जीव त्यात ओतलेला असतो आणि आता ही मुले त्यांच्या या सर्व गोष्टी भंगारात काढायला निघालेली असतात. एकांत मिळाला की मग अशी नवरा बायको हळूच कुजबुजतात "या मुलांना आपण संसारासाठी खरेदी केलेल्या वस्तू आता जुनाट वाटू लागल्यात, आता त्यांना या वस्तूंची अडगळ वाटू लागलीय, काय जाणो उद्या आपलीही यांना अडगळ वाटेल"! मग माझ्यासारखा कडक बाप कडाडतो "काही गरज नाही नवीन वस्तूंची, नवीन लाद्यांची, त्या गुळगुळीत लाद्यांवर म्हातारपणी घसरून पडून आम्हाला आमचे हातपाय मोडून घ्यायचे नाहीत कोणाला काही बदल करायचे असतील तर ते त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःची घरे घेऊन त्या घरांत करावेत, आमचे हे घर आमच्या वस्तूं सह आहे तसेच राहूद्या"! वृध्द बायकोला तिच्या वृध्द नवऱ्याचा कडकपणा मनातून सुखावतो. पण तिकडून मुलांची मने दुखावली गेली म्हणून ती माऊली आतून रडतही असते. हे उदाहरण आहे माझ्या वडिलांचे व माझ्या आईचे! मी कमावता झाल्यावर असेच काही बदल वरळी बी.डी.डी. चाळीतल्या छोट्या घरात करायला घेतले होते तेंव्हा माझे वडील माझ्यावर असेच कडाडले होते. मी कर्जाच्या हप्त्यावर घरात ब्लॕक अँड व्हाईट टी.व्ही. आणायचे ठरवले तेंव्हा वडील माझ्यावर खूप भडकले होते. आमच्या घरात फार जुनी लोखंडी खाट होती. ती खूप मजबूत होती. माझ्या वडिलांनी खूप वर्षापूर्वी ती आणली होती. तिला ते अधूनमधून हिरवा अॉईल पेंट द्यायचे. ती खाट ठेवायला त्यांनी सुताराकडून जाडजूड चार मोठे ठोकळे तयार करून घेतले होते. त्या ठोकळ्यांवर ती लोखंडी खाट ठेवल्याने तिची उंची वाढवली गेली होती जेणेकरून घरातील पेट्या, बिछाने वगैरे सामान त्या खाटेखाली ठेवता येईल. घरात कोण पाहुणे मंडळी आली तर त्यांना ते सामान दिसू नये म्हणून आईने त्या खाटेच्या मापाचा एक पडदा शिवून घेतला होता व त्या खाटेला लावला होता. माझ्या आईवडिलांचा त्या जुन्या  लोखंडी खाटेवर फार जीव होतो. ती लोखंडी  खाट होतीच तशी मजबूत! तसेच मी व आई दोघांनी मिळून नळबाजारातून (त्याला मुंबईत चोर बाजार म्हणतात) एक मस्त लाकडी कपाट आणले होते. त्या कपाटाला पुढून मोठी उभी काच होती. त्या काचेत बघून घरातील आम्हा  सगळ्यांचे भांग काढणे व्हायचे. त्या कपाटाला छान कप्पे होते. ते कप्पे आम्ही बहीण भावांनी वाटून घेतले होते. त्यांचा उपयोग प्रत्येकाचे कपडे व शाळेतील पुस्तके ठेवण्यासाठी केला जायचा. माझ्या ठराविक दोन कप्प्यांना कोणी हात लावला की मी घरात जाम चिडायचो. मग आई मला शांत करायची. अधूनमधून माझे वडीलही ओरडायचे "त्या बाळूच्या कप्प्यांना हात का लावता तुम्ही" असे माझ्या बाजूने बोलायचे. