https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

कॉपी पेस्ट प्रॕक्टिस?

माझ्या बौद्धिक संपदेचा मालक मी स्वतः आहे!(मेरी बौद्धिक प्रापर्टी का मालिक मै खुद हूं!)

माझ्या लिखाणाचे कॉपी पेस्ट करताना लेखक म्हणून कोणी माझे नाव काढून तिथे स्वतःचे  नाव टाकले तर खरंच माझी तळपायाची आग मस्तकात जाते. मी माझ्या लेखांवर माझे नाव व तिथे कॉपी राईट हक्काची © निशाणी लावतो. पण ती © निशाणी न बघता काहीजण खुशाल माझ्या लिखाणावरून माझे नाव काढून स्वतःचे नाव घालतात. हे जर माझ्या नजरेस आले तर मी अशा लोकांना उघडे करतो. खरंच, कॉपी करण्याचा यांना इतका मोह व्हावा!🙏🙏😢

एका व्हॉटसॲप ग्रूपवर हा कॉपी पेस्ट खेळ आज एकाने केला व मग मला त्याला चांगलेच झापावे लागले. तोच अनुभव इथे फेसबुकवर शेअर करतोय. तिथे हिंदी व इंग्रजीत संवाद झाला म्हणून थोडी हिंदी व इंग्रजी इथेही.

Admin please see this and warn against copy paste practice here at least in my original posts.🙏👏

मै बौद्धिक मेहनत करू और मेरी मेहनत कोई चुराकर कोई मेरे सामने ही मुझ पर राज करने की कोशिश करे तो मै कैसा चूप रहू? मै ऐसी गांधीगिरी नही करता. मेरी मेहनत, मेरा फल, बस्स! उसका क्रेडिट दुसरा कोई ले यह मै बरदाश्त नही कर सकता.

माझ्या वरील संताप कमेंटवर त्या ग्रूप मधील दुसऱ्या सभासदाने इंग्रजीत दिलेली ही सहमत प्रतिक्रिया.

Sir You are GREAT! I FULLY Agree with the contents and your attachments with literature actually in this regard . I request to put a note in the group that such copyright post should not be forwarded without the sender permission . Because it will not be justified without the permission of the sender it should not be forwarded so Admin kindly ensure it . 🙏🏻

हा अनुभव मी मुद्दामहून इथे फेसबुकवर शेअर करीत आहे जेणे करून अशा गोष्टी माझ्या बाबतीत तरी कोणी करणार नाही. मी माझ्या ज्ञानाला पैशापेक्षा जास्त किंमत देतो हे स्पष्ट करून माझी ही अनुभव कथा इथेच संपवतो.

-ॲड.बी.एस.मोरे©५.१०.२०२०

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

नवसंजीवनी!

नवसंजीवनी!

(१) कालचा माझा दिवस माझे डोळे सताड उघडे करणारा, मला नवसंजीवनी देऊन मला मोठे करणारा ठरला. काल २ अॉक्टोबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे साधे पण महान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महान नेत्यांचा जन्मदिवस! या मंगल दिनी माझ्याही आयुष्यात मंगलमय गोष्ट घडली. मला आलेले नैराश्य दूर झाले, मरगळ झटकली केली, निसर्गातील देवाचा मला सर्वोच्च आदेश मिळाला "उठ, स्वतःला ओळख आणि पुन्हा कामाला लाग, आयुष्याचे नवनिर्माण कर"!

(२) याला पहिले कारण म्हणजे ॲड. विजय चौगुले यांनी माझ्या दोन नैराश्यजनक लेखांवर दिलेल्या त्यांच्या दोन प्रतिक्रिया. या दोन्ही प्रतिक्रियांनी माझे झाकलेले डोळे सताड उघडे झाले व मला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती मी ॲडव्होकेटस असोसिएशन अॉफ वेस्टर्न इंडिया या हायकोर्ट वकिलांच्या एका फेसबुक ग्रूपवर लिहिलेल्या एका नैराश्यजनक लेखावर. तिथून त्यांनी मला जागे केले. नंतर "माझ्या ज्ञानाची शोकांतिका" या माझ्या दुसऱ्या नैराश्यजनक पोस्टवर त्यांनी भलीमोठी प्रतिक्रिया दिली आणि मला पूर्ण जागे केले.

