निसर्ग एक दुभती गाय!
निसर्ग हा कोणाला परमेश्वर वाटतही असेल. पण मी निसर्गाला दुभत्या गायीच्या रूपात बघतो. निदान पृथ्वी तरी मला दुभती गाय म्हणजे गोमाता वाटते जी तिच्या लेकरांना सतत दूध देऊन त्यांना उपाशी मरू देत नाही.
या दुभत्या गायीचे दूध काढणारी व पिणारी असंख्य माणसे पृथ्वीवर जन्मतात, दूध पिऊन जगतात व शेवटी जीवनचक्रात मरतात. पण गाय मात्र आहे तिथेच दूध पुरवत कायम आहे. पण हळूहळू मनुष्य नावाच्या तिच्या लेकरांची संख्या वाढत गेली. अर्थात लोकसंख्या वाढत गेली आणि तिच्या लेकरांत तिचे दूध काढण्याची (उत्पादन कामाची) व ते दूध पिण्याची (उपभोग घेण्याची) स्पर्धा वाढत गेली.
तिच्या लेकरांना तिनेच बुद्धी दिलीय. पण ही लेकरे निर्बुद्ध होऊन हावरट झाली व मर्यादेच्या बाहेर जाऊन त्यांची लोकसंख्या व स्पर्धा वाढवत गेली. बेअक्कली कुठली. त्यांच्या जन्मदात्या व पोषणकर्त्या आईलाही तिच्या मर्यादा आहेत एवढी साधी अक्कल असू नये या हावरट पोरांना.
यातली काही शहाणी, अतीशहाणी पोरं तर मूळ प्रश्न समजून घेऊन त्याचे मूळ उत्तर शोधायचे सोडून एकमेकांना बुड नसलेली तत्वज्ञाने पाजळत, वरवरचे उपदेश करीत फिरत आहेत.
ही पोरं म्हातारी झाल्यावर मात्र दूध काढण्याच्या व दूध पिण्याच्या या स्पर्धेतून निवृत्त होऊन शांत होतात. पण त्यांनी निर्माण केलेली पोरं पुन्हा नव्या उमेदीने व मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत भाग घेऊन या आईला हवे तसे ओरबाडण्यास सुरूवात करतात. धन्य धन्य या पोरांची!
-©ॲड.बी.एस.मोरे, २१.५.२०२४