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या त्या जुन्या वस्तू वरळीच्या त्या जुन्या घरासह शेवट पर्यंत जपल्या. पण २००९ साली वडील वारले. घराच्या वाटण्या चार भावंडात करायचे ठरले. आणि मग त्या घरातील तो संसार विस्कटला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर संसारातील त्या जुन्या वस्तूंची आता विल्हेवाट लागणार म्हणून माझ्या  आईची तळमळ तिच्या डोळ्यांत मला दिसत होती. "नवरा गेला, उभा संसार मोडला, बाबांनो आता तुम्हाला काय करायचे ते करा, माझा नवरा जिवंत असता तर तुमच्या एकाचेही त्याने काही चालू दिले नसते, आता मी एकटी पडलेय माझे काय चालणार" असेच भाव मला माझ्या आईच्या डोळ्यांत दिसत होते. पण माझाही नाइलाज होता. मीच पुढाकार घेतला आणि चार भावंडात त्या चार वाटण्या केल्या. कारण मला चार भांवडांत पुढे जराही वाद वाढू द्यायचे नव्हते. सर्व भांवडांची व माझ्या आईची संमती  घेऊनच मी त्या चार वाटण्या केल्या. पण त्या वाटणीने सगळ्यांचीच मने दुखावणारी एक गोष्ट झाली आणि ती म्हणजे माझ्या आईचा जीव तिच्या नवऱ्याच्या ज्या घरात होता, त्या घरात संसारासाठी तिने जमवलेल्या ज्या जुन्या वस्तूंत होता, त्या सगळ्याच गोष्टी उध्वस्त झाल्या. माझ्या आईने तिच्या नवऱ्याबरोबर (माझ्या वडिलांबरोबर) मांडलेला संसार अशा रितीने मोडला गेला. तिने संसार मांडला आणि शेवटी नवऱ्याच्या (माझ्या वडिलांच्या) मृत्यूने तो मोडला! म्हणून "संसार मांडते मी" हे गाणे मला खूप भावूक करते. आता इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते. आम्ही नवरा बायको आता वृध्द झालो आहोत. आम्ही संसारासाठी जमवलेल्या वस्तूंही आमच्या घरासह आता जुन्या झाल्यात. माझी आर्थिक आवक कमी झालीय. मुलगी लग्न होऊन सासरी गेलीय. मुलगी कसली आमचा तो मुलगाच आहे. मग आमची ही मुलगी कधीतरी आमचे जुने घर नव्याने सजवू असे म्हणेल, त्यासाठी ती तिचा पैसाही स्वखुशीने देऊ करील. पण मी ते होऊ देणार नाही. माझ्या वडिलांसारखाच मी स्वाभिमानी आहे. मुलीचे पैसे घ्यायचे तर नाहीतच पण आम्ही नवरा बायकोने संसारात जमवलेल्या वस्तू त्या जुन्या झाल्या म्हणून आम्ही जिवंत असताना भंगारात जाऊ देणे आम्हाला आवडणार नाही. जुन्या झाल्या तरी त्या व्यवस्थित काम देतात ना हे महत्वाचे! आमच्या दोघांचेही हृदय या घरात, या जुन्या वस्तूंत गुंतलेले आहे. मग आम्हाला त्यांची अडगळ कशी वाटेल? जेंव्हा आमच्या दोघांपैकी एकजण अगोदर वर जाईल तेंव्हा आमचा संसार मोडेल. मग घर काय व त्या घरात संसारासाठी आम्ही गोळा केलेल्या वस्तू काय, मागे राहणाऱ्या आमच्या पैकी एकाला त्याचे काहीच वाटणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी! मांडलेला संसार पुढे निसर्गाकडून मोडलाही जातो हे सत्य कटू असले तरी ते स्वीकारावेच लागणार!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.६.२०२०

Religious Differentia!

RELIGIOUS DIFFERENTIA!

All religions seem to have been outcome of regional influences. The territorial diversity seems to have been responsible for widespread religious diversity all over world and hence no religion from among all religions is found to be universal truth of whole world. Followers of each religion try to praise their own religion and criticize other religions thereby creating religious hatred and enmity all over world. If God is one for all, how could he allow this?

-Adv.B.S.More©25.6.2020

देवांश!

देवांश (गॉड पार्टिकल)!

(१) देवांश (गॉड पार्टिकल) ही अशी तर्कशुद्ध संकल्पना आहे की तिच्यावर वैज्ञानिकांचा अभ्यास सुरू आहे. तिची सत्य, असत्यता पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग केले गेले, पण त्यात वैज्ञानिकांना अपयश आले. वैज्ञानिकांना देवांश (गॉड पार्टिकल) शोधण्यात आलेले अपयश म्हणजे निसर्गात देवांश नाहीच असे अनुमान काढणे हे पूर्णतया चुकीचे! या मुद्यावर नास्तिकांशी माझे कायम मतभेद राहतील.

(२) माझ्या वैयक्तिक संकल्पनेतून निसर्ग म्हणा, विश्व म्हणा नाहीतर सृष्टी म्हणा ते एक विशाल शरीर आहे. पण या शरीराला कुठेतरी केंद्रबिंदू आहेच या मतावर मी ठाम आहे. तो केंद्रबिंदू निश्चितच अतिसूक्ष्म आहे. तोच देवांश (इंग्रजीत गॉड पार्टिकल)! निसर्गाचा हा केंद्रबिंदू म्हणजे देवांश हे एक भौतिक अणुकेंद्र, रासायनिक शक्तीकेंद्र व मानसिक क्रियाकेंद्र आहे. अर्थात भौतिक, रासायनिक व मानसिक असे देवांशाचे तीन भाग आहेत.

(३) यातील मानसिक भाग हा भौतिक वासना, आध्यात्मिक भावना व बुद्धी या तीन गोष्टींनी युक्त आहे. देवांशाचा मानसिक भाग हाच निसर्गाला क्रियाशील ठेवणारा प्रमुख भाग आहे. पण या मानसिक भागातील जो बुद्धीचा भाग आहे तो भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या फक्त दोनच मानसिक गोष्टींवर नव्हे तर भौतिक वस्तुमान असलेले विविध अणू व रासायनिक शक्ती तथा गुणधर्म असलेली विविध द्रव्ये या इतर दोन शारीरिक गोष्टींवरही लक्ष ठेऊन या सर्वच मानसिक व शारीरिक गोष्टींना नैसर्गिक हालचाल करण्यास उद्युक्त करतो व त्या हालचाली नियंत्रित करतो.

(४) देवांशाबद्दलचा माझा हा तर्क अंधश्रध्द नसून तो वैज्ञानिक आहे यावर मी ठाम आहे. निसर्गातील देवांश (गॉड पार्टिकल) शोधण्याचे वैज्ञानिक कार्य पुढे कित्येक हजारो वर्षे चालूच राहील. या देवांशाचा वैज्ञानिक शोध लागेपर्यंत मानव जगातील अनेक धर्म या देवांशाबद्दल अनेक कल्पना करतील ज्या कल्पनांना अनेक अंधश्रध्दा चिकटून राहतील.

(५) मी या देवांशालाच देव म्हणतो. मानतो नाही तर त्याचे निसर्गात अस्तित्व आहे म्हणून म्हणतो. या देवापुढे नतमस्तक होण्याची माझी आस्तिकता व या देवाशी एकरूप होण्याची माझी आध्यात्मिकता ही या देवांशाशी जोडली गेली आहे. निसर्गातील देवांशात असलेले बुद्धीकेंद्र व माझी स्वतःची बुद्धी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क आहे हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. मी निसर्गालाच गुरू मानतो बाकी कोणालाही नाही याचे कारण म्हणजे निसर्ग बुद्धी ते माझी बुद्धी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क आहे यावर माझा असलेला ठाम विश्वास!