(३) कोण आहेत हे ॲड. विजय चौगुले साहेब? माझ्या काही मित्रांना माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतोय. आज ७० वर्षाचे वय म्हणजे माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वयाने मोठे असलेले हे चौगुले वकील साहेब म्हणजे वरळी पोदार आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या पाठीमागील अभ्यास गल्लीत रस्त्यावरच पालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करणारा हा एक होतकरू धडपड्या मुलगा! हाच धडपड्या मुलगा पुढे वकील झाला व आयुष्यात मोठे यश मिळवून आता तो सुखासमाधानाने जगत आहे. मीही पोदारच्या त्याच अभ्यास गल्लीत रस्त्यावर अभ्यास करून वकील झालो.

(४) विजय चौगुले माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठे पण १९७५ ते १९७८ या चार वर्षांच्या काळात मी जेंव्हा माटुंग्याच्या पोदार वाणिज्य कॉलेज मधून बी.कॉम. चे शिक्षण घेत होतो तेंव्हा याच पोदार अभ्यास गल्लीत मी रस्त्यावर अभ्यास  करीत असताना माझी विजय चौगुले बरोबर  दोस्ती झाली. चौगुले साहेब कधीकधी त्या गल्लीतच रात्री झोपायचे व सकाळी तिथेच उठून कामाला जायचे. नोकरी करून हिंमतीने उच्च शिक्षण घेणारा हा अत्यंत हुशार मुलगा. मी अभ्यास करता करता मध्येच विजय चौगुले यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचो आणि विजय चौगुले त्या वयातही मला धीर देणाऱ्या गोष्टी समजावून सांगायचे.

(५) नंतर विजय चौगुले यांचे पोलीस इन्स्पेक्टर मुलीबरोबर लग्न झाले. त्यांच्या पत्नी डेप्युटी कमिशनर अॉफ पोलीस (डी.सी.पी.) या फार मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा मुलगा, सून, मुलगी हे सर्वच जण आता वकील होऊन ॲड. विजय चौगुले यांच्या चौगुले ॲन्ड असोसिएटस या लॉ फर्ममध्ये एकत्र वकिली करीत आहेत. त्यांची मुंबईत दोन कार्यालये आहेत. हे सर्व कालच त्यांच्या बरोबर झालेल्या फोनवरील चर्चेतून कळले. खरंच फार मोठे यश मिळवले माझ्या या मित्राने! इतकेच नव्हे तर मुंबई काँग्रेसमध्ये एकेकाळी या माझ्या मित्राची खासदार गुरूदास कामत यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबर उठबस होती, मोठे नाव होते. पण त्या राजकारणाचे जाऊ द्या. त्यांचे वकिलीतले यश हे खूप मोठे यश आहे.

(६) मी जेंव्हा चौगुले साहेबांना त्यांच्या या यशाबद्दल बोललो तेंव्हा त्यांनी मी मिळवलेल्या यशाची आठवण करून दिली. "अरे, माणसा दुसऱ्याच्या यशाकडे बघून तू स्वतःचे यश का अंधारात लपवून ठेवत आहेस, कुठे होतास तू, किती कष्ट उपसलेस तेंव्हा कुठे स्वकष्टाने वकील झालास, स्वकर्तुत्वावर ज्ञानी झालास, किती छान लिहितोस तू, सर्वांकडे ज्ञानाची ही उंची नसते व लेखनाची कला नसते, देवाने तुला कितीतरी भरभरून दिले आहे, तळागाळातून हळूहळू पायऱ्या चढत तू केवढी मोठी उंची गाठली आहेस, अरे स्वतः हिंमतीने मिळवलेले तुझे हे मोठे यश ओळख आणि रूबाबात रहा"! ही चौगुले साहेबांची वाक्ये माझ्या काळजाला भिडली आणि मला नवसंजीवनी मिळाली.

(७) किती काळ लोटला मध्ये! जवळजवळ २५ ते ३० वर्षे झाली. चौगुले साहेब त्यांच्या मार्गावर  व मी माझ्या मार्गावर! मधल्या काळात दोघांची प्रत्यक्ष गाठभेटच नाही आणि मग इतक्या वर्षांनी मी वकिलांच्या ग्रूपवर ती नैराश्यजनक पोस्ट लिहितोय काय, तिथे हे चौगुले साहेब (माझा अभ्यास गल्ली मित्र) अचानक येतात काय, माझ्या यशाची आठवण करून देतात काय व मग आम्ही इतक्या वर्षांनी फेसबुक मित्र होतोय काय हे सगळेच अचंबित करून टाकणारे! माझ्याच यशाचा मी शत्रू का झालो, स्वतःच स्वतःला जिंकण्याचा आनंद हा सर्वात मोठा असतो हे मी का विसरलो? मानवी यशाचे परिमाण काय? पैसा, छे पैसा तर कोणीही मिळवतो, वाटेल ते उलटसुलट धंदे करून! मोठमोठया गँगस्टर्स लोकांकडे का कमी पैसा आहे! यावरून हेच सिद्ध होते की मानवी जीवनात पैसा हे यशाचे परिमाण होऊ शकत नाही. जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे पण पैसा म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व नव्हे! जगण्यासाठी पोटाला अन्न आवश्यक आहे पण  माणूस जगण्यासाठी अन्न खातो की ते अन्न खाण्यासाठी जगतो? पैशाचेही साधारण तसेच आहे. माणसाचे जगणे व जनावरांचे जगणे यात फरक आहे. मानवी जीवनाचा अर्थ मोठा, या जीवनाची ध्येये मोठी, जगणे मोठे! या सर्व गोष्टी शाळा, कॉलेजात शिकूनही हे ज्ञान मी नैराश्येच्या गर्तेत सापडून विसरलो होतो.

(८) मला दुसरी संजीवनी मिळाली एका छोट्या मुलीकडून. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे माझे तरूण वकील मित्र ॲड. रूपेश मांढरे यांची ही कन्या. नाव वैदेही! काल तिच्या आईने म्हणजे रूपेशच्या पत्नीने (जी माझीही फेसबुक मैत्रीण आहे रूपेश बरोबर) वैदेहीचे वकिलाच्या ड्रेसमधील फोटो व तिचा वकिली युक्तीवादाचा छोटा व्हिडिओ कालची फेसबुक स्टोरी म्हणून टाकला. ते फोटो आणि चिमुकल्या वैदेहीचा तो रूबाबदार वकिली अवतार बघून माझे डोळे सताड उघडले. सोनाराने कान टोचल्यासारखे झाले माझे! रूपेश हा स्वतः तर वकील आहेच. पण तो त्याच्या पत्नीलाही वकील बनवतोय. एलएल. बी. च्या शेवटच्या वर्षाला आहे त्याची पत्नी आणि हे दोघेही त्यांच्या गोड कन्येला लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू देत आहेत हे बघून मला खूप बरे वाटले. या तिघांनी मिळून विशेष करून वैदेहीने माझ्यातला वकील पुन्हा जागृत केला.

(९) अरे, मी हे काय करून बसलोय? काय लिहितोय मी हे! नवोदित वकिलांना नवीन उमेद द्यायची सोडून मी स्वतः उगाच निराश होऊन त्यांनाही निराश करतोय! छे, छे! हे फार चुकीचे आहे. वकिली व्यवसाय हा काय साधासुधा व्यवसाय नव्हे! वकील व्हायला फार मोठी तपश्चर्या लागते. राजकारणी असोत नाहीतर सेलिब्रिटी असोत कायद्याच्या कचाट्यात अडकून वकिलाच्या अॉफीसमध्ये आल्यानंतर त्यांची काय भंबेरी उडते, ते किती केविलवाणे होतात, या लफड्यातून वाचवा हो म्हणून वकिलापुढे किती गयावया करतात, हे मी प्रत्यक्षात बघितले आहे. कारण मीही मुंबई हायकोर्टाच्या मोठमोठया वकिलांसोबत बसून तिथे बिनधास्त वकिली केली आहे. गरिबीतून वकील झालो म्हणून काय झाले. स्वकर्तुत्वावर वकिलाचा काळा कोट अंगावर चढवलाय. त्या बार रूममध्ये मी गरीब म्हणून तिथे बसू नको असे म्हणण्याची कोणत्याही मोठ्या वकिलाने हिंमत केली नाही. तशी  हिंमत कोणी करूच शकणार नाही.

