देववाणी!
पृथ्वीवरील सृष्टीची रचना जर नीट तपासली तर असे दिसून येते की जी रचना निर्जीव पदार्थांसाठी आहे ती अर्धसजीव वनस्पतींसाठी नाही, जी रचना अर्धसजीव वनस्पतींसाठी आहे ती सजीव पशुपक्षांसाठी नाही व जी रचना सजीव पशुपक्षांसाठी आहे ती माणसांसाठी नाही कारण माणसांसाठी निसर्गाने एक विशेष जबाबदारीची रचना रचली आहे आणि तरीही या सर्व नैसर्गिक रचना त्यांच्यातील सर्व निर्जीव, सजीव पदार्थांसह एकमेकांशी संलग्न असून त्या एकमेकांना एका समान धाग्याने बांधलेल्या आहेत व समान पर्यावरणीय साखळीत बद्ध आहेत.
माणूस हा विशेष प्राणी पर्यावरणीय साखळीत अगदी शेवटी व वरच्या टप्प्यावर उत्क्रांत, विकसित झाला आहे. पीटर हिग्ज या नोबेल विजेत्या वैज्ञानिकाने चैतन्य, उर्जा व बल यांनी युक्त असा मूलकण पदार्थाला चिकटल्यानेच पदार्थाला वस्तुमान प्राप्त होते हा शोध लावला व त्यातून विश्वाच्या पदार्थीय रचनेचे कोडे थोडे उलगडले असले तरी त्यातून माणूस हा प्राणी उत्क्रांती प्रक्रियेतून निर्माण होऊन विकसित होत असताना त्याच्या मेंदूला सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना नेमकी कधी व कशी चिकटली याचा स्पष्ट वैज्ञानिक शोध अजून तरी लागलेला नाही. त्यामुळे मानवी मेंदूची सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना यांनी मिळून निर्मिलेल्या, रचलेल्या मानव धर्म व मानव समाज कायदा यांच्या पाठीमागे कोणती तरी प्रेरक उच्च चैतन्यशक्ती असावी जी यांत्रिक पद्धतीने कार्य करीत असलेल्या भौतिक पदार्थ व रसायन विज्ञानाहूनही श्रेष्ठ म्हणजे पदार्थीय विश्वाहून/निसर्गाहूनही श्रेष्ठ असावी व या विशेष चैतन्यशक्तीने पदार्थीय विश्वाची/निसर्गाची निर्मिती करताना मनुष्य नावाच्या विशेष प्राण्याची निर्मिती केली असावी हा कुतूहल मिश्रित प्रश्न मानवी मनाला सतत पडतो.
पदार्थ व रसायन विज्ञानाचा अधिक प्रगत असा यांत्रिक उपयोग करून मानवी बुद्धीने या मूलभूत विज्ञानात तांत्रिक क्रांती केली, पण त्याही पुढे जाऊन मनुष्याने त्याच्या सुज्ञ बुद्धी व उदात्त भावनेच्या जोरावर धर्म, कायदा यांची निर्मिती करून मानव समाजात सांस्कृतिक क्रांती केली. याच सांस्कृतिक क्रांतीत कुठेतरी परमेश्वर (निसर्गाहूनही श्रेष्ठ अशी विशेष चैतन्यशक्ती) असल्याचे मानवी मनाला जाणवते व धर्म, कायदा ही देववाणी वाटू लागते.
-©ॲड.बी.एस.मोरे, २३.४.२०२४