(६) निसर्गात बुद्धीला सर्वोच्च स्थान असण्याचे कारण म्हणजे बुद्धीकडे असलेली व्यवस्थापन व नियंत्रण शक्ती! मानवी मेंदूत असलेली बुद्धी हे मनुष्याला निसर्गाकडून अर्थात निसर्गातील देवांशाकडून (थोडक्यात देवाकडून) मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे. तसे पाहिले तर नुसती बुद्धीच काय पण मनुष्य जीवन, त्या जीवनाला निर्माण करणारी आई वडील रूपी माध्यमे, त्या जीवनाला जगवणारी हवा, पाणी, अन्न रूपी साधने, त्या जीवनाला रोगांपासून, शत्रूंपासून वाचवणारी औषधे, शस्त्रे रूपी साधने या सर्वच गोष्टी ही निसर्गातील देवांशाकडून (देवाकडून) मनुष्याला मिळालेली वरदानेच आहेत.

(७) पण मनुष्याने कधीही स्वतःच्या बुद्धीचा गर्व करता कामा नये. स्वतःच्या बुद्धीचा टेंभा मिरवताना मनुष्याने त्याच्या बुद्धीचा उगम निसर्गात (माझ्या मते निसर्गातील देवात) आहे हे विसरता कामा नये. खरं तर सगळ्यांच गोष्टींचा उगम निसर्गात (निसर्गातील देवात) आहे. मग ती निसर्गातून निर्माण होणारी अनेक प्रकारची आव्हाने असोत की निसर्गाने बुद्धीसह बहाल केलेली अनेक साधने (वरदाने) असोत.

(८) माझ्या मते, बुद्धी हे एक अत्यंत शक्तीशाली नैसर्गिक साधनच आहे. त्या साधनाचा मनुष्याने नीट उपयोग केला पाहिजे. बुद्धीला निसर्गातील प्रश्न निसर्गातच व समाजातील प्रश्न समाजातच सोडविणे जमले पाहिजे. नैसर्गिक व सामाजिक प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे निसर्गात व समाजातच आहेत. त्यांचा शोध निसर्गात व समाजातच घेणे बुद्धीला जमले पाहिजे. त्यासाठी बुद्धीने खूप प्रयत्न केले पाहिजेत. यालाच बौद्धिक कष्ट म्हणतात जे शारीरिक कष्टापेक्षा श्रेष्ठ असतात. बुद्धी श्रेष्ठ म्हणून बौध्दिक कष्टही श्रेष्ठ  हे मान्य करायलाच हवे. कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर जर बुद्धीमुळेच मिळते तर मग बुद्धी श्रेष्ठ नव्हे काय?

(९) बौद्धिक कष्ट केल्याने कठीण प्रश्नांची उत्तरे मिळतात व यालाच प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणतात. पण बुद्धी श्रेष्ठ म्हणून कोणीही स्वतःच्या बुद्धीचा गर्व करू नये. कारण शेवटी बुद्धी हे निसर्गाचेच (माझ्या मते निसर्गातील देवांशाचे) वरदान आहे. म्हणून बुद्धीने नेहमी निसर्गाशी (निसर्गातील देवांशाशी) कृतज्ञ राहिले पाहिजे. निसर्गाशी/देवांशाशी कृतज्ञ राहणे, त्याच्यापुढे आदराने नतमस्तक होणे, त्याच्याशी सर्वार्थाने एकरूप होणे म्हणजे त्याच्यापुढे शरणागत होऊन भीक मागणे नव्हे. अशी भीक मागणे हा स्वतःच्या बुद्धीचाच नव्हे तर निसर्गाचा/देवांशाचाही अपमान आहे. माझी आस्तिकता ही अशी वैज्ञानिक आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©२४.६.२०२०

सोमवार, २२ जून, २०२०

आषाढ प्रारंभ दिनी अत्रे!

आषाढ मास प्रारंभ दिनी अत्रे!

रविवार, दिनांक २१ जून २०२० च्या लोकसत्ता वृत्तपत्रात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या मराठा वृत्तपत्रात दिनांक २२ जून १९६० रोजी आषाढ मास प्रारंभ दिनानिमित्त "आषाढस्य प्रथम दिवसे" हा जो लेख लिहिला होता तो पुन्हा प्रसिद्ध झालाय. त्या लेखातील खालील दोन निवडक गोष्टी मला आवडल्या त्या वाचकांसाठी सादर!

(१) नैतिकता, बौध्दिकता व सुंदरता ही प्राचीन भारतीय संस्कृतीची तीन रूपे अनुक्रमे वाल्मिकींच्या रामायणात, व्यासांच्या महाभारतात व कालिदासांच्या शाकुंतलात आढळतात! 

(२) भाषा ही पार्वती तर तिच्यातून मिळणारा ज्ञानार्थ हा परमेश्वर!

आचार्य प्र.के.अत्रे यांच्यासारखा अभ्यासकच प्राचीन भारतीय संस्कृतीची अशी थोडक्यात मांडणी करू शकतो व त्यांच्यासारखा साहित्यिकच भाषेला पार्वती व तिच्यातून मिळणाऱ्या ज्ञानार्थाला परमेश्वराची उपमा देऊ शकतो. खरंच आचार्य अत्रे ग्रेटच होते!

-ॲड.बी.एस.मोरे, संकलक

रविवार, २१ जून, २०२०

पुंगी ताईट व्यायाम!

अनलॉक २ मधील चालण्याचा पुंगी ताईट व्यायाम!

तीन महिन्यानंतर इमारतीच्या खाली उतरून आज रविवार, दिनांक २१ जून २०२० रोजी संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान डोंबिवली स्टेशन  पर्यंत चालण्याचा व्यायाम केला. रस्त्यावर व रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट व भयाण शांतता आढळली. त्यातच तोंडावर मास्क लावून चालत असताना रस्त्यावरील कुत्री अंगावर भुंकत होती. त्यामुळे चालताना शरीर मोकळे होत असले तरी हळूहळू या व्यायामाचे रूपांतर  पुंगी ताईट व्यायामात झाले. पुढे कोणी पोलीस तर हटकणार नाही ना याची भीती होतीच. रात्री  जागून दुपार नंतर उशिरा उठणारा मी माणूस असल्याने सकाळ, दुपारचा व्यायाम शक्य नाही. बघूया उद्यापासून थोडे लवकर उठून कमीतकमी संध्याकाळी ६ ला असे पाय मोकळे करणे जमतेय का?

खरं म्हणजे,फक्त  डॉक्टर, पोलीस व सरकारी खात्यातील इतर लोकांनाच अत्यावश्यक सेवक समजून लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायची परवानगी देणे हे चुकीचे आहे. वकिलांचा सुद्धा अत्यावश्यक सेवक वर्गात समावेश केला गेला पाहिजे. समजा कुठे घरगुती हिंसाचार वगैरे गोष्टी घडल्या तर लोक डॉक्टरकडे जाणार की वकिलाकडे? मग वकील अशा क्लायंटला घेऊन मध्यरात्री सुध्दा पोलीस स्टेशनला जाऊ शकतो की नाही? जरा कायदा नीट समजून घ्या हो!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०

फादर्स डे!

आज फादर्स डे निमित्त माझ्या वडिलांना ही भावांजली!

(१) कठीण आहे मला माझ्या वडिलांविषयी शब्दांत व्यक्त होणे, पण तरीही कसाबसा व्यक्त होतोय. सातवीपर्यंत शिकलेले माझे वडील राष्ट्रीय मिल मजदूर संघ या मान्यताप्राप्त कामगार युनियनचे पुढारी झाले व काँग्रेसचे तत्कालीन मोठमोठे नेते इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, संगमा, वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.  त्यांच्याबरोबर लहानपणी मी श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील बंगल्यावर व तरूण पणी श्री. वसंतदादा पाटील यांच्या मुंबईतील बंगल्यावर गेलो होतो. मी इयत्ता सातवीत असताना दिल्लीला यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यात गिरणी कामगारांच्या बैठकीत त्या लहान वयातही धाडसाने छोटे भाषण केले होते व ते ऐकून यशवंतराव चव्हाणांनी मला जवळ ओढून घेतले होते. माझ्या वडिलांचे इंदिरा गांधी यांच्याबरोबरही फोटो होते. हे सर्व फोटोंचे पुढे काय झाले, ते कसे गहाळ झाले, माझ्या वडिलांच्या या मौल्यवान आठवणी कुठे आणि कशा अदृश्य झाल्या हे मला कळत नाही. या सर्व आठवणी वरळी बी.डी.डी. चाळीतील माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून मी १९८५ साली डोंबिवली गाठली व डोंबिवलीला पत्नी व मुलीसह वेगळा राहू लागलो. याचे कारण म्हणजे वरळीची १०×१२ फूटाची ती खोली खूप छोटी होती व त्या एवढ्या लहान खोलीत माझा धाकटा भाऊ, धाकटी भावजय यांचे कुटुंब, माझे आईवडील व पुन्हा माझे कुटुंब यांना एकत्र राहणे केवळ अशक्य होते.

(२) तरीही आईवडिलांना मी सोडले नव्हते. तिथे दर आठवड्याला जाऊन त्यांची नुसती वरवर चौकशी नाही तर थोरला मुलगा म्हणून काळजी घेणे हे कर्तव्य मी पार पाडीत होतो. माझे वडील खूप स्वाभिमानी असल्याने त्यांच्या औषधांचा खर्च ते स्वतःच करायचे. मी फक्त आईच्याच औषधपाण्याचा खर्च करायचो. धाकटा भाऊ व भावजय आईवडिलांसोबतच राहत असल्याने त्यांच्या जेवणाची व सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते सर्व जुने फोटो मी माझ्याबरोबर डोंबिवलीला घेऊन आलो नाही. उत्तर भारत सफरीचे वडिलांबरोबरचे माझे खूप फोटो होते. पण ते सर्व गहाळ झाले आहेत. त्यामुळे या लेखासोबत ते फोटो मी दाखवू शकत नाही.

(३) घरात माझ्या वडिलांनी त्यांच्या चारही मुलांना म्हणजे मी थोरला मुलगा, दोन धाकट्या बहिणी व एक सर्वात धाकटा भाऊ या सर्वांना शिक्षण घेण्याची संधी दिली. पण इतर तीनही भावंडे एस.एस.सी. च्या पुढे शिकलीच नाहीत. मी मात्र सातवी पी.एस.सी.ला (प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट) व अकरावी एस.एस.सी. ला (सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट) फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन पुढे राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली व बी.कॉम.(अॉनर्स), कंपनी सेक्रेटरी (इंटर), एलएल.बी. एवढे उच्च शिक्षण पूर्ण केले व पुढे स्वतःच्या हिंमतीवर वकील झालो.

(४) माझ्या वडिलांना माझ्या शिक्षणाचा, माझ्या धाडसाचा खूप अभिमान होता. पुढारी असल्याने ते ज्या मिल मध्ये नोकरीला होते त्या व्हिक्टोरिया मिलमध्ये त्यांचा दबदबा होता. त्या मिलचे जनरल मॕनेजर सोनाळकर साहेब यांच्यापर्यंत त्यांची उठबस होती. माझ्या वडिलांनी मला एकदा सोनाळकर साहेबांच्या कॕबिनमध्ये रूबाबात नेले होते. तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष वसंतराव होशिंग, जनरल सेक्रेटरी भाई भोसले, संघाचे नंतरचे अध्यक्ष व शालिनीताई पाटील यांचे बंधू मनोहर फाळके यांच्याकडेही मला माझे वडील कौतुकाने घेऊन गेले होते. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांच्याकडेही माहिमला ज्योती सदन बंगल्यावर व नंतर मलबार हिल येथील मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. लहानपणीचा श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावरील माझ्या छोट्या भाषणाचा किस्सा तर वर सांगितलाच आहे.