(१०) राजकारणात पदांसाठी नेत्यांची हाजी हाजी करायला लावणारा व सेलिब्रिटी आयुष्य  जगण्यासाठी उलटसुलट उड्या मारायला लावणारा हा वकिली व्यवसाय नव्हे! अशा या प्रतिष्ठित वकिली व्यवसायात गेली ३२ वर्षे पाय घट्ट रोवून मी हिंमतीने उभा आहे. हे माझे यश मी विसरतोय हे मला ॲड. रूपेश मांढरे याच्या चिमुकल्या कन्येने (वैदेहीने) प्रात्यक्षिक करून दाखवून समजावून सांगितले.

(११) अरे मोठ्यांनो, तुम्ही काहीही उपद्व्याप करा, कितीही कोलांटउड्या मारा, आम्ही सर्व वकील तुमच्याकडे कायद्याच्या नजरेतून नजर ठेऊन आहोत हे लक्षात ठेवा! सद्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना नावाच्या पिल्लावरही आम्हा वकिलांची सक्त कायदेशीर नजर आहे. सर्व डॉक्टर मंडळी व पोलीसही या लढाईत जीव धोक्यात घालून त्यांचे उदात्त कार्य करीत आहेत. पण तरीही कायद्याची नजर ही वेगळी असते. कायदा म्हणजे काय हे त्यासाठी नीट लक्षात घ्यायला हवे. माझ्या मते कायदा म्हणजे निसर्गातील देवाचा सर्वोच्च आदेश! तो आदेश वकिलांना लवकर व छान कळतो हेही माझे वैयक्तिक मत! ते कोणाला पटो अगर न पटो! कोरोनावरील निसर्गाच्या त्या सर्वोच्च आदेशाचे सखोल विचारमंथन वकिलांच्या ज्ञानसागरात सद्या चालू आहे हे ध्यानात ठेवा! सुटेल कसा हा कोरोना कायद्याच्या नजरेतून, कायद्याच्या मगरमिठीतून!

(१२) हो, हे खरे आहे की कायद्याच्या राज्यात हाथसर सारखे बलात्कार सुरू आहेत. खून, बलात्कार करणारी ही नराधम मंडळी म्हणजे मनुष्याचे कातडे अंगावर पांघरून मोकाट सुटलेली हिंस्त्र जनावरेच! या नराधमांना वाटते की अजूनही जंगल राजच सुरू आहे. पण माणूस तो जंगलीपणा सोडून देऊन आता खूप पुढे येऊन पोहोचलाय. या सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात तुमची आता डाळ शिजणार नाही. वैदेही सारख्या क्रांतीकन्या तयार होत आहेत, तयार झाल्या आहेत. नराधमांनो, या सुशिक्षित, सुसंस्कृत मुली व स्त्रिया या क्रांतीकन्या आहेत. त्या तुमची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला जंगलात नेऊन वाघ, सिंहापुढे आता टाकता येईल. पण वाघ, सिंह तुम्हाला पटकन खाऊन टाकतील. तुमचे एनकांऊटर हा त्यातलाच आधुनिक प्रकार! पण अशी झटपट शिक्षा देऊन तुम्ही पटकन मोकळे होणार हे कायद्याला माहित आहे. म्हणून तर तुम्हाला कायद्याच्या जाळ्यात ओढून खूप नाचवायचे व हालहाल करून शेवटी कायद्याची कठोर शिक्षा द्यायची हाच आधुनिक कायद्याच्या राज्याचा न्याय आहे.

(१३) म्हणून तुमचे बारावे नाही तर चांगले तेरावे  घालण्यासाठी हा १३ आकडा माझ्या लेखाच्या शेवटी आलाय. वैदेही ही सर्व क्रांतीकन्यांची प्रतिनिधी आहे. मी तिला आता तिच्या फोटो व वकिली युक्तिवादाच्या व्हिडिओसह वकिलांच्या सर्व ग्रूप्सवर फिरवणार. उठा, मरगळ टाकून द्या असे वैदेही सगळ्या वकिलांना विशेष करून माझ्यासारख्या निराश झालेल्या वकिलांना सांगत फिरणार. वैदेहीवर पोस्ट बनवून तिला फेसबुकवर आणखी प्रसिद्ध करण्याची रितसर परवानगी मी तिच्या आईकडून व्हॉटसअप संवादातून घेतली आहे. विजय चौगुले वकील व कु. वैदेही मांढरे यांच्या वयात केवढे मोठे अंतर पण दोघांनीही माझे कान टोचले, माझे डोळे सताड उघडले व मला काल नवसंजीवनी दिली म्हणून तमाम वकील मंडळींच्या ज्ञान दरबारात माझी ही खास पोस्ट विनम्रपणे सादर करतोय. तिचा स्वीकार होईल अशी आशा बाळगतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३.१०.२०२०

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

हनी ट्रॕप!

हनी ट्रॕप काय आहे?

#साइबर_क्राइम जरूर पढे महत्वपूर्ण जानकारी।

आज कल फेसबुक पर 1 गिरोह बहुत तेजी से सक्रिय हुआ है, जो आप से बात करेगा और इमोशनली बात करेगा, और सहयोग की बात करेगा। जैसे ही आप विनम्र हो कर बात करेंगे वो आप से व्हाट्सएप या फेसबुक पर कॉल कर के बात करने को कहेगा वो खुद ही कॉल करेगा और वेरिफाई के लिये या विश्वास के लिये वीडियो कॉल करेगा या ऑडियो कॉल करेगा, और जैसे ही आप वीडियो कॉल उठाते है या कई बार ध्यान न होने के कारण लोग ऑडियो कॉल समझ के वीडियो कॉल रिसीव कर लेते हैं, और जैसे ही आप वीडियो कॉल रिसीव करेंगे,  यदि कोई महिला है, तो सामने वाला कोई लड़का या यदि कोई पुरुष कॉल रिसीव करता है तो सामने कोई लड़कीं का वीडियो आप को दिखाएंगे, और वो वीडियो अभद्र होगा, और उन सब का उद्द्देश्य होता है, आप का चेहरा वीडियो में आना, जैसे ही आप का चेहरा वीडियो में आता है, वो उसको वीडियो बना लेते है, बस #इतना_ही उनका काम है।

#फिर शुरू होता है उनका खेल, और वो उस वीडियो को एडिट कर के आप को धमकी देने लगेंगे, पैसा दो अन्यथा वीडियो वायरल कर देंगे, पैसे दोगे तो ही वीडियो डिलीट करेंगे और लोग डर के पैसा भी दे देते है, अपनी बदनामी के डर से। लेकिन पैसे बिल्कुल न दें, वरना वो दुबारा फिर मांग करेगा।

#इसलिए फेसबुक पर सोच समझ के वीडियो कॉल या ऑडियो कॉल रिसीवर करें, सोच समझ के फेसबुक मित्र बनाये।

लेखक- एडवोकेट हिमांशु गिरि
https://m.facebook.com/story.php?story_fbid=155399349564277&id=100052826378786


गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

माझ्या ज्ञानाची शोकांतिका!

माझ्या ज्ञानाची शोकांतिका!

