https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
शनिवार, २५ मे, २०२४
निसर्ग हाच मोठा चमत्कार!
नैतिक गोष्ट, कायदेशीर गोष्ट फरक!
वास्तवात जगताना!
वास्तवात जगताना!
निसर्गाची विविधता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या विविधतेला निसर्गाच्या विविध ज्ञान शाखा चिकटलेल्या आहेत. माणूस त्याच्या जन्मानंतर साधारण तीन वर्षांनी बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व महाविद्यालये या खालच्या पायरीपासून वरच्या पायरी पर्यंतच्या शैक्षणिक संस्थांतून या ज्ञान शाखांचे शिक्षण घेतो व पुढे तरूण, प्रौढ वयात या ज्ञानाचा वापर करून हळूहळू सरावाने त्यात विशेष प्रावीण्य, कौशल्य मिळवून तज्ज्ञ होतो. माणसे येतात, जातात पण नैसर्गिक विविधतेला चिकटलेल्या या ज्ञान शाखा व त्यांना संलग्न असलेल्या विविध शैक्षणिक संस्था व कार्यशाळा कायम राहतात.
माणसे निसर्गाच्या विविधतेचे ज्ञान मिळवून व त्यात कौशल्य प्राप्त करून या विविधतेची एकमेकांशी देवाणघेवाण करतात व निसर्गाचे वास्तव जगतात. ते जगण्यासाठी माणसे एकमेकांवर अवलंबून असतात व म्हणून तर विविधतेची आंतरमानवी देवाणघेवाण होते. माणूस स्वयंपूर्ण असता तर अशी देवाणघेवाण शक्य झाली नसती.
माणसे निसर्गाचे वैविध्यपूर्ण वास्तव जगताना त्यात काल्पनिक रंग भरून हे वास्तव मनोरंजक करतात. हे वास्तव जगताना येणारा प्रत्यक्ष अनुभव व घडणाऱ्या प्रत्यक्ष घटना माणसे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतात व त्यातून एकमेकांशी शाब्दिक संवाद साधतात. ही मानवी अभिव्यक्ती नैसर्गिक असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क कायद्याने काही अटी शर्तींसह मान्य केला आहे.
निसर्गाच्या वैविध्यपूर्ण वास्तवाचा अनुभव घेत माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे. इथे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अभिप्रेत आहे, जनावर म्हणून जगण्याचा नव्हे.
-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४
आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!
आध्यात्मिक प्रार्थनेने वास्तव बदलत नाही!
आपण सर्वजण निसर्ग व्यवस्थेचे व त्या व्यवस्थेअंतर्गत आपण आपल्या बुद्धीने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेचे गुलाम आहोत. निसर्ग व्यवस्थेत वाघ हरणाला जबड्यात पकडून ठार मारून खातो तर समाज व्यवस्थेत मूठभर धनदांडगे सर्वसामान्यांची सर्व बाजूंनी पिळवणूक करून आणखी धनश्रीमंत व बलदांडगे होतात. ही समाज व्यवस्था निसर्गाच्या बळी तो कानपिळी या निसर्ग नियमावर आधारित निसर्ग व्यवस्थेला पूरक आहे. नैतिकता व कायद्याचे राज्य या संकल्पनेची वरवरची रंगरंगोटी केल्याने निसर्ग व समाज व्यवस्थेतील कटू वास्तव बदलत नाही. इथे बौद्धिक प्रश्न हा आहे की, परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने वाघाच्या जबड्यातील हरणाची सुटका करता येत नसेल तर त्या प्रार्थनेचा उपयोग काय? पण असो, जे आहे ते आहे!
-©ॲड.बी.एस.मोरे, २५.५.२०२४
शुक्रवार, २४ मे, २०२४
काय चाललंय काय?
काय चाललंय काय?
या जगात आजूबाजूला ज्या गोष्टी बघायला मिळतात त्यातून काय चाललंय काय हा प्रश्न माझ्या मनात उत्पन्न होतो. कदाचित माझी बुद्धी उतार वयात नीट काम देत नसल्यामुळे असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतील.
या प्रश्नास कारण की, आजूबाजूला जो तमाशा चाललाय त्या तमाशात एखादी प्रसिद्ध नटी साधा नाही तर तब्बल तीनचारशे कोटी रूपयांचा नेकलेस गळ्यात घालून त्याचे जाहीर प्रदर्शन करते. याच तमाशात हजारो कोटीची संपत्ती बाळगणारे प्रसिद्ध खेळाडू, कलाकार त्यांच्या जाहिरातीतून जंगली रमी सारखे आॕनलाईन गेम्स खेळायला लोकांना उद्युक्त करतात.
याच तमाशात एखादा अती श्रीमंत उद्योगपती त्याच्या मुलांच्या लग्नात करोडो रूपयांचा चुराडा करून त्याच्या श्रीमंतीचे जाहीर प्रदर्शन करतो. याच तमाशात एखादा श्रीमंत उद्योजक त्याच्या लाडक्या पोरास अल्पवयातच महागडी कार खेळणे म्हणून चालवायला देतो. याच तमाशात एखादा खंडणीखोर भाई गळ्यात सोन्याच्या चैनी व बोटांत हिऱ्यांच्या अंगठ्या घालून मिरवतो व अप्रत्यक्षपणे बेकार पोरांना स्वतःचा महान आदर्श घालून देतो. आणि हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत त्याचे खूप कौतुक वाटून सर्वसामान्य माणसे टाळ्या वाजवत बसतात आणि याच महान लोकांच्या गुलामीत पिढ्यानपिढ्या आयुष्य पुढे ढकलत राहतात.
काय चाललंय काय?
-©ॲड.बी.एस.मोरे, २४.५.२०२४
गुरुवार, २३ मे, २०२४
विकासाचा फुगा!
ज्येष्ठांची मैत्री?
ज्येष्ठांची मैत्री?
लहान व तरूण वयात वाढलेली मित्र संख्या उतार वयात कमी होते की वाढते? शाळा, कॉलेजातील मैत्री ही अपरिपक्वतेची किनार असलेली मैत्री. पण हेच जुने मित्र वृद्धापकाळी जगाचे प्रगल्भ ज्ञान व जीवनाचा परिपक्व अनुभव बरोबर घेऊन जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांना स्वतःचा शहाणपणा सांगण्यात व एकमेकांच्या आयुष्याचा हिशोब मांडण्यात धन्यता मांडतात. कशी वाढेल व टिकेल अशी मैत्री? म्हणून मी स्वतः वयाने ज्येष्ठ असूनही अशा ज्येष्ठ मित्रांनाच काय पण इतर ज्येष्ठ लोकांना सुद्धा टाळतो कारण एकतर त्यांच्या गप्पा म्हणजे एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या किंवा स्वतःच्या शहाणपणाचा गर्व. मी याच गोष्टी साठी फोन संपर्कातील व्हॉटसॲप माध्यम टाळतो कारण समोरच्याला माझा एखादा लेख शेअर करावा तर कदाचित त्याच्या मनात "आलाय मोठा शहाणा" असा भाव निर्माण होण्याची भीती असते. म्हणून मी फेसबुक, लिंकडइन सारख्या समाज माध्यमातून व्यक्त होणे पसंत करतो कारण तिथली मंडळी मला तशी अनोळखी असतात व मी प्रसारित केलेल्या बौद्धिक विचारावर कुणी जास्त शहाणपणा केला तर त्याला तिथल्या तिथे ब्लॉक करण्याची अशा समाज माध्यमावर छान सोय असते. वृद्धापकाळी तुम्हाला तुमचे ज्ञान, अनुभव व बौद्धिक विचार मुक्तपणे शेअर करण्याची जिथे सोय नाही तिथे ज्येष्ठ मैत्री शक्य नाही.
-©ॲड.बी.एस.मोरे, २३.५.२०२४