(५) असे हे माझे वाघासारखे वडील २००९ साली के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आम्हाला कायमचे सोडून गेले त्यावेळी मी खऱ्या अर्थाने निराधार झालो. कारण मी महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री व नंतर काँग्रेसचे खासदार असलेले बॕ. ए. आर. अंतुले यांच्याविरूध्द सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यामुळे  टी.व्ही. वर माझे सारखे नाव येऊ लागले होते. त्यातून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर असलेली काळजी, "बाळू, मला न विचारता तू एकट्यानेच एवढे मोठे धाडस का केलेस, आता ही रिट याचिका पुन्हा मागे घेता येईल का" हे मला माझ्या काळजीने सांगणे व नंतर मी न्यूमोनियाने खूप आजारी पडलो तेंव्हा माझ्या काळजीने कासावीस होणे या सर्व गोष्टी माझ्या वडिलांच्या मृत्यूबरोबर संपल्या होत्या.

(६) असा पाठिंबा देणारी एकही व्यक्ती जगात शिल्लक राहिली नव्हती व आताही अशी एकही व्यक्ती या जगात नाही हे मी जाहीरपणे सांगत आहे. आज माझी पत्नी माझ्या सोबत आहे, माझी मुलगीही माझ्यामागे पाठबळ म्हणून उभी आहे. पण माझ्या वडिलांची बरोबरी कोणच करू शकत नाही. माझे वडील हा माझा फार मोठा आधार होतो. तो आधार संपला आणि मी कमकुवत झालो. वकिली सुरू ठेवली पण राजकारणाचा नाद सोडून दिला.  

(७) या लेखासोबत डावीकडे आहेत ते माझे वडील व उजवीकडे आहे तो मी त्यांचा मुलगा. आज फादर्स डे निमित्त एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०

शनिवार, २० जून, २०२०

चाळीतला सीमावाद!

चाळीतला सीमावाद!