मी एकटाच करतोय माझ्या लेखनाचा सगळा उपद्व्याप! मी काय विचार करतोय, काय लिहितोय याच्याशी माझी पत्नी व एकुलती एक उच्च शिक्षित मुलगी यांना काहीही घेणे देणे नाही, मग इतर नातेवाईक किंवा मित्रांची गोष्टच सोडा. मी पहिली दोन फेसबुक खाती अशीच वैतागून बंद केली. ५०० ते १००० पर्यंत पोस्टस साठल्या होत्या तिथे. पण एखादा संशोधक वैतागून स्वतःच्या हस्तलिखित वह्या फाडतो त्याप्रमाणे फेसबुकवर जतन केलेला तो लेखन साठा डिलिट करून टाकला. आता हे तिसरे फेसबुक खाते मी उघडलेय. कारण डोक्यात साठलेले ज्ञान व त्यावर निर्माण होत असलेले विचार कुठेतरी शेअर केल्याशिवाय मला स्वस्थ बसवत नाही. हा माझा एकखांबी मोठा बौद्धिक कारखाना आहे. देवाने म्हणा नाहीतर निसर्गाने म्हणा माझ्या डोक्यात बळ दिले, पण माझे पंख छाटून टाकलेत. त्यामुळे या ज्ञान व बुद्धीच्या बळावर उंच भरारी घेता येत नाही. मागच्या जुन्या फेसबुक खात्यावर मी छान लिहितो वगैरे बरीच स्तुती केली लोकांनी, पण त्या पलिकडे काही नाही. एक हैद्राबादचा वकील तर माझ्या लिखाणावर इतका खूश झाला की त्याच्या ओळखीने व खर्चाने माझ्या फेसबुक पोस्टसचा भला मोठा ज्ञानग्रंथच करूया म्हणून माझ्या बराच मागे लागला व शेवटी आशा लावून निघून गेला. काय सांगू मी स्वतःविषयी! अधिक काही बोललो तर आत्मप्रौढी होईल. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्रमुख माझ्या लेखनाचा काही भाग बघून मला म्हणाले की विद्यापीठाच्या आवारातील झाडाखाली रोज संध्याकाळी आपण बसू. मग तुम्ही हे जे काय लिहिलेय त्याचा अर्थ नीट समजावून सांगा. मग तुम्हाला पी.एच.डी. चे मार्गदर्शन करता येईल. पण विद्यापीठाच्या झाडाखाली बसून माझे लेखन त्या प्रमुखाला सांगण्याचा पुढे योगच आला नाही. ते कायदा विभाग प्रमुखही नंतर सेवानिवृत्त झाले. हे फेसबुक लिखाण तर काहीच नाही. माझ्या हस्तलिखित लिखाणाच्या जवळजवळ चाळीस मोठ्या वह्या कपाटात धूळ खात पडल्या आहेत. त्यांना कोणी सुद्धा  गॉडफादर मिळाला नाही. मग मी पाच वर्षापूर्वी फेसबुकला जवळ केले. पण इथेही निराशाच पदरी पडतेय. म्हणून मी वैतागून पहिली दोन फेसबुक खाती त्यावरील माझ्या ५०० ते १००० लेखांसह बंद करून टाकली. मागे एकदा मी इंडियन लॉ इन्स्टिट्यूटला माझ्या हस्तलिखित वह्यांची झेरॉक्स पाने सरळ रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून दिली. पण त्या इन्स्टिट्यूटच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी तो सगळा लेखन पसारा मला तसाच रजिस्टर्ड पोस्टाने न वाचता परत पाठवून दिला. मागे एका व्यक्तीने माझे लेखन बघून काय अॉफर द्यावी? तर म्हणे माझ्या लेखाचे मोठे पुस्तक होईल पण लेखक म्हणून त्या व्यक्तीचे नाव असेल त्या पुस्तकाला व त्याचा मोबदला म्हणून ती व्यक्ती काही पैसे मला देईल. मी नंतर डॉक्टरेट होण्याचा, लेखनाचे पुस्तक करण्याचा नादच सोडून दिला. ही आहे माझ्या ज्ञानाची शोकांतिका, माझ्या आयुष्याची सत्यकथा! आज अंतर्मनातील ही गोष्ट व्यक्त करून मनापासून मोकळा झालो बस्स एवढेच!

-ॲड.बी.एस.मोरे©२.१०.२०२०

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

समाजकार्याचा जेंव्हा पोपट होतो!

#couplechallenge एक बाजार कल्पना!

स्त्रियांना काय आवडते, त्या कोणता ड्रेस घालतात व त्यांच्या पुरूष जोडीदारांनाही काय आवडते वगैरेचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या तरी मार्केटिंग कंपनीने बहुतेक ही #couplechallenge ची भन्नाट कल्पना काढलीय की काय असे या सकाळ (सांगली परिसर) वृत्तपत्रातील बातमीतून दिसत आहे. या लोकांचे हे असे धंदेवाईक डोके चालते व मी उगाच असल्या गोष्टींना महत्व देऊन लोकांना सावध करण्याचे समाजकार्य हाती घेतले. या बातमीने माझ्या या उतावळ्या समाजकार्याचा पुरता पोपट झाला. काय अर्थ राहिला नाही या फेसबुकवर गंभीर, वैचारिक लेखन करण्याला!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.९.२०२०

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

देवा, सर्वांना सुखी व शांत ठेव!

देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव!

(१) निसर्गात देव आहे व तो निसर्गाचा निर्माता व नियंता आहे असे मानून "देवा, सगळ्यांना सुखी व शांत ठेव" अशी सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना कितीजण करत असतील? मुद्दा हा आहे की, अशी प्रार्थना करून सर्व जग व त्या जगातील सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे सुखी व शांत होऊ शकतात का?

(२) वनस्पतीजन्य प्राण्यांना मारून मांसाहारी हिंस्त्र प्राणी वनस्पतीजन्य प्राण्यांच्या मांसावर जगतात तेंव्हा वरील प्रार्थना अशी हिंसा रोखू शकत नाही हे सत्य आहे. तसेच तुम्ही दुसऱ्यांचे कितीही भले चिंता, दुसरी माणसे तुमचे हित जपतीलच याची शास्वती नाही. तुम्ही इतरांच्या शांतीची प्रार्थना कराल, पण तुमच्या अशांतीचे कारण बनणाऱ्या उपद्रवी माणसांचे तुम्ही काय कराल?

