वकिली व झोपेचे गणित!
जवळजवळ वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका श्रीमंत क्लायंटला घेऊन मुंबई हायकोर्टात एका कोर्ट रूम मधून दुसऱ्या कोर्ट रूममध्ये बसत होतो. क्लायंट श्रीमंत पण घरच्या कौटुंबिक वादामुळे रस्त्यावर आलेला. मीही रस्त्यावरचा गरीब वकील पण कंपनी सेक्रेटरी (इंटर) पात्रतेमुळे मला कंपन्यांची लिगल कन्सल्टन्सी मिळत गेली. एका कंपनीने मला त्यांच्या धर्मादाय संस्थेसाठी मोफत कायदा सल्ला व सहाय्य केंद्र सुरू करण्यासाठी फोर्ट मध्ये त्यांचे छोटे कार्यालय दिले. तिथे हा रस्त्यावर आलेला श्रीमंत क्लायंट मला भेटला. त्याची केस मी काही दिवस तरी फुकट चालवावी अशी त्याने विनंती केली. मग मी माझ्या कंपनीच्या लिगल स्टेनो टायपिस्टच्या मदतीने माझ्या लेटर हेडवर धडाधड विरूद्ध पार्टीला कायदेशीर नोटीसा पाठवू लागलो. केसचा अभ्यास मुळापासून करणे ही माझी पूर्वीपासून सवय. त्यामुळे माझी एक लिगल नोटीस म्हणजे अभ्यासपूर्ण वकिलीचा दणका होता. समोरची पार्टी जबरदस्त श्रीमंत व त्यामुळे त्या पार्टीचे वकील खूप मोठे. पण मी त्यांना न जुमानता त्यांच्याशी लढत होतो. परंतु तरीही असे नुसत्या लिगल नोटीसींवर किती दिवस चालणार होते? माझ्या त्या श्रीमंत क्लायंटला मी समजावून सांगितले. अरे बाबा, ही लढाई मोठी आहे. मी लिगल कन्सल्टन्ट वकील. समोरच्या मोठ्या वकिलांविरूद्ध मी हायकोर्टात काय युक्तिवाद करणार? मी तुझ्या केसमध्ये विरूद्ध पार्टीला सरळ करण्यासाठी एक मनाई हुकूमाचा अर्ज तयार करतो पण तू काहीही करून कुठूनही थोडे पैसे उसने घे. आपण माझ्या मनाई हुकूम अर्जावर छान युक्तिवाद करणारा मोठा वकील (काऊन्सेल) करू. त्या क्लायंटला ते पटले. परंतु असा मोठा वकील शोधायचा कसा?
मी तर रस्त्यावरचा गरीब वकील. माझ्या या श्रीमंत क्लायंटला घेऊन संध्याकाळच्या मोफत कायदा केंद्र कार्यालयाची वेळ संपली की तिथे जवळ असलेल्या सी.एस.टी. रेल्वे स्टेशनवर जाऊन आम्ही दोन रेल्वे प्लाटफाॕर्म तिकीट काढायचो व जो प्लाटफाॕर्म रिकामा, शांत असायचा तिथे त्याच्या केसवर चर्चा करीत अभ्यास करीत बसायचो. माझ्या मोठ्या वकिलांशी ओळखी कशा असणार? तरीही आम्ही अशा मोठ्या वकिलाचा शोध सुरू केला. आम्ही दोघे हायकोर्टात निरनिराळ्या कोर्ट रूम्समध्ये जाऊन कोणता मोठा वकील चांगला युक्तिवाद करतोय हे ऐकत फिरायचो. माझ्या बॕगमध्ये मी स्वतः अभ्यास करून तयार केलेला मनाई हुकूम अर्ज जवळ ठेवला होता कारण त्यावर मोठ्या वकिलाबरोबर चर्चा करणे आवश्यक होते.
एका कोर्ट रूममधून दुसऱ्या कोर्ट रूममध्ये फिरत असताना आमच्या केसशी साम्य असलेल्या मुद्यांवर एक काऊन्सेल युक्तिवाद करताना दिसले. ती केस प्रसिद्ध चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांची होती. मी माझ्या क्लायंटच्या कानात हळूच सांगितले की हेच वकील करूया मी तयार केलेल्या मनाई हुकूम अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी. क्लायंटला ते पटले. मग दिलीप कुमार केसचा युक्तिवाद संपल्यावर ते मोठे वकील रूबाबात बाहेर पडले. माझ्या अंगावर काळा कोट होतात. मी त्यांच्या मागे धावून "सर, सर प्लीज मला एका केसमध्ये मनाई हुकूम अर्जावर तुमच्या युक्तिवादासाठी तुमची भेट हवीय" असे म्हणालो. मग त्या वकिलांनी मला त्यांच्या आॕफीसचे कार्ड दिले व माझ्या क्लायंटला घेऊन सोबत ५०००० रू. फी घेऊन दुसऱ्या दिवशी बरोबर संध्याकाळी ६.३० वाजता यायला सांगितले.