माझा जन्म १९५७ चा, म्हणजे १९६२ साली भारत व चीन यांच्यात सीमावादातून जे युद्ध झाले त्यावेळी मी जेमतेम पाच वर्षाचा होतो. पहिली इयत्तेत सुध्दा प्रवेश न घेतलेल्या मला त्या बाल वयात काय माहित असणार भारत काय, चीन काय? पण मुंबईत वरळी बी.डी.डी. चाळीत असलेली आमची खोली व समोरची खोली यांच्यात एक अलिखित सीमारेषा आहे हे मात्र कळत होते. मुंबईत वरळी, डिलाईल रोड, नायगाव याठिकाणी बी.डी.डी. चाळी आहेत. प्रत्येक चाळीला तळ मजला धरून एकूण चार मजले. चाळीच्या प्रत्येक मजल्यावर १०×१२ फूटाच्या एकूण २० खोल्या. म्हणजे चार मजल्यावर एकूण ८० खोल्या. एकाच चाळीत राहणाऱ्या या ८० खोल्यांत गिरणी कामगारांची ८० कुटुंबे संसार करायची. अर्थात सरकारी भाडेतत्वावरील त्या छोट्या खोल्या हीच चाळीत राहणाऱ्या सर्व गिरणी कामगारांची स्थावर मिळकत होती व मिलमधून मिळणारा पगार हेच त्या सर्वांचे आर्थिक उत्पन्न होते. म्हणजे सगळ्या कुटुंबाची परिस्थिती सारखी होती. पण तरीही त्यांच्यात अधूनमधून छोटे सीमावाद चालू असायचे. प्रत्येक भाडेकरूने स्वतःचे सामान म्हणजे चिनपाट (सार्वजनिक संडास करण्यासाठी लागणारा पत्र्याचा छोटा डबा किंवा प्लॅस्टिकची छोटी बादली), कपडे वाळू घालण्यासाठी लागणारा स्टूल, कपडे वाळू घालण्यासाठी आवश्यक असलेल्या दोऱ्या इत्यादी गोष्टी स्वतःच्याच अंगण भागात ठेवणे हा नियम होता. दोन खोल्यांमधील अंगण भागाचे म्हणजे वटणाचे (corridor) एका सीमारेषेने दोन भाग केलेले होते. अलिकडच्या खोलीचे सामान अलिकडच्या अंगण भागात, तर पलिकडच्या खोलीचे सामान पलिकडच्या अंगण भागात आणि मध्ये अंगण सीमारेषा अशी ती व्यवस्था होती. गणपती, नवरात्र, दिवाळी सारख्या सणात रांगोळी, आकाश कंदील, पणत्या वगैरे गोष्टी प्रत्येकाने स्वतःच्या अंगणातच लावणे हाही नियम होता. दोन अंगण भागांमधील सीमारेषा ओलांडून कोणीही दुसऱ्याच्या अंगण भागात अतिक्रमण करायचे नाही हे ठरलेले होते. हे सर्व एकमेकांच्या सहकार्याने अगदी व्यवस्थित चालायचे. आम्ही लहान मुले मात्र  या सीमारेषा ओलांडून एकमेकांच्या खोल्यांत घुसून धुडघूस घालायचो. पण आमचे सगळ्या खोल्यांत स्वागतच व्हायचे. इतकेच नव्हे तर आमच्या आया एकमेकींच्या खोल्यांत जाऊन बिनधास्त गप्पा मारीत बसायच्या. इतकेच नव्हे तर घरी केलेल्या मोदक, लाडू, करंजी, मच्छी, मटण वगैरे खाद्य पदार्थांचीही मुक्त देवाणघेवाण व्हायची. कोणाकडे बारसे, लग्नकार्य असले तर मजल्यावर (माळ्यावर) राहणारे शेजारी एकमेकांच्या मदतीला धावायचे. पण तरीही सीमारेषा या होत्याच. अधूनमधून क्षुल्लक सीमावाद व्हायचे, धुसफूस व्हायची, छोटी  भांडणे व्हायची, पण पुन्हा सर्वजण एक व्हायचे. हळूहळू वय व शिक्षण वाढत गेले तसे आर्थिक व्यवहाराचा व राजकीय सीमावादाचा हा पसारा फार मोठा आहे हे मला कळू लागले. आमची चाळ एकच पण त्या चाळीतील ८० खोल्यांच्या सीमा वेगवेगळ्या, तशी पृथ्वी एकच पण या पृथ्वीवरील विविध देशांच्या सीमा वेगवेगळ्या हे हळूहळू कळू लागले. आता तर हेही कळलेय की या जगात कोणतीही व्यक्ती व कोणताही देश आत्मनिर्भर नाही. सगळेजण एकमेकांवर अवलंबून आहेत. आमच्या आया जशा एकमेकींना मोदक, लाडू, करंज्या, मच्छी, मटण द्यायच्या तसे जगातील देश एकमेकांशी आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण करतात. तरीही त्यांच्यात अधूनमधून सीमावाद उफाळून येतोच. मग त्यांच्यात छोटी, मोठी युद्धे होतात. युद्ध ज्वराने सगळे वातावरण तापते. पण नंतर ही युद्धे संपतात, नव्हे ती संपवावीच लागतात. कोण युद्धात जिंकतो तर कोण हारतो. मग जिंकणारा देश व हरणारा देश यांच्यात तहाचे करार होतात. त्या देशांत आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होतात. जगात हे असेच चालू आहे आणि असेच चालू राहणार आहे. हे सर्व नीट समजून घ्यायला मला बी.डी.डी.चाळीतील त्या सीमारेषा व ते छोटे सीमावाद अजूनही मदत करतात. लहानपणीच्या या अनुभवाचा मी माझ्या वकिलीतही उपयोग करतो हे विशेष!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.६.२०२०