(३) माणूस हळूहळू उत्क्रांत झाला व मानवी संस्कृतीही हळूहळू विकसित झाली. उत्क्रांती ही झटपट क्रांतीची प्रक्रिया नव्हे. निसर्गाच्या विज्ञानाविषयी सुशिक्षित झालेला माणूस हा निसर्गाच्या व समाजाच्या पर्यावरणाविषयी सुसंस्कृत असेलच असे नाही. तसे असते तर मग मानव समाजाला पर्यावरणीय रक्षणाचे व सामाजिक सुसंस्कृतपणाचे कायदे करावेच लागले नसते.

(४) तुमच्या चांगुलपणाकडे अर्थात तुमच्या सुसंस्कृतपणाकडे पाठ फिरवून असंस्कृतपणा इतकेच नव्हे तर हिंसक गुन्हेगारीपणा दाखवून तुमच्यावर उलटणाऱ्या माणसांबरोबर तुमचे वर्तन कसे असेल? मानसिक समाधान म्हणून सर्वस्वार्थसमभावी प्रार्थना ठीक, पण प्रत्यक्ष व्यवहार हे अशा आध्यात्मिक देव प्रार्थनेवर आधारित असू शकत नाहीत.

(५) खरं तर, निसर्गात देव आहे असे मानून चालले तरी तो देव तुम्हाला देवभोळे व्हा असे सांगत नाही तर व्यवहारी व्हा असेच सांगतो. या व्यवहाराचे मूलभूत नैसर्गिक तत्व काय तर जशास तसे वागणे. तुमच्यावर अन्याय करून सुसंस्कृतपणाने जगण्याचा तुमचा हक्क जर कोणी बळाने हिसकावून घेऊ लागला तर तुम्ही त्याच्यापुढे देवाची प्रार्थना करीत बसणार की त्याला तुमचा जशास तशाचा हिसका दाखवून वठणीवर आणणार? फौजदारी कायदा तर हेच शिकवतो ना!

(६) स्वभाव गुणधर्मानुसार समाजात सुसंस्कृत, असंस्कृत व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. आंतरमानवी संबंधातून निर्माण होणाऱ्या नात्यांचेही तीन प्रकार निरीक्षण व अभ्यासातून माझ्या लक्षात आले आहेत. पहिला प्रकार म्हणजे वीट येऊन संपृक्त अवस्था प्राप्त झालेली मृत नाती, दुसरा प्रकार म्हणजे सद्या अचल पण भविष्यात चल होऊ शकणारी संभाव्य उर्जेची अचल नाती व तिसरा प्रकार म्हणजे प्रेम व व्यवहाराच्या संततधारेने खेळती राहिलेली वाहत्या उर्जेची चल नाती!

(७) आंतरमानवी नातेसंबंधातील वरील तीन प्रकारचे वर्गीकरण मी मनुष्य स्वभावाच्या गुणधर्मानुसार केले आहे. पदार्थांच्या गुणधर्मा नुसार वागणे म्हणजे जशास तसे वागणे. असे गुणधर्मीय वर्तन हेच जर निसर्गाचे नैसर्गिकत्व आहे तर मग तेच निसर्गातील देवाचे देवत्व आहे असे तार्किक अनुमान निघते.

(८) या निसर्ग नियमाला जर निर्जीव पदार्थ, मानवेतर सजीव पदार्थ व माणूस हे सगळेच जण बांधील आहेत तर मग निसर्गातील देव या नियमापासून कसा मुक्त राहील? देवाची भक्ती किंवा अध्यात्म हे सुद्धा या नियमापासून मुक्त होऊ शकत नाही किंवा अपवाद होऊ शकत नाही असे मला वाटते.

(९) म्हणून प्रभो गुणधर्मा असेच निसर्गातील देवाचे नामस्मरण करीत जशास तसे नियमाने गुणधर्मीय वर्तन करणे हीच निसर्गातील देवाची भक्ती होय, देवपूजा होय असे माझे वैयक्तिक मत आहे. मी निसर्गातील देवाला निसर्गाचा आधार मानत असल्याने निसर्गाच्या विज्ञानातच मी देवाचा धर्म बघतो. माझ्या या वैयक्तिक मताशी सगळेजण सहमत होणार नाहीत हे मला माहित आहे. पण हे माझे वैयक्तिक मत असल्याने त्यावर वादविवाद घालू नयेत ही नम्र विनंती!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.९.२०२०

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

व्यवहारज्ञान घेऊन व्यवहारी बना!

व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!

अन्न, वस्त्र, निवारा ही मनुष्याच्या जीवनावश्यक  गरजा भागविणारी मूलभूत साधने! ही साधने निसर्गात कच्च्या स्वरूपात सापडतात. म्हणजे जमीन, हवा, पाणी व सूर्यप्रकाश यांच्या सोबत नैसर्गिक बी बियाणे या गोष्टी निसर्गात फुकट सापडतात ज्यातून अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत साधनांची पक्क्या स्वरूपात निर्मिती करता येते. म्हणजे निसर्ग माणसाला कच्चे भांडवल फुकट पुरवतो. त्याबदल्यात निसर्गाला हवे असतात ते माणसाचे बौद्धिक व शारीरिक श्रम. मानवी श्रम व निसर्गाकडून मिळणारे फुकटचे कच्चे भांडवल यांच्यात भौतिक व्यवहाराची देवाणघेवाण होत असते व ती व्यावहारिक देवाणघेवाण नैसर्गिक असते ज्यात व्यवहार असतो. निसर्गाबरोबरचा हा मूलभूत भौतिक व्यवहार पार पाडल्यानंतर पुढे सुरू होते ती आंतरमानवी व्यावहारिक देवाणघेवाण व या देवाणघेवाणीचे सामाजिक माध्यम असते तो म्हणजे पैसा. आंतरमानवी भौतिक व्यवहार हा मुख्यत्वे पैशाच्या माध्यमातून होतो. निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार व माणूस व माणूस यांच्यातील पूरक भौतिक व्यवहार यांचे नियमन दोन कायद्यांकडून होते ते म्हणजे निसर्गाचा मूलभूत नैसर्गिक कायदा व मानव समाजाचा पूरक सामाजिक कायदा. मानवी जीवन टिकून राहण्यासाठी स्री व पुरूष यांच्यातील लैंगिक पुनरूत्पादन हा सुद्धा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. कारण स्त्री व पुरूष निसर्गानेच निर्माण केले आहेत व त्यांच्यात लैंगिक वासना ही सुद्धा निसर्गानेच निर्माण केली आहे म्हणजे कच्चे भांडवल हे निसर्गानेच पुरवले आहे. या कच्च्या भांडवलावर होणारा स्त्रीपुरूषातील लैंगिक व्यवहार हा निसर्ग व माणूस यांच्यातील मूलभूत भौतिक व्यवहार होय. पण याच निसर्ग प्रेरित मूलभूत भौतिक व्यवहारातून मानव समाजाची निर्मिती झाली. मग पुढे या मूलभूत भौतिक लैंगिक व्यवहाराचे सामाजिक नियमन करणे गरजेचे झाले. त्यातून वैवाहिक संबंध यासारखे पूरक भौतिक व्यवहार निर्माण झाले व मग या पूरक भौतिक व्यवहारांचे नियमन करण्यासाठी त्याप्रकारचे पूरक सामाजिक कायदे निर्माण झाले. निसर्गाचा मूलभूत भौतिक कायदा काय किंवा समाजाचा पूरक भौतिक कायदा काय हे कायदे निसर्ग व माणूस व त्याबरोबर माणूस आणि माणूस यांच्यातील भौतिक व्यवहारांचे अर्थात भौतिक व्यावहारिक देवाणघेवाणीचे नियमन करतात. या भौतिक व्यवहारांत जे काही देवाचे अध्यात्म घुसले आहे ते आभार प्रदर्शनाचे अध्यात्म आहे म्हणजे निसर्गाकडून मनुष्याला जे आयते, फुकट कच्चे भांडवल मिळते त्याबद्दल निसर्गराजा किंवा निसर्गातील देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे अध्यात्म आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. पण शेवटी या सगळ्याच्या पाठीमागे निसर्गाचा भौतिक व्यवहार आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून व्यवहार ज्ञान घेऊन व्यवहारी बना!

-ॲड.बी.एस.मोरे©२७.९.२०२०