आता त्या क्लायंटला त्यावेळी एवढी मोठी रक्कम पटकन गोळा करणे हे आव्हान होते. पण त्याने दुसऱ्या दिवशी कुठून तरी व्याजाने तेवढी मोठी रक्कम तयार केली व माझ्या फोर्टमधील मोफत कायदा केंद्र कार्यालयात संध्याकाळी ६ वाजता ती रक्कम घेऊन आला. मग आम्ही दोघे लगेच टॕक्सी करून संध्याकाळी बरोबर ६.३० वाजता त्या काऊन्सेल वकिलाच्या आॕफीसमध्ये पोहोचलो.
आॕफीसमध्ये पोहोचल्याबरोबरच त्या मोठ्या वकिलांनी मला पहिलाच प्रश्न केला "अरे, ५०००० रूपये घेऊन आलास ना"? मी लगेच माझ्या क्लायंट कडून ५०००० रू. चे पैशाचे पुडके घेऊन त्या मोठ्या वकिलांच्या पुढे ठेवले. त्यांनी ते पटकन त्यांच्या टेबलाच्या खणात टाकून दिले. मी म्हणालो "साहेब, पैसे मोजून घ्या"! तर ते वकील हसत हसत मला म्हणाले "अरे, तू एकदम ज्यूनियर वकील दिसतोस. आण तुझा तो मनाई हुकूम अर्ज"! मग मी तो अर्ज त्यांच्या हातात दिला. त्यांनी काही क्षणातच तो वाचून काढला व माझे कौतुक करीत म्हणाले "अर्ज छान बनवलास तू. परंतु या केसची हियरिंग तर उद्या लगेच आहे. मी रात्री बरोबर ८ वाजता झोपतो व रात्री ८ ते मध्यरात्री ३ अशी ७ तास झोप काढतो व मध्यरात्री ३ ते सकाळी ६ असा केसेसचा अभ्यास करून बरोबर सकाळी १०.३० वाजता युक्तीवाद करण्यासाठी हायकोर्टात हजर राहतो". त्यांनी माझ्या कडून केसची ब्रिफ नीट ऐकून घेतली. ती ऐकताना मला अधूनमधून कडक शब्दांत सुनावले व मग आम्हा दोघांना दुसऱ्या दिवशी जिथे आमची केस बोर्डावर लागली होती त्या कोर्ट रूममध्ये बरोबर सकाळी १०.३० वाजता हजर रहायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी मी व माझा क्लायंट त्या कोर्ट रूममध्ये हजर राहिलो तर आमच्या अगोदर ते मोठे वकील (काऊन्सेल) तिथे हजर होते. त्यांनी आमच्या केसचा मध्यरात्री ३ ते सकाळी ६ असा जबरदस्त अभ्यास केल्याचे समोर दिसतच होते. बरीच जजमेंटस ब्रिफमध्ये काढून तयार ठेवली होती. कायद्याची जाडजूड पुस्तके सोबत होती. त्यांना मदत करण्यासाठी दोन ज्यूनियर वकील सोबत होतेच. त्यांनी मलाही काळा कोट व गाऊन चढवून युक्तिवादाच्या वेळी त्यांच्या सोबत बसण्याची सूचना केली. मी कोर्टाबाहेर जाऊन अंगावर काळा कोट, वर काळा गाऊन व शर्टावर पांढरी गळपट्टी लावून रूबाबात आमच्या त्या मोठ्या वकिलांच्या शेजारी येऊन बसलो.
आमचा नंबर आला व मग मी तयार केलेल्या मनाई हुकूम अर्जावर त्या मोठ्या वकिलांनी हळूहळू आवाज चढवत जबरदस्त युक्तिवाद सुरू केला. अधूनमधून सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे एकेक जजमेंटस ते न्यायाधीशांना देत होते. समोरही तेवढेच तगडे, मोठे वकील उभे होते. त्यांनी पण माझ्या मनाई हुकूम अर्जावर पुढची तारीख न मागता विरोधी युक्तिवाद केला. पण माझी काऊन्सेलची निवड योग्य ठरली व कोर्टाने मी तयार केलेला तो मनाई हुकूम अर्ज आमच्या बाजूने मंजूर केला. तो निकाल म्हणजे त्या केसच्या मुळावरच घाव घालणारा निकाल होता. त्यावेळी ते काऊन्सेल जिंकले पण माझ्या क्लायंटने तो माझाच विजय आहे हे स्वीकारले व त्याच रात्री मला मोठ्या हॉटेलात जेवू घालून घरी नेण्यासाठी माझ्या आवडीची एक किलो भारी मिठाई म्हणजे काजू कतली दिली व माझ्या हातात ५००० रू. फी दिली जी फी माझ्यासाठी जबरदस्त फी होती.
माझ्या खडतर वकिलीचा हा मोठा अनुभव माझ्या झोपेच्या सवयीशी निगडीत आहे. मला त्यावेळी जर दररोज वकिलीची नियमित कामे मिळत गेली असती व त्या कामांची योग्य ती फी नियमित मिळत गेली असती तर माझे झोपेचे चक्र कधीच बिघडले नसते. रात्री ८ ते मध्यरात्री ३ एवढी त्या मोठ्या वकिलांच्या ७ तासांच्या नियमित झोपेची सवय माझ्यासाठी आश्चर्यकारक होती. माझी झोप मात्र माझ्या अनियमित वकिलीने मोडली ती कायमचीच!
-©ॲड.बी.एस.मोरे, १६.